:: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/01/2015 )
आदरणीय सदस्या श्रीमती.जे.जी.खांडेभराड , यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्त्याचे वारा जहॉंगीर येथे अतिक किराणा शॉप या नांवाने किराणा दुकान रेती, सिमेंट, विटा मध्ये बांधलेले असून दुकानाला शटर आहे. दुकानाला लागूनच तक्रारकर्त्याचे घर सुध्दा आहे. किराणा दुकानाचा व्यवसाय करुन येणा-या उत्पन्नावर तक्रारकर्ता कुटूंबाची देखभाल करतो. तक्रारकर्त्याने दि वाशिम अर्बन को. ऑप. बँक, शाखा अनसिंग यांच्याकडून रुपये 2,00,000/- कर्ज घेउन किराणा दुकानामध्ये माल भरला होता. तक्रारकर्ता दिनांक 01/04/2012 रोजी नातेवाईकांकडे लग्न समारंभ असल्यामुळे कुटूंबातील व्यक्तीसह घर व दुकान बंद करुन गेला होता. जेंव्हा दिनांक 03/04/2012 रोजी तक्रारकर्ता घरी परत आला, त्यावेळेस तक्रारकर्त्याला घराचे व दुकानाचे शटरचे कुलूप तुटलेले दिसले तसेच घरातील व दुकानातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तक्रारकर्त्याने सदरहू घटनेचा रिपोर्ट पोलीस स्टेशन, आसेगांव येथे दिला. पोलीस स्टेशन,आसेगांव यांनी एफ.आय.आर. क्र.14/12 कलम 457,380 भा.दं.वि. प्रमाणे अज्ञात चोरांविरुध्द गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी घटनास्थळावर येउन तक्रारकर्त्याचे घर व दुकानाचा पंचनामा केला. तक्रारकर्त्याचे दुकानात झालेल्या चोरीमध्ये अंदाजे पाच ते साडेपाच लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. तक्रारकर्त्याचे किराणा दुकानाच्या गल्ल्यामधून रुपये 45,000/- नगदी/रोख चोरी गेलेले आहेत, दुकानातील तुटफुटीचे नुकसान रुपये 35,000/- तसेच दुकानातील चोरीस गेलेल्या मालाची किंमत रुपये 3,50,000/- एवढी आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडे त्याच्या दुकानातील मालाचा विमा रुपये 4,50,000/- चा काढला होता. त्या पॉलिसीचा क्र. 4017/0025000/01/017 आहे, तसेच पॉलिसी प्रमाणपत्र क्र. 4017/ 0025000/A-01158 आहे. त्या पॉलिसीची मुदत दिनांक 28/02/2012 ते 27/02/2013 पर्यंत होती. तक्रारकर्त्याच्या दुकानात दिनांक 01/04/2012 ते 03/04/2012 चे दरम्यान चोरी झालेली आहे. सदर पॉलिसी घटनेच्या दिवशी चालू स्थितीत होती. तक्रारकर्त्याने दुकानात चोरी झाल्यानंतर विरुध्द पक्ष कंपनीला घटनेची माहिती दिली होती. तसेच विरुध्द पक्षाने तपास अधिकारी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा सुध्दा केला. तक्रारकर्त्याने नुकसान भरपाई मिळण्याकरिता विमा कंपनीकडे लागणा-या सर्व कागदपत्रांसह अर्ज केले होते. परंतु विरुध्द पक्षाने नुकसानीचा कोणताही विचार न करता तक्रारकर्त्यास दिनांक 14/06/2012 रोजी धनादेश क्र.721550 दिनांक 23 मे 2012, रुपये 18,831/- चा दिला आहे. विरुध्द पक्षाने ही नुकसान भरपाईची रक्कम कोणत्या हिशोबाने दिली याबद्दल कोणताही खुलासा आजपर्यंत तक्रारकर्त्यास दिला नाही. विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन, विनंती केली की, तक्रार मंजूर व्हावी व विरुध्द पक्षाकडून रुपये 4,50,000/- वसुल करुन दयावेत, त्यावर द.सा.द.शे. 18 % व्याज मिळावे तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक,त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्षाकडुन देण्याचा आदेश व्हावा. तसेच या व्यतिरीक्त योग्य व न्याय दाद तक्रारकर्त्याला देण्यात यावी.
सदर तक्रार तक्रारकर्त्याने प्रतिज्ञापत्रावर केली व दस्तऐवज यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब ः- विरुध्द पक्षाने त्यांचा लेखी जबाब व प्राथमिक आक्षेप (निशाणी 24) दाखल करुन, बहुतांश विधाने नाकबूल केली आहेत. अधिकचे कथनामध्ये थोडक्यात आशय असा की, सदर घटना घडल्यानंतर तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन, आसेगांव जि. वाशिम येथे एफ.आय.आर. क्र.14/12 प्रमाणे रिपोर्ट दिला की, त्याचे घरी व दुकाणात चोरी झाली आहे व त्यामध्ये त्याचे किराणा दुकानातील, किराणा सामान किंमत रुपये 26,500/- चा माल चोरीला गेला आहे, याबद्दलच आहे. त्यामुळे त्याचे गल्ल्यातील रुपये 45,000/- रोख चोरी गेले, त्याचप्रमाणे रुपये 35,000/- तुटफुटीचे नुकसान झाले ही बाब खोटी व खोडसाळपणाची आहे, हे प्रथमदर्शनी निदर्शनास येते.
विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याचे दुकानाचा Cunningham Lindsey International Pvt. Ltd. मार्फत दि. 22/05/2012 रोजी रेफरन्स 11/208/01780/एफएसआर अन्वये नुकसानीबाबत सर्व्हे केला, त्याची प्रत सोबत जोडलेली आहे. त्यानुसार विरुध्द पक्ष यांनी दिनांक 05/06/2012 रोजी धनादेश क्र.721550 दिनांक 23 मे 2012 रोजीचा रुपये 18,831/- चा धनादेश तक्रारदारालाफुल अॅण्ड फायनल सेटलमेन्ट म्हणून दि वाशिम अर्बन को. ऑप. बँक मार्फत तक्रारदारास दिला व तो धनादेश तक्रारदाराने दिनांक 14/06/2012 रोजीच फुल अॅण्ड फायनल सेटलमेन्ट म्हणून स्विकारला व त्याची पावती दिली, त्याची प्रत सोबत जोडलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या क्लेमचा निवाडा आधीच, कंपनी व पॉलिसीचे नियमानुसार व सर्व्हेअर रिपोर्टनुसार लावलेला आहे व तक्रारकर्त्यास नुकसान भरपाईची रक्कम दिलेली आहे.
तक्रारकर्त्याने जास्तीत जास्त रक्कम उकळविण्याच्या हेतूने खोटी तक्रार दाखल केल्याचे व जाणीवपूर्वक खोटे कागदपत्रे सादर केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह खारीज होण्यास पात्र आहे. शिवाय तक्रारकर्ता व्यावसायीक तत्वावर दुकान चालवीत असल्यामुळे, त्या कारणास्तव तक्रार चालू शकत नाही. सबब तक्रारकर्त्याचा संपूर्ण दावा हा खर्चासह खारीज करण्यात यावा.
विरुध्द पक्षाने त्यांचा लेखी जबाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला.
3) कारणे व निष्कर्ष ः-
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाची पुरावा देण्याबाबतची पुर्सीस, तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद व दाखल केलेले न्यायनिवाडे तसेच विरुध्द पक्षाचा तोंडी युक्तीवाद,यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवून पारित केला तो येणेप्रमाणे.
या प्रकरणात उभय पक्षांना मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ता यांचे मालकीचे ‘अतिक किराणा शॉप’ या नांवाचे दुकान असून त्या दुकानाचा विमा विरुध्द पक्ष - आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी कडून काढलेला आहे. तसेच या पॉलिसीचा कालावधी दिनांक 28/02/2012 ते 27/02/2013 पर्यंत होता. सदरच्या दुकानात तक्रारकर्ता बाहेरगावी असलेल्या कालावधीत म्हणजे दिनांक 01/04/2012 ते 03/04/2012 च्या दरम्यान चोरी झालेली होती व या घटनेचा एफ.आय.आर. पोलीस स्टेशन, आसेगांव जि. वाशिम येथे दिल्या गेला होता.
तक्रारकर्त्याच्या मते या चोरीच्या घटनेत त्याचे अंदाजे 5.00 लाख ते 5.30 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. परंतु विरुध्द पक्ष विमा कंपनीने झालेल्या नुकसानीचा कोणताही विचार न करता तक्रारकर्त्याला दिनांक 14/06/2012 रोजी धनादेश क्र.721550 दिनांक 23 मे 2012 चा रुपये 18,831/- चा दिला आहे. म्हणून उर्वरित रक्कम म्हणजे सर्व मिळून एकंदर रक्कम रुपये 4,50,000/- विमा कंपनीकडून व्याजासह वसूल करुन देण्यात यावी.
तक्रारकर्त्याचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर व त्यांनी दाखल केलेल्या सर्व दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यानंतर,मंचाच्या असे निदर्शनास आले की, तक्रारकर्त्याने त्यांच्या या नुकसान भरपाईपोटी विरुध्द पक्षाकडून रक्कम रुपये 18,831/-फुल अॅण्ड फायनल सेटलमेन्ट म्हणून, कोणतीही तक्रार न करता स्विकारलेली आहे. तसेच ही रक्कम स्विकारल्यानंतर त्याची रितसर पावती विरुध्द पक्षाला सही करुन दिलेली आहे. तसेच तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत, विरुध्द पक्षाने ही रक्कम देतांना कोणतीही बळजबरी अथवा दबाव तंत्राचा वापर केला, असे कुठेही नमुद केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेले मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे या प्रकरणात लागू होत नाहीत, असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारकर्त्याची ही तक्रार प्रतिपालनीय नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
::: अं ति म आ दे श :::
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते.
2) न्यायिक खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3) उभय पक्षास आदेशाची प्रत निशुल्क दयावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.