जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा : सौ.व्ही.व्ही.दाणी.
मा.सदस्य : श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ११४/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०९/०६/२०११
तक्रार निकाली दिनांक – २६/०२/२०१४
धर्मेंद्र साहेबसिंग चौधरी ----- तक्रारदार.
उ.व.४० वर्षे,धंदा-व्यापार
रा.प्लॉट नं.४४,उत्कर्ष,
श्री.शिवाजी को.ऑप हौसिंग सोसायटी,
विद्यावाडी,धुळे
विरुध्द
आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड विमा कंपनी ----- सामनेवाले.
(नोटीसीची बजावणी शाखाधिकारी यांचेवर करावी)
झेनित हाऊस,केशवराव खाडे मार्ग,
महालक्ष्मी,मुंबई-३४
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य : श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.ए.आय.पाटील)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.डी.एन.पिंगळे)
---------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून विमा क्लेमची रक्कम मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांच्या मालकीचे टेम्पो ट्रॅव्हलर क्र.एम.एच.२०-एवाय-२८९१ हे वाहन असून, त्या वाहनाचा सामनेवाले कंपनीकडे दि.१९-०६-२००८ ते दि.१८-०६-२००९ या कालावधी करिता विमा उतरविला होता. सदर पॉलिसी क्रमांक ५४३१२२७० असा आहे. दि.१४-०४-२००९ रोजी सदर वाहन हे नंदुरबारहून दोंडाईचाकडे येत असतांना या वाहनाने अचानक पेट घेतल्याने ते पूर्णपणे जळाले. तसेच वाहनात, वाहनाचे मुळ कागदपत्र असल्याने ते सुध्दा जळून गेले आहेत. या घटनेची नोंद दोंडाईचा ग्रामिण पोलीस स्टेशन येथे नोंदविलेली आहे. सदर वाहनाचे रु.१०,००,०००/- एवढे नुकसान झालेले आहे. या घटने बाबत सामनेवाले यांचेकडे माहिती देवून सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली आहे. परंतु सामनेवाले विमा कंपनीने सदर क्लेम मंजूर केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना प्रस्तुतची तक्रार या मंचात दाखल करावी लागली आहे.
सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन, तक्रारदार यांना योग्य ती सेवा दिलेली नाही. त्यामुळे सामनेवाले यांच्याकडून नुकसान भरपाई मिळणेची तक्रारदारांनी मागणी केली आहे. तक्रारदारांची विनंती अशी आहे की, तक्रारदारांनी अर्जात दिलेल्या खर्चाच्या तक्त्याप्रमाणे रक्कम र.११,५०,५७८/-, मानसिक व शारीरिक त्रासाकामी रु.५०,०००/- या रकमा सामनेवालेंकडून व्याजासह मिळाव्यात तसेच अर्जाचा खर्च मिळावा.
तक्रारदारांनी नि.नं. २ वर शपथपत्र दाखल केले असून, नि.नं.५ सोबत एकूण ६ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. यात खबर, पंचनामा, सामनेवाले यांनी केलेला पत्रव्यवहार व विमा पॉलिसी यांचा समावेश आहे.
(३) सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.नं.१४ वर दाखल केले असून, त्यात त्यांनी तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांच्या तक्रारीस मुदतीची बाधा येते व सदरची तक्रार ही मुदतीत दाखल केलेली नाही. सदर वाहनाचा तक्रारदारांनी विमा घेतलेला असून त्याची इन्शुअर्ड व्हॅल्यू रु.६,८८,०००/- पर्यंतच आहे. त्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई तक्रारदारांना मागता येत नाही. तक्रारदार यांनी दि.१५-०६-२००९ रोजी दिलेल्या पत्राप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. तक्रारदारांना सदर तक्रार करण्यास कोणतेही कारण घडलेले नसून, सामनेवाले यांनी सेवेत कसूर केलेला नाही. सबब तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा अशी सामनेवाले यांनी शेवटी विनंती केली आहे.
सामनेवाले यांनी नि.नं.१५ वर शपथपत्र दाखल केले असून, नि.नं.१८/१ सोबत सर्व्हे रिपोर्ट आणि पॉलिसीची कॉपी अशी दोन कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(४) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र आणि दाखल कागदपत्रे व सामनेवाले यांची कैफीयत, शपथपत्र आणि दाखल कागदपत्रे पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले विमा कंपनीकडे, टेम्पो ट्रॅव्हलर क्र.एम.एच.२०-एवाय-२८९१ या वाहनाचा दि.१९-०६-२००८ ते दि.१८-०६-२००९ या कालावधी करिता विमा उतरविला असून त्याचा विमा पॉलिसी क्रमांक ५४३१२२७० असा होता. सदर विमा पॉलिसीची प्रत नि.नं.५/३ वर दाखल केली असून, सदर पॉलिसी सामनेवालेंनी मान्य केली आहे. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” आहेत हे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदारांचे वाहन नंदुरबारहून दोंडाईचा येथे येत असतांना त्यास अचानक आग लागली व त्यामुळे संपूर्ण वाहन जळालेले आहे. या बाबत पोलीस स्टेशनकडील कागदपत्र नि.नं.५/१ वर फिर्याद, नि.नं.५/२ वर पंचनामा प्रकरणात दाखल केलेला आहे. सदर कागदपत्र पाहता, त्यावरुन असे दिसते की, दि.१४-०४-२००९ रोजी वाहन चालवत असतांना त्यास अचानक आग लागलेली आहे. त्यामुळे वाहन संपूर्णपणे जळाल्याचे स्पष्ट होत आहे. यावरुन सदर वाहनाचे अपघातात झालेल्या आगीमुळे पूर्णपणे नुकसान (Total loss) झालेले आहे हे दिसून येते.
या बाबत तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे क्लेम केलेला आहे. त्यानंतर विमा कंपनीने दि.१५-०६-२००९ रोजी तक्रारदार यांना पत्र देवून आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी केलेली आहे. सदरचे पत्र नि.नं.५/४ वर दाखल आहे. या पत्राप्रमाणे सामनेवाले यांनी सदर घटनेच्या वेळी प्रवास करीत असलेल्या प्रवाशांची माहिती व इतर माहिती मागितलेली दिसते. परंतु पोलिस स्टेशनकडील कागदपत्रांप्रमाणे, सदर वाहनाने प्रवास करीत असतांना अचानक पेट घेतला असून त्यात वाहन संपूर्ण नष्ट झाले आहे. त्या बाबत संबंधीत कागदपत्रांमध्ये कोणतीही शंका घेतलेली नाही हे स्पष्ट होत आहे.
या बाबत सामनेवाले यांनी सर्व्हे रिपोर्ट नि.नं.१८/१ वर दाखल केलेला आहे. या कागदपत्रांमध्ये घटनेचे कारण यामध्ये “due to shortcircuit in wire loom, iv got fire ” असे नमूद केले आहे. या प्रमाणे सदर वाहनास अपघातात आग लागून नुकसान झाले आहे हे स्पष्ट होते. त्यामध्ये अंतिम नुकसान भरपाईकामी सदर वाहनाचे रक्कम रु.४,२४,२२९/- एवढे, सर्व अटी शर्ती प्रमाणे घसारा वजा जाता, मुल्य निर्धारीत केलेले आहे. याचा विचार होता सदर वाहनाचे अपघातात जे नुकसान झाले आहे त्यापोटी सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे निर्धारीत रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे स्पष्ट होते. परंतु सदरची रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारास वेळेत न देऊन सेवेत त्रुटी केली आहे, असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘क’’ – उपरोक्त सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी या आदेशाच्या दिनांका पासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारांना वाहनाच्या विमा क्लेमची रक्कम ४,२४,२२९/- (अक्षरी रुपये चार लाख चोवीस हजार दोनशे एकोणतीस मात्र) द्यावेत.
(२) तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
(क) उपरोक्त आदेश कलम (ब) (१) मध्ये नमूद केलेली रक्कम सामनेवाले यांनी तीस दिवसांचे मुदतीत न दिल्यास, संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे पुढील कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
धुळे.
दिनांकः २६/०२/२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.