::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 30/11/2017)
1. तक्रारकर्ती ही शिक्षीका असून तिने प्रस्तूत तक्रार चालविण्याकरीता तिचे भाऊ श्री. बलवंत चन्द्रशेखर गौरकार यांना खास मुख्त्यार नियुक्त केले आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्तीने दिनांक 29/5/2014 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 व 2 ने निर्मीत अॅक्सेंट 1.12 एसएक्स सीआरडीआय डिझेल कार, त्यांचे अधिकृत विक्रेते असलेल्या विरूध्द पक्ष क्र.3 यांचेकडून रू,7,11,509/- किमतीत खरेदी केली. सदर वाहन खरेदीकरीता तक्रारकर्तीने भारतीय स्टेट बॅंक, शाखा पडोली यांचेकडून अर्थसहाय्य घेतले असून त्याची दरमहा किस्त 10,368/- तक्रारकर्त्याला भरावी लागत आहे. विरूध्द पक्ष क्र.3 यांचे दिनांक 29/5/2014 चे इन्वॉईस नुसार नोदणी करून दिनांक 9/6/2014 रोजी सदर वाहनाचा ताबा तक्रारकर्तीस मिळाला. वाहनाचा नोंदणीक्रमांक एमएच 34, एएम 3342 असा असून वाहनाचा हमी कालावधी दिनांक 9/6/2014 रोजी तक्रारकर्तीस वाहनाचा ताबा मिळाल्यापासून 24 महिन्यांपर्यंत होता. सदर वाहन दिनांक 9/6/2015 ते दिनांक 8/6/2016 या कालावधीकरीता विरूध्द पक्ष क्र.4 यांचेकडून विमाकृत करण्यांत आले होते. तक्रारकर्तीच्या भावाला कार चालविण्याचा अनुभव असल्याने तोच सदर वाहन चालवीत असे व देखभाल करीत असे. तक्रारकर्तीने शोरूममधून कार खरेदी करतेवेळी तेथील कर्मचा-यांनी सदर कारमध्ये ए.बी.एस. ची सुविधा असल्याचे सांगितले, परंतु वाहनखरेदी केल्यानंतर सदर वाहनात सदर सुविधा आढळून आली नाही व हयुंदई कंपनीचे वेबसाईटवर शोध घेतला असता सदर मॉडेलमध्ये ती सुविधा नसल्याचे कळले. पहिल्या व दुस-या सर्व्हीसींगचे वेळी याबाबत तोंडी तक्रार वि.प.क्र.3 कडे नोंदविली असता माहिती देण्यांचे टाळले व नंतर चुक झाल्याचे त्यांनी मान्य केले व तिस-या सर्व्हीसींगचे वेळी सदर तक्रार फिडबॅक फॉर्मवर नोंद केली. परंतु वि.प.क्र.3 ने वाहनात ए.बी.एस. सुविधा बसवून देण्याबाबत असमर्थना दर्शवून वि.प.1 व 2 ती बसवून देऊ शकतात असे सांगितले. मात्र वि.प.2 कडे तक्रार केली असता, सदर मॉडेलमध्ये ती सुविधाच नसल्याचे सांगून त्यांनी तक्रार स्विकारली नाही. सदर वाहनातील ए.सी. हा 100 कि.मी. चालल्यानंतर नीट चालत नव्हता व याबाबत तक्रार केली असता दुस-या सर्व्हीसींगनंतर तो नीट चालेल असे सांगितले. सदर वाहनाचे अॅव्हरेज 25 कि.मी.प्रति लिटर असल्याचे वि.प.1 व 2 ने जाहीर केले असले तरी सदर वाहन केवळ 14-16 कि.मी.च अॅव्हरेज देत होती. कारमधील चारजींग पॉईंट पोर्ट योग्यरीत्या काम करीत नव्हता. सदर वाहनात चार अॅलॉय व्हील लावले असले तरीही स्टेपनीला अॅलॉय व्हील देण्यांत आले नव्हते. सदर वाहन गिअर बदलतांना बंद पडत होते व याबाबत तक्रारकर्त्याने वॉरंटी कालावधीत जॉब कार्डवर नोंद करून तक्रार केली असता वि.प. 1 ते 3 ने सदर दोष दुरूस्त करून दिला नाही.
3. तक्रारकर्तीचा भाऊ दिनांक 6/11/2015 रोजी चंद्रपूर येथे सदर वाहनाने परत येत असतांना बामनी बल्लारपूर हायवेवर दिलासा ग्रामसमोर गतीरोधकावरून जात असतांना त्याला थोडा आवाज आला. कार थांबवून त्याने तपासले असता कारच्या ऑईल पॅनमधून इंजीन ऑईल सांडत असल्याचे दिसले. त्याने लगेच याबाबत वि.प.3 ला फोनद्वारे सुचीत केले. रात्री 9 वाजता वि.प.3 ने दोन माणसे पाठविली व त्यांनी वाहनाची पाहणी करून, ऑईल पॅन फुटल्याचे सांगितले व रात्र होवून गेल्यामुळे कार शोरूमला नेता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्तीच्या भावाने सदर दोन व्यक्ती व अन्य व्यक्तींच्या मदतीने सदर वाहन ढकलत नेवून 100 मिटरवरील परिचित असलेल्या जगदंबा डिझल्स येथे नेऊन सुरक्षीत ठेवले. दुस-या दिवशी वि.प.3 चे कर्मचारी व वि.प.4 चे सर्व्हेयरने कारचा सर्व्हे केला व त्यानंतर कार वि.प.3 च्या वर्कशॉपला नेण्यांत आली. तक्रारकर्तीने दिनांक 7/11/2015 रोजी वि.प.3 कडे चौकशी केली असता वाहन दुरूस्तीसाठी रू.20,000/- ते रू.25,000/- रूपये खर्च येईल व तसे वि.प.क्र.4 विमा कंपनीला परस्पर कळविण्यांत आले आहे असे सांगितले. मात्र वि.प.3 ने सदर वाहन दिनांक 7/11/2015 ते दिनांक 16/12/2015 असे 37 दिवस दुरूस्तीकरीता स्वतःचे ताब्यात ठेवले. वाहनाची मागणी केली असता विमा कंपनीकडून दुरूस्ती च्या देयकाची रक्कमप्राप्त न झाल्यामुळे वाहन देता येणार नाही असे सांगितले. दिनांक 10/12/2015 रोजी वि.प.4 कडून रू.24,300/- क्षतीग्रस्त वाहनाचे विमादाव्यापोटी वि.प.3 ला मिळाल्यानंतर वि.प.3 ने तक्रारकर्तीला दिनांक 27/11/2015 चे एकूण रू.49,662/- रकमेचे दुरूस्ती बिल दिले त्यापैकी रू.24,300/- वि.प.क्र.4 कडून मिळाले असल्याने रू.25,000/- ची मागणी करून ती रक्कम दिल्याशिवाय वाहन देण्यांस नकार दिला. सबब तक्रारकर्तीने रक्कम रू.25,000/- वि.प.3 कडे जमा करून वाहनाची डिलीव्हरी घेतली. परंतु वाहन सुरू करून पाहिले असता इंजीनचा घरघर आवाज येत असून वाहनाची गती कमी झाली आहे व सायलेन्सरमधून जास्त प्रमाणात धुर निघत असल्याचे तसेच वाहनाचा लोगो तुटलेला असल्याचे तिचे निदर्शनांस आले. त्यामुळे वरील सर्व त्रुटी फिडबॅक फॉर्ममध्ये नोंदविण्यांत आल्या. परंतु वि.प.3 चे कर्मचा-याने जॉबकार्डवर सदर वाहन फार दुरवर चालविल्यामुळे ऑईल पॅन फुटला असे खोटेच नमूद केले. वि.प.3 ने सदर वाहन दिनांक 7/11/2015 ते दिनांक 16/12/2015 असे 37 दिवस दुरूस्तीकरीता स्वतःचे ताब्यात ठेवूनही त्यांना वाहनातील दोष दुरूस्त करता आले नाहीत. केवळ 4-5 दिवस वाहन चालविले असता वाहनातील दोष वाढत गेल्यामुळे पुन्हा वाहन वि.प.3 कडे दुरूस्तीकरीता देण्यांत आले. तेंव्हा कारचा टर्बो बदलविण्याचा सल्ला देवून त्यांचेकडे तो उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून विकत घेण्यांस तक्रारकर्तीस सांगितले. वारंवार तोंडी व लिखीत तक्रारी करूनही वि.प.3 ने वाहन दुरूस्त करून न दिल्यामुळे वाहन बंद अवस्थेत तक्रारकर्तीकडे पडून आहे. दुरूस्तीखर्चाच्या एकूण रक्कम रू.49660/- पैकी विमा कंपनीने केवळ रू.24,300/- देय केले व इंजीनमधील दोष हा अपघातामुळे उद्भवला नसल्याचे कारणास्तव त्याचा दुरूस्ती खर्च देण्यांस नकार दिला. तर वि.