(घोषित दि. 13.12.2010 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) बँकेच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती मयत शिवाजी मुजगुले यांनी गैरअर्जदार आय.सी.आय.सी.आय.बँक, जालना (या पुढे “गैरअर्जदार बँक” असा उल्लेख करण्यात येईल.) यांचेकडून मोटार सायकल खरेदी करण्यासाठी दिनांक 05.01.2007 रोजी कर्ज घेतले होते. सदर वाहनाचा गैरअर्जदार बँकेने दिनांक 05.01.2007 ते 04.01.2008, दिनांक 05.01.2008 ते 04.01.2009 आणि दिनांक 05.01.2009 ते 04.01.2010 या कालावधीसाठी विमा उतरविला होता. दिनांक 21.08.2009 रोजी तिच्या पतीचे अपघाती निधन झाले. त्यामुळे तिने गैरअर्जदार बँकेकडे तिच्या पतीच्या मोटार सायकलच्या विमा पॉलीसीची प्रत मागितली. परंतू बँकेने पॉलीसीची प्रत दिली नाही. त्यामुळे तिला पॉलीसीमधील तरतुदीनुसार नुकसान भरपाईचा दावा दाखल करता आला नाही. गैरअर्जदार बँकेने अशा प्रकारे पॉलीसीची प्रत न देऊन त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार बँकेने तिच्या पतीच्या मोटार सायकलची विमा पॉलीसी देण्याबाबत आदेश व्हावा आणि तिला नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअर्जदार बँकेने लेखी निवेदन दाखल केले. बँकेचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचे पती शिवाजी मुजगुले यांनी वाहन कर्ज घेतले होते. परंतू शिवाजी मुजगुले यांनी कराराप्रमाणे कर्ज हप्त्याची परतफेड केलेली नाही. बँकेने तक्रारदाराच्या पतीच्या वाहनाचा विमा उतरविलेला नाही. वाहनाचा विमा उतरविण्याची जबाबदारी वाहनाच्या मालकाची असते. तक्रारदाराने विमा पॉलीसीची प्रत मागण्याबाबत कोणताही अर्ज दिलेला नाही. तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदाराला त्रुटीची सेवा दिलेली नसून तक्रारदार ही बँकेची ग्राहक देखील नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी बँकेने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार बँकेच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार बँकेच्या वतीने अड.विपूल देशपांडे यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराचे पती शिवाजी मुजगुले यांनी गैरअर्जदार बँकेकडून मोटार सायकल खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते या विषयी वाद नाही. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तिचे पती शिवाजी यांचे दिनांक 21.08.2009 रोजी वाहन अपघातामधे निधन झाले. तिच्या पतीच्या अपघाती मृत्युसंदर्भात नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी पतीच्या मोटार सायकलच्या विमा पॉलीसीची आवश्यकता होती आणि तिच्या पतीच्या मोटारसायकलची विमा पॉलीसी गैरअर्जदार बँकेकडे होती. म्हणून तिने गैरअर्जदार बँकेकडे मोटार सायकलच्या विमा पॉलीसीची मागणी केली. परंतू बँकेने तिला विमा पॉलीसीची प्रत दिली नाही. तक्रारदाराचे पती मयत शिवाजी यांनी दिनांक 05.01.2007 रोजी गैरअर्जदार बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतू त्यांनी जी मोटारसायकल खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते त्या मोटर सायकलचा विमा गैरअर्जदार बँकेमार्फत उतरविला जात होता अशा प्रकारचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दिला नाही. तसेच तिच्या पतीने गैरअर्जदार बँकेकडे विमा हप्त्याची रक्कम भरल्याबाबतचा देखील पुरावा नाही. त्याचप्रमाणे दरवर्षी मोटारसायकलचा विमा उतरविण्याची जबाबदारी बँकेवर असल्याचा देखील पुरावा नाही. त्यामुळे गैरअर्जदार बँकेमार्फत मयत शिवाजी यांच्या वाहनाचा विमा उतरविण्यात आल्याचे सिध्द् होत नाही. म्हणून तक्रारदाराने मागणी केल्याप्रमाणे जर बँकेने विमा पॉलीसीची प्रत दिली नसेल तर त्यासाठी बँकेच्या सेवेत त्रुटी आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |