निकालपत्र :- (दि.01/12/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊनही सामनेवाला प्रस्तुत कामात हजर झाले नाहीत किंवा त्यांनी लेखी म्हणणेही दाखल केले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. तक्रारदाराचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही सामनेवाला बँकेने कर्ज कराराच्या बाहेर जाऊन त्रयस्त संस्थेमार्फत बेकायदेशीररित्या बळाचे जोरावर कर्ज वसुली करुन तक्रारदारास मानिकस व शारिरीक त्रास झाल्याने दाखल केली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हे तक्रारीत नमुद पत्त्यावर कायमचे रहिवाशी असून सामनेवाला ही वित्तीय व बॅंकींग कंपनी असून सदर कंपनीची कोल्हापूर येथे शाखा आहे. सामनेवाला कंपनीचा मुख्य उद्देश त्यांचे ग्राहकांना अर्थ पुरवठा करणे हा आहे. तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे कर्जदार आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीकडून दि.02/12/2005 रोजी रक्कम रु.2,00,000/- गृहकर्ज घेतले होते. सदरचे कर्ज 77 मासिक हप्त्यामध्ये परतफेड करावयाचे होते. सदर कर्जाचा पहिला हप्ता दि.10/03/2008 रोजी सुरु झाला व दि.10/07/2014 रोजी शेवटचा हप्ता भरावयाचा होता. सदर कर्जाचा क्र.LAN-LBKPR00001205503 असा आहे. ब) तक्रारदाराने सदर कर्जाचा मार्च-2008 पर्यंत वेळोवेळी ई.एम.आय. भरलेला आहे. परंतु तक्रारदाराचे हृदयाचे मोठे ऑपरेशन झालेने तक्रारदाराची आर्थिक स्थिती खालावली त्यामुळे तक्रारदारास सामनेवाला कंपनीचे कर्जाचे हप्ते नियमित भरता आले नाहीत. मग तक्रारदार सामनेवाला कंपनीचे मॅनेजर यांना भेटले व तक्रारदाराची खरी परिस्थिती त्यांना सांगितली व ई.एम.आय. भरणेकरिता मुदत वाढवुन देणेविषयी विंनती केली. त्याप्रमाणे सामनेवालांनी तक्रारदारास हमी दिली. क) एप्रिल-2009 मध्ये अर्सिल-आर्मस या कंपनीकडून सामनेवाला कंपनीच्या कर्जाच्या वसुलीसाठी तक्रारदारास पत्र मिळाले. तक्रारदाराचा व अर्सिल-आर्मस कंपनीचा काहीही संबंध नाही.तक्रारदाराने सदर कंपनीत चौकशी केली असता तेथील मॅनेजरने सांगितले की, आय.सी.आय.सी. आय.बँकेने तक्रारदाराने कर्ज खाते अनियमित झालेने कर्ज वसुलीकरिता त्यांचेकडे वर्ग केलेले आहे. अर्सिल-आर्मस कंपनीच्या मॅनेजरनी अपमानकारक व गैरवर्तन भाषेत सांगितले की, ‘’तक्रारदाराने जर कर्ज खातेची रक्कम भागविली नाही तर तीव्र परिणाम होतील.’’ त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीच्या मॅनेजरची भेट घेऊन तक्रारदाराशी विचारविनिमय न करता किंवा तक्रारदाराची परवानगी न घेता सदरचे कर्ज खाते अर्सिल-आर्मस कंपनीकडे वर्ग कसे झाले अशी विचारणा केली असता सामनेवालांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ड) तक्रारदाराने सामनेवालांकडून रक्कम रु.2,00,000/- इतके कर्ज घेतले होते व आतापर्यंत रक्कम रु.87,000/- अदा केलेले आहे. अर्सिल-आर्मस या कंपनीच्या मॅनेजरनी रक्क्म रु.2,21,819/- इतकी थकबाकी दाखवलेली आहे. त्यामध्ये इतर चार्जेस व दंड आकारणेत आले आहेत. सदर देय दाखविलेली रक्कम ही बेकायदेशीर तसेच कराराच्या विरुध्द आहे. सदर अर्सिल-आर्मस यांनी सदर कर्ज वसुल करीत असताना त्यांचे व्यक्तींनी वारंवार कर्ज वसुलीस येऊन तक्रारदारास घरातील सामान बाहेर फेकून देणेबाबत भिती घातलेली आहे. त्यामुळे तक्रारदारास कधीही भरुन न येण्यासारखे हनी व मानसिक त्रास झालेला आहे. तक्रारदाराने सामनेवालांच्या व्यवस्थापकांना दि.29/01/2010 रोजी प्रस्तुतचे कर्जखाते वरील रक्कम एक रकमी भरलेस तक्रारदार तयार असलेचे कळवलेले आहे. त्यास सामनेवाला बँकेने कोणतेही उत्तर दिलेले नाही. तदनंतर दि.26/03/2010 रोजी तक्रारदाराने वकील नोटीस पाठवली असता त्यासही उत्तर दिलेले नाही. सामनेवालांनी सेवेत गंभीर त्रुटी केली असलेने तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत यावी तसेच सामनेवालांना बँकींग कायदा व प्रक्रियेप्रमाणे तक्रारदाराचे कर्ज खाते आर्सिल-आर्म कंपनीने खर्ची टाकलेले अनावश्यक दंड व येणे कमी करुन तक्रारदाराचे खाते निगोशिएट करुन दयावे. रक्कम रु.10,000/- मानसिक त्रासापोटी, रु.10,000/- सेवात्रुटीसाठी, रक्कम रु.10,000/- तक्रारदारास झालेली असुविधा,मानसिक त्रास व त्यामुळे आलेले नैराश्य व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळणेबाबत विंनती सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नमुद कर्जाचा खातेउतारा, सामनेवालांना कर्ज खाते सेटल करणेसाठी दिलेली पत्र व वकील नोटीस इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. (04) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे व तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- होय. 2. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने सामनेवालांकडून रक्कम रु.2,00,000/- गृहकर्ज घेतलेले होते. तक्रारदाराचे दाखल केलेल्या कर्ज खाते उता-याच्या सत्यप्रतीचे अवलोकन केले असता कर्ज करार क्र. LAN-LBKPR00001205503 असून सदर कर्जाची प्रि ई. एम.आय. पूर्णत: अदा केलेचे दिसून येते. तसेच इन्स्टॉलमेंट ओव्हर डयू रु.49,893/- व इतर ओव्हर डयूज रक्कम रु.8,643/- दिसून येते व अनअडजस्टड रक्कम रु.555/- असे एकंदरीत रक्कम रु.57,981/- येणे असलेचे दिसून येते. सदर कर्जासाठी नियमित मासिक हप्ता दि.10/03/2008 पासून ते 10/07/2014 पर्यंत होते. अदयापही सदर कर्जाची मुदत बाकी आहे. तक्रारदाराने मार्च-2008 पर्यंतचे प्रत्येक प्रिईएमआय व्यवस्थित व नियमितपणे भरलेचे दिसून येते. मात्र दरम्यान तक्रारदाराचे हृदयाचे ऑपरेशन झालेने त्याची आर्थिक स्थिती अडचणीची झाली. त्यामुळे सदर कर्ज खाते अनियमित झालेने सामनेवाला बँक कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन सदर कर्ज वसुल करु शकले असते मात्र तसे न करता बळाचे जोरावर त्रयस्त संस्थेमार्फत सामनेवाला बॅकेने वसुलीचा प्रयत्न केलेला आहे. सदर कर्ज खाते अनियमित झालेने सामनेवाला बँकेने कर्ज कराराच्या बाहेर जाऊन आर्सिल आर्म या त्रयस्थ संस्थेमार्फत बेकायदेशीरपणे कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केला आहे व सदर संस्थेच्या वसुलीसाठी आलेल्या व्यक्तींनी तक्रारदाराचे घरात वारंवार येऊन सामान बाहेर फेकणेची भिती घातलेली आहे व तक्रारदार सदर भितीखाली वावरत असलेने त्यास मानसिक त्रासास सामोरे जावे लागले आहे. सदर भितीखाली वावरण्यापेक्षा तक्रारदाराने प्रस्तुतचे कर्ज एकरकमी भागविणेचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे सामनेवाला बँकेस दि.29/01/2010 चे पत्राने कळवलेले आहे. सदरची बाब तक्रारदाराने शपथेवर नमुद केलेली आहे. सदरचे कर्ज खाते ओटीएस(वन टाईम सेटलमेंट) खाली बँकींग कायदा व प्रक्रियेनुसार कर्ज परत फेड रक्कम निश्चित करणेत यावी तसेच नमुद आर्सिल आर्म यांनी खर्ची टाकलेले अनावश्यक दंड व येणे कमी करणेत यावे याबाबत सामनेवाला बँकेला कळवलेचे वस्तुस्थिती दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. सदर पत्रावर पोच दिलेची दिसून येते. सदर पत्राची दखल सामनेवाला बँकेने घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि.26/03/2010 रोजी कायदेशीर वकील नोटीस पाठविलेली आहे व यामध्ये तक्रारदाराच्या संमत्तीशिवाय व कराराच्या बाहेर जाऊन आर्सिल आर्म या त्रयस्थ संस्थेकडे तक्रारदाराचे कर्ज खाते वसुलीसाठी वर्ग केलेले आहे व ही बाब बेकायदेशीर आहे असे स्पष्टपणे नमुद केले आहे. सामनेवाला बॅंकेने तक्रारदाराचे पत्रास तसेच सदर नोटीसला प्रतिउत्तर दिलेले नाही. तसेच सदर मंचासमोर त्यांना नोटीस लागू होऊनही लेखी म्हणणे दाखल केलेले नाही व युक्तीवादही केलेला नाही यावरुन त्यांना तक्रारदाराची तक्रार मान्यच आहे असे म्हणावे लागेल. कर्ज वसुलीसाठी सामनेवाला बँकेने आर्सिल आर्म सारख्या त्रयस्थ संस्थेकडून बळाचे व भितीचे जोरावर सदर कर्ज वसुल करणेसाठी प्रयत्न केलेला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालय, मा.राष्ट्रीय व राज्य आयोग यांनी कितीतरी दाखले दिलेले आहेत. थकीत कर्जे कायदेशीर मार्गाने वसुल करणेचे सर्व अधिकार व मुभा सामनेवाला बॅंकेस असतानाही अशा प्रकारे बेकायदेशीरपणे कर्ज वसुल करणे ही सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. तसेच अशा आर्सिल आर्म सारख्या वसुली संस्था मनमानी दंड व येणे आकारतात जे बेकायेदशीर आहे. सामनेवाला बँकेस संधी असतानाही म्हणणे देऊन तक्रारदाराची तक्रार खोडून काढलेली नाही. सबब सामनेवाला बँकेने सेवात्रुटी केलेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवाला संस्थेने राबवलेल्या वसुली प्रक्रियेच्या भितीने तक्रारदार एक रकमी कर्ज भागवणेस तयार आहे. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवालांनी पत्रव्यवहार करुनही सामनेवालांनी त्याची दखल घेतलेली नाही. तक्रारदार ओटीएस खाली सदर कर्ज खाते भागवू इच्छितो याचा विचार करता सामनेवाला कंपनीने बॅंकीग कायदा व प्रक्रियेचा अवलंब करुन तक्रारदाराचे खाते ओटीएस खाली भागवून घ्यावे व सदर कर्जखातेस नमुद आर्सिल आर्म कंपनीने खर्ची टाकलेले अनावश्यक दंड व येणे रक्कमा सदर कर्ज रक्कमेतून रद्द कराव्यात व त्याप्रमाणे तक्रारदारास त्याचे खाते निरंक करुन दयावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला कंपनीने तक्रारदाराचे गृहकर्ज खाते क्र.LAN-LBKPR00001205503 एकरकमी परत फेड करुन घ्यावे. सदर परत फेड करुन घेताना आर्सिल आर्म कंपनीने खर्ची टाकलेले अनावश्यक दंड व येणे रक्कम रद्द कराव्यात. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावी.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |