जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 108/2011 दाखल तारीख :27/04/2011
निकाल तारीख :07/02/2015
कालावधी :03वर्षे 09 म.10 दिवस
नितीन निवृततीराव थिटे,
वय सज्ञान धंदा नौकरी,
रा. श्रीनगर अश्वमेध हॉस्पीटलच्या पाठीमागे,
लातूर, ता.जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्ड,
जनरल इंशुरन्स कं.लि. तर्फे,
मॅनेजर आय.सी.आय.सी.आय बँक टॉवर बांद्रा,
कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई 400051. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.एम.जी.सुतार.
गै.अ. यांचे तर्फे : अॅड.एस.जी.डोईजोडे.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री. अजय भोसरेकर, मा.सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा लातूर येथील रहिवाशी असून व्यवसायाने नौकरी करतो, तक्रारदाराने कुटूंबाच्या व वैयक्तीक वापरासाठी इंडिका कार खरेदी केली, त्याचा वाहन क्रमांक एम.एच.24/5071 असून, सामनेवाला यांच्याकडे वाहन अपघात विमा घेतला,त्याचा पॉलिसी क्रमांक 54299706 असून, दि. 25.05.2009 ते 24.05.2010 या कालावधीसाठी घेतली आहे. तक्रारदाराचे नातेवाईक नामे अशोक उत्तरेश्वर भोसले व सुनिल ज्ञानेश्वर काळदाते हे तक्रारदाराकडे लातूर येथे आले होते. त्यांना परत तातडीने औरंगाबाद येथे जाण्याचे असल्यामुळे त्यांचे वाहन नादुरुस्त झाल्या कारणाने तक्रारदाराने स्वत:चे वाहन क्र.एम.एच.24/ 5071 व पाहुण्यांनी आणलेला ड्रायव्हर यास सोबत देवुन स्वत:ची गाडी औरंगाबाद जाण्यासाठी दिली.
तक्रारदाराचे नातेवाईक औरंगाबादकडे जात असतांना दि. 08.05.2010 रोजी रात्री 8 वा.च्या सुमारास बासरवाडा फाटयाजवळ पाचोडच्या अलीकडे 10 कि.मी. अंतरावर समोरुन जानावरे येत असल्या कारणाने वाहन बाजुस उभा केले होते, त्यावर लाईट नसलेले अवस्थेतील ट्रॅक्टर समोरुन भरधाव वेगाने व निष्काजीपणे चालवुन तक्रारदाराच्या वाहनास समोरुन दिली. त्यात तक्रारदाराचे नातेवाईक गंभीर जखमी झाले त्यांना धुत हॉस्पीटल औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. सदर वाहनाचा पोलीस पंचनामा दि. 09.05.2010 रोजी दुपारी 4.00 वाजता गुन्हा क्र. 129/2010 अन्वये करण्यात आला.
तक्रारदाराने सामनेवाला यांना सदर घटनेची माहिती दिल्या नंतर सर्व्हेअर नियुक्त केला, व सर्व्हेअर यांनी सदरचा वाहनाचा सर्व्हे केला, तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे वाहन अपघात विम्याची रक्कम मिळण्यासाठी क्लेम क्र. MOT 01560040 या नुसार मागणी केली. सामनेवाला यांनी तक्रारदारास दि. 25.05.2010 रोजी पत्राद्वारे वाहनाचा व्यवसायीक वापर असल्याकारणाने आपला क्लेम देता येत नसल्याचे पत्र देवुन विमा दावा नाकारला. त्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने वाहन दुरुस्ती खर्च रु. 61,000/-, वाहन दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग रक्कम रु. 2,90,275/-, शारिरीक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 25,000/- त्यावर 12 टक्के व्याज मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 08 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 21.08.2014 रोजी दाखल झाले असून, तक्रारदाराने विमा पॉलिसी घेतल्याचे त्यांना मान्य असून दि. 25.05.2010 रोजी दिलेले पत्र हे तक्रारदाराचे वाहन व्यावसायीक वापर करत असल्याकारणामुळे देता येत नाही. तक्रारदाराच्या वाहन अपघात विमा हा खाजगी वापरासाठी संरक्षित असल्यामुळे तक्रारदाराचा विमा प्रस्ताव नाकारुन विमा पॉलिसीच्या अटी व नियमानुसार योग्य केले आहे. आम्ही तपासणी अधिकारी नियुक्त केला होता. त्याचा अहवालावरुन व तक्रारदाराचा जबाब दि. 14.05.2010 रोजी तपासणी अधिका-याने घेतलेला, तो सदर प्रकरणात दाखल केला आहे. यावरुन तक्रारदाराचे वाहन हे व्यावसायीक वापर करत असल्याचे दिसून येत आहे. म्हणुन तक्रारदाराचा विमा प्रस्ताव न देवुन आम्ही कोणतीही सेवेत त्रूटी केली नसल्यामुळे, तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 05 कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार सोबतची कागदपत्रे, सामनेवाला यांना दि. 30.12.2014 रोजी तोंडी युक्तीवाद केला व तक्रारदाराने दि. 07.01.2014 रोजी तोंडी युक्तीवाद केला. या सर्वाचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदारास सामनेवाला यांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे यावर आपले म्हणणे शपथपत्रावर म्हणणे मांडण्याची संधी असतांना, तक्रारदाराने दि. 22.11.2011 रोजी पुरसीसद्वारे तक्रारी सोबतचे शपथपत्र हे सरतपासणीचे शपथपत्र समजावे असे म्हटले आहे. म्हणजेच सामनेवाला यांनी दाखल केलेले तपासणी अधिका-याचा अहवाल त्याच बरोबर तक्रारदाराचा व त्याच्या पत्नीचा घेतलेला जबाबावरील सहया व तक्रारदाराच्या वकालतनामावर आणि दाखल तक्रारीवरील सहया हया एकच आहेत हे दिसून येते. म्हणजेच तक्रारदार हा सदर वाहन व्यावसायीक वापर करत होता, हे त्याने अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी दि. 25.05.2010 रोजी व्यावसायीक वापरामुळे विमा दावा नाकारुन सेवेत त्रूटी केली आहे हे तक्रारदाराने सिध्द न केल्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्द करणे , योग्य व न्यायाचे होईल असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**