SHIVSHANKAR DAVJI SHELAKE filed a consumer case on 12 Feb 2015 against ICICI LOMBARD GEN INSURANCE in the Satara Consumer Court. The case no is CC/14/18 and the judgment uploaded on 05 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 18/2014.
तक्रार दाखल दि.30-01-2014.
तक्रार निकाली दि.12-2-2015.
श्री.शिवशंकर दावजी शेळके,
रा.229, बिल्डिंग नं.29, गोळीबार
मैदान, गोडोली, सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जन.इन्शु.
कं.लि.तर्फे शाखाप्रमुख.
इंटरफेस बिल्डींग नं.11,401/402,
चौथा मजला, न्यू लिंक रोड, मालाड-वेस्ट,
मुंबई 400 064.
2. आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जन.इन्शु.
कं.लि.तर्फे फ्रंचायसी शाखा सातारा.
हेम एक्झिक्युटिव्ह हॉटेल इमारत,
पहिला मजला, पोवई नाका,
सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.ए.आर.कदम.
जाबदारातर्फे– अँड.श्रीमती माधुरी प्रभुणे.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे 229, बिल्डिंग नं.29, गोळीबार मैदान, गोडोली, सातारा येथील रहिवासी असून त्यांनी वैयक्तिक वापरासाठी हिरो मोटो कॉर्पोरेशन कंपनीची स्प्लेंउर प्लस मॉडेलची MH-11/BB-4537 या क्रमांकाची गाडी खरेदी केली होती व सदर वाहन या न्यायनिर्णयाचा विषय असून त्यास येथून पुढे विषयांकित वाहन असे संबोधणेत येईल. विषयांकित वाहनाचा विमा जाबदार क्र.2 कडे उतरविला होता, त्याचा पॉलिसी क्र.3005/75553150/00/बी00 असा असून वैध विमा कालावधी दि.17-11-2012 ते दि.16-11-2013 पर्यंत होता. दि.8-12-2012 रोजी तक्रारदार हे त्यांची नियमित डयूटी संपवून भाजी घेणेसाठी पोवई नाक्यावरील भाजी मंडईमध्ये असलेल्या मोटार सायकल पार्किंगमध्ये त्यांची मोटार सायकल पार्क करुन गाडी व्यवस्थित लॉक करुन भाजी घेणेसाठी गेले असता व भाजी खरेदी करुन परत गाडी पार्किंगचे ठिकाणी आले असता विषयांकित गाडी पार्किंगचे ठिकाणी उभी असल्याचे त्यांना दिसून आले नाही, त्यामुळे त्यांनी गाडीच्या आजूबाजूस शोध घेतला, चौकशी केली परंतु त्यांना त्यांची गाडी मिळून आली नाही, तसेच तक्रारदारानी विषयांकित गाडी चोरीला गेल्याची फिर्याद देणेसाठी सातारा शहर पोलिस स्टेशनला गेले असता संबंधित पोलिस स्टेशनचे अधिका-यांनी विषयांकित वाहनाचा शोध घेणेस तक्रारदाराना सांगितले. प्रस्तुत तक्रारदार हे पोलिस खात्यातच नोकरीत असल्याने त्यांचे वरिष्ठांचा आदेश मानून त्यांनी संपूर्ण एक आठवडा संपूर्ण सातारा शहर, आसपासचा परिसर, उपनगरे याठिकाणी वाहनाचा शोध घेतला. परंतु त्यांना विषयांकित वाहन मिळून आले नाही त्यामुळे त्यांनी दि.14-12-2014 रोजी सातारा शहर पोलिस स्टेशनला फिर्याद गु.र.नं.807/2012 ने दाखल केली. विषयांकित वाहन चोरीला गेलेची माहिती तातडीने जाबदार क्र.2 याना दिली. त्याप्रमाणे प्रस्तुत जाबदार क्र.2 यानी विषयांकित वाहन चोरीस गेलल्या वाहनासंबंधीची सर्व कागदपत्रे त्यांचे कार्यालयाकडे जमा करावीत असे कळविले, त्याप्रमाणे विषयांकित वाहन चोरीबाबत संपूर्ण कागदपत्रे जाबदार क्र.2 कडे तक्रारदारांनी सादर केली, परंतु तक्रारदारांनी सर्व पूर्तता करुनही दि.10-6-2013 रोजी तक्रारदारांचा विमा वाहन नुकसानी क्लेम नं.MOTO2923214 तक्रारदारानी जाबदाराना विषयांकित वाहन चोरीला गेल्याची माहिती 54 दिवसांनी जाबदाराला कळवली, त्यामुळे जाबदारांचे पॉलिसीमधील अटींचा भंग झाला. त्यामुळे तक्रारदारांचा वाहन चोरी नुकसानभरपाई दावा जाबदारांनी फेटाळला आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदारांनी मे.मंचात प्रस्तुत जाबदाराविरुध्द तक्रार दाखल करुन जाबदाराकडून चोरीला गेलल्या गाडीची विमा दाव्याची रक्कम रु.35,000/- वाहन चोरीचे दिनांकापासून त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंतचे व्याज, मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.20,000/- व अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावेत अशी विनंती मे.मंचास केली आहे.
3. प्रस्तुत प्रकरणाच्या नोटीसा रजि.पोस्टाने यातील जाबदाराना मे.मंचातर्फे पाठवणेत आल्या. सदर नोटीसा जाबदाराना मिळाल्या, त्याप्रमाणे जाबदार क्र.1 तर्फे सौ.माधुरी प्रभुणे यानी त्यांचे वकीलपत्र नि.11 कडे व पत्तामेमो नि.12 कडे म्हणणे दाखल करणेसाठी अर्ज व नि.13 कडे जाबदार क्र.1 यांचा पत्ता मेमो दाखल केला असून त्यानी दि.11-7-2014 पासून दि.10-9-2014 अखेर मे.मंचात जाबदार 1 तर्फे कोणतेही म्हणणे दाखल केले नाही, त्यासाठी मुदत मागणी अर्ज दिला नाही व शेवटपर्यंत जाबदार क्र.1 चे वकील किंवा जाबदार क्र.1 मे.मंचासमोर उपस्थित राहून त्यांचे म्हणणे/कैफियत त्यानी प्रकरणी दाखल केली नाही, त्यामुळे जाबदार क्र.1 याना दि.10-9-2014 रोजी वारंवार मंच उठेपर्यंत पाच वेळा पुकारा करुनही ते गैरहजर दिसून आले त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या तरतुदीनुसार जाबदारांविरुध्द नो से चे आदेश नि.1 वर पारित करणेत आले. प्रस्तुत प्रकरणी जाबदार 2 याना प्रकरणाच्या नोटीसा लागू झाल्या, त्याची पोहोचपावती नि.14 कउे दाखल असून जाबदार क्र.2 यांना नोटीस मिळूनही ते स्वतः किंवा वकीलातर्फे मे.मंचात हजर झाले नाहीत व त्यानी जाबदारांचे अर्जास कोणतेही आक्षेप प्रकरणी दाखल केले नाहीत, त्यामुळे जाबदार क्र.2 यानाही मंचाने पाचवेळा पुकारा करुन ते गैरहजर असल्याने मंचाने जाबदार 2 विरुध्द दि.10-9-2014 रोजी एकतर्फा आदेश पारित केले व प्रकरण जाबदार 1 व 2 विरुध्द विना आक्षेप म्हणणे व एकतर्फा सुनावणीस घेऊन तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकून प्रकरण निकालासाठी ठेवणेत आले.
4. सदर प्रकरणी तक्रारदारांचा नि.1 वरील तक्रारअर्ज, त्यासोबतचे नि.2 कडील प्रतिज्ञापत्र, नि.5 सोबत गुदरलेले पुराव्यासाठीचे नि.5/1 ते 5/10 कडील एकूण 10 कागदपत्रे, नि.15 चे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.17 कडील नि.17/1 चा सातारा शहर पोलिस स्टेशनचा समरी रिपोर्ट पहाता न्यायनिर्णय पहाता मंचासमोर सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदारांचा वाहन चोरी नुकसानविमा दावा
अकारण नाकारुन तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
कारणमीमांसा-
मुद्दा क्र.1 ते 3
5. सदरची जाबदार ही विमा कंपनी असून जाबदार क्र.1 ही जाबदार क्र.2 चे मुख्य कार्यालय असून जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.1 चे शाखा कार्यालय आहे. जाबदार हे वार्षिक प्रिमियम घेऊन वाहनाधारकांच्या सर्व प्रकारच्या वाहनांना वीज, चोरी, अपघात याप्रकारच्या घटनांपासून होणा-या नुकसानीसाठी विमा संरक्षण पुरवण्याचा सेवा व्यवसाय करते. सदर प्रकरणी यातील तक्रारदार वाहनधारकाने त्यांचे विषयांकित वाहन क्र.एम.एच-11/बी.बी.4537 या दुचाकी हिरो मोटो कॉर्पोरेशन कंपनीची स्प्लेंडर प्लस मॉडेलची दुचाकी गाडीसाठी विमा संरक्षण घेतले होते. त्याचा पॉलिसी क्र.3005/75553150/00/बी 00 असा असून सदर विमा संरक्षण पॉलिसी कालावधी दि.17-11-2012 ते दि.16-11-2013 अखेर होता. या विमा कालावधीच्या वर्षातील विषयांकित गाडीची बाजारभावाने किंमत रु.35,400/- अशी जाबदारानी निश्चित करुन त्या किंमतीवर तक्रारदाराकडून विमा हप्ता अधिक ओन डॅमेज प्रिमियम असा एकूण रु.1109/-चा वार्षिक हप्ता स्विकारुन विषयांकित वाहनासाठी वर नमूद प्रकारचे विमा संरक्षण दिलेले होते हे नि.5/1, 5/2 वरील तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होते, त्यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असल्याचे पूर्णतः शाबित होते त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
5.1- सदर प्रकरणी यातील जाबदार क्र.1 व 2 त्यांनी त्यांचे म्हणणे/कैफियतीद्वारे मंचाने त्यांना भरपूर संधी देऊनही तक्रारदारांचे तक्रारीबाबत आक्षेप मे.मंचात दाखल केलेले नाहीत, तसेच जाबदार क्र.2 प्रत्यक्ष ज्यांचे कार्यालयाकडून तक्रारदारानी त्यांच्या विषयांकित दुचाकी विमा संरक्षण पॉलिसी घेतली त्यानी प्रस्तुत प्रकरणाची नोटीस त्यांना मिळूनही ते मंचात हजरही झाले नाहीत किंवा त्यांनी तक्रारदाराचे अर्जास कोणतेही आक्षेप नोंदलेले नाहीत त्यामुळे जाबदार क्र.1 विरुध्द नो से आदेश व जाबदार क्र.2 विरुध्द नो से व एकतर्फा आदेश नि.1 वर मंचाने पारित केले आहेत. जाबदार हे युक्तीवादाचे वेळी मंचात उपस्थित नव्हते त्यामुळे तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकलेनंतर शेवटच्या क्षणी म्हणजेच दि.10-2-15 रोजी यातील जाबदारानी निकालपत्र तयार होत असताना त्यांचा लेखी युक्तीवाद सदर केस बोर्डावर घेऊन लेखी युक्तीवाद दाखल करुन घेणेची विनंती मंचाला केली. जाबदार 1 यांचेविरुध्द नि.1 वर नो से आदेश पारित झाला असूनही त्यांनी दिलेला युक्तीवाद मंचाने या कामी दाखल करुन घेतला. जाबदार 1 यांचे युक्तीवादाप्रमाणे तक्रारदाराचे गाडीचा सदर प्रकरणी घेतलेला विमा, त्याचा कालावधी, गाडी चोरीला गेली इ.बाबी जाबदार 1 याना मान्य असलेचे त्यानी कबूल केले आहे. जाबदार 1 ची फक्त एवढीच तक्रार आहे की, त्याना सदर गाडी चोरीची माहिती तक्रारदारानी वेळेत दिली नाही. वरील जाबदारांचा एकमेव व तक्रारीमध्ये नि.5/10 वरील तक्रारदारांचा क्लेम नाकारणेची जाबदारांचे पत्रातील कारणे व युक्तीवादातील कारणे ही एकच असून तेवढाच आक्षेप जाबदारांचा महत्वपूर्ण असून सदर गाडीच्या चोरी प्रकरणी तक्रारदारानी वेळेत सूचना दिली नाही एवढाचा आक्षेप येथे महत्वाचा ठरतो, याशिवाय जाबदाराना सदर गाडीचे चोरीबाबत कोणतेही आक्षेप नाहीत. सदर प्रकरणातील तक्रारदारांचे तक्रारीतील कथन पहाता त्यानी नि.5 कडे नि.5/1 कडील आर.सी.बुकची प्रत, नि.5/2 कडील सदर वाहनाची विमा पॉलिसी, नि.5/3 कडील दि.14-12-2012 ची फिर्याद, नि.5/4 कडील खबरी जबाब, नि.5/5 कडील दि.31-1-13 चे जाबदारांचे विषयांकित गाडीची संपूर्ण कागदपत्रे पाठवून देणेचे पत्र, त्याचप्रमाणे नि.5/6 कडे 4-3-2013 चे चोरीच्या गाडीच्या विमा क्लेम देणेबाबत आवश्यक कागदपत्रे पाठवणेचे तक्रारदारास दिलेले पत्र, नि.5/7 कडील दि.27-3-12 चे स्मरणपत्र, सर्व्हेअर व इन्व्हेस्टीगेटर यानी पाठवलेले कागदपत्र पूर्ततेचे पत्र व तक्रारदारांचे नि.5/9 व 5/10 कडील तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारलेबाबतचे पत्र व नि.5/11 कडील सातारा शहर पोलिस स्टेशनकडील दाखला व नि.17 सोबत 17/1 कडे दाखल केलेला दि.30-1-14 रोजीचा मुख्य न्यायदंडाधिकारी यांचेकडील समरी मंजुरीचा आदेश इ.कागदपत्रे पाहिली असता निर्विवादरित्या स्पष्ट होते की, तक्रारदारांची विषयांकित दुचाकी हिरोमोटो कॉर्पोरेशन कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी दि.8-12-12 रोजी भाजीमार्केटमधून चोरीस गेली. सदर बाब उभय पक्षकाराना मान्य व कबूल आहे. या चोरीची फिर्याद देणेसाठी तक्रारदार 8-12-12 रोजी सातारा पोलिस स्टेशनला गेले असता तक्रारदार हे स्वतः पोलिस स्टेशनला नोकरीस असलेने संबंधित पोलिस स्टेशनचे अधिका-यानी त्याना पोलिस या नात्याने या गाडीचा तपास करणेचा आदेश दिला व तपास न लागलेस गुन्हा नोंद करुन घेऊ, सदर गाडीच्या चोरीची सूचना आजरोजी पोलीसस्टेशनला मिळाली आहे त्यामुळे तुम्ही शोधाशोध करावी. वरिष्ठांचे सूचनेप्रमाणे तक्रारदारानी विषयांकित गाडीची सातारा शहरामध्ये व आसपासचे संपूर्ण परिसरात 6-7 दिवस चौकशी व तपास केला परंतु ती आढळून आली नाही, त्यामुळे सातारा पोलिस स्टेशनकडे तक्रारदारानी 14-12-2012 रोजी त्यांची फिर्याद नोंद केली हे नि.5/3 व 5/4 कडील कागदपत्रावरुन व नि.5/11 कडील संबंधित पोलिस स्टेशनच्या दाखल्यावरुन स्पष्ट होते. नि.5/11 चा सातारा शहर पोलिस स्टेशनचा दाखला पाहिला असता एक बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट दिसते की, तक्रारदारानी तक्रारीत कथन केलेप्रमाणे दि.8-12-12 रोजी गाडी चोरीस गेलेदिवशीच त्यानी सातारा पोलिस स्टेशनला तक्रार देणेसाठी गेले होते व त्याची फिर्याद वाहन शोधाअंती मिळून न आलेने 14-12-12 रोजी तक्रार नोंद करुन घेणेत आली असे स्वच्छ कथन केले आहे. त्यामुळे तक्रारदारानी प्रामाणिकपणे त्यांचे वाहन चोरीची माहिती वेळेत पोलिस स्टेशनला दि.8-12-2012 रोजीच दिली होती व वाहन चोरीच्या घडलेल्या घटनेचे त्यांचे तक्रारीत सत्यकथन केलेले आहे हे निर्विवादरित्या शाबीत होते म्हणजेच संबंधित पोलिस स्टेशनला तक्रारदारानी तत्काळ घटना घडले दिवशीच वाहनचोरीची फिर्याद दिली असल्याचे सिध्द होते. त्यामुळे जाबदारानी नि.5/9 व 5/10 मध्ये कथन केलेला मजकूर विश्वासार्ह वाटत नाही. त्यामुळे आमचे मते सदर तक्रारदारानी फिर्याद देणेस 6 दिवसाचा विलंब केल्याचे म्हणता येणार नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदारांचे हे कथन 6 दिवसाचा विलंब केला हे म्हणणे विश्वासार्ह वाटत नाही त्याचप्रमाणे तक्रारदारानी घटना घडल्यादिवशीच म्हणजे दि.8-12-12 संबंधित जाबदारांचे कार्यालयाकडे फोन करुन त्यांचे कर्मचा-यांकडून 18002666 या क्रमांकावर संपर्क साधणेस सांगण्यात आल्यावर त्याप्रमाणे वरील क्रमांकावरुन तक्रारदारानी जाबदाराशी संपर्क साधून विषयांकित गाडी चोरीस गेलेची माहिती जाबदाराना दिलेली होती, याची नोंद जाबदारानी घेतलेली होती हे निर्विवादरित्या शाबीत होते. एकंदर प्रकरणावरुन जाबदारानी त्यांचे कार्यालयास तक्रारदारानी दिलेल्या वाहनचोरीचे माहितीची नोंद 54 दिवसानी उशीरा घेतली असे म्हणावे लागेल. याचा अर्थ जाबदारांचा कारभार हा निष्काळजीपणाचा असून पारदर्शी नसलेचे शाबित होते. निःसंशयरित्या हे शाबीत होते की, जाबदारानी केवळ तक्रारदारांचा क्लेम नाकारणेच्या एकमेव उद्देशाने 'तक्रारदारानी 54 दिवसानी विषयांकित गाडीची चोरीची माहिती जाबदारास दिली' असे चुकीचे खोटे कारण घालून तक्रारदारांचा क्लेम नाकारला आहे या निष्कर्षाप्रत मंच येत आहे.
जाबदारांचे तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारणेच्या आक्षेपाच्या शाबितीसाठी जाबदारानी कोणताही ठोस पुरावा सादर करुन त्यांचे आक्षेप शाबीत केलेले नाहीत. त्याबाबतचे कोणतेही पुराव्याचे प्रतिज्ञापत्रसुध्दा सादर केलेले नाही वा ते मंचात हजरही राहिलेले नाहीत व जाबदारानी तक्रारदारांचा वाहन चोरी विमा क्लेम नाकारणेचा आक्षेप मंचात शाबित केलेला नाही परंतु तक्रारदारानी मात्र त्यांची तक्रार पुराव्यानिशी शाबीत केलेली आहे. त्यामुळे मंचापुढे असं स्पष्टपणे शाबित झालेले आहे की जाबदाराची तक्रारदारांच्या वाहन चोरी विमा नुकसानभरपाई क्लेम अकारण नाकारुन त्याना सदोष सेवा दिली आहे हे निर्विवादरित्या शाबीत होते. त्यांच्या या कृतीमुळे तक्रारदाराना दोन वर्षे नुकसानभरपाई मिळणेसाठी वाट पहावी लागली. त्यांना मानसिक, शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागले त्याच्या नुकसानभरपाईपोटी रु.15,000/- गाडीची किंमत रु.35,400/- व त्यावर गाडी चोरीस गेलेल्या दिनांकापासून विमा जोखीम सुरु होत असलेने त्यावर दि.8-12-12 पासून द.सा.द.शे.10 टक्के दराने संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंतचे व्याजासह होणारी रक्कम व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेस तकारदार पात्र आहेत या निष्कर्षापत मंच आला आहे.
6. त्यामुळे वरील सर्व विवेचन व कारणीमीमांसेला अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-
आदेश
1. तक्रारदारांचा अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदारांनी तक्रारदारांचा वाहनचोरी विमा नुकसानभरपाई क्लेम कोणत्याही योग्य संयुक्तीक कारणाशिवाय नाकारुन तक्रारदाराना सदोष सेवा दिली असल्याचे घोषित करणेत येते.
3. जाबदारानी तक्रारदाराना गाडी क्र.एम.एच-11-बी.बी.4537च्या नुकसानीपोटी रक्कम रु.35,400/- (रु.पस्तीस हजार चारशे मात्र) व त्यावर दि.8-12-2012 पासून द.सा.द.शे.10 टक्के दराने संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंतचे होणारे व्याजासह आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावेत.
4. जाबदारानी तक्रारदाराना शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.15,000/- (रु.पंधरा हजार मात्र)व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत अदा करावेत.
5. सदर आदेशाची अंमलबजावणी जाबदारानी विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
6. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.12-2-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.