जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २१४/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०१/११/२०११
तक्रार निकाली दिनांक – २२/०५/२०१४
श्री. चेतन हुकूमचंद पगारिया,
वय ३२ वर्षे, व्यवसाय – ट्रान्सपोर्ट
रा. १६–ब, जयशंकर कॉलनी, चाळीसगांवरोड,
धुळे. ..…........ तक्रारदार
विरुध्द
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरंन्स क.लि.
शाखा धुळे
(नोटीसीची बजावणी मॅनेजर, यांचेवर करावी)
कांकरिया टॉवर, २ रा मजला,
सिव्हील हॉस्पीटलसमोर, धुळे ............ सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.एस.जी. शर्मा)
(सामनेवाला नं.१ व ३ तर्फे – अॅड.श्री.डी.एन. पिंगळे)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री. एस.एस. जोशी)
१. सामनेवाले यांनी विमा दाव्याची रक्कम अपूर्ण दिली या कारणावरून तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ नुसार सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची तक्रार अशी आहे की, त्यांनी सप्टेंबर २०१० एम.एच-१८/ एम ७०१७ क्रमांकाचा ट्रक कन्हैया इलेक्ट्रॉड प्रा.लि., लळींग यांच्याकडून विकत घेतला. त्यावेळी त्या ट्रकची विमा पॉलीसी सामनेवालेंकडून काढलेली होती. तक्रारदार यांनी ट्रक विकत घेतल्यावर ती पॉलीसी दि.०१/१०/२०१० रोजी तक्रारदार यांच्या नावे वर्ग करण्यात आली. त्यावेळी पॉलीसी क्रमांक ३००३/५९३९२०४३/००/००१ असा देण्यात आला. या पॉलीसीची मुदत दि.२१/०५/२०१० ते २०/०५/२०११ अशी होती. दि.०७/०३/२०११ रोजी सदर ट्रक अहमदाबादमार्गे धुळे येथे येत असतांना वाकवाळी गावाजवळ मेहमदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यात बंद पडलेल्या गुजरात परिवहन महामंडळाच्या बसवर सदरचा ट्रक जावून आदळला. त्यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. त्याच्या दुरूस्ती खर्चाचा रूपये ४,६३,४००/- रूपयांचा दावा तक्रारदार यांनी सामनेवालांकडे दाखल केला. प्रत्यक्षात ट्रक दुरूस्तीसाठी रूपये ५,१६,०००/- इतका खर्च आला. सामनेवाला यांच्याकडून दाव्याप्रमाणे रूपये ४,६३,०००/- एवढी रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी दि.१०/०६/२०११ रोजी रूपये १,९८,९२९/- चा धनादेश पाठवून दिला. त्यासोबत कोणतेही पत्र नव्हते. सामनेवाले यांनी विमा दाव्याची उर्वरीत रक्कम रूपये ३,१७,०७१/- त्यावर दि.११/०३/२०११ पासून द.सा.द.शे. १२ टक्के व्याज, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रूपये ५०,०००/- द्यावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. सामनेवाले यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदार यांच्या वाहनाच्या सर्व्हे रिपोर्टनुसारच त्यांना रूपये १,९८,९२९/- अदा करण्यात आले आहेत. तक्रारदार यांना सेवा देण्यास कोणतीही कसूर केलेली नाही. विम्याच्या अटी व शर्ती पाहून कार्यवाही करणे ही सेवेतील कसूर असू शकत नाही, असे सामनेवाले यांनी म्हटले आहे.
४. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत टेलीफोन वरदी, पंचनामा, गुन्हयाचा प्रथम अहवाल, गुजराथी भाषेतील फिर्याद, क्लेम अर्ज, विमा पॉलीसी, आर.सी.बुक, चालकाचा परवाना, नोटीसची प्रत, वाहन दुरूस्तीची बिले, आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती तर पोचपावतीची मूळ प्रत दाखल केली आहे.
सामनेवाला यांनी आपल्या खुलाशासोबत पॉलीसीच्या नियम व अटी, पॉलीसी, सर्व्हे रिपोर्ट यांची छायांकीत प्रत दाखल केली आहे.
५. तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांचा खुलासा, त्यासोबत त्यांनी दाखल केलेला सर्व्हे रिपोर्ट पाहता आणि सामनेवाला यांच्या वकिलांचा खुलासा ऐकल्यावर आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुददे उपस्थित होतात. त्यांची उत्तरेही आम्ही सकारण देत आहोत.
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत का ? होय
- सामनेवाले यांनी सेवेत कसूर केला आहे का ? नाही
- विमा दाव्याची उर्वरीत रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र
आहेत का ? नाही
- ? अंतिम आदेशाप्रमाणे
६. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी कन्हैया इलेक्ट्रॉड यांच्याकडून ट्रक विकत घेतल्यानंतर त्या ट्रकची पॉलीसीही दि.०१/१०/२०१० रोजी वर्ग केली. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना नवीन पॉलीसी क्रमांक दिला. त्याबाबत उभय पक्षात वाद नाही. सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशासोबत तक्रारदार यांच्या नावाची पॉलीसीची छायांकीत प्रत दाखल केली आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय देत आहोत.
७. मुद्दा ‘ब’- तक्रारदार यांच्या ट्रकला दि.०७/०३/२०११ रोजी अपघात झाला. त्याबाबत त्यांनी दि.११/०३/२०११ रोजी सामनेवालेंकडे क्लेम अर्ज दाखल केला. सामनेवाले यांनी दि.१०/०६/२०११ रोजी तक्रारदार यांना रूपये १,९८,९२९/- एवढया रकमेचा धनादेश पाठवला. तो धनादेश तक्रारदार यांनी स्विकारला आहे. सामनेवाले यांच्याकडे रूपये ४,३३,४००/- एवढया रकमेचा दावा केला होता. त्यापैकी त्यांनी फक्त रूपये १,९८,९२९/- एवढी रक्कम दिली. वारंवार मागणी करूनही सामनेवाले यांनी उर्वरीत रककम दिली नाही. यामुळे त्यांनी सेवेत कसूर केली आहे, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.
तक्रारदार यांच्या ट्रकचा सर्व्हे केल्यानंतर मिळालेल्या सर्व्हे रिपोर्टनुसारच तक्रारदार यांना रक्कम अदा करण्यात आली आहे, असे सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशात म्हटले आहे. दि.०७/०३/२०११ रोजी तक्रारदार यांच्या ट्रकला अपघात झाल्यानंतर दि.१०/०६/२०११ रोजी म्हणजे तीन महिन्यात सामनेवाले यांनी तक्रारदारांना रूपये १,९८,९२९/- अदा केल्याचे दिसते. ही रककम मिळविण्यासाठी कोणताही पाठपुरावा करावा लागल्याचे तक्रारदार यांनी नमूद केलेले नाही, किंवा त्याबाबत कोणतीही कागदपत्रे दाखल नाहीत. जी रककम तक्रारदार यांना देण्यात आली ती नियमानुसार, सर्व्हे रिपार्टनुसार देण्यात आली, असे सामनेवालेंनी म्हटले आहे. यावरून सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत कसूर केली हे सिध्द होत नाही. म्हणूनच मुददा ‘ब’ चे उत्तर आम्ही नाही असे देत आहोत.
८. मुद्दा ‘क’ – तक्रारदार यांनी सामनेवालेंकडे रूपये ४,६३,४००/- एवढया रकमेची मागणी केली आहे. तर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रूपये १,९८,९२९/- एवढी रक्कम अदा केली आहे. उर्वरीत रक्कम सामनेवालेंकडून मिळावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तक्रारदार यांना अदा करण्यात आलेले रूपये १,९८,९२९/- सर्व्हे रिपोर्टनुसार अदा करण्यात आले असे सामनेवाले यांनी खुलाशात महटले आहे. त्यांनी सर्व्हे रिपोर्ट आणि पॉलीसीच्या नियम व अटीही दाखल केल्या आहेत. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व्हे रिपोर्टमध्ये कोणत्या रकमेवर किती घसारा आकारलेला आहे, त्याचे सविस्तर विवरण दिलेले आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या खुलाशावर तक्रारदार यांनी प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, सामनेवाले यांनी कोणत्या मुद्यांच्या आधारे सर्व्हे रिपोर्ट तयार केला याचा उल्लेख केलेला नाही. कोणत्या कागदपत्रांना अनुसरून कोणकोणत्या तपासण्या करून हा रिपोर्ट तयार करण्यात आला याचाही उल्लेख केलेला नाही. तथापि, सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व्हे रिपोर्ट कसा चुकीचा आहे, हे दाखवणारा कोणताही दस्तऐवज तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. सर्व्हे रिपोर्टबाबत तक्रारदार यांनी तज्ज्ञांचे
मत किंवा अहवाल दाखल केलेला नाही. विमा कंपनीच्या आणि पॉलीसीतील नियम व अटींनुसारच सर्व्हे रिपोर्ट तयार करण्यात आल्याचे सामनेवाले यांच्या वकिलांनी युक्तिवादात म्हटले आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सर्व्हे रिपोर्टनुसार अदा केलेली विम्याची रक्कम योग्य आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळेच तक्रारदार हे मागत असलेली विमा दाव्याची उर्वरीत रक्कम मिळण्यास पात्र नाहीत असे आम्हाला वाटते. म्हणूनच मुददा ‘क’ चे उत्तर आम्ही नाही असे देत आहोत.
९. मुद्दा ‘ड’ – सामनेवाले यांनी सर्व्हे रिपोर्टनुसार आणि पॉलीसीच्या नियम व अटींनुसार तक्रारदार यांना विमा दाव्याची रककम दिली आहे. ती तक्रारदार यांनी स्विकारली आहे. सामनेवाले यांचा सर्व्हे रिपोर्ट चुकीचा आहे, हे तक्रारदार यांनी सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार मंजूर करता येणार नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
-
-
(श्री.एस.एस. जोशी)(सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.