द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष -
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदार हे वालवणे येथील मयत शेतकरी श्री.नाथा बजाबा पठारे यां मुलगा आहे. दि.23/05/2005 तक्रारदारांचे वडील ट्रॅक्टरमधून माती भरुन शेतातून चालले असताना अचानक ट्रॅक्टर घसरला व त्याखाली तक्रारदारांचे वडील श्री.नाथा बजाबा पठारे सापडले व त्याच जागेवर त्यांचा मृत्यु झाला. श्री.नाथा हे त्यांच्या कुटूंबातील एकमेव मिळवते होते. श्री.नाथा यांच्या मृत्युमुळे त्यांचे कुटूंबीय निराश्रीत व कर्जबाजारी झाले.
2) मयत श्री.नाथा बजाबा पठारे यांचा मुलगा म्हणजेच तक्रारदार श्री.प्रशांत यांना महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा अपघाती मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटूबियांसाठी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना लागू केल्याची माहिती मिळाली. वरील माहिती मिळाल्यानंतर क्लेम सादर करण्यासाठी आवश्यक ते कागदपत्र जमा करुन वडिलांच्या मृत्युनंतर 8 दिवसांचे आत क्लेम फॉर्म भरुन तो गांवकामगार तलाठी यांना दिला. गांवकामगार तलाठी यांनी सदरचा अर्ज तहसिलदार, ता.पारनेर यांना पाठविला व तहसिलदार यांनी सदरचा अर्ज सामनेवाला कंपनीकडे पाठविला. परंतु अद्यापपर्यंत सामनेवाला कंपनीने तक्रारदारांच्या क्लेमबद्दल निर्णय घेतला नाही.
3) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी सामनेवाला यांचेकडे त्यांच्या क्लेमबाबत चौकशी केली असता सामनेवाला यांनी फक्त त्यांना पोकळ आश्वासने दिली. त्यानंतर दि.19/08/2005 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना पत्र पाठविले. सदर पत्रान्वये तक्रारदारांनी ते मयताचे कायदेशीर वारस आहेत असा पुरावा दाखल केलेला नाही म्हणून क्लेम प्रलंबित ठेवण्यात आला आहे असे कळविले. वरील पत्र मिळाल्यानंतर तक्रारदारांनी मा.न्यायाधीश, दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, ता.पारनेर यांचे कोर्टात वारस दाखल मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. अर्जासंबंधीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने तक्रारदारांना वारस दाखल दिला. तक्रारदारांनी सदरचा वारस दाखला दि.13/12/2006 रोजी सामनेवाला यांचे संबंधीत अधिका-यांना देवून त्याची छायांकित प्रतीवर सही घेतली. तरी सुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या क्लेमबाबत निर्णय न घेतल्यामुळे तक्रारदारांनी दि.05/12/2008 रोजी सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस दिली. सदर नोटीसीस सामनेवाला यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या वडिलांच्या अपघाती मृत्युबद्दल रक्कम रु.1 लाख नुकसानभरपाई द्यावी असे सामनेवाला यांना आदेश करावा तसेच वरील रकमेवर सामनेवाला यांनी 12 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावी असा आदेश सामनेवाला यांना करावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी नुकसानभरपाईपोटी रु.20,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रु.5,000/- ची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्र दाखल केली आहेत. त्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या नांवे असणारे 7/12 च्या उता-याची प्रत, खाते उता-याची प्रत, तक्रारदारांनी त्यांच्या वडिलांना अपघात झाल्यानंतर सदर बाबत पोलिस स्टेशनला दिलेल्या प्रथम खबरीची छायांकित प्रत, घटनास्थळाचा पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा तसेच शवविच्छेदन अहवाल इत्यादींच्या प्रती जोडलेल्या आहेत. तसेच सक्सेशन सर्टिफीकेट ची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे जोडली आहेत.
4) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. तक्रारअर्ज गैरसमजूतीवर आधारलेला असून तक्रारअर्जात केलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. सामनेवाला यांचेकडून निव्वळ पैसे उकळण्याच्या उद्देशाने तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. सबब तो खर्चासहित रद्द करणेत यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गरीब शेतक-यांसाठी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सामनेवाला यांचेकडून घेतली ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे.
5) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(डी) प्रमाणे 'ग्राहक' नाहीत त्यामुळे या ग्राहक मंचास सदरचा अर्ज चालविता येणार नाही. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून त्यांचे वडील दि.23/03/05 रोजी वाहन चालवताना अपघातात मरण पावले त्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज केला होता. सामनेवाला यांनी वरील अर्जाची छाननी केली असता तक्रारदारांनी आवश्यक ती कागदपत्रे दाखल केली नाहीत असे आढळून आले. पोलिसांनी दिलेला अंतिम अहवाल, फेरफार उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केली नव्हती. सामनेवाला यांनी तक्रारदारांना पत्र पाठवून वरील कागदपत्र पाठवावेत असे कळविले व कागदपत्र दाखल केली नाहीत म्हणून क्लेम प्रलंबित आहे असे कळविले. सामनेवाला यांनी त्यांचे वरील पत्राची छायांकित प्रत कैफीयत सोबत जोडली असून सामनेवाला यांनी तक्रारदारांना पत्र पाठवून तक्रारदारांनी मयताचा वारस दाखला दिला नाही असे कळवून तक्रारदारांनी क्लेम मंजूर करता येणार नाही असे कळविले. सदरचे पत्र सामनेवाला यांनी तक्रारदारांना कधी पाठविले याची तारीख पत्रावर लिहिलेली नाही. तक्रारदार हे मयताचे कायदेशीर वारस आहेत असा पुरावा तक्रारदारांनी न दिल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला आहे. अशा परिस्थितीत सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही.
6) तक्रारदारांनी केलेले आरोप सामनेवाला यांनी नाकारले असून पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदारांचे वकील अभयकुमार जाधव व सामनेवालातर्फे वकील अंकुश नवघरे यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला व सदर तक्रारअर्ज निकालासाठी ठेवण्यात आला.
7) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्युबद्दल नुकसानभरपाई व इतर दाद सामनेवाला यांचेकडून सामनेवाला यांचेकडून मागता येईल
काय ?
उत्तर - अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा - तक्रारदारांनी त्यांचे वडील श्री.नाथा बजाबा पठारे हे वालवणे, ता.पारनेर, जिल्हा अहमदनगर या गांवचे शेतकरी होते हे दाखविण्यासाठी तक्रार अर्जासोबत त्यांच्या वडिलांच्या नांवाचा 7/12 चा उतारा, खाते उतारा दाखल केला आहे. तक्रारदारांनी त्यांचे वडील दि.23/05/05 रोजी शेतामध्ये काम करीत असताना ट्रॅक्टर घसरला व त्या ट्रॅक्टरखाली चिरडून जागेवरच त्यांचा मृत्यु झाला असे म्हटले आहे. तक्रारदारांनी वडिलांच्या मृत्युबद्दल पारनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या पहिल्या खबरीची छायांकित प्रत, इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या पहिल्या खबरीमध्ये ट्रॅक्टर घसरल्याने ट्रॅक्टरखाली चिरडून श्री.नाथा पठारे यांचा मृत्यु झाला असे म्हटले आहे. इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमांचा उल्लेख केला असून शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्युचे कारण डोक्यात झालेल्या जखमेमुळे झालेला रक्तस्त्राव असे नमूद केले आहे. तक्रारदारांनी गांवकामगार तलाठयामार्फत सदरचा अर्ज तहसिल कार्यालयाकडे पाठविला व तहसिल कार्यालयाने तो अर्ज सामनेवाला यांचेकडे पाठविला असे दिसते. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांचा क्लेमफॉर्म त्यांना मिळाला होता परंतु क्लेम फॉर्मसोबत आवश्यक ते कागदापत्र नसल्यामुळे त्यांनी दि.19/08/05 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी केली. सदर पत्रातील मजकुरावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांकडे वारस दाखल्याची मागणी केली असे दिसते. तक्रारदार वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांचे वरील पत्र मिळाल्यानंतर तक्रारदारांनी मा.न्यायाधीश, दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, ता.पारनेर यांचे कोर्टात वारस दाखल मिळण्यासाठी अर्ज दाखल केला व त्यानंतर दि.11/09/06 चे आदेशाने मा.दिवाणी न्यायालयाने तक्रारदारांना वारस दाखल दिला. तक्रारदारांनी सदरचा मूळ वारस दाखला सामनेवाला यांच्या संबंधीत अधिका-यांना दिला. संबंधीत अधिका-याची वारस दाखल मिळाल्याबाबत तक्रारदारांनी छायांकित प्रतीवर सही घेतली. सामनेवाला वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे मूळ वारस दाखला सामनेवाला यांना मिळाला नाही तथापि, तक्रारदारांनी वारस दाखल्याच्या छायांकित प्रतीवर निदर्शनास आणलेल्या सामनेवाला यांच्या अधिका-यांची सहीबद्दल सामनेवाला यांच्या वकीलांनी कोणताही खुलासा केला नाही.
या प्रकरणातील मयत नाथा बजाबा पठारे, वालवणे गांवचे गरीब शेतकरी होते व महाराष्ट्र शासनाने सामनेवाला यांचेकडून महाराष्ट्रातील गरीब शेतक-यांसाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना घेतली होती त्यातील अटी व शर्तींनुसार मयताचे वारसदार म्हणून तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.1 लाख मिळणे आवश्यक होते. वारस दाखल मिळूनही सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या क्लेमबाबत विचार केला नाही ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे असे म्हणावे लागते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांचे वडील मयत श्री.नाथा बजाबा पठारे यांचा अपघाती मृत्यु झाला. तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेखाली रक्कम रु.1,00,000/-मागता येतील. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.1,00,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी वरील रक्कम रु.1,00,000/- यावर 12 टक्के दराने व्याजाची मागणी केली आहे. तक्रारदारांनी केलेली व्याजाची मागणी काहीशी जास्त दराने केली आहे. तक्रारदारांकडून वारस दाखला मिळाल्यानंतर सुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम मंजूर केला नाही म्हणून दि.13/12/2006 पासून सामनेवाला यांना रक्कम रु.1,00,000/- यावर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून नुकसानभरपाई दाखल 20,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- ची मागणी केली आहे. या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रु.5,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते.
वर नमूद कारणास्तव तक्रारअर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1. तक्रार क्रमांक 52/2009 अंशतः मंजूर करणेत येतो.
2. सामनेवाला यांनी तक्रारदारांना वडिलांच्या मृत्युबद्दल नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र) द्यावेत व सदर
रकमेवर दि.13/12/2006 पासून द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावी.
3. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) व या अर्जाच्या
खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार मात्र) द्यावेत.
4. सामनेवाला यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी प्रस्तुत आदेशाची प्रत त्यांना मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
5. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.