जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1646/2008
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-11/12/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 30/11/2013.
1. श्रीमती आशाबाई सुनिल पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
2. चैताली सुनिल पाटील,
उ.व.अज्ञान, अ.पा.क. 1,
3. भुषण सुनिल पाटील,
उ.व.अज्ञान, अ.पा.क.1,
4. गं.भा.शांताबाई पंढरीनाथ पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः काही नाही,
सर्व रा.जळगांव खुर्द, ता.जळगांव, जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि, तर्फे शाखाधिकारी,
साईबाबा मार्केट, केळकर मार्केट जवळ, जळगांव,
ता.जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.सतीश तुकाराम पवार वकील.
विरुध्द पक्ष तर्फे श्री.एस.व्ही.देशमुख वकील.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमाधारक मृत्यु झाल्यानंतर त्याचा विमा क्लेम देण्याचे नाकारुन दिलेल्या सेवेतील त्रृटी दाखल प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार क्र. 1 चे पती सुनिल पंढरीनाथ पाटील यांचे दि.7 नोव्हेंबर,2006 रोजी खिर्डी फाटा, मुंजोबाचे जवळ सायकलने जात असतांना अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दवाखान्यात उपचार सुरु असतांना दि.12 नोव्हेंबर,2006 रोजी अपघाती निधन झाले. तक्रारदार क्र. 1 ही मयत सुनिल पंढरीनाथ पाटील यांची विधवा पत्नी असुन तक्रारदार क्र. 2 व 3 ही त्यांची अपत्ये आहेत व विरुध्द पक्ष क्र. 4 ही मयत सुनिल ची विधवा आई आहे. मयत सुनिल पंढरीनाथ पाटील यांचे नावावर मौजे तिघ्रे ता.जि.जळगांव येथे शेती होती व ते शेती वहीवाटदार होते. शासन निर्णय क्र.एनएआयएस 1204/सी आर 166/11-अ दि.5 जानेवारी,2005 नुसार शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास रु.1,00,000/- नुकसान भरपाई विरुध्द पक्षाने द्यावायाची आहे. तक्रारदार हिने योग्य त्या कागदपत्रांसह विमा रक्कम मागणीसाठी तहसिलदार, जळगांव यांचेमार्फत फॉर्म भरुन पाठविला असता तसेच विरुध्द पक्षाचे मागणीनुसार कागदपत्र पुरविले असतांनाही विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्कम देण्याचे नकारले असुन तक्रारदारांना सदोष सेवा दिलेली आहे. सबब विमा क्लेमपोटी रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- तसेच मंजुर रक्कमेवर द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे व्याज मिळावे व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीस काढण्यात आली.
4. विरुध्द पक्ष यांनी याकामी म्हणणे दाखल केलेले असुन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. मयत हा शेतकरी असल्याचा व त्याचा अपघाती मृत्यु झाल्याचा मजकुर खोटा असुन तो विरुध्द पक्षास मान्य नाही. मयतचा मृत्यु अपघाताने झाला हे म्हणणे पुर्णपणे खोटे व लबाडीचे आहे. मयताचे अपघाती मृत्युबाबत तक्रारदाराने कोर्टापुढे सिध्द करावे. तक्रारदाराने अगोदर आय.सी.आय.सी.आय लोंम्बार्ड जनरल इंन्शुरन्स कंपनीला पार्टी केले व त्यानंतर विरुध्द पक्षास याकामी सामील केले त्यामुळे तक्रारदाराची केलेली मागणी ही बेकायदेशीर आहे. सबब तक्रारदाराची नुकसान भरपाई मागणी खर्चासह रद्य करण्यात यावी व तक्रार अर्जाचे खर्चादाखल विरुध्द पक्षास रु.10,000/- तक्रारदाराकडुन मिळावेत अशी विनंती विरुध्द पक्षाने केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, व उभयतांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. तक्रारदार हे विरुध्द पक्षांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. विमा कंपनीने तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली
आहे काय ? होय.
3. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
6. मुद्या क्र. 1 - तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होतात काय, याबाबत तक्रारदार क्र. 1 ने तक्रार अर्जातुन ती मयत सुनील पंढरीनाथ पाटील ची पत्नी असल्याचे कथन केलेले असुन नि.क्र.3 लगत दाखल वारस दाखल्याचे अवलोकन करता मयत सुनिल पंढरीनाथ पाटील यास पत्नी आशाबाई सुनिल पाटील, मुले अनुक्रमे भुषण सुनिल पाटील, चैताली सुनिल पाटील व आई शांताबाई पंढरीनाथ पाटील हे वारस असल्याचे स्पष्ट होते. यास्तव तक्रारदाराचे पती हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होते व ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 2(1)(ब)(v) च्या तरतुदीनुसार मयत ग्राहकाचे वारस म्हणुन तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक ठरतात. यास्तव मुद्या क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 - विरुध्द पक्ष यांनी याकामी हजर होऊन तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे विम्याची रक्कम मागणी केल्याचा कुठलाही दस्तऐवज दाखल केलेला नसल्याने त्यांची विमा क्लेम देण्याची जबाबदारी येत नाही तसेच मयताचा मृत्यु अपघाताने झाला हे तक्रारदाराने सिध्द करावे. तसेच तक्रारदाराचा तक्रार अर्ज मुदतीत नसल्याने या सर्व कारणास्तव तक्रारदाराचा विमा क्लेम रद्य होण्यास पात्र आहे असे लेखी म्हणणे व युक्तीवादातुन प्रतिपादन केलेले आहे.
8. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत नि.क्र.3 लगत फीर्याद, घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, मृत्यु दाखला, मयताचे लिव्हींग सर्टीफीकेट, शेतकरी विम्याचा अर्ज, 7/12 उतारा, गट नं.47 चा उतारा, ड पत्रक नोंद, पोलीस पाटील यांचा अहवाल, खाते उतारा, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत. वरील सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता तक्रारदार क्र. 1 चे पती सुनिल पंढरीनाथ पाटील हे दि.7 नोव्हेंबर,2006 रोजी झालेल्या अपघातात मृत्यु झाल्याचे स्पष्ट होते. मयताचे पोष्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये ही मृत्युचे कारण हेड इंन्जुरी असे दिलेले आहे. वर नमुद मयताचे अपघातात मृत्यु झाल्याबाबतचे योग्य ते सर्व कागदपत्रे असतांना तसेच मयताचे नांवे 7/12 उता-यात नमुद शेती असतांनाही विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्लेम नाकारुन सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विहीत नमुन्यातील क्लेम फॉर्म भरुन दिलेला असल्याचे नि.क्र.3/1 लगत दाखल प्रतीवरुन स्पष्ट होते. वर नमुद केलेप्रमाणे तक्रारदाराकडे तिच्या पतीचे अपघाती निधनाबाबत चे तसेच तिचा पती शेतकरी असल्याबाबतचे व तक्रारदार ही मयताची पत्नी असल्याचे योग्य ते सर्व कागदोपत्री पुरावे असतांनाही विरुध्द पक्ष विमा कंपनीने विमा क्लेम नाकारतांना खोटया सबबी सांगुन तक्रारदार सारख्या खेडयात राहणा-या शेतक-याच्या विधवा पत्नीस सेवा देतांना अक्षम्य दिरंगाई व सेवेत त्रृटी केल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब मुद्या क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
9. मुद्या क्र. 3 - तक्रारदाराने याकामी तक्रार अर्जातुन विमा रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- अशी एकुण रक्कम रु.1,25,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावेत व तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च मिळावा अशी विनंती केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रृटी केलेली आहे. परिणामी शासन निर्णयाप्रमाणे रु.1,00,000/- विमा रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र ठरतात. कोणतेही संयुक्तीक कारणाशिवाय विमा दावा नाकारल्यामुळे रक्कम रु.1,00,000/- वर प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल तारखेपासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे. तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मागणी केली आहे तथापी आमचे मते तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- मिळणेस आमचे मते पात्र आहेत. सबब वरिल विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रक्कम रु.एक लाख मात्र) तक्रार दाखल दि.11/12/2008 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासा दाखल रु.15,000/- (अक्षरी रक्कम रु.पंधरा हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 30/11/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.