Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, त्याने त्याचा मुलगा यश सुनवाणी याचा विरुध्द पक्षाचे I C A D School of Learning Pvt. Ltd. , टिळक नगर, नागपूर- 21 येथे असलेल्या शाखेत JEE mean, JEE Advance and Other Engineering entrance examination च्या 2 वर्षाच्या कोर्स करिता प्रवेश घेतला होता. सदरच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतांना तक्रारकर्त्याने दि. 17.12.2019 ला विरुध्द पक्षाकडे रजिस्ट्रेशन फी म्हणून रुपये 21,000/- जमा केले. सन 2020 मधील पॅन्डमिक परिस्थितीमुळे संपूर्ण भारतात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे विरुध्द पक्षाने दि. 27.05.2020 पासून ऑनलाईन क्लासेस सुरु केले होते, त्यानंतर तक्रारकर्त्याने दि. 19.06.2020 रोजी फी चा पहिला हप्ता रुपये 35,000/- विरुध्द पक्षाकडे जमा केला. परंतु तक्रारकर्त्याच्या मुलाला ऑनलाईन क्लासेस मध्ये काहीही समजत नव्हते.
- त.क.ने पुढे नमूद केले की, ऑनलाईन शिकवणी वर्ग जरी सुरु झाले होते, परंतु (link failure) लिंक फेल्यर ही नित्याची बाब होती आणि वि.प. त.क.ला ऑनलाईन क्लासेस मध्ये येणा-या अडचणी सोडविण्यास मदत करीत नव्हते. त्यामुळे तक्रारकर्ता शिकवणी वर्गातील लेक्चरला अटेंड करु शकत नव्हता आणि लेक्चर डाऊनलोड करु शकत नसल्यामुळे त्याला समजत नव्हते. विरुध्द पक्षाची असहकार्याची भूमिका आणि लिंक फेल्यरमुळे तक्रारकर्त्याच्या मुलाला ऑनलाईन लेक्चर समजणे शक्य नव्हते. म्हणून तकारकर्त्याने दि. 25.06.2020 ला विरुध्द पक्षाला ई-मेल पाठवून त्याद्वारे ऑनलाईन लेक्चर समजत नसल्यामुळे शिकवणी वर्गातील प्रवेश रद्द करण्याबाबत कळविले व त्याद्वारे शिकवणी वर्गापोटी जमा केलेली रक्कम (रुपये 21,000 + रुपये 35,000= 56,000) परत करण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने वि.प. च्या कार्यालयात जाऊन व्यवस्थापकाच्या निदर्शनास सदर बाब आणून देऊन रक्कम परत करण्याबाबतची विनंती केली असता त्यावर वि.प.ने आश्वासन देऊन ही रक्कम परत न केल्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 31.07.2020 ला पत्र पाठवून त्या अन्वये रक्कमेची मागणी केली असता वि.प.ने दि. 18.09.2020 ला पत्र पाठवून रक्कम परत करु शकत नसल्याचे कळविले. म्हणून तक्रारकर्त्याने दि. 05.10.2020 ला विरुध्द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली असता वि.प.ने दि. 23.10.2020 ला पत्र पाठवून तक्रारकर्त्याची मागणी नाकारल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्द पक्ष यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे नोंदणी फी पोटी जमा केलेली रक्कम रुपये 21,000/- व शिकवणी हप्त्यापोटी जमा केलेली रक्कम रुपये 35,000/- असे एकूण रुपये 56,000/- द.सा.द.शे.24 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्याला देण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा.
- विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश परिच्छेद निहाय कथन नाकारलेले असून पुढे नमूद केले की, त.क.च्या मुलाने स्वच्छेने वि.प यांनी आयोजित केलेल्या सन 2020-2022 या दोन वर्षाच्या शैक्षणिक JEE Advance Program, CPA Test करिता प्रयत्न केला व तो CPA Test मध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मुलाला दि. 27.11.2019 ला पत्र पाठवून त्या अन्वये Scholarship & Mode of Payment बाबत ( फी अदा करावयाच्या पध्दतीबाबत ) अवगत केले. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला शैक्षणिक प्रवेश निश्चित करण्याकरिता अटी व शर्ती सांगितल्या होत्या व त्या समजून घेतल्यानंतरच प्रवेश अर्ज शर्ती व अटीसह भरुन वि.प.च्या शिकवणी वर्गात प्रवेश निश्चित केला होता. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या नांवे दि. 17.12.2019 रोजी रुपये 21,000/- Non Refundable यान्वये जमा करुन प्रवेश निश्चित केला होता. तक्रारकर्ता व त्याच्या मुलाला प्रवेश घेतांना शिकवणी वर्गाचे संस्थेचे शर्ती, अटी व नियम बाबत माहिती दिली होती आणि Enrollment Form दि. 17.12.2019 ला दिला होता आणि सदर फॉर्म मध्ये आणि पावतीवर स्पष्ट नमूद केले आहे की, Fee is non-refundable. तक्रारकर्ता व त्याच्या मुलाने आफॅर लेटर अन्वये सर्व शर्ती, अटी, नियम व विनियम वाचल्यानंतर दि. 17.12.2019 ला त्यावर स्वाक्षरी करुन स्वीकारले.
- वि.प.ने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याने रजिस्ट्रेशन फी पोटी रुपये 21,000/- जमा करुन प्रवेश निश्चित केला व टूयशन फी चा पहिला हप्ता दि. 19.06.2020 ला भरला होता. तक्रारकर्ता व त्याचा मुलगा शर्ती, अटी मधील खालील नमूद अटीबाबत अवगत आहे.
- . After depositing fees towards registration, if a student becomes disinterested in the institute due to any reason whatsoever and wants refund, the institute will not refund the money deposited towards Registration fee / Admission fee. The registration/admission fee deposited towards a particular course will not be adjusted against any other course/centre or person.
13. In case if admission is cancelled before the Batch Start date, 100% of Tuition fees paid will be refunded after deduction of tax & registration/admission fee. 14. In case if admission is cancelled within 10 days after Batch start 50% of Tuition fees paid will be refunded after deduction of tax & registration/admission fee. - विरुध्द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याने दि. 25.06.2020 ला ई-मेल पाठवून त्याअन्वये अॅडमिशन रद्द करुन फी परत करण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर दि. 31.07.2020 ला पत्र पाठवून रक्कम परत मागितली होती, परंतु ई-मेल आणि दि. 31.07.2020 ला पाठविलेल्या पत्रातील नमूद कारण हे वेगवेगळे आहेत. वि.प.ने दि. 18.09.2020 ला पत्र पाठवून त्या अन्वये फी कां परत करु शकत नाही याबाबत सविस्तर कळविले होते. त.क.ने अॅडमिशन रद्द करण्याबाबत फार उशिराने कळविले व ते ही शिकवणी वर्गाला अटेंड केल्यानंतर, त्यामुळे त.क.च्या मुलाची प्रवेश रद्द करण्याची विनंती वि.प.च्या शर्ती व अटी नुसार विचारार्थ घेऊ शकत नाही. त.क. व त्याच्या मुलाने स्वतः स्वच्छेने वि.प.कडे फी जमा केली व शिकवणी वर्गातील एक जागा व्यापली व त्या शैक्षणिक वर्षाकरिता एक जागा ब्लॉक केल्यामुळे वि.प. दुस-या इच्छिक मुलाला त्या शैक्षणिक वर्षात प्रवेश देऊ शकला नाही, त्यामुळे कोणताही विद्यार्थी शैक्षणिक वर्षाच्या मधल्या काळात प्रवेश घेत नाही. त.क.ने प्रवेश रद्द केल्यामुळे वि.प.च्या त्या शैक्षणिक वर्षाचे एक सिट ब्लॉक केल्यामुळे नुकसान झाले व त्या कालावधीमध्ये ती जागा भरल्या जाऊ शकत नाही.
- पॅन्डमिक कालावधीत लॉकडाऊन घोषित केल्याने ऑनलाईन क्लासेस सुरु करण्यात आले होते, परंतु त.क.च्या मुलाला ऑनलाईन क्लासेस समजत नसल्याचे कथन नाकारण्यात येते. तसेच ऑनलाईन क्लासेस मध्ये मिस मॅनजमेंट असल्याचे कथन नाकारण्यात येते. ऑनलाईन क्लासेस मध्ये नेहमी लिंक फेल्यर होत नव्हती. तसेच वि.प. त.क.च्या मुलाला ऑनलाईन क्लासेस मध्ये येणा-या अडचणीला सहकार्य करीत नसल्याचे कथन आणि त.क.च्या मुलाला ऑनलाईन क्लासेसला मुकावे लागत होते हे कथन नाकारलेले आहे. ऑनलाईन क्लासेस मध्ये लिंक फेल्यर मध्ये तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कोणाकडूनही तक्रार उपलब्ध झाली नाही व त्याबाबतचा त.क.ने पुरावा दाखल करावा. वि.प.ने कोणतीही त्रुटी पूर्ण सेवा दिली नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- उभय पक्षाने दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने दोषपूर्ण सेवा दिली काय? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्याने त्याच्या मुलाच्या सन 2020-2022 या दोन वर्षाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता रुपये 1,75,200/- पैकी नोंदणी फी म्हणून रुपये 21,000/- दि. 17.12.2019 ला भरुन प्रवेश निश्चित केला होता. तसेच दि. 19.06.2020 ला शिकवणी वर्गाचा पहिला हप्ता म्हणून रुपये 35,000/- भरले असल्याचे उभय पक्षांना मान्य असल्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने आयोजित केलेल्या शैक्षणिक वर्ष 2020-2022 या वर्षाच्या शिकवणी क्लासेस मध्ये प्रवेश घेतला होता व विरुध्द पक्ष तक्रारकर्त्याच्या मुलाला शिकवणी वर्गामध्ये लेक्चर आयोजित करुन JEE mean, JEE Advance and Other Engineering कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याकरिता तयारी करुन देणार होता. परंतु भारतात आणि महाराष्ट्रात अचानक उद्ध्भवलेल्या कोविड-19 च्या महामारीमुळे लॉकडाऊन घोषित केल्याने वि.प.ला वर्गात शिकवणी वर्ग आयोजित करता आले नाही व तक्रारकर्ता आणि विरुध्द पक्ष यांच्यामधील करार अस्तित्वात आला नाही. म्हणून विरुध्द पक्षाने ऑनलाईन क्लासेस सुरु केले होते. परंतु ऑनलाईन क्लासेस द्वारे आयोजित लेक्चर समजणे कठीण झाले व ते त्याला जमले नाही, म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे घेतलेला प्रवेश रद्द करण्याकरिता दि. 25.06.2020 ला ई-मेल पाठवून प्रवेश नोंदणी फी आणि टयूशन फी पोटी जमा केलेल्या रक्कमेची मागणी केली असता वि.प. ने खालीलप्रमाणे नमूद केलेल्या शर्ती व अट क्रं.
- . After depositing fees towards registration, if a student becomes disinterested in the institute due to any reason whatsoever and wants refund, the institute will not refund the money deposited towards Registration fee / Admission fee. The registration/admission fee deposited towards a particular course will not be adjusted against any other course/centre or person.
13. In case if admission is cancelled before the Batch Start date, 100% of Tuition fees paid will be refunded after deduction of tax & registration/admission fee. 14.In case if admission is cancelled within 10 days after Batch start 50% of Tuition fees paid will be refunded after deduction of tax & registration/admission fee. अन्वये तक्रारकर्त्याची रक्कम मिळण्याबाबतची मागणी नाकारुन दोषपूर्ण सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून प्रवेश नोंदणी फी वगळता टयूशन फी पोटी जमा केलेली रक्कम रुपये 35,000/- परत मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला टयुशन फी पोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 35,000/- व त्यावर तक्रार दाखल दि.27.01.2021 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 6% दराने व्याजासह रक्कम तक्रारकर्त्याला द्यावी.
- विरुध्द पक्ष तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावे.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |