मा. अध्यक्ष श्री. संजय वा. पाटील यांच्या आदेशान्वये
आदेश
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्याचे थोडक्यात म्हणणे खालालीप्रमाणे.
- तक्रारकर्ता हा Swift D-zire VXI या मारोती कंपनीच्या कारचा वैध मालक आहे. सदर गाडीचा पंजीयन क्रं. MH-31-DK-0289 असा आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 कडून विरुध्द पक्ष 2 यांच्या मार्फत विमा उतरविला होता आणि सदरहू विमा पॉलिसीची मुदत 22.09.2014 ते 21.09.2015 पर्यंत होती.
- तक्रारकर्त्याने सदरहू गाडी विकण्याचा तोंडी करार श्रीराम पोहरकर रा. लाखनी, जि. भंडारा यांच्याशी केला होता आणि सदरहू गाडी श्रीराम पोहरकर यांच्या ड्रायव्हरला(चालकाला) ट्रायलसाठी दिली आणि दुर्दैवाने चालकाच्या हाताने सदरहू गाडीचा अपघात दिनांक 21.12.2014 रोजी झाला आणि त्यामध्ये गाडीचे नुकसान झाले. तक्रारकर्त्याने गाडी दुरुस्तीसाठी विरुध्द पक्ष 2 यांच्याकडे दाखल केली आणि गाडीच्या दुरुस्तीच्या बिलानुसार अंदाजित रक्कम रुपये 3,64,941/- आणि एस्टिमेट चार्जेस रुपये 18,247/- असे मिळून विमा कंपनी विरुध्द पक्ष 1 कडे दावा सादर केला होता. परंतु विरुध्द पक्ष 1 ने दि. 04.03.2015 रोजी सदरहू दावा फेटाळून लावला. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असून सेवेत त्रुटी केल्याचे नमूद केले आहे. तसेच विरुध्द पक्ष 1 कडून रुपये 3,64,941/- व रुपये 18,247/- एवढी रक्कम 12 टक्के दराने दि. 04.03.2015 पासून व्याजाने देण्याची विनंती केली. तसेच विरुध्द पक्ष 2 यांनी लावलेले पार्किंग चार्जेस प्रतिदिन रुपये 250/- विरुध्द पक्ष 2 ला देण्याचे आदेश वहावे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटीस रुपये 50,000/- देण्याचा आदेश देण्यात यावा अशी विनंती केली.
- विरुध्द पक्ष 1 यांनी आपला लेखी जबाब नि.क्र. 12 वर दाखल केला असून त्यात असे नमूद केले की, तक्ररकर्त्याने सदरहू कार ही श्रीराम पोहरकर यांना विकल्यामुळे त्यांच्या मध्ये आणि विरुध्द पक्ष 1 यांच्यामध्ये कोणताही करार झालेला नसल्याने विरुध्द पक्ष 1 हे सदरहू दुरुस्तीचे बिल अथवा चार्जेस देण्याची त्यांची जबाबदारी नाही. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीत लावलेले सर्व आरोप नाकारलेले असून तक्रार मुदतीत नसल्याचा दावा केलेला आहे.
- विरुध्द पक्ष 1 यांनी आपल्या लेखी जबाबाच्या परिच्छेद क्रं. 5 मध्ये पुढे असे नमूद केले की, वि.प. 1 ला सदरहू क्लेम बाबत उशिरा माहिती मिळाली आणि त्यांनी त्यांचे सर्व्हेअर श्री. एस.एन.काकडे यांना चौकशीसाठी आणि सदरहू दाव्याच्या पडताळणीसाठी पाठविले होते आणि सदरहू सर्व्हेअरने त्याच्या रिपोर्टमध्ये रुपये 83,699/- खर्चाचे अंदाजित पत्र दिले होते आणि सदरहू सर्व्हेअर रिपोर्टवर विरुध्द पक्ष 1 यांनी आपली भिस्त ठेवलेली आहे.
- विरुध्द पक्ष 1 ने पुढे असे नमूद केले की, श्रीराम पोहरकर यांनी दि.05.08.2014 ची सेल पावती हजर केली होती आणि तक्रारकर्ता आणि श्रीराम पोहारकर यांनी मोटर वाहन कायद्याच्या कलम 157 चे पालन केले नाही आणि सदरहू ट्रान्स्फरबाबत 14 दिवसात विरुध्द पक्ष 1 ला सूचना दिली नाही आणि तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सदरहू तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष 2 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन ही ते मंचासमक्ष हजर झाले नाही व आपला लेखी जबाब दाखल केला नाही. म्हणून विरुध्द पक्ष 2 विरुध्द प्रकरण एकतर्फी पुढे चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याची दाखल तक्रार, दस्तावेज, विरुध्द पक्ष 1 ने दाखल केलेला लेखी जबाब, दस्तावेज, उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद, दाखल न्यायनिवाडे व तोंडी युक्तिवाद इत्यादीचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद करण्यात येते.
अ.क्रं. मुद्दे उत्तर
1 तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय? होय
2 तक्रार मुदतीत आहे काय ? होय
3. विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली
आहे काय? होय.
4. तक्रारकर्त्याचा विमा दावा पूर्णपणे मंजूर करण्या योग्य
आहे काय? अंशतः मंजूर
5 आदेश अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
7 मुद्दा क्रमांक 1, 2, 3 व 4 – तक्रारकर्ता हा सदरहू कारचा मालका आहे आणि सदरहू कार ही श्रीराम पोहरकर यांच्या नावाने ट्रान्स्फर झालेली नाही. त्यामुळे अपघाताच्या दिवशी तक्रारकर्ता हाच सदरहू कारचा वैध मालक असल्याचे दिसून येते. जो पर्यंत कायदेशीर मार्गाने सदरहू कारची मालकी दुस-या व्यक्तीकडे जात नाही तो पर्यंत सदर कारबाबतची जबाबदारी ही पंजीकृत मालकाचीच आहे आणि म्हणून तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष 1 यांच्यामधील विमा बाबतचा करार संपुष्टात आला आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्त्याने आपल्या कथनाच्या समर्थनार्थ मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी 1999 ACJ 781 , G. Govindan VS. New India Assurance Co. Ltd and Other या प्रकरणातील न्यायनिवाडयावर आपली भिस्त ठेवलेली आहे व ती योग्य आहे.
या उलट विरुध्द पक्षाच्या वकिलांनी सुध्दा आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ एकूण 5 न्यायनिवाडे खालीलप्रमाणे दाखल केलेले आहे.
- HDFC Ergo General Insurance Co.Ltd. VS. Balraj Singh (IV (2015) CPJ682 (NC))
- New India Assurance Co.Ltd. Vs. Shri Divya Prashad I (2011)CPJ22 (NC)
- New India Assurance Co.Ltd. Vs. Shri Dattatraya Shankar Buva 2009 (2)ALL MR (JOURNAL) 44.
- Bajaj Allinaz Insurance Co. Ltd. VS. Omprakashsingh Mangalsing
- Oriental Insurance Co.Ltd. Vs. M/S. Kamal Tours & Travels
वरील दाखल न्यायनिवाडया मधील वस्तूस्थिती व तथ्यवेगवेगळे असून या तक्रारीत लागू पडत नाही असे मंचाचे मत आहे.
- तक्रारकर्त्याने त्याचा विमा दावा हा विमा कराराच्या मुदतीत दाखल केला असून सदरहू तक्रार ही सुध्दा मुदतीत दाखल केली आहे. तक्रारकर्त्याचा विमा दावा हा यामध्ये NON INSURABLE INTEREST (नॉन इन्श्युरेबल इन्टरेस्ट) नाही असे म्हणून विरुध्द पक्ष 1 यांनी सदरहू विमा दावा चुकिच्या कारणाने नाकारल्याचे दिसून येते. यावरुन विरुध्द पक्ष 1 यांनी आपल्या सेवेत त्रुटी केलेली असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सदरहू तक्रारी मधील तक्रारकर्त्याचा विमा दावा रक्कम रुपये 3,64,941/- आणि एस्टीमेट चार्जेस रक्कम रुपये 18,247/- असे मिळून एकूण रुपये 3,83,188/- हे द.सा.द.शे. 10 टक्के दराने व्याजसह मंजूर करणे योग्य असल्याचे दिसून येते. वि.प. क्रं. 2 यांनी पार्किंग चार्जेस बाबत प्रतिदिन रुपये 250/- ची मागणी तक्रारकर्त्याकडून केली आहे परंतु सदरची मागणी ही अवाजवी आणि अवास्तव असल्याचे मंचाचे मत आहे. तसेच सदरहू मागणीसाठी वि.प.क्रं. 2 यांनी कोणत्याही प्रकारचा पुरावा दाखल केलेला नाही आणि सदरहू प्रकरण वि.प. 2 विरुध्द एकतर्फी चालविण्यात आले. सबब तक्रारकर्त्याने वि.प. क्रं. 2 ला पार्किंगसाठी रुपये 250/- प्रतिदिन द्यावे अशी मागणी अवाजवी असल्यामुळे मंजूर करता येणार नाही. त्याऐवजी सदरहू कारचा वि.प. 2 यांनी सांभाळ केल्यामुळे त्यांना दुरुस्ती खर्चा व्यतिरिक्त आणखी रुपये 10,000/- देणे योग्य व वाजवी होईल आणि सदरहू विमा दाव्याची रक्कम वि.प. क्रं. 1 यांनी वेळेवर न दिल्यामुळे सदरहू रक्कम वि.प.क्रं. 1 ने द्यावी हे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येते.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्याला रक्कम रुपये 3,83,188/- द्यावे आणि सदरहू रक्कमेवर दि. 04.01.2015 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाएगी पर्यंत द.सा.द.शे.10 टक्के दराने व्याजसह रक्कम द्यावी.
अथवा
सदर रक्कम विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना देऊन विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी दुरुस्त गाडी तक्रारकर्त्याला त्वरित द्यावी.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 ने विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना पार्किंग चार्जेस पोटी रुपये 10,000/- द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत विरुध्द पक्ष 1 व 2 ने करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.