निकालपत्र :- (दि.17/09/2010) (सौ.प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की – तक्रारदार यांचे मयत पती महादेव शंकर पाटील हे कुंभारवाडी ता.राधानगरी जि.कोल्हापूर येथील शेतकरी होते व त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला विमा कंपनीकडून अपघात विमा उतरवला होता. मयत महादेव शंकर पाटील दि.13/11/2005 रोजी रस्त्याने दुर्गमानवाडकडे जाणा-या रोडने चालत जात असताना मोटरसायकल अपघातात जखमी झालेने त्यांना सी.पी.आर.हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. तक्रारदार यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झालेनंतर दि.21/12/2005 रोजी योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन क्लेम फॉर्म भरुन सामनेवाला कंपनीकडे पाठविलेला होता. तथापि, सामनेवाला कंपनीने यातील तक्रारदार यांचेकडून दि.18/09/2006 रोजी पोलीस फायनल रिपोर्ट, फेरफार उतारा व पासबुक झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रांची मागणी केली. तसेच दि.15/12/2006 रोजी तक्रारदार यांचेकडून तक्रारदार यांचे पतीचा शाळा सोडलेचा दाखला याची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी सदरच्या कागदपत्रांची पूर्तता केलेनंतर यातील तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीकडे क्लेम मंजूरीबाबत चौकशी केली असता सामनेवाला कंपनीने तुमचा क्लेम आज मंजूर होईल उदया मंजूर होईल अशी ग्वाही देत होते. यातील तक्रारदार यांचा क्लेम मंजूरीस पात्र असताना सामनेवाला कंपनीने क्लेम मंजूर केलेला नाही अथवा क्लेमबाबत कळविलेले नाही. (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदार या गरीब, अशिक्षीत, विधवा असून राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागात राहते व तिच्यावर संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी आहे. पतीच्या अपघाती मृत्युमूळे तिच्या मनावर आघात झाला आहे. त्यामुळे मयत पतीच्या विम्याची रक्कम तक्रारदारास न मिळाल्यास तिच्या संपूर्ण कुटूंबावरच उपासमारीची वेळ येणार आहे. तक्रारदाराचा न्याययोग्य विमा क्लेम वेळेवर मंजूर न करणे ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे म्हणून तिच्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने मंचासमोर आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून विनंती केली आहे. सामनेवाला विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे; (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत तहसिलदार यांना दिलेला अर्ज, तहसिलदार यांनी सामनेवाला यांना पाठविलेले पत्र, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना पाठविलेले पत्र, अंतिम दोषारोप (चार्जशिट) पत्र, स.क्रि.केस नं.4/06, तक्रारदाराचे मयत पतीचे नावाचा डायरी उतारा, तक्रारदारचे मयत पतींचे नावाचा 8-अ उतारा, गट नं.45 व गट नं.345 चा 7/12 उतारा, सामनेवाला यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, पोष्टाची पोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी आपल्या कथनात तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु इतर सर्व कथनास तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवालाचे म्हणणे असे की, तक्रारदाराच्या मयत पतीला दि.13/11/2005 रोजी 9.30 वाजता अपघात झाला असे तक्रारदाराने म्हटले आहे. परंतु एफ.आय.आर. मध्ये 7.30 वाजता अपघात झाल्याचे म्हटले आहे. तसेच तहसीलदारांच्या पत्रात मयताच्या पत्नीचे नांव आंबुबाई असे आहे. परंतु तक्रारदाराचे नांव आकुबाई असे आहे. या तफावतीमुळे सदरचा क्लेम कायदयाने देय नाही सामनेवाला आपल्या कथनात पुढे असे म्हणतात, तक्रारदाराने क्लेम फॉर्मसोबत योग्य ती कागदपत्रेही (जसे मृत्यू दाखला, पी.एम.रिपोर्ट इत्यादी) दाखल केली नाहीत. त्यामुळे तसेच तक्रारही मुदतीत दाखल केली नसल्यामुळे ती खर्चासह फेटाळून टाकावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (6) या मंचाने तक्रारदारांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकल. तसेच सामनेवाला वकीलांचा लेखी युक्तीवाद वाचला. दोन्ही पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे तपासली. (7) तक्रारदाराची विमा पॉलीसी सामनेवाला यांनी मान्य केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे. आता पुढील मुद्दयांचा विचार करावा लागेल. 1. सामनेवाला यांचे सेवेत त्रुटी आहे काय ? --- होय. 2. सामनेवाला तक्रारदारास नुकसानभरपाई देय आहे काय ? --- होय. (8) सामनेवाला यांनी आपल्या कथनात तक्रारदाराकडून कागदपत्रे मिळाली नसल्याचे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दि.18/09/2006 रोजी तक्रारदाराने पोलीस रिपोर्ट, फेरफार उतारा व पासबुक झेरॉक्स प्रत सामनेवालांकडे दिल्याचे दिसून येत आहे. तसेच सामनेवालाने मागितलेला मयताचा शाळा सोडल्याचा दाखलाही तक्रारदाराने सामनेवालांकडे दि.15/02/2006 रोजी दाखल केल्याचे दिसून येते त्याच्यावर सामनेवाला यांची पोचही आहे. (9) तक्रारदार ही अशिक्षीत गरीब विधवा असून दूर्गम भागातील रहिवाशी आहे ही सर्व परिस्थिती विचारात घेता तिला सरकारी यंत्रणेतील कर्मचा-याकडून आवश्यक कागदपत्रे मिळण्यास विलंब झाला आहे ही बाब हे मंच ग्राहय धरत आहे. तसेच सामनेवालाने काढलेले अपघाताच्या वेळेबद्दल किंवा तक्रारदाराच्या नावातील तफावतीचे मुद्दे केवळ तांत्रिक स्वरुपाचे आहेत. या सर्व बाबी विचारात घेऊन तसेच सदर शेतकरी अपघात विमा योजना सुरे करण्यामागील शासनाचा मूळ हेतू लक्षात घेऊन सामनेवालाने तक्रारदाराचा विमा क्लेम अग्रक्रमाने मंजूर करणे आवश्यक होते. तक्रारदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू दि.13/11/2005 रोजी झाला व तक्रारदाराने विमा क्लेम दि.21/12/2005 रोजी सामनेवालांकडे दाखल केलेला कागदपत्रावरुन दिसून येत आहे. परंतु त्यानंतर जवळपास वर्षभराने सामनेवालाने तक्रारदाराकडून पोलीस रिपोर्ट व मयताचा शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रांची मागणी केलेली दिसून येत आहे. यावरुनच सामनेवालाच्या दप्तर दिरंगाईचे व अक्षम्य बेजबाबदारपणाचे दर्शन होत आहे. वरील कागदपत्र तक्रारदाराकडून मिळूनही सामनेवालाने तक्रारदाराच्या क्लेमबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. इतकेच नाहीतर तक्रारदाराने दि.26/08/2009 रोजी पाठविलेल्या कायदेशीर नोटीसला उत्तर देण्याचे सौजन्यही दाखवले नाही. असे असतानाही सामनेवाला अत्यंत बेजबाबदारपणे तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय असल्याने काढून टाकावी अशी मागणी करतात. यावरुन त्यांच्या अक्षम्य बेपर्वाईची व सेवात्रुटीची प्रवृत्ती दिसून येत आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराला नुकसानभरपाई दाखल रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) दि.15/12/2006 रोजीपासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह अदा करावी. 3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासाबद्दल रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |