सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 16/2014.
तक्रार दाखल दि.07-02-2014.
तक्रार निकाली दि.29-10-2015.
श्रीमती प्रतिमा बबनराव उबाळे,
रा. 135 ब, केसरकर पेठ, सातारा. ... तक्रारदार.
विरुध्द
1. आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड
जनरल इन्श्यूरन्स कंपनी लि.,
तर्फे व्यवस्थापक,
414, वीर सावरकर मार्ग,
सिध्दीविनायक मंदिराजवळ,
प्रभादेवी, मुंबई 400 025. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.संग्राम मुढेकर.
जाबदार तर्फे – अँड.माधुरी प्रभूणे.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे केसरकर पेठ, सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तक्रारदाराने दि.26/10/2012 रोजी त्यांची हिरोहोंडा मोटो कॉर्प या कंपनीची प्लेजर ही दुचाकी मोटार सायकल ग्रे कलरची, त्याचा इंजिन नंबर JF 16ECCGK 21235 चॅसी नं. MJBLJF6EFCGK 20811, रजि. नं. MH-11 BG 7830 या वर्णनाची मोटरसायकल तक्रारदाराने रक्कम रु.48,800/- ला खरेदी केली होते. प्रस्तुत वाहनाचा विमा तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे दि.28/10/2012 रोजी सर्टिफिकेट नं.3005/17512564/10323/000 ने उतरविला होता व आहे. प्रस्तुत विम्याचा कालावधी दि.27/10/2015 पर्यंत होता. त्यापोटी तक्रारदाराने विमा हप्ते नियमीतपणे जमा केले होते.
तक्रारदाराने वर नमूद प्लेजर दुचाकी ही दि.22/11/2013 रोजी सायंकाळी 8.45 ते दि.23/11/2012 रोजी सायंकाळी 4.00 च्या सुमारास त्यांचे भावाचे राहते घराच्या असणा-या पार्कींगमधून चोरीस गेली आहे. त्याबाबतची फिर्याद दि.24/11/2012 रोजी तक्रारदाराचे भाऊ प्रशांत उबाळे यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.746/2012 ने नोंदवली आहे. तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीने क्लेम नं. MOTO 02810146 अगेन्स्ट टू व्हील पॅकेज पॉलीसी नं.3005/74941370/00/000 ने बेअरिंग व्हेईकल रजि. नं. MH-11 BG 7830 ने विमा क्लेम केलेला आहे. सदर वाहनाची एक चावी ही वाहनाच्या डीकी मध्ये होती व एक चावी जाबदार विमा कंपनीकडे जमा केलेली आहे. तसेच सर्व कागदपत्रांची योग्य ती पूर्तता तक्रारदाराने केली. मात्र जाबदार विमा कंपनीने दि. 24/5/2013 रोजी तक्रारदार यांना लेखीपत्र देऊन कळविले की, ‘तक्रारदाराने सदरचे वाहन त्यालाच चावी ठेवून पार्क केले होते’ त्यामुळे प्रस्तुत विमा क्लेम फेटाळला असलेचे कळविले.
वास्तवीक तक्रारदाराचे वाहन विमा कालावधीत चोरीस गेलेने विमा क्लेमची रक्कम देणेची पूर्णतः जबाबदारी जाबदार विमा कंपनी आहे. परंतू जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमाक्लेम फेटाळून तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस विमा क्लेमची रक्कम रु,48,800/- परत मिळावेत म्हणून वकिलांमार्फत नोटीस दि.15/10/2013 रोजी पाठवली. परंतू सदर नोटीस जाबदाराला मिळूनही जाबदाराने त्यास उत्तरही दिलेले नाही व तक्रारदाराला विमा रक्कमही अदा केली नाही. सबब तक्रारदार यांना जाबदाराने सदोष सेवा दिलेली असलेने जाबदाराकडून विमा क्लेम रक्कम वसूल होवून मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने जाबदारांकडून विमा रक्कम रु.48,800/- (रुपये अठ्ठेचाळीस हजार आठशे मात्र) वसूल होऊन मिळावी, जाबदार विमा कंपनीकडून तक्रारदाराला झाले मानसीक त्रास व खर्चासाठी रक्कम रु.10,000/- वसूल होऊन मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- जाबदारांकडून मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने प्रस्तुत कामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/13 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे वाहन खरेदी बील, आर.सी.सी.बुक, प्रस्तुत वाहन तक्रारदाराचे मालकीचे असलेबाबत आर.टी.ओ.सातारा यांनी दिलेले पत्र, प्रस्तुत वाहनासाठीची विमा पॉलीसी, वाहन चोरीस गेलेची फिर्याद, चार्जशीट, जाबदार विमा कंपनीने तक्रारदार याचा क्लेम नाकारलेबाबतचे पत्र, तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस पाठवलेले पत्र, जाबदार कंपनीस पत्र मिळालेची पोहोच पावती, जाबदार विमा कंपनीस तक्रारदाराने वकीलांमार्फत दिलेली नोटीस, प्रस्तुत नोटीस जाबदाराला मिळालेबाबतची पोहोच, नि. 12 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 13 कडे लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार यांनी नि. 14 कडे जाबदारांविरुध्द झालेला एकतर्फा आदेश रद्द होणेसाठीचा अर्ज, नि. 15 कडे म्हणणे, नि. 16 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत. जाबदाराने त्यांचे म्हणणे/कैफियतीमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. जाबदाराने पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविले आहेत.
i तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथन मान्य व कबूल नाही.
ii तक्रारदाराने त्यांचे वाहन जाबदारकडून MH-11 BG 7830 हे जाबदारांकडे पॉलीसी क्र.3005/74941370/00/000 दि.18/10/2012 ते दि.27/10/2013 या कालावधीत या जाबदाराकडे विमाकृत केले होते. तथापी, विमा पॉलीसीच्या नियम व अटीनुसार तक्रारदाराने स्वतःच्या मालकीचे वाहनाची सुरक्षा ठेवणेची जबाबदारी तक्रारदारांवरच असते. मात्र तक्रारदाराने या जाबदारांकडे विमा क्लेम दाखल करताना त्याची मोटार सायकल नं. MH-11 BG 7830 हे वाहन चोरीस गेलेबद्दल नुकसानभरपाई मिळावी म्हणून विमाक्लेम दाखल केला होता. कोणतेही वाहन चोरीस गेलेनंतर जर विमाधारकाने जाबदार कंपनीकडे विमा क्लेम दाखल केला असेल तर विमा धारकाने प्रस्तुत वाहनाची चावी जाबदार विमा कंपनीकडे जमा करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय वाहन चोरी झाले किंवा कसे? याबाबतची शहानिशा करणे जाबदार यांना शक्य नसते. तसेच तक्रारदाराने केलेल्या विमा क्लेमची शहानिशा करणे हे जाबदार विमा कंपनीचे आद्य कर्तव्य आहे. परंतू याकामी जाबदार कंपनीने तक्रारदाराकडे गाडीचे चावीची मागणी केली असता गाडीची दुसरी चावी गाडीच्या डिकीमध्येच होती असे तक्रारदाराने विमा कंपनीस लेखी कळविले आहे. तसेच तक्रारदाराने तक्रार अर्जामध्येही प्रस्तुत चावी गाडीचे डिकीत राहीलेचे नमूद केले आहे. यावरुन प्रस्तुत वाहन चोरीस गेलेचे स्पष्ट होत नाही. तर प्रस्तुतचे कृत्य हे तक्रारदाराचे केवळ निष्काळजीपणाने झालेला आहे. त्यामुळे तक्रारदाराला प्रस्तुत वाहनाचा विमा क्लेम जाबदाराकडे मागणेचा अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळे तक्रारदाराचा विमाक्लेम जाबदार कंपनीने फेटाळलेला आहे. यामध्ये जाबदार विमा कंपनीने सेवेमध्ये कोणतीही कमतरता केलेली दिसून येत नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज मे. ग्राहक मंचासमोर चालविण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. जाबदार कंपनी ही व्यापारी कंपनी नसून विमाक्षेत्रात सेवा पुरविणारी कंपनी आहे. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत. त्यामुळे तक्रारदारास प्रस्तुत तक्रार अर्ज या न्यायमंचाकडे चालवण्याचा कोणताही अधिकार नाही. तसेच प्रस्तुत तक्रार अर्ज चालवणेचा त्यावर निकाल देणेचा अधिकार या मे मंचास नाही. सबब तक्रारदाराचा प्रस्तुत तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हणणे जाबदाराने याकामी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे मंचाने प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना
सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. तक्रार अर्ज या मे. मंचात चालणेस पात्र आहे काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खालील नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदाराने त्यांची हिरो मोटो कॉर्प कंपनीची प्लेजर मोटार सायकलचा विमा जाबदार विमा कंपनीकडे दि. 28/10/2013 रोजी विमा पॉलीसी नं. 3005/17512564/10323/000 ने उतरविला होता व आहे. सदर विम्याचा कालावधी दि.27/10/2013 पर्यंत होता. प्रस्तुत विमा कंपनीकडे तक्रारदाराने विमा हप्ते वेळेवर जमा केलेले होते व आहेत. तसेच प्रस्तुत वाहनाचा विमा जाबदारकडे उतरविला होता व तो वाहन चोरीस गेले त्यावेळी चालू होता ही बाब जाबदार यांनी मान्य केली आहे. तसेच ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (1)(d) नुसार ग्राहक ‘Consumer’ ची व्याख्या पुढीलप्रमाणे दिलेली आहे. “Consumer means any person who – i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised or under any system of deferred payment and includes any uses of such goods other that the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is mod with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose, or
ii) (hires or avails of) any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who (hires or avails of) the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised or under any system of deferred payments when such services are availed of with the approval of the first mentioned person (but does not include a person who avails of such services for any commercial purchases).”
त्यामुळे तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडून विमा सेवा घेतली असलेने ते जाबदाराचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तार आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांचे मालकीची हिरोहोंडा मोटो कॉर्प या कंपनीची प्लेजर ही मोटर सायकल जाबदार विमा कंपनीकडे विमाकृत केलेली होती. प्रस्तुतची प्लेजर मोटारसायकल रजि. नं. MH-11 BG 7830 हि दि.22/11/2012 रोजी सायंकाळी 8.45 ते दि. 23/11/2012 रोजी सायंकाळी 4.00 वाजणेच्या दरम्यान त्यांचे भावाचे राहते घराच्या असणा-या पार्कींगमधून चोरीस गेली त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत वाहन चोरीस गेलेबाबतची फिर्याद दि. 24/11/2012 रोजी तक्रारदार यांचे भाऊ प्रशांत उबाळे यांनी दिली. त्याचा गु.र.नं.745/2012 असा आहे. प्रस्तुतचे वाहन पोलीसांनी शोधाशोध करुनही सापडले नसलेने पोलीस स्टेशनने ‘अ’ समरी दाखल केली. त्यानंतर तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे MOTO-02810146 अगेन्स्ट टू व्हीलर पॅकेज पॉलीसी नं.3005/7494/1370/00/000 बेअरिंग व्हेईकल नं.एम.एच.11.बी.जी.7830 हा विमा क्लेम सर्व कागदपत्रांसह दाखल केला. परंतू जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा सदरचा विमा क्लेम दि. 24/5/2013 रोजी “तक्रारदार यांनी सदरचे वाहन हे त्यालाच चावी ठेवून पार्क केले होते” असे खोटे कारण देऊन तक्रारदाराचा क्लेम नाकारत असलेचे तक्रारदारास कळविले आहे. वास्तविक जाबदाराने तक्रारदाराने त्याची गाडीची चावी प्रस्तुत गाडीलाच ठेवून गाडी पार्क केली होती ही बाब पुराव्यानिशी सिध्द करणे गरजेचे होते. परंतू ते जाबदाराने सिध्द केलेले नाही. तक्रारदाराने दिले जबाबात गाडीची चावी गाडीचे डिकीत होती असे म्हटलेले आहे. त्यामुळे जाबदाराने म्हणण्यामध्ये व पुराव्याच्या शपथपत्रामध्ये घेतलेल्या हरकती “जाबदाराने वाहनाला चावी ठेवून वाहनाची काळजी घेतली नाही” निष्काळजीपणा केला ही बाब सिध्द करणेसाठी कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा याकामी दाखल केलेला नाही. तसेच हे कारण दाखवून तक्रारदाराचा विमाक्लेम फेटाळलेला आहे. सबब,जाबदाराने विनाकारण तक्रारदाराचा गाडीचा विमा क्लेम फेटाळून तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
8. वर नमूद मद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे. कारण- वर नमूद मुद्दा क्र. 1 चे विवेचनाप्रमाणे तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत हे स्पष्ट झाले आहे. तसेच प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मे. मंचास चालविणेचे अधिकार आहेत असे या मंचाचे मत आहे. सदर कामी जाबदार यांनी घेतलेल्या कोणत्याही हरकती सिध्द करणेसाठी कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा मे मंचात दाखल केलेला नाही. सबब तक्रारदार यांना त्यांचे प्लेजर गाडीचा सदर तक्रार अर्जात नमूद केलेला विमा क्लेम जाबदार विमा कंपनीकडून मिळणे न्यायोचीत होणार आहे. सबब जाबदाराने विमापॉलीसीमध्ये नमूद केलेली I.D.V. प्रमाणे एकूण रक्कम रु.40,660/- (रुपये चाळीस हजार सहाशे साठ मात्र) तक्रारदार यांना अदा करणे न्यायोचीत होईल असे आमचे स्पष्ट मत आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा क्लेमपोटी रक्कम रु.40,660/- (रुपये
चाळीस हजार सहाशे साठ मात्र) अदा करावी.
3. तक्रारदार यांना झाले मानसीकत्रास जाणेयेणेचा खर्च याकरीता रक्कम रु.5,000/-
(रुपये पाच हजार मात्र )जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराला अदा करावेत.
4. अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार मात्र) तक्रारदाराला जाबदार
विमा कंपनीने अदा करावेत.
5. वरील सर्व आदेशांची पूर्तता/पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45
दिवसात करावी.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक
संरक्षण कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 29-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा