नि.13 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 236/2010 नोंदणी तारीख – 7/10/2010 निकाल तारीख – 4/2/2011 निकाल कालावधी – 57 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री कुमार केशव पाटील रा.ताकारी ता. वाळवा जि. सांगली हल्ली रा. मलकापूर ता.कराड जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री एन.एस.पाटील) विरुध्द शाखाधिकारी, आय.सी.आय.सी.आय. बँक निल ऍव्हेन्यू, प्लॉट नं.5, सेक्टर नं.19 पनवेल, माथेरान रोड, न्यू पनवेल, रा.पनवेल जि. रायगड ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांचा कृष्णाई बोअरवेल्स नावाचा व्यवसाय आहे. अर्जदार यांनी पुणे येथील ननावरे एंटरप्राइझेस यांचे इमारत बांधकामाकरिता बोअर व ब्लास्ट करुन देणेचे काम कंत्राट पध्दतीने घेतलेले होते. त्याप्रमाणे अर्जदार यांनी ते काम पूर्ण करुन दिले. याकामापोटी अर्जदार यांना ननावरे एंटरप्राइझेस यांचेकडून रु.7,08,500/- येणेबाकी होते. सदरचे रकमेपोटी श्री ननावरे यांनी अर्जदार यांना सिंडीकेट बँक शाखा नेरुळ या बँकेतील त्यांचे खात्यावरील चेक रक्कम रु.4,08,500/- दि. 23/9/08 रोजीचा दिला. सदरचा चेक अर्जदार यांनी जाबदार यांचे पनवेल शाखेत दि.26/9/08 रोजी भरला. त्यावर जाबदार यांनी सदरचा चेक 8 ते 10 दिवसात वटेल असे सांगितले. त्यानंतर अर्जदार यांनी वारंवार विचारणा केली असता चेकची रक्कम जमा झाली नाही असे जाबदार यांनी सांगितले. म्हणून अर्जदार यांनी लेखी तक्रार दिली असता तुमचा चेक गहाळ झाला आहे असे उत्तर जाबदार यांनी दिले. सदरचे चेकची संपूर्ण जबाबदारी जाबदार बँकेवर आहे. परंतु त्याबाबत त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही व सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे. त्यामुळे अर्जदार यांचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु जाबदार यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. सबब सदरची चेकची रक्कम व्याजासह मिळावी, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. याकामी अर्जदार यांनी दाखल केलेले शपथपत्र नि.10 पाहिले. सबब, जाबदारविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद पाहिला तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. अर्जदारची तक्रार पाहता अर्जदार यांचा कृष्णाई बोअरवेल्स नावाचा व्यवसाय असून मशिनद्वारे होल मारुन ब्लास्टींगचे काम करुन देतात. पूणे हिंजवडीी येथील मे.ननावरे एंटरप्राइझेस, प्रोप्रा. हणमंत रा. ननावरे यांचे अर्जदाराने काम करुन दिले होते. त्यापोटी श्री ननावरे यांनी अर्जदार यांना सिंडीकेट बँकेचा दि.23/9/2008 या तारखेचा रक्कम रु.4,08,500/- चा चेक दिला. चेक नं.86528 असा होता. अर्जदारने चेक जाबदर बँकेच्या पनवेल शाखा येथे वटवणेसाठी दिला. जाबदार बँकेकडे कोअर बँकींग सुविधा उपलब्ध आहे. 8/10 दिवसांनी अर्जदारने जाबदारकडे चेकची रक्कम जमा झाली का हे विचारले असता तुमचा चेक ट्रान्झीटमध्ये गहाळ झालेला आहे असे सांगितले. अशा पध्दतीने अर्जदाराला चेकची रक्कम मिळाली नाही अथवा निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ऍक्ट कलम 138 प्रमाणे अर्जदार ननावरे यांचेविरुध्द कारवाई करु शकत नाहीत. जाबदार बँकेने अर्जदारचा चेक गहाळ करुन सेवेत त्रुटी केली आहे अशी तक्रार दिसते. 5. निर्विवादीतपणे नि.5 सोबत अर्जदारने कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.5/1 कडे सिंडीकेट बँकेचा दि.23/9/2008 रोजीचा ननावरे एंटरप्राइझेस यांनी कृष्णाई बोअर वेल्स (अर्जदार) यांना रक्कम रु.4,08,500/- च्या दिलेल्या चेकची झेरॉक्स प्रत दाखल दिसते. नि.51अ कडे अर्जदारने सदरचा चेक रक्कम रु.4,08,500/- जाबदार बँक (आय.सी.आय.सी.आय.बँक) यांचेकडे वटवणेसाठी जमा केलेल्या चलनाच्या काऊंटरस्लीपची प्रत दाखल केली आहे. तसेच नि.5/2 कडे जाबदार बँकेने अर्जदार यांना तुमचा चेक ट्रान्झीट मध्ये गहाळ झाले असलेबाबतचे पत्राची प्रत दाखल केली आहे. तसेच नि.5/2अ कडे अर्जदारचे आय.सी.आय.सी.आय.बँकेकडील खात्याचा उतारा दाखल केला आहे. त्याचे अवलोकन करता अर्जदारने ननावरे एंटरप्राइझेसचा चेक क्र.086528 खात्यामध्ये वटवणेसाठी जमा केला आहे हे दिसून येत आहे. परंतु चेकची रक्कम जमा नाही हेही दिसून येत आहे. तसेच नि.5/3 कडे अर्जदारने जाबदार बॅकेस वकीलांमार्फत नोटीस पाठवली आहे त्याची प्रत पोस्टाचे पावतीसह दाखल केली आहे. 6. निर्विवादीतपणे जाबदार बॅंकेमध्ये कोअर बँकींगची सुविधा उपलब्ध आहे. सबब पनवेल जि. रायगड येथे जरी अर्जदारने चेक जमा केला असला तरी सदर मंचास प्रस्तुत तक्रार चालविण्याचा अधिकार आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. निर्विवादीतपणे नि.5/5 कडील सिनियर सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट ऑफिस सातारा यांचे पत्रावरुन जाबदार यास मे. मंचाचे समन्स दि.17/11/08 रोजी पोहोच झाले आहे हे दिसते. परंतु तरीही जाबदार मे. मंचात हजर झाले नाहीत व अर्जदारचा तक्रारअर्ज नाकारला नाही. 7. निर्विवादीतपणे कोणीही ग्राहकाने बँकेस चेक वटवणेसाठी दिला असता जाबदार बँक चेक वटवणेसाठीचे चार्जेस ग्राहकाकडून आकारत असते, सबब ग्राहकाला योग्य सेवा देणे हे बँकेचे प्रथम कर्तव्य आहे. सबब ग्राहकाने वटवणेसाठी दिलेला चेक दुस-या बँकेचा असल्यास तो काळजीपूर्वक वटवणेसाठी पाठवणे अथवा त्याचा निर्णय घेणे हे बँकेचे काम आहे. परंतु प्रस्तुत कामातील दाखल कागदपत्रे पाहता जाबदार बँकेकडून अर्जदारने वटवणेसाठी दिलेला चेक ट्रान्झीट मध्ये गहाळ झालेला आहे हे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सबब अर्जदारने जाबदारविरुध्द आपली तक्रार शाबीत केली आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 8. अर्जदार जाबदार बँकेकडून गहाळ चेकच्या रकमेची मागणी करत आहे. परंतु अर्जदारची सदरची मागणी मान्य करणे न्याय होणार नाही. कारण ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार अर्जदार जाबदार बँकेविरुध्द ट्रान्झीटमध्ये चेक गहाळ केला, सबब सेवा देणेमध्ये त्रुटी केली म्हणूनच फक्त तक्रार दाखल करु शकतात. जाबदारविरुध्द वसुलीसाठी तक्रार दाखल करु शकत नाही. सबब अर्जदार जाबदारकडून केवळ सेवेत त्रुटी केली म्हणून रक्क म रु.5,000/- तसेच या तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासासाठी रक्कम मिळणेस पात्र आहेत या नि र्णयाप्रत हा मंच आला आहे. 9. याकामी खालील वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयाचा आधार घेतलेला आहे. 2007 NCJ 619 Delhi National Commission Corporation Bank Vs. N.C.S. Films 10. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार यांनी अर्जदार यांना सेवेतील त्रुटीसाठी रक्कम रु.5,000/- (पाच हजार फक्त) द्यावी. 3. जाबदार यांनी अर्जदार यांना मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.3/2/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |