सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र.87 /2014.
तक्रार दाखल दि.10-06-2014.
तक्रार निकाली दि. 26-08-2015.
श्री. जयंत बाबूलाल शहा,
रा.वॉर्ड नं.12, घर नं.34,
मेन रोड, इचलकरंजी,
ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर. .... तक्रारदार
विरुध्द
श्री. अध्यक्ष,
आय.डी.बी.आय.ट्रस्टी शीप,
सर्व्हीसेस लि. विश्वस्त भवन,
पहिला मजला,218,प्रताप गंज पेठ,
सातारा,जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.पी.यू.समडोळे
जाबदार तर्फे– अँड.जी.पी.कुलकर्णी.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.श्री. श्रीकांत कुंभार, सदस्य यानी पारित केला)
1. प्रस्तुत अर्जदार यांनी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे यातील जाबदारांविरुध्द सेवा त्रुटीबाबत तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराचे तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे-
प्रस्तुत अर्जदार हे इचलकरंजी, ता.हातकणगले, जि.कोल्हापूर येथील रहिवाशी आहेत. बाबूलाल हिराचंद शहा हे अर्जदारांचे वडिल असून ते दि.8/10/2010 रोजी मृत्यू पावले. त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र बनवले होते. यातील जाबदार हे आय.डी.बी.आय. ट्रस्टीशीप, सर्व्हीसेस या नावाने संबंधीत गरजू लोकांना त्यांची अत्यंत महत्वाची मौल्यवान कागदपत्रे सुरक्षित ठेवणे ज्यांना मृत्यूपत्र करावयाचे असेल तर ते तयार करणे व मृत्यूपत्रकर्त्याचे वतीने मृत्यूपत्राचे ट्रस्टी व एक्झिक्यूटर म्हणून काम करणे व मृत्यूपत्राचे प्रोबेट मिळवून देणे अशा प्रकारची सशुल्क सेवा संबंधीत सेवा घेणा-यास प्रदान करते. या सेवेला अनुसरुन प्रस्तुत कामातील अर्जदारांचे मयत वडील बाबुलाल शहा यांनी त्यांचे मृत्यूपत्र जाबदारांचे ताब्यात दिले होते व बाबूलाल शहा यांचे मृत्यूपश्चात विषयांकीत मृत्यूपत्र (Execute) करुन देणे, प्रोबेट घेणे त्याचप्रमाणे मृत्यूपत्रकर्त्याचे पश्चात त्याचे लाभार्थींना शोधून त्याना विषयांकीत मृत्यूपत्र (Execute) करुन देणे, प्रोबेट मिळवून देणे अशा प्रकराची सेवा प्रस्तुत जाबदार त्यांचे ग्राहकांना देण्याचा व्यवसाय करतात. या प्रकारची सेवा अर्जदाराचे मयत वडिल बाबूलाल शहा यांनी जाबदारांचे योग्य ते सेवाशुल्क भरुन स्विकारले होते व त्यांचे मृत्यूपत्र जाबदारांकडे सोपवलेले होते. मयत बाबूलाल शहा यांच्या मृत्यूनंतर साधारण 5 वर्षानी मयताचे मृत्यूपत्राची माहीती प्रस्तुत अर्जदारांना मिळाली व तेथून पुढे प्रस्तुत अर्जदारानी यातील जाबदारांना दि. 26/11/2012 रोजी पत्र पाठवून मृत्यूपत्राची माहीती मागितली. त्यास प्रस्तुत जाबदारांनी प्रस्तुत अर्जदारांना दि.1/12/2012 रोजी पत्र पाठवून जाबदारांनी दि. 17/4/2009 साठी संबंधीत मृत्यूपत्र रजिस्टर ए.डी.ने पत्रासोबत मयत बाबूलाल शहा यांना पाठवून दिलेचे कळविले. परंतु लगेचच प्रस्तुत अर्जदाराने त्यांच्या वडिलांचे मृत्यूची तारीख वगैरे कळवून जर मयत बाबूलाल शहा यांचे मृत्यूपत्र रजि.ए.डी.ने पोष्टाने मयत मृत्यूपत्रकर्त्याचे पत्त्यावर पाठवलेचे असेल तर त्यावर एकतर पोष्टाचा ‘सदर मालक मयत’ सबब पाठवणारास परत किंवा ‘सदर पत्त्यावर राहण्यास नाहीत’. असा शेरा आला असता व मृत्यूपर्यंत मयत बाबूलाल शहा हे या अर्जदाराकडेच राहण्यास असल्याने त्यांना सन 2009 साली जाबदारांनी रजि.ए.डी.ने. पत्राव्दारे त्यातून पाठवलेल्या मृत्यूपत्राची माहिती प्रस्तुत अर्जदारांना संबंधीत पोष्टमनने नक्कीच दिली असती. परंतु मुळातच मृत्यूपत्राचे कायदेशीर ट्रस्टी व एक्झिक्यूटर जाबदार हे असताना त्यांनी मयत बाबूलाल शहा यांच्या मृत्यूपश्चात त्यांनी आश्वासित केलेली सेवा काटेकोरपणे मयत बाबूलाल शहा यांना त्यांच्या पश्चात प्रस्तुत अर्जदार व मृत्यूपत्रातील लाभार्थी यांना न देवून त्याबाबत शेवटपर्यंत प्रस्तुत अर्जदाराला खोटी माहिती देवून, मूळ मृत्यूपत्र गहाळ करुन, प्रस्तुत अर्जदारांना सदोष सेवा दिली असल्यामुळे प्रस्तुत अर्जदाराने या मंचात ग्राहक या नात्याने, जाबदाराविरुध्द त्यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत तक्रार दाखल करुन दाद मागितली आहे.
2. प्रस्तुत तक्रारदार याने नि. 1 कडे त्याचा तक्रार अर्ज नि. 2 कडे त्याचे पृष्ठयर्थ शपथपत्र,नि.3 कडे वकिल नेमणूक परवानगी अर्ज, नि. 4 कडे वकिलपत्र, नि.5 कडे एकूण पुराव्याचे 6 दस्तऐवज, नि. 13 कडे जाबदाराकडून फोटो कॉपी मंचात हजर करावी असा आदेश जाबदारांना व्हावा अशा आशयाचा अर्ज, नि. 15 सोबत एकूण पुराव्याचे 13 दस्तऐवज, नि.16 ब कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 18 कडे पुराव्याचे एकूण आठ कागदपत्रे, नि. 19 कडे तोंडी पुरावा संपलेची पुरसीस, नि. 24 कडे लेखी युक्तीवाद इत्यादी कागदपत्रे प्रकरणी दाखल केलेले आहेत.
3. प्रस्तुत प्रकरणाच्या नोटीसा यातील जाबदारांना रजि.पोष्टाने मंचामार्फत पाठवण्यात आल्या. प्रस्तुतची नोटीस जाबदाराना मिळाली त्याप्रमाणे प्रस्तुत जाबदार हे त्यांचे वकील गिरीष कुलकर्णी यांचे नि. 9 कडील वकीलपत्राने प्रकरणी दाखल झाले. त्यांनी त्यांचे म्हणणे नि. 10 कडे, या म्हणण्याचे पृष्ठयर्थ शपथपत्र, नि.11 कडे, नि. 21 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 22 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 23 कडे लेखी युक्तीवाद, नि. 20 कडे पुराव्याचे कागदपत्र (एकूण 20), नि.26 सोबत पुराव्याचे कागदपत्र, नि.16 अ व नि. 16 ब कडे पुराव्याची कागदपत्रे इत्यादी दस्तऐवज प्रकरणी दाखल केला असून त्यातील आशय पाहता, प्रस्तुत जाबदाराने अर्जदाराचे तक्रार अर्जास खालीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत. ‘प्रस्तुत अर्जदार हा जाबदाराचा ग्राहक नाही व तसे प्रस्तुत अर्जदार व जाबदारामध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते नाही’. यातील जाबदार कंपनीने विषयांकित मृत्यूपत्र दि.17/4/2009 रोजी रजि.पोष्टाने पाठवलेले असून त्याची पोहोच पावती 01/05/2005 रोजीची आहे. प्रस्तुत अर्जदाराने प्रस्तुत अर्ज दि.6/6/2014 रोजी दाखल केला आहे. त्यामुळे तो मुदतीत नाही त्यास मुदतीच्या कायद्याची बाध येते. मयत बाबूलाल शहा यांचे मूळ मृत्यूपत्र गहाळ होण्याशी या जाबदाराचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे जाबदारानी कोणतीही सदोष सेवा या अर्जदारांना दिलेला नाही. जाबदारांचे कृत्यामुळे प्रस्तुत अर्जदाराचे कोणतेही नुकसान झालेले नाही. अर्जदारांचे वडिलांनी ज्या मुळ कंपनीत त्यांचे मृत्यूपत्र ठेवले होते व सशुल्क सेवा घेतली होती ती कंपनी दि वेस्टर्न इंडिया ट्रस्टी एक्झिक्यूटर कं. लि. प्रस्तुत जाबदार कंपनीमध्ये विलीन सन 2007 साली झालेनंतर प्रस्तुत जाबदारानी ‘ मृत्यूपत्राचे व्यवस्थापन न करण्याचा ’ धोरणात्मक निर्णय घेतला व त्यास अनुसरुन ज्यांची त्यांची सर्व मूळ मृत्यूपत्रे संबंधितांकडे पाठवण्यात आली आहेत. त्याप्रमाणे प्रस्तुत बाबुलाल शहा (मृत्यूपत्रकर्ता) यांचे नावे त्यांचे मृत्यूपत्र रजि. ए.डी.ने 29/4/2009 रोजी पाठवले होते. व ते पोष्टाचे पोहोच पावतीवरील सही करणा-यास मिळाले असे समजून प्रस्तुत बाबुलाल शहा यांचे प्रकरण बंद केले होते. दरम्यानचे काळात जाबदार कंपनीने त्यांचे तळमजल्यावरील त्यांचे कार्यालय वरच्या मजल्यावर हलविताना कंपनी स्थलांतराच्या प्रक्रियेत कांही कागदपत्रांची व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यामुळे बाबूलाल शहा यांच्या मुळ मृत्यूपत्राची प्रत शोध घेवूनदेखील मिळाली नाही. परंतु, मयत बाबूलाल शहा यांची मृत्यूपत्राची इच्छापत्राची फोटो कॉपी पुन्हा शोधल्यानंतर जाबदारांना सापडली व ती त्यांनी प्रकरणी दाखल केलेली आहे. त्यामुळे प्रस्तुत अर्जदाराचा अर्ज हा खोटा व लबाडीचा आहे. तो खर्चासह रद्द करावा, अर्जदाराचा अर्ज हा खोटा व लबाडीचा आहे. तो खर्चासह रद्दा करावा, अर्जदाराकडून जाबदारास दिले त्रासाबद्दल रु.25,000/- नुकसानभरपाई मिळावी असे आक्षेप जाबदारांनी प्रकरणी नोंदलेले आहेत.
4. प्रस्तुत अर्जदाराचा तक्रार अर्ज त्या प्रकरणी दाखल पुरावे,जाबदारांचे म्हणणे त्यांनी दाखल केलेले पुरावे त्यांनी अर्जदारांचे अर्जास घेतलेले आक्षेप यांचा विचार करता प्रस्तुत प्रकरणांच्या न्यायनिर्णयासाठी आमचेसमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष
1. प्रस्तुत अर्जदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक
व सेवापुरवठादार असे नाते आहे का ?
व प्रस्तुत अर्जदार हा जाबदारांचा ग्राहक आहे का ? होय
2. प्रस्तुत जाबदारांनी मृत्यूपत्रकर्त्याचे मूळ मृत्यूपत्र गहाळ करुन,
त्यांच्या मृत्यूपश्चातील लाभार्थी या नात्याने त्यांच्या
मृत्यूपश्चात प्रस्तुत अर्जदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय ? सदोष सेवा दिली आहे काय ? होय
3. अंतिम आदेश काय ? तक्रार मंजूर
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 ते 3
प्रस्तुत प्रकरणातील अर्जदारांचे मयत वडिल श्री. बाबालाल शहा यांनी त्यांच्या हयातीत सन 2002 साली त्यांच्या स्थावर-जंगम मिळकतीचे वाटप करुन त्याबाबत मृत्यूपत्र करुन ठेवले होते व ते प्रथमतः सातारा, जि.सातारा येथील दि वेस्टर्न इंडिया एक्झिक्युटर कं. लि. यांचेकडे योग्य ते शुल्क भरुन सुरक्षिततेसाठी व मृत्यूपत्रकर्त्याच्या मृत्यूपश्चात विषयांकित मृत्यूपत्र योग्य कोर्टातून मृत्यूपत्रावर प्रोबेट घेवून त्याची अंमलबजावणी (Execute) करुन देणेसाठी वरील कंपनीचे ताब्यात दिली होती व वरील जबाबदारी वर नमूद संस्थेने तो त्यांचा सशुल्क सेवा व्यवसाय असल्याने स्विकालेली होती ही बाब यातील जाबदारांना मान्य व कबूल आहे. मूलतः वरील संस्थेचे व प्रस्तुत जाबदाराचे कंपनीचा वेगवेगळया सार्वजनिक व खाजगी ट्रस्टचे, मृत्यूपत्राचे सर्वांगीण व्यवस्थापन करणे हा त्यांचा सशुल्क सेवा व्यवसाय होता ही गोष्ट प्रस्तुत जाबदारांना मान्य आहे. त्यामुळे मूळ वेस्टर्न इंडिया ट्रस्टी एक्झिक्यूटर कं लि. यांनी त्यावेळी सर्व जबाबदारीसह व कर्तव्यासह मयत बाबूलाल शहा यांचे मूळ मृत्यूपत्र सशुल्क स्विकारले व त्यांची सेवा मयत बाबूलाल शहा यानी विकत घेतली त्यावेळी ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते उभयतामध्ये निर्माण झाले. त्यामुळे मयत बाबुलाल शहा हे मूळ वेस्टर्न इंडियाचे ग्राहक होते हे निर्वीवादरित्या शाबीत होते.
सन 2007 साली दि वेस्टर्न इंडिया ट्रस्टी एक्झिक्यूटर कंपनी लि. यांचे विलीनीकरण प्रस्तुत जाबदार कंपनीमध्ये म्हणजेच आय.डी.बी.आय. ट्रस्टीशिप सर्व्हीसेस लिमीटेड या कंपनीत झाले. सदर जाबदार हे सुध्दा मूळ वेस्टर्न इंडिया कंपनीची कार्य व तत्वे अनुसरणारी व त्याचे व्यवसाय करणारी कंपनी आहे, त्यामुळे मूळ कंपनीच्या सर्व कायदेशीर जबाबदारा-या व कर्तव्ये यासह प्रस्तुत जाबदार यानी मयत बाबूलाल शहा यांच्या मृत्यूपत्राची जबाबदारी स्विकारली होती ही गोष्ट सुध्दा सर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे व ही बाब या जाबदारांनी कुठेही अमान्य केलेली नव्हती व नाही. त्यामुळे मूळ वेस्टर्न इंडिया कंपनीने ग्राहकांच्याप्रती असणारे त्यांचे दायित्व, जबाबदा-या, कर्तव्ये यासह त्यांचे विलीनीकरण प्रस्तुत जाबदार संस्थेत केले व प्रस्तुत जाबदारांनी ते करुन घेतले. त्यामुळे मयत मृत्यूपत्रकर्ते बाबूलाल शहा हे जाबदार यांचे गाहक होते हे सुध्दा निर्विवादरित्या शाबीत होते. आता मयत मृत्यूपत्रकर्ते श्री. बाबूलाल शहा यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या मृत्यूपत्रात ज्याना-ज्याना लाभ दिलेला आहे, जे लाभार्थी आहेत ते सर्व मयताचे कायदेशीर वारस असलेने व लाभार्थी असलेने प्रस्तुत जाबदारांचे, ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीप्रमाणे ‘ग्राहक’ होतात हे स्पष्ट होते. म्हणजेच प्रस्तुत जाबदारांची जबाबदारी एवढी विस्तृत आहे की, मृत्यूपत्राचे मृत्यूकर्त्याचे मृत्यूपश्चात त्याची अंमलबजावणी करुन त्याचा लाभ संबंधीत लाभार्थीना करुन देण्यापर्यंत प्रस्तुत जाबदारांची जबाबदारी कायम राहते. त्यामुळे प्रस्तुत अर्जदार व जाबदार यांचेमध्येही ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते कायम आहे. त्यामुळे प्रस्तुत अर्जदार हा जाबदाराचा ग्राहक आहे हे निर्विवादरित्या शाबीत होते. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
5(2) प्रस्तुत जाबदारांनी प्रकरणी दाखल केलेले नि. 10 कडील म्हणणे व नि. कडील पुराव्याचे शपथपत्र व त्यातील मजकूर पाहता, त्यांनी ते ज्या प्रकारची सेवा मृत्यूपत्रकर्त्याना व त्यांचे पश्चात मृत्यूपत्रातील लाभार्थ्यांना देतात त्याबाबतच्या जबाबदारा-या व कर्तव्याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. उदा.
प्रस्तुत जाबदारांनी मूळ वेस्टर्न कंपनीचे प्रस्तुत जाबदार कंपनीत सन 2007 साली विलीनीकरण, सर्व ग्राहकांच्या सर्व जबाबदा-यांसह झाले ही गोष्ट मृत्यूकर्ता श्री. बाबूलाल शहा यांना रजि.देय पोष्टाने कळविलेले आम्हास दिसून आले नाही.
प्रस्तुत जाबदार कंपनीने विलीनीकरणानंतर ग्राहकांच्या सर्व जबाबदारा-या स्विकरलेवर त्यांच्या ग्राहकांना सन 2009 साली विश्वासात न घेता परस्पर “इच्छापत्राचे व्यवस्थापनाचे काम (सेवा) रद्द करण्याचा निर्णय घेतला” असा निर्णय घेतलेबाबत मयत मृत्यूपत्रकर्ता बाबूलाल शहा यांना कळविले नाही. कळविले असल्यास त्याबाबतचा कोणताही निर्णयाक पूरावा मंचात जाबदारांनी दाखल केलेला दिसून येत नाही.
प्रस्तुत जाबदारांचे कथनाप्रमाणे, दि.13/3/2009 रोजी मूळ मृत्यूपत्र परत घेवून जाण्याबाबत रजिस्टर पत्राने मृत्यूपत्रकर्त्यास कळविलेचे कथन करतात. परंतु असे पत्र मृत्यूपत्रकर्त्यास पाठवलेचे पोष्टाचा पुरावा किंवा अन्य पुरावा जाबदारांनी प्रकरणी दाखल केलेला नाही. प्रस्तुत प्रकरणी जाबदारांनी हजर होवून नि. 10 कडील कैफियतसोबत नि. 11 कडे व नि. 21 कडे सरतपासाचे अँफीडेव्हीट दाखल केले असून, त्यामध्ये जाबदार कबूल करतात की, त्यांना मृत्यूपत्राची मुळ प्रत शोधूनही सापडली नाही. मग त्यांनी दि.17/4/2009 ला मूळ मृत्यूपत्र तक्रारदाराचे वडिलांकडे पाठवले हा मुद्दा पूर्णतः खोटा ठरतो व मयत बाबूलाल शहा यांचे मृत्यूपत्र प्रस्तुत जाबदारांनी गहाळ केले हे पूर्णतः शाबीत होते.
प्रस्तुत जाबदारांनी अर्जदाराचे वडिलांचे मूळ मृत्यूपत्र गहाळ झालेचे त्यांचे नि.10 कडील म्हणणे नि.11 कडील अँफीडेव्हीटमध्ये कलम 14 व 15 मध्ये स्पष्टपणे कबूल केलेले आहे व जाबदारांचे हे कृत्य फौजदारी कारवाईस पात्र असून त्यांनी त्यांचेकडे अर्जदाराचे वडिलांची मूळ मृत्यूपत्राची प्रत गहाळ करुन अत्यंत निष्काळजीपणा, हयगय, दुर्लक्षामुळेच बाबूलाल शहांचे अस्सल मृत्यूपत्र गहाळ केले. म्हणजेच मयत बाबूलाल शहा यांच्या मृत्यूपश्चात असलेल्या लाभार्थी हक्कदारांचे हक्क प्रस्तुत जाबदारांचे कृतीमुळे धोक्यात आले आहेत. वरील सर्व जाबदारांच्या कृती या त्यांच्या ग्राहक सेवेतील त्रुटी असून, प्रस्तुत जाबदाराने प्रस्तुत अर्जदारांना अत्यंत गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिली आहे हेच शाबीत होते. त्याचप्रमाणे प्रस्तुत जाबदार हे त्यांच्या कैफियत कलम 10 मध्ये कथन करतात कि, मयत बाबूलाल शहा यांचे मृत्यूपत्र गहाळ होण्यास जाबदार कंपनी जबाबदार नाही व या अस्सल मृत्यूपत्राच्या हरवल्यामुळे अर्जदारांचे न्याय हक्कावर कोणतेही गंभीर परिणाम झालेले नाहीत या विधानावरुन आमचेसमोर एक गोष्ट स्पष्ट होते कि, प्रस्तुत जाबदार हे ग्राहकाप्रती त्यांना सेवा देण्यात निष्काळजी, बेफीकीर असलेचे, ग्राहकाप्रती नम्रपणे सेवा पुरवठादार नसलेचे व ग्राहकांच्या मौल्यवान दस्तऐवजाच्या सुरक्षिततेबाबत बेफिकीर असलेचे व ग्राहकांचे अस्सल मौल्यवान दस्तऐवज हरविल्यामुळे संबंधित लाभार्थी वारसांचे हक्कावर काय परिणाम होतो व मृत्यूपत्रकर्त्याच्या इच्छेचा अनादर होतो. याविषयी बेफिकीर व कायद्याची माहिती नसणारे आहेत असे स्पष्टपणे जाणवते व अशा (व्यक्तीना) जाबदारांना ते करीत असलेला व्यवसाय करण्याचा मूळातच अधिकार येत नाही. वरील जाबदारांचे कृत्य हे सुध्दा प्रस्तुत जाबदारांनी मयत मृत्यूपत्रकर्त्याला व प्रस्तुत अर्जदाराला दिलेली अत्यंत गंभीर स्वरुपाची सदोष सेवा आहे यावरुन प्रस्तुत जाबदार हे त्यांच्या व्यवसायात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करतात हे स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत जाबदाराने या तक्रारदार यांना अत्यंत गंभीर स्वरुपाची टोकाची सदोष सेवा दिली आहे हे पूर्णतः शाबीत होते. त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
5(3) प्रस्तुत अर्जदाराने प्रकरणी दाखल जाबदाराशी केलेला पत्रव्यवहार, त्यांचेकडे पाठवलेला अर्ज, वकीलांमार्फत नोटीस, नि.5/1 ते नि.5/5 अखेर प्रकरणी दाखल असून, त्याचे अवलोकन केले असता, प्रस्तुत जाबदारानी मृत्यूपत्राच्या बाबतीतील गांभीर्य समजून न घेता केवळ कागदी घोडे नाचवून अर्जदाराला अत्यंत त्रासच दिला आहे असे स्पष्ट दिसते. प्रस्तुत जाबदारांनी मृत्यूपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे दि.8/10/2007 नंतर दोन वर्षानी मृत्यूपत्र पाठवले होते असे जाबदारांनी कथन केले आहे. त्याचप्रमाणे प्रस्तुत जाबदार हे त्यांचे कैफियतीमध्ये असेही नमूद करतात कि, जाबदार कंपनीचे कार्यालय तळमजल्यावरुन दुस-या मजल्यावर हलविताना मृत्यूपत्रकर्ता श्री. बाबूलाल शहा यांचे मृत्यूपत्र गहाळ झाले व ते अथक शोधानंतरही मिळून आले नाही. मग प्रश्न असा पडतो की, प्रस्तुत जाबदार हे त्यांनी त्याचे कैफियत कलम 14 मध्ये नमूद केलेप्रमाणे दि.29/4/2009 रोजी रजिस्टर पोष्टाने मयत बाबूलाल शहा यांना मूळ मृत्यूपत्र पाठवण्यात आले. याच दरम्यानचे काळात सन 2009 सालीच प्रस्तुत जाबदारांचे तळमजल्यावरील ऑफीस दुसरे मजलेवर नेताना या प्रक्रीयेत जाबदाराकडील काही कागदपत्रांची व्यवस्था विस्कळीत झाली व कैफियत कलम 15 मध्ये ते कबूल करतात कि, “कंपनीने शोध घेवूनही जाबदारांना मूळ मृत्यूपत्र मिळून आले नाही” तर दि.29/4/2009 च्या तथाकथीत रजिस्टर पोष्टाने पाठवलेल्या लखोटयामध्ये कोणते मृत्यूपत्र होते ते मूळ मृत्यूपत्र होते का, झेरॉक्स प्रत होती का, त्यामध्ये फक्त जाबदारांचे पत्रच होते याबाबत कोणतीही सुस्पष्टता जाबदारांचे कथनात नाही. एकदा मूळ मृत्यूपत्र गहाळ झालेचे जाबदारांनी कैफियतीमध्ये मान्य केल्यावर दि.29/4/2009 ला मुळ मृत्यूपत्र बाबूलाल शहा या मृत्यपत्रकर्त्यास रजि.पोष्टाने पाठविले या विधानास कोणताही अर्थ उरत नाही व प्रस्तुत जाबदार हे खोटारडे असून त्यांनी त्यांचे अर्जदाराचे अर्जास घेतलेले कोणतेच आक्षेप ठोस पुराव्यानिशी शाबीत केलेले नाहीत. त्यामुळे प्रस्तुत जाबदारांनी अर्जदारांचे व त्यांचे वडिलांचे मृत्यूपत्राबाबत व त्यांच्याबाबत असलेल्या कर्तव्यात कसूर करुन, मुळ मृत्यूपत्र गहाळ करुन प्रस्तुत अर्जदारांना सदोष सेवा दिलेने प्रस्तुत अर्जदाराची तक्रार मंजूर करणे योग्य व न्यायोचित होणार आहे या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. त्यामुळे अर्जदारांनी जाबदाराचे बेजबाबदारपणामुळे, निष्काळजीपणामुळे गहाळ केले, मुळ मृत्यूपत्राचे मूळ दस्तऐवज हरविलेने त्याच्या नुकसानीपोटी रक्कम र.90,000/-, वरील कारणासाठी त्यांना मे मंचात दाद मागून करावी लागलेली यातायात त्याची मानसिक व शारिरीक नुकसानीपोटी रक्कम रु.5,000/- व अर्ज खर्चापोटी रक्कम रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेस पस्तुत अर्जदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे.
वास्तविक मृत्यूपत्रकर्त्याचा मूळ दस्तऐवज मृत्यूपत्र गहाळ करणे हे कृत्य जाबदारांचे त्यांच्या सेवेशी स्वरुपाशी विसंगत असून ते फौजदारी गुन्हयास पात्र आहे व जाबदाराचे या कृत्यापोटी या जाबदारांना कितीतरी पटीने ग्राहकाप्रती दाखवलेल्या बेजबाबदारपणामुळे नुकसानभरपाई देणे योग्य ठरते परंतु प्रस्तुत अर्जदार यांनी केलेल्या मर्यादित मागण्यास अधिन राहून त्यांचा अर्ज मंजूर करण्यास पात्र असलेने ता मंजूर केला आहे.
6. सबब वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन यास अधिन राहून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येतात.
आदेश
1. अर्जदारांचा अर्ज मंजूर करण्यात येतो.
2. प्रस्तुत जाबदारांनी यातील अर्जदारांना त्यांचे मुळमृत्यूपत्र हरविलेने व एकूणच
त्यांना दिलेल्या सदोष सेवेबद्दलची नुकसानीपोटी रक्कम रु.90,000/- (रुपये
नव्वद हजार फक्त) मानसिक व शारिरीकत्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रुपये
पाच हजार फक्त) व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र)
अर्जदार यांना अदा करावेत. या रकमा सदर आदेश प्राप्त
झालेपासून चार आठवडयांचे आत अर्जदार यांना अदा कराव्यात. दिले
मुदतीत जाबदारांनी अर्जदार यांना नुकसानीची रक्कम रु.90,000/- अदा न
केलेस चार आठवडे संपल्यानंतरचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत
या रकमेवर द.सा.द.शे. 10 टक्के दराने व्याज द्यावे.
3. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार
यांना जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई
करणेची मुभा राहील.
4. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
5. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि.26 -08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.