प.3 ने ऑईल पॅनमधील ऑईल वाहून गेल्यावर वाहन ऑईलशिवाय चालविल्यामूळे इंजीन क्षतीग्रस्त झाले या कारणाखाली वॉरंटीची सवलत देण्यांस नकार दिला. सदर दोष हा मेकॅनीकल स्वरूपाचा असून तो वॉरंटीमध्ये येतो परंतु जर तो अपघातामुळे उदभवला असल्यांस विमा कंपनी नुकसान-भरपाई देण्यांस जबाबदार ठरते. वाहन बंद अवस्थेत असल्यामुळे तक्रारकर्ती दिनांक 16/11/2015 पासून वाहनाचा वापर करू शकली नाही. बाहेरगावी जावयाचे असतांना तसेच तक्रारकर्तीचे आईला पायाच्या त्रासाच्या उपचाराकरीता तक्रारकर्तीला भाडयाने वाहन घ्यावे लागले व त्यासाठी दरमहा रू.20,000/- खर्च सहन करावा लागला. वाहनातील दोष दुरूस्त करून देण्याची जबाबदारी वि.प.क्र.1 ते 3 यांची होती परंतु ती त्यांनी पार न पाडल्यामुळे त्यांचे सेवेत त्रुंटी असून त्यांनी अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. सबब तक्रारकर्तीने अधिवक्त्यांमार्फत वि.प. ना दिनांक 26/12/2016 रोजी नोटीस पाठविला. परंतु सदर नोटीसला वि.प.नी खोटे उत्तर दिले. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष वि.प. विरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, वि.प.क्र.1 ते 3 यांनी सदर वाहन दुरूस्त करून देवून त्यातील आवश्यक भाग विनामुल्य बदलून देवून रस्त्यावर चालण्यायोग्य स्थितीत करून द्यावे, परंतु वाहन दुरूस्त करणे शक्य नसल्यांस तक्रारकर्त्याचे वाहन बदलून नवीन वाहन दोन वर्षाचे वॉरंटीसह विनामुल्य देण्यांत यावे. दिनांक 15/11/2016 पासून विवादीत वाहन बंद पडल्यामुळे तक्रारकर्तीला भाडयाने वाहन घ्यावे लागले. त्यासाठी आलेला खर्च दरमहा रू.20,000/- वाहन दुरूस्त करून देईपर्यंत वि.प.वर बसविण्यात यावा, आणी दुरूस्तीखर्चापोटी वि.प.3 ने दिनांक 16/12/2015 रोजी वसुल केलेले रू.25,000/- व ते रक्कम वसुल होईपर्यंत त्यावर द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह परत करावेत तसेच तक्रारकर्त्याला आजपर्यंत झालेल्या त्रासापोटी रू.500000/- देण्याबाबत तसेच वि.प.1 ते 4 कडून शारिरीक व मानसीक त्रासापोटी रू.5 लाख व तक्रारीच्या खर्चापोटी रू.25,000/- मिळावेत असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
4. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन वि.प. क्र. 1 ते 4 विरुध्द नोटीस काढण्यात आले. मात्र वि.प.क्र.2 हे नोटीस प्राप्त होवूनही मंचासमक्ष उपस्थीत न झाल्यामुळे त्यांचेविरूध्द नि.क्र.17 वर दिनांक 19/7/2017 रोजी एकतर्फी कार्यवाहीचा आदेश पारीत करण्यांत आला.
5. विरूध्द पक्ष क्र.1 ने हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये तक्रारकर्तीचे कथन नाकबूल केले व पुढे त्यांनी नमूद केले की, सदर विवादीत वाहन दिनांक 29/5/2014 रोजी वि.प.3 कडून खरेदी केले. वाहन खरेदी केल्यानंतर तक्रारकर्तीने जवळ जवळ 3 वर्षानंतर तक्रार दाखल केलेली असल्याने ती मुदतबाहय असून खारीज करण्यास पात्र आहे. वि.प.1 ने नमूद केले की, सदर वाहनामध्ये ए.बी.एस.सुविधा उपलब्ध असल्याचे तसेच वाहनाची स्टेपनीदेखील अॅलॉय व्हील ची राहील असे तक्रारकर्तीला सांगण्यांत आले नव्हते तसेच सदर बाब तक्रारकर्तीला देण्यांत आलेल्या माहिती पुस्तिकेत आणी वि.प.1 च्या वेबसाईटवरदेखील नमूद नाही. वाहनातील वातानुकूलनाची क्षमता ही बाहयघटकांवर अवलंबून असल्यामुळे तो निर्मीतीतील दोष समजता येत नाही.
6. वाहनाच्या कार्यक्षमतेची जबाबदारी ही वाहन निर्माते वि.प.1 व 2 यांची असून वि.प.3 हे वाहनाचे दुरूस्तीकरीता जबाबदार आहेत. मात्र सदर वाहनात निर्मीती दोष असल्याबाबत तक्रारकर्तीने कोणताही तज्ञ अहवाल पुराव्यादाखल सादर केलेला नाही. इतकेच नव्हे तर तक्रारकर्तीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर विवादीत वाहन निरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्याबाबत तक्रारकर्तीला वारंवार कळविण्यात येवूनही तक्रारकर्तीने ते निरीक्षणासाठी उपल्ब्ध करून दिले नाही. तक्रारकर्तीने वाहन दिनांक 29/12/2014 रोजी सर्व्हीसींगकरीता आणले असता वि.प. क्र.3 ने वॉरंटी कालावधीत ते विनामुल्य सुस्थीतीत करून तक्रारकर्तीला परत दिले. सदर वाहनाला दिनांक 6/11/2015 रोजी अपघात घडल्यानंतर तक्रारकर्तीने सदर वाहन दुरूस्तीकरीता वि.प.क्र.3 कडे आणले. तक्रारकर्तीने तक्रारअर्जात मान्य केले आहे की, गतीरोधकावर वाहन आदळल्यामुळे ऑईल पॅन क्षतीग्रस्तहोवून त्यातील ऑईल वाहून गेले व तशाच अवस्थेत ते काही अंतरापर्यंत ओढत नेल्या गेले. वि.प.1 ने नमूद केले की, इंजीन ऑईलशिवाय वाहन चालल्यामुळे त्याचे इंजीन क्षतीग्रस्त झाले आहे. वॉरंटी कालावधीत वाहनाच्या अपघातामुळे होणा-या क्षतीची दुरूस्ती वॉरंटीअंतर्गत येत नसल्यामुळे वि.प.3 ने वि.प.4 च्या विमासंरक्षणांतर्गत तसेच दुरूस्तीखर्च आकारून सदर वाहन दुरूस्त करून दिले. मात्र वि.प.4 कडून दुरूस्तीखर्चाबाबत विम्याची रक्कम मिळण्यांत विलंब झाल्यामुळे तक्रारकर्तीला वाहन परत करण्यांत उशीर झाला. त्यामुळे तक्रारकर्तीने त्याबाबत वि.प.4 विमा कंपनीकडे त्याबाबत नुकसान-भरपाई मागावी. वि.प.1 चे सेवेत कोणतीही त्रुटी नसून सदर वाहनात कोणताही निर्मीती दोष नव्हता. सबब सदर तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी वि.प.1 ने मंचास विनंती केलेली आहे.
7. विरूध्द पक्ष क्र.3 ने हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात कबूल केले आहे की, तक्रारकर्ती त्यांचेकडे वाहन खरेदीसाठी आली असता त्यांनी विविध मॉडेलची वाहने तक्रारकर्तीला दाखवून त्यांची वैशिष्टये आणी किमती सांगितल्या व त्यानंतर तक्रारकर्तीने सीआरडीएक्स अॅसेंट या वाहनाची निवड करून विकत घेतले. वाहन घेतेवेळी वाहनाच्या विम्याबाबत विविध पर्यायांपैकी तक्रारकर्तीने एसबीआय इंश्युरंस कंपनीमार्फत विमा काढण्यांस संमती दिली. सदर वाहनामध्ये ए.बी.एस.सुविधा उपलब्ध असल्याचे तसेच वाहनाची स्टेपनीदेखील अॅलॉय व्हील ची राहील असे तक्रारकर्तीला सांगण्यांत आले नव्हते. शिवाय वॉरंटी कालावधीत तक्रारकर्तीने 7/7/2014 ते 29/12/2014 या कालावधीत सर्व्हीसींगला वाहन आणले तेंव्हाही अॅलॉय व्हीलबाबत कोणतीही तक्रार नोंदविली नाही. तक्रारकर्तीने तक्रारअर्जात मान्य केले आहे की, गतीरोधकावर वाहन आदळल्यामुळे ऑईल पॅन क्षतीग्रस्तहोवून त्यातील ऑईल वाहून गेले. वि.प.1 ने नमूद केले की, तक्रारकर्तीकडून याबाबत माहिती प्राप्त होताच वि.