निकालपत्र
--------------------------------------------------------------------
(1) मा.सदस्य,श्री.सी.एम.येशीराव. – विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून नुकसानभरपाई मिळणे करिता, तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून रु.20,67,580/- एवढया रकमेचे गृह कर्ज घेतले. त्याचा दरमहा हप्ता रु.29,070/- एवढा होता. तक्रारदाराने विरुध्दपक्षाचे अधिकृत एजंट व तक्रारीतील विरुध्दपक्ष क्र.3 यांच्याकडे वेळोवेळी कर्जाचे हप्ते भरले आहेत. तक्रारदाराने माहे फेब्रुवारी 2010 मध्ये सदर कर्ज खात्याचे संपूर्ण हप्ते अदा केले. त्यानंतरही विरुध्दपक्षाने तक्रारदारास दि.16 मे 2010 रोजी नोटिस पाठविली व रक्कम रु.29,070/- एवढया थकबाकीची मागणी केली. तक्रारदारांनी दि.22-02-2010 रोजी रु.29,070/- चा हप्ता, पावती क्र.1002782771 अन्वये भरलेला होता. तरीही विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास वेळोवेळी रात्री-अपरात्री फोन केले. हप्ता भरल्याबाबत तक्रारदाराने प्रत्यक्ष भेटून सांगितले. त्यानंतरही हप्त्याची रक्कम मागणे चालूच आहे, म्हणून तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांना दि.03-06-2010 रोजी वकीला मार्फत नोटिस पाठविली. परंतु ती नोटिस विरुध्दपक्ष यांनी स्वीकारली नाही. म्हणून पुन्हा दि.19-06-2010 रोजी रजिष्टर्ड पोष्टाने नोटिस देण्यात आली. मात्र त्यानंतरही विरुध्दपक्ष यांनी त्याची योग्य ती पुर्तता केली नाही व त्यांची मागणी चालूच ठेवली. म्हणून तक्रारदार यांनी, सदरचा हप्ता भरला असून कर्ज खात्याचा उतारा मिळण्यासाठी तसेच अनावश्यक व बेकायदेशीर लावलेला चार्ज काढून टाकून नविन आकाउंट स्टेटमेंट मिळण्यासाठी तसेच मानसिक, शारीरिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रु.1,50,000/- मिळण्यासाठी, विरुध्दपक्ष यांनी सदोष सेवा दिली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे घोषीत होऊन मिळण्यासाठी, तक्रारीचा खर्च रु.10,000/- व नोटिसीचा खर्च रु.2,000/- मिळण्यासाठी या न्यायमंचात तक्रार दाखल केली आहे.
(3) विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना या मंचामार्फत नोटिस काढण्यात आली. त्यानुसार ते मंचात हजर झाले. विरुध्दपक्ष क्र.3 यांनी नि.नं.15 व 16 वर कैफीयत तसेच शपथपत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी तक्रारदारांची तक्रार मान्य व कबूल नाही असे कथन केले. सदर हप्त्याची रक्कम विरुध्दपक्ष क्र.3 यांनी विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडे दि.08-03-2010 रोजी जमा केली आहे. त्यात अनुक्रमांक 1 प्रमाणे पावती क्र.782671 ते 782780 अन्वये विरुध्दपक्ष क्र.2 यांचे कार्यालयात जमा केल्याचे कथन केलेले आहे. यात विरुध्दपक्ष क्र.3 यांनी कुठलीही सदोष सेवा दिलेली नाही व त्यांची कुठलीही जबाबदारी नाही, त्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार रद्द करावी असे कथन केले आहे. त्यांच्या कथनाच्या पुष्ठयर्थ त्यांनी नि.नं.18/1 व 18/2 वर तक्रारदारांनी हप्ता भरल्याची पावती व विरुध्दपक्ष क्र.3 यांनी विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडे हप्ता जमा केल्याचे स्टेटमेंट दाखल केले आहे.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी नि.नं.22 वर आपला खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी तक्रारदारांची तक्रार अमान्य व कबूल नाही, तक्रारदार हे ग्राहक नाहीत, तक्रारीस नॉन जॉईंडर व मिस जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येत आहे. तक्रारदाराने दिलेली कागदपत्रे खोटी व बनावट आहेत ती विरुध्दपक्ष यांना मान्य नाहीत. तक्रारदाराने तक्रारीतील वादग्रस्त हप्ता भरलेला नाही असे कथन केलेले आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष हे कोणतीही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत, त्यामुळे तक्रार रद्द करावी असे त्यांनी कथन केले आहे.
(5) तक्रारदारांनी नि.नं.2 वर तक्रार अर्ज, नि.नं.3 वर शपथपत्र, नि.नं.5/1 वर वकील नोटिस, नि.नं.5/3 ते 5/7 वर पोष्टाच्या पावत्या, नि.नं.5/8 वर हप्ता भरल्याची पावती, नि.नं.5/9 व 5/10 वर विरुध्दपक्ष यांची नोटिस व अकाउंट स्टेटमेंट दाखल केले आहे.
(6) विरुध्दपक्ष क्र.3 यांनी नि.नं.15 व 16 वर कैफीयत व शपथपत्र दाखल केले आहे. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी नि.नं.22 वर खुलासा, नि.नं.23 वर वादातील रक्कम वेव (Waive off) ऑफ करुन दिल्याची पुरसीस आणि नि.नं.23/1 वर स्टेटमेंट दाखल केले आहे.
(7) तक्रारदारांची तक्रार तसेच विरुध्दपक्षांची कैफियत आणि प्रकरणात दाखल कागदपत्रांवरुन आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | ः होय. |
(ब)विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कमतरता ठेवली आहे काय व अनुचित व्यापरी प्रथेचा अवलंब केला आहे काय ? | ः होय. |
(क)तक्रारदार नुकसान भरपाई व मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | ः होय. |
(ड)आदेश काय ? | ःअंतिम आदेशानुसार |
विवेचन
(8) मुद्दा क्र. ‘‘अ’’ - तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांचेकडून कर्ज घेतलेले आहे व त्यापोटी हप्तेही भरलेले आहेत. त्याबद्दलची पावती व स्टेटमेंट नि.नं.5/8 व नि.नं.5/9 वर दाखल आहे. त्यानुसार तक्रारदार विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(9) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार व विरुध्दपक्ष यांचे युक्तिवादाचे वेळेस विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांच्या तक्रारीतील कथन मान्य केले आहे. नजर चुकीने ही बाब त्यांचेकडून झाल्याचे मान्य केले आहे. चुक लक्षात आल्यानंतर दुरुस्त केली आहे. त्यानुसार नि.नं.23 वर त्यांनी पुरसीस दिलेली आहे व नि.नं.23/1 वर सुधारीत स्टेटमेंट दाखल केलेले आहे. त्यात त्यांनी तक्रारीतील वादग्रस्त हप्ता जमा दाखविला आहे. वेव ऑफ करुन घेतलेले आहे. विरुध्दपक्ष यांनी तक्रारीतील कथन मान्य केल्यामुळे सदोष सेवाही मान्य केलेली आहे. नजरचुकीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब झाला हेही मान्य केले आहे.
(10) तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र.3 यांचेकडे वादातील हप्ता भरलेला आहे, तो हप्ता विरुध्दपक्ष क्र.3 यांनी विरुध्दपक्ष क्र.2 यांच्याकडे जमा केलेला आहे. त्याची पावती नि.नं.18/1 व 18/2 वर दाखल आहे. ही बाब पाहता विरुध्दपक्ष क्र.3 यांनी सदोष सेवा दिलेली नाही ही बाब शाबीत होते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.3 यांचे विरुध्द तक्रार रद्द करणे उचीत होईल असे या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(11) मुद्दा क्र. ‘‘क’’ – विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांच्या चुकीमुळे तक्रारदारास सदोष सेवा मिळालेली आहे. ही बाब विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मान्य आहे. तक्रारदारांनी हप्ता भरलेला असतांनाही त्या हप्त्याची रक्कम नोटिस देऊन पुन्हा पुन्हा मागणे, तक्रारदारांनी नोटिस देऊनही त्या नोटिसी प्रमाणे पूर्तता न करणे या सामनेवालेंच्या कृतीमुळे तक्रारदारांचे निश्चितच आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच त्यांना मानसिक, शारीरिक त्रासही झालेला आहे. त्यासाठी तक्रारदारांनी नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,50,000/- मिळावेत, तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा, नोटिसीचा खर्च रु.2,000/- मिळावा अशी विनंती केली आहे. मात्र या नुकसानीबद्दल त्यांनी इतर पुरावा दिलेला नाही. विरुध्दपक्ष यांनी आता तक्रारदारांचे सुधारीत लोन स्टेटमेंट दाखल केलेले आहे. हप्ताही वेव ऑफ करुन दिल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदारांची मागणी अंशतः पूर्ण झालेली आहे. त्यासाठी वेगळा आदेश करण्याची आवश्यकता नाही असे आम्हास वाटते. या बाबी पाहता तसेच विरुध्दपक्ष कंपनीचा नावलौकीक पाहता त्यांच्याकडून अशी चुक अभिप्रेत नाही. तक्रारदाराने विरुध्दपक्षास दोन नोटिसा दिल्यानंतर योग्य ती पुर्तता न केल्यामुळे त्यांना या न्यायमंचात तक्रार दाखल करावी लागली. न्यायमंचाची नोटिस मिळाल्यानंतर विरुध्दपक्षांनी खुलासा दाखल केला, त्यातही त्यांनी तक्रारदारांची तक्रार नाकारली. मात्र युक्तिवादाच्या वेळेस त्यांनी तक्रारदारांनी सदर हप्ता भरल्याचे मान्य केले. विरुध्दपक्ष यांची ही कृती सदोष सेवा आहे असे आम्हास वाटते. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.8,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(12) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सदर निकाल प्राप्त झाल्यापासून पूढील तीस दिवसांचे आत विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी, वैयक्तिक व संयुक्तिक रित्या.
(1) तक्रारदारास मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम 8,000/- (अक्षरी रुपये आठ हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
(2) उपरोक्त आदेशात नमूद केलेली रक्कम मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदारास द्यावे.
धुळे
दिनांक – 29-02-2012.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.