जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ३३१/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ३०/११/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २८/०१/२०१४
श्री.कल्पेश किशोर बाफना
उ.व.३५, धंदा – व्यापार
रा.मु.पो.काळखेडा शिवार,
फागणे ता.जि.धुळे ४२४३०१. ................ तक्रारदार
विरुध्द
आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जन.इन्शुं कं.लि.
झेनित हाऊस, केशवराव खाडे मार्ग,
महालक्ष्मी, मुंबई ४०००३४. ............... जाबदेणार
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.एम.ए. माळी)
(जाबदेणार तर्फे – अॅड.श्री.डी.एन.पिंगळे)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
तक्रारदार यांच्या अपघातग्रस्त वाहनाचा नुकसानभरपाईचा दावा विमा कंपनीने नामंजूर केला म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी त्यांच्या ट्रक क्र.एम.एच.१८/एए-००५२ चा विमा विरुध्द पक्ष आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि. यांचेकडून दि.१७/१०/०९ ते दि.१६/१०/१० या कालावधीकरीता घेतला होता. त्यासाठी प्रिमियम रु.२८,५१८/- अदा केले होते. त्यांचा पॉलिसी क्र.३००३/५७९४४३४७/००/००० असा आहे. दि.१५/०४/१० रोजी रात्री १.१५ वाजेच्या सुमारास सदर ट्रक व ट्रेलर क्र.एम.पी.०९/एच.एफ. ८५४६ एकमेकांना धडकले व अपघात झाला. त्यात ट्रकचे बरचसे नुकसान झाले त्याबाबत पिंपळगांव (ब) पोलिस स्टेशनला गु.क्र.५२/१० दाखल झाला.
२. तक्रारदार यांनी विमा कंपनीला सदर घटनेची माहिती दिली व गाडीच्या दुरुस्तीचे काम करुन सर्व बिलेही दिली. त्याचप्रमाणे तक्रारदाराच्या ड्रायव्हर कडे ट्रक चालविण्याचा योग्य तो परवाना होता व आहे. परंतू जाबदेणार विमा कंपनी यांनी जाणूनबुजून तक्रारदाराचा क्लेम ना मंजूर केलेला आहे. गाडी दुरुस्तीसाठी त्यांना रु.१,८१,३९५/- खर्च आला. तक्रारदाराची उपजीविका या ट्रकवरच आहे. सदर ट्रक सुमारे ३ महिना दुरूस्तीसाठी लागल्यामुळे त्याचे रोजचे रू.२०००/- प्रमाणे महिन्याचे रू.१,२०,०००/- चे नुकसान झालेले आहे. चालकाचे लायसन्स व क्लेमफॉर्म विमा कंपनीकडे देण्यात आला. परंतु विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केला व सेवेत त्रुटी केली आहे. सबब तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून नुकसानीची रक्कम रु.१,८१,३९५/- अधिक ट्रक दुरुस्ती खर्च, मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.१,५०,०००/- अशी एकूण रक्कम रू.३,३१,३९५/- वर दि.१७/०४/२०१० पासून द.सा.द.शे.१२ टक्के प्रमाणे व्याज, तसेच सदर तक्रार अर्जाचा खर्च जाबदेणार यांच्याकडून मिळावा अशी विनंती केली आहे.
३ तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ नि.३ वर शपथपत्र, तसेच नि.५ वरील कागदपत्रांच्या यादीनुसार २० कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.५/१ वर क्लेम फॉर्म, नि.५/२ वर फिर्याद, नि.५/३ वर घटनास्थळ पंचनामा, नि.५/४ वर ड्रायव्हींग लायसन्सची प्रत, खर्चाची बिले इ.कागदपत्रे आहेत.
४. जाबदेणार यांनी आपल्या खुलाशात असे म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी व बेकायदेशिर आहे त्यामुळे ती खर्चासह रद्द करावी अशी विनंती केली आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचे सर्व म्हणणे नाकारले आहे व सत्यपरिस्थिती या सदरात म्हटले आहे की, तक्रारदार यांच्या चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तसेच चालकाचे फिर्यादीतील नाव व विमाकंपनीकडे सादर केलेल्या परवान्यातील चालकाचे नाव जुळत नाही, तसेच सदर ट्रकमध्ये जास्त प्रवासी असल्याने पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. जाबदेणार यांनी सदर वाहनाचा सर्व्हे केला आहे. जाबदेणार यांनी सदर वाहनाचा सर्व्हे रिपोर्ट मंचात कोर्टात केला आहे. जाबदेणार यांनी सेवा देण्यास कोणताही कसूर केलेला नाही. तसेच विमा कंपनीने सेवेत त्रुटी केलेली नाही त्यामुळे अर्ज रद्द होणेस पात्र आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
५. जाबदेणार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ नि.१६ सोबत नि.१६/१ वर सर्व्हे रिपोर्ट, नि.१६/२ तक्रारदार यांना पाठविलेले पत्र दाखल केले आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनीचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
अ. तक्रारदार जाबदेणार यांचा ग्राहक आहे का ? होय
ब. तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत जाबदेणार यांनी
कसूर केली आहे काय ? होय
क. अपघातग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई मिळण्यास
तक्रारदार पात्र आहे का ? होय
ड. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी त्यांच्या वाहनाची विमा पॉलीसी जाबदेणार यांचेकडून घेतलेली आहे. त्या अनुशंगाने दोन्ही पक्षांमध्ये आर्थिक व्यवहार आणि लेखी करार झाला आहे. त्याबाबत दोन्ही पक्षात कोणताही वाद नाही. म्हणजेच तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक ठरतात. म्हणूनच मुद्दा ‘अ’ चे
उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘ब’ – तक्रारदार यांच्या एम.एच१८-एए-००५२ क्रमांकाच्या ट्रकला दि.१५/०४/२०१० रोजी चांदवड ते नाशिक दरम्यान पिंपळगाव (ब) गावानजिक अपघात झाला. त्यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. या अपघाताबाबतची सुचना तक्रारदार यांनी त्वरीत जाबदेणार यांना दिली. त्यानंतर दि.१७/०४/२०१० रोजी जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या अपघातग्रस्त ट्रकचा सर्व्हेही केला. त्याचदिवशी तक्रारदार यांनी क्लेम फॉर्मही दाखल केला. त्यानंतर तक्रारदार यांनी ट्रक दुरूस्तीसाठी पाठविला. त्याच्या दुरूस्तीला एकूण रूपये १,८१,३९५/- इतका खर्च आला असल्याचे तक्रारदारांनी तक्रारीत म्हटले आहे. सामनेवाले यांनी केलेल्या सर्व्हेनुसार ट्रक दुरूस्तीचा खर्च रूपये १,०७,१२६/- इतका (घसारा वजा करून) झाला आहे. मात्र ही रक्कमही तक्रारदार यांना मिळालेली नाही. त्यांचा विमा दावा नाकारण्यात येत असल्याचे त्यांना दि.३१/०७/२०१० रोजी कळविण्यात आले. वास्तविक तक्रारदार यांच्या ट्रकला अपघात झाला हे जाबदेणार यांना मान्य आहे. दि.१७/०४/२०१० रोजी त्यांनी अपघातग्रस्त ट्रकचा सर्व्हे केला आहे. ट्रकच्या दुरूस्तीची बिले तक्रारदार यांनी दि.२१/०७/२०१० रोजी जाबदेणार यांच्याकडे दाखल केली आहेत. त्यांनतर जाबदेणार यांनी त्यांचा विमा दावा मंजूर करणे अपेक्षित होते. पण दि.३१/०७/२०१० रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांना विमा दावा नाकारण्यात येत असल्याचे कळविले.ही जाबदेणार यांनी सेवेत केलेली त्रुटी आहे, असे मंचाचे मत बनले आहे. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क’ – दि.१५/०४/२०१० रोजी ट्रकला अपघात झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर तक्रारदार यांनी जाबदेणार विमा कंपनीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेच म्हणजे दि.१७/०४/२०१० रोजी सामनेवाला यांनी अपघातग्रस्त ट्रकचा सर्व्हे करून घेतला. त्याच दिवशी तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे विम्याचा क्लेम फॉर्म दाखल केला आहे. त्यानंतर दि.२१/०७/२०१० रोजी तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रे जाबदेणार यांच्याकडे दाखल केली. ही कागदपत्रे मिळाल्यानंतर जाबदेणार यांनी दि.३१/०७/२०१० रोजी विमा दावा नाकारत असल्याचे तक्रारदार यांना कळविले. वास्तविक ही कागदपत्रे मिळाल्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर करणे आवश्यक होते. पण त्याऐवजी अपघाताची माहिती देणारे लेखी पत्र, एफआयआर आणि पंचनामा, चालकाचे लेखी पत्र जोडलेले नाही त्यामुळे दावा मंजूर करता येत नाही असे तक्रारदाराला कळविले (दि.३१/०७/२०१०) वास्तविक अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जाबदेणार यांनी स्वतःचा सर्व्हेअर पाठवून तक्रारदार यांच्या अपघातग्रस्त ट्रकचा सर्व्हे करून घेतला. त्यामुळे अपघाताची घटना जाबदेणार यांना मान्य आहे, त्याबद्दल कोणताही वाद नाही, हे स्पष्ट दिसते. तक्रारदार यांनी त्याचा ट्रक दुरूस्तीला टाकला तेथील गॅरेजची बिले, जे पार्टस् बदलण्यात आले त्याची बिले आणि गॅरेज चालक भंवरलाल शर्मा व शैलेश नटवरलाल पटेल यांची प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. त्यावरून जाबदेणार यांना आवश्यक असलेली माहिती तक्रारदार यांनी पुरविली होती हे दिसून येते. जाबदेणार यांनी कागदपत्रे मिळाली नाहीत म्हणून दावा नाकारला ती कागदपत्रे दावा नाकारण्यासाठी फारशी महत्वाची नाहीत, असे मंचाला वाटते. म्हणूनच तक्रारदार यांना त्यांचा विमा दावा मिळाला पाहिजे असे मंचाचे मत बनले आहे. त्याचमुळे मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
१०. मुद्दा ‘ड’ – वरील सर्व मुद्यांचा विचार करता आणि तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकता तक्रारदार यांना त्यांच्या ट्रकची नुकसान भरपाई जाबदेणारकडून मिळायला हवी असे मंचाचे मत बनले आहे. तक्रारदार यांनी एकूण रूपये १,८१,३९५/- रूपयांची खर्चाची बिले जोडली आहेत. त्याशिवाय मानसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये १,५०,०००/- असे एकूण रूपये ३,३१,३९५/- दि.१७/०४/२०१० पासून १२ टक्के व्याजासह मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तर विमा कंपनीने रूपये १,०७,१२६ रूपये एवढया नुकसानीचा (घसारा वजा करून) सर्व्हे केला आहे. यावरून नियमानुसार सर्व्हे रिपोर्टप्रमाणेची रक्कम जाबदेणार यांनी तक्रारदार यांना देणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी रूपये १,८१,३९५/- रूपयांच्या भरपाईची मागणी केलेली असली तरी नियमानुसार ती त्यांना देता येत नाही. पण सामनेवाला यांनी केलेल्या सर्व्हे रिपोर्टनुसार रूपये १,०७,१२६ ही रक्कम तक्रारदार यांना मिळायला हवी असे मंचाला वाटते. जाबदेणार यांनी विमा दावा नाकारल्याने तक्रारदार यांना विनाकारण ही तक्रार दाखल करावी लागली आणि त्याचा खर्च सहन करावा लागला. याच कारणामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याचीही भरपाई अनुक्रमे रूपये १०००/- व रूपये ५००/- त्यांना मिळाली पाहिजे असे मंचाचे मत बनले आहे. जाबदेणार यांनी कोणतेही ठोस कारण नसतांना दि.३१/०७/२०१० रोजी विमा दावा नाकारला. तेव्हापासून रिपोर्टनुसारची विमा रक्कम आणि मानसिक त्रास व तक्रार खर्चाच्या रकमेवर द.सा.द.शे. ६ टक्के व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत, असे मंचाला वाटते. म्हणूनच हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार अंशता मंजूर करण्यात येत आहे.
२. जाबदेणार यांनी या निकालापासून ३० दिवसांच्या आत,
अ) तक्रारदार यांना सर्व्हे रिपोर्टनुसार विमा दाव्याची रक्कम रूपये १,०७,१२६ (रूपये एक लाख सात हजार एकशे सव्वीस) दि.३०/११/२०१० पासून रक्कम देवून होईपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह द्यावी.
ब) तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रूपये १,०००/- (रूपये एक हजार मात्र) व तक्रारीचा खर्च रूपये ५००/- (रूपये पाचशे मात्र) दि.३०/११/२०१० पासून संपूर्ण रक्कम देवून होईपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के व्याजसह द्यावे.
धुळे.
दि.२८/०१/२०१४
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.