प.3 चे कर्मचायांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व वाहन तशा अवस्थेत नेता येणार नाही सबब ते हलवू नये अशी सूचना केली. परंतु तरीदेखील तक्रारकर्तीने वाहन त्याच अवस्थेत काही अंतरापर्यंत ओढत नेले. परिणामतः इंजीन ऑईलशिवाय वाहन चालल्यामुळे त्याचे इंजीन क्षतीग्रस्त झाले आहे. तक्रारकर्तीचे वाहन त्यानंतर वि.प.3 कडे आणण्यात आले असता ते तपासून वि.प.3 ने सदर वाहनाची दुरूस्ती करावी लागणार असल्याचे वि.प.4 विमा कंपनीला कळविले. परंतु वि.प.क्र.4 व तक्रारकर्ती यांच्यात नो क्लेम बोनस बाबत समस्या असल्यामुळे वाहन दुरूस्तीकरीता घेता आले नाही. तक्रारकर्तीने दिनांक 10/11/2015 रोजी रू.3892/- प्रिमियम शुल्क चा भरणा केल्यानंतर वाहन दुरूस्तीला घेण्यांत आले. त्यावेळी वाहनाच्या ऑईल पॅनव्यतिरीक्त इंजीनचे कव्हर व टर्बो चार्जर दुरूस्ती करणे आवश्यक असल्याचे तक्रारकर्तीला सांगितले. परंतु तक्रारकर्तीने केवळ ऑईल पॅन व इंजीनचे कव्हर दुरूस्त करावे असे सांगितल. तक्रारकर्तीने टर्बो विनामुल्य दुरूस्त करण्यांची वि.प.3 ला विनंती केली, परंतु सदर क्षती ही बाहयघटकामुळे झाली असल्यामुळे ती वॉरंटीत बसत नाही या कारणास्तव वि.प.3 ने त्यांस नकार दिला. त्यानंतर तक्रारकर्तीने टर्बो चार्जर दुरूस्ती करण्यांस सांगितले नाही. वि.प.4 कडून विमारक्कम रू.24,300/- मिळाल्यानंतर तसेच तक्रारकर्तीने दुरूस्तीची उर्वरीत रक्कम रू.25,000/-जमा केल्यानंतर तक्रारकर्तीला वाहनाचा ताबा सुस्थीतीत देण्यांत आला व टर्बो चार्जर न बदलल्यामुळे इंजीनचा आवाज येत असल्याचे सांगितले होते. इतकेच नव्हे तर तक्रारकर्तीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर वि.प.1 हयुंदई कंपनीचे तंत्रज्ञ दिनांक 28/1/2016 रोजी वि.प.3 कडे येणार असून त्यांच्या निरीक्षणासाठी विवादीत वाहन उपलब्ध करून देण्याबाबत तक्रारकर्तीला वारंवार कळविण्यात येवूनही तक्रारकर्तीने ते निरीक्षणासाठी उपल्ब्ध करून दिले नाही व घरी येवून निरीक्षण करण्याचा तीने आग्रह केला. तांत्रिक सोयीअभावी ते शक्य नसल्याचे तक्रारकर्तीला कळविण्यांत आले. तक्रारकर्तीने दिलेल्या दिनांक 22/2/2016 तसेच दिनांक 26/12/2016चे नोटीसला अनुक्रमे दिनांक10/3/2016व16/1/2017 रोजीउत्तर दिले आहे. त्यामुळे यात वि.प.3 चे सेवेत त्रुटी नसून वाहनाचा ताबा देण्यांत झालेल्या विलंबाला वि.प.क्र.3 जबाबदार नाहीत. सबब सदर तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
8. विरूध्द पक्ष क्र.4 ने हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रारकर्तीचे तक्रारीतील कथन नाकारले आहे. वि.प.4 ने नमुद केले की, सदर वाहनाच्या दुरूस्तीखर्चाचे रू.49,660/- चे देयक वि.प.3 ने दिनांक 16/4/2016 रोजी तक्रारकर्तीला दिले व या रकमेपैकी अपघातामुळे वाहनाच्या झालेल्या क्षतीबद्दल विम्याची रक्कम रू.24,300/- वि.प.4 ने वि.प.3 ला दिली. परंतु वाहनाच्या इंजीनमधील दोष हा अपघातामुळे उद्भ्वला नसल्यामुळे त्याबाबतचा दुरूस्तीखर्च विमादाव्यापोटी दिला नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तावेजांवरून सदर दोष हा तक्रारकर्तीने वि.प.4 कडून विमा घेण्यापूर्वीच उद्भवला आहे व तक्रारकर्तीने सदर बाब शपथेवर मान्यही केली आहे.त्यामुळे त्याबाबत वि.प.4 चा काहीही संबंध नाही. त्याचप्रमाणे वाहनातील बