::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/11/2016 )
आदरणीय अध्यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ती ही स्व. श्रीकृष्ण रामराव वानखेडे हयांची विधवा पत्नी असून तक्रारकर्ते क्र. 2 ते 4 ही त्यांची मुले आहेत. सर्व तक्रारकर्ते हे मौजा धोत्रा ता. कारंजा, जि. वाशिम येथील रहिवाशी आहेत.
तक्रारकर्तीचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. श्रीकृष्ण रामराव वानखेडे हे दिनांक 08/02/2014 रोजी कामरगाव येथून स्वतःचे काम आटोपून हिरोहोंडा सि.डी. 100 ने घरी परत येत असतांना, सदर गाडी स्लिप झाली व त्यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली. त्यांनी उपचाराला दाद न दिल्याने त्यांचा त्याच दिवशी म्हणजेच दिनांक 08/02/2014 रोजी अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.
मयत श्रीकृष्ण रामराव वानखेडे हयांनी त्यांचे जिवनकाळात विरुध्द पक्ष क्र. 1 कडून त्यांचे वाहन हिरोहोंडा सि.डी. 100 ची विमा पॉलिसी क्र. 3005/ 21054857/20815/000 ही विकत घेतलेली होती. सदर विमा पॉलिसी दिनांक 19/11/2013 ते 18/11/2014 पर्यंत वैध होती व प्रिमीयमपोटी रक्कम रुपये 1217/- ही अदा केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ते क्र. 1 ते 4 हे कायदेशीर वारस या नात्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक होतात. सदर विमा पॉलिसी अंतर्गत एकूण विमाधन रुपये 1,00,000/- सुरक्षित आहे.
तक्रारकर्त्यांनी मृत्यूदावा हा विरुध्द पक्ष क्र. 1 कडे दाखल केला व त्यापोटी सर्व कागदपत्रे विमा प्रतिनिधीमार्फत देण्यात आली. विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे वारंवार विमाकृत रक्कमेची मागणी करुनही, अदा करण्यात आली नाही. सरतेशेवटी कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्यामुळे, तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कडे चौकशी केली असता त्यांनी सुचित केले की, सदर प्रकरणात मृतकाचे आवश्यक ते अपघाताचे कागदपत्र हे देण्यात आलेले नसल्यामुळे सदर दावा हा बंद करण्यात आलेला आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर बाब ही तक्रारकर्त्यांना तोंडी कळविली व कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा अधिकृत माहिती दिलेली नाही. म्हणून तक्रारकर्त्यांनी, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना वकिलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस मिळूनही विरुध्द पक्ष यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही व नोटीसची दखल घेतली नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्ष यांनी सेवा देण्यात उणीव व अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे.
त्यामुळे, तक्रारकर्तीने सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, तक्रार मंजूर करावी, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्ती विमा रक्कम रुपये 1,00,000/- दयावी, तसेच सदर रकमेवर दरसाल, दरशेकडा 18 % दराने व्याज दयावे, मानसिक त्रासाबद्दल रुपये 20,000/-, शारीरिक त्रासाबद्दल रुपये 20,000/, तक्रारीचा खर्च रुपये 20,000/-, अशी एकूण रुपये 1,60,000/- नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश करावा, अशी विनंती, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 07 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चा लेखी जबाब - विरुध्द पक्षाने त्यांचा लेखी जबाब मंचासमोर दाखल करुन, तक्रारकर्तीचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनात नमुद केले की, विरुध्द पक्षाचे कोणतेही कार्यालय वाशीम जिल्हयात कोठेही नाही. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार या न्याय मंचाच्या कार्यक्षेत्रात चालू शकत नाही. तक्रारकर्तीचे पती हे दिनांक 08/02/2014 रोजी कामरगाव जि. वाशिम येथून स्वतःचे काम आटपून घरी परत येत असतांना, त्यांचे ताब्यातील दुचाकी हिरोहोंडा सि.डी. 100 स्लिप होऊन खाली पडून त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्या बाबत तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना कधीही कळविले नाही. तसेच या विरुध्द पक्षांना आजपर्यंत तक्रारकर्त्यांनी सुचना वा माहिती दिल्याबद्दलची कागदपत्रे या प्रकरणात दाखल केलेली नाहीत. तसेच आजपर्यंत या विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यांचा नुकसान भरपाई मिळण्याचा अर्ज किंवा क्लेम नाकारलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार ही प्रिमॅच्युअर असल्यामुळे चालू शकत नाही व खारिज होण्यास पात्र आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 यांचे ऑफिस वाशिम येथे असल्याची बाब तक्रारकर्ते यांनी खोटी नमूद केली आहे. जर तक्रारकर्ते यांनी विमा पॉलिसी धारकाच्या मृत्यूची बाब व रितसर क्लेम फॉर्म भरुन दिल्यास विरुध्द पक्ष आजही त्यांच्या सेवेत कसूर न दाखवता त्यांचा क्लेम विचारात घेण्यास तयार आहे. तक्रारकर्ते यांनी क्लेम नाकारल्याबाबतचे कागदपत्रे व त्यांच्यामधील झालेल्या व्यवहाराची कागदपत्रे वि. मंचामध्ये दाखल केली नसून, या विरुध्द पक्षा विरुध्द नाहक त्रास देण्याच्या हेतूने खोटी, बिनबुडाची तक्रार दाखल केली असून, विरुध्द पक्ष यांनी कधीही दोषपूर्ण सेवा प्रदान केलेली नाही किंवा अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही. वरील सर्व कारणास्तव तक्रारकर्तीची तक्रार ही खर्चासह खारिज करण्यांत यावी.
3) कारणे व निष्कर्ष ::
तक्रारकर्ते यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिज्ञापत्र, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब, व उभय
पक्षांचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन नमूद केला.
उभय पक्षात ही बाब वादात नाही की, मयत विमाधारक श्रीकृष्ण रामराव वानखेडे यांनी त्यांच्या जिवनकाळात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून, त्यांचे वाहन हिरोहोंडा सि.डी. 100 ची विमा पॉलिसी ही विकत घेतली होती व सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 19/11/2013 ते 18/11/2014 पर्यंत वैध असून, तिच्या प्रिमीयमपोटी एकूण रक्कम रुपये 1217/- भरलेले होते. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या दस्तावरुन असा बोध होतो की, मयत विमाधारक श्रीकृष्ण रामराव वानखेडे यांचे दिनांक 08/02/2014 रोजी अपघाती निधन झाले आहे व तक्रारकर्ते हे मयत श्रीकृष्ण रामराव वानखेडे यांचे वारस आहेत. त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक/लाभार्थी या संज्ञेत मोडतात, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर दाखल केलेले दस्त जसे की, एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, पोष्टमॉर्टम रिपोर्ट इ. यावरुन असा बोध होतो की, विमाधारक श्रीकृष्ण रामराव वानखेडे हे दिनांक 08/02/2014 रोजी कामरगाव ता. कारंजा जि. वाशिम येथून त्यांचे वाहन हिरोहोंडा सि.डी. 100 ने येत असतांना, गाडी स्लिप होऊन अपघात झाला होता व त्यात ते जबर जखमी होवून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
तक्रारकर्ते यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ते यांनी मयताचे वारस या नात्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडे, सर्व आवश्यक ते दस्तऐवज लावून मृत्यू दावा दाखल केला असता विरुध्द पक्षाने तो आजतागायत दिला नाही व मृतकाच्या अपघाताचे आवश्यक ते कागदपत्र विरुध्द पक्षाला दिले नाही, असे सुचित करुन दावा बंद केला ही सेवा न्युनता ठरते. त्यामुळे प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी.
विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा यावर असा आक्षेप आहे की, विरुध्द पक्षाचे कोणतेही कार्यालय वाशीम जिल्हयात नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांची तक्रार या न्याय मंचाच्या कार्यक्षेत्रात चालू शकत नाही. परंतु दाखल दस्तावरुन असे आहे की, मयत विमाधारकाने विरुध्द पक्षाची पॉलिसी राहत्या ठिकाणावरुन, विरुध्द पक्षाच्या शाखा कार्यालयातून घेतली होती व अपघातही या न्याय मंचाच्या कार्यक्षेत्रात घडला होता. तक्रारकर्ते यांनी शपथेवर असे कथन केले की, विरुध्द पक्षाचे शाखा कार्यालय वाशिम इथे आहे, त्यामुळे हा आक्षेप गृहीत धरता येणार नाही. विरुध्द पक्षाचा असा युक्तिवाद आहे की, तक्रारकर्ते यांनी मयत विमाधारकाच्या मृत्यूची सुचना व मृत्यूदावा मिळण्याचा अर्ज पूर्ण माहितीसह व कागदपत्रांसह विरुध्द पक्षाकडे दाखल केलेला नाही, त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांचा विमा दावा लेखी ऊत्तर देवून नाकारलेला नाही, म्हणून यात सेवा न्यूनता नाही.
यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर जे दस्त दाखल केले, त्यावरुन त्यांनी विरुध्द पक्षाकडे मयत विमाधारकाच्या मृत्यूची सुचना देणारे कागदपत्र किंवा दावा पत्र व नुकसान भरपाई मिळण्याचा पूर्ण माहितीसह व कागदपत्रासह क्लेमफॉर्म अर्ज विरुध्द पक्षाकडे दाखल केला होता, असे कुठेही दिसून येत नाही. परंतु विरुध्द पक्षाला तक्रारकर्ते यांनी हे प्रकरण दाखल करणेपुर्वी कायदेशीर नोटीस पाठवली होती, त्याचे ऊत्तर विरुध्द पक्षाने दिले नाही, म्हणून सदर प्रकरण तक्रारकर्ते यांना दाखल करावे लागले. त्यामुळे विरुध्द पक्षाने मयत विमाधारकाच्या मृत्यूची सुचना मिळाली नाही असे म्हणणे, गैर आहे. म्हणून तक्रारकर्ते यांनी मयत विमाधारकाचा विमादावा पूर्ण माहितीसह व कागदपत्रांसह ( रेकॉर्डवर जे दाखल आहेत ) विरुध्द पक्षाकडे सादर करावा व विरुध्द पक्षाने त्यानंतर तो रितसर निकाली काढावा असे आदेश विरुध्द पक्षाला देवून, प्रकरण खर्चासह ही तक्रार, खालीलप्रमाणे आदेश पारित करुन, अंशतः मंजूर केली.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार, अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी, वैयक्तीकरित्या वा संयुक्तपणे तक्रारकर्ते यांनी मयत विमाधारकाचा मृत्यू विमादावा पूर्ण माहितीसह व कागदपत्रांसह (क्लेमफॉर्म ) सादर केल्यावर, तो रितसर सकारात्मकरित्या निकाली काढावा. तसेच या प्रकरणाच्या न्यायिक खर्चापोटी तक्रारकर्त्यांस रुपये 3,000/- ( रुपये तीन हजार फक्त ) ईतकी रक्कम दयावी.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svg