पारित दिनांक 30.11.2010 (द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे पती शेतकरी आणि शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभधारक होते. दि.27.12.2005 रोजी तक्रारदाराचे पती विहीरीत पडले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. त्यानंतर तक्रारदारानी सर्व कागदपत्रासहीत तहसिलदारकडे क्लेम फॉर्म पाठवून दिला. गैरअर्जदार विमा कंपनीने अद्यापपर्यंत क्लेमची रक्कम दिली नाही, आणि उत्तर ही दिले नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून क्लेमची रक्कम रु.1,00,000/- 15% व्याजदराने, तक्रारीचा खर्च आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी मंचामध्ये प्राथमिक मुद्यावर आधी सुनावणी व्हावी म्हणून अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे लेखी जबाबही दाखल केला. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराच्या पतीचे निधन दि.27.12.2005 रोजी झाले, व तक्रारदारानी तहसिलदारकडे क्लेम फॉर्म दि.19.07.2006 रोजी पाठविला. क्लेम फॉर्म पाठविण्यास विलंब झाल्याचे म्हणतात. तक्रारदारानी 90 दिवसाच्या आत तहसिलदारकडे क्लेम फॉर्म पाठविणे गरजेचे होते. तक्रारदारानी मंचामध्ये घटना घडल्यानंतर दोन वर्षाच्या आत तक्रार दाखल करणे गरजेचे होते. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 (अ) नुसार तक्रार ही मुतदबाहय आहे असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. हया त्यांच्या म्हणण्याला आधार म्हणून गैरअर्जदारानी मा.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कंडीमल्ला विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी हा दाखल केला आहे. तक्रारदारानी तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्ज ही दाखल केला नाही. वरील कारणावरुन प्राथमिक मुद्दा आधी निकाली काढावा, व तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी गैरअर्जदार करतात. गैरअर्जदारानी लेखी जबाब, शपथपत्र, तसेच कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदारानी दि.09.09.2010 रोजी विलंब माफीचा अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विमाधारकाचा मृत्यू दि.27.12.2005 रोजी झाला, व लगेचच तक्रारदारानी क्लेम दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारानी, त्यांच्या घरातील कर्ता पुरुषाचे निधन झाले असले तरी, लगेचच कमीत कमी वेळेमध्ये क्लेम दाखल केला. तक्रारदार ही अशिक्षित महिला असून, पतीच्या दुःखामध्ये होती. अशा परिस्थितीत त्यांनी क्लेम दाखल केला होता, हा विलंब हेतुपूर्वक केला नसून, तो माफ करावा अशी मागणी तक्रारदार करतात. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी लेखी जबाब दाखल केला नसल्यामुळे त्यांच्या विरुध्द नो से चा आदेश पारित करण्यात आला. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचानी पाहणी केली. तक्रारदाराच्या पतीचे निधन दि.27.12.2005 रोजी झाले. त्यानंतर कागदपत्रांनुसार असे दिसून येते की, तक्रारदारानी दि.19.07.2006 रोजी तहसिलदार फुलंब्री यांच्याकडे क्लेम फॉर्म दाखल केला. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, पॉलीसीनुसार क्लेम फॉर्म अपघात घडल्यापासून 90 दिवसाच्या आत दाखल करावयास पाहिजे होता, परंतू तक्रारदारानी तो विलंबाने दाखल केलेला आहे. मंचाचे असे म्हणणे आहे की, अपघात घडल्यापासून 90 दिवसाच्या आत क्लेम दाखल करावयास पाहिजे, तसेच जर 90 दिवसानंतर क्लेम फॉर्म भरला असेल तर, त्यास व्यवस्थित स्पष्टीकरण, कारणे, देणे गरजेचे असते. परंतू तक्रारदारानी असा कुठलाही विलंब माफीचा अर्ज तहसिलदार कार्यालयामध्ये त्यांच्या क्लेम फॉर्म सोबत दाखल केला नाही. गैरअर्जदारानी, प्राथमिक मुददा आधी निकाली काढावा असा अर्ज दिला होता. तसेच लेखी जबाबात सुध्दा त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारानी क्लेम फॉर्म भरण्यासही विलंब लावला. त्याचप्रमाणे मंचात केस दाखल करण्यासही विलंब लावलेला आहे. त्यांनी मा.सर्वोच न्यायालयाचा निकाल कंडीमल्ला विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी, त्यानुसार अपघात घडल्यापासून किंवा घडण्याचे कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या आत तक्रार दाखल करावयास पाहिजे असे त्यात नमूद केलेले आहे. तक्रारदारानी दि.01.01.2010 रोजी मंचात तक्रार दाखल केली. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्यांनी दि.09 सप्टेंबर 2006 रोजी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला. नामंजूरीचे कारण ही क्लेम दाखल करण्यास विलंब झालेला आहे असे दिले होते. त्या दिवसापासून 2 वर्षाच्या आत तक्रार दाखल करावयास पाहिजे. तक्रारदारानी त्यांच्या तक्रारीमध्ये क्लेम नामंजूर झाल्याबददल कुठेही उल्लेख केलेला नाही, तसेच पत्रही दाखल केले नाही. गैरअर्जदारानी नामंजूरीचे पत्र मंचात दाखल केलेले आहे, यांचा अर्थ तक्रारदारानी क्लेम नामंजूर झाल्यापासून 2 वर्षाच्या आत मंचात केस दाखल केली नाही. तसेच तहसिलदार यांच्याकडे क्लेम दाखल करण्यापासून 2 वर्षाच्या आत ही केस दाखल केली नाही. गैरअर्जदारानी त्यांच्या लेखी जबाबात प्राथमिक मुददा आधी निकाली काढावा असा अर्ज दाखल केला होता. ही दोन्ही अर्ज दिल्यानंतर तक्रारदारानी विलंब माफीचा अर्ज दि.09.09.2010 रोजी दिला. विलंब माफीच्या अर्जामध्ये एकीकडे विलंब झाला आहे असे म्हणतात, आणि दुसरीकडे तक्रार दाखल करण्यास जर विलंब झाला असेल तर, तो ही माफ करावा असे म्हणतात. तक्रारदारानी असे कुठलेही ठोस कारण, स्पष्टीकरण, विलंब माफीसाठी दिलेले नाही. किती विलंब झाला याचा हिशोब ही दिलेला नाही. त्यांची (प्रेयर) विनंती पाहता, जर विलंब झाला तर अशी भाषा वापरलेली आहे, म्हणजे त्यांना अद्यापही विलंब झाला आहे असे वाटत नाही. तक्रारदारानी क्लेम तहसिलदारकडे दाखल करण्यास ही जी.आर.नुसार विलंब केलेला आहे. तसेच मंचात तक्रार दाखल करण्यास ही विलंब लावलेला आहे. विलंब माफीचा अर्ज मंच नामंजूर करुन सदरील तक्रार नामंजूर करीत आहे. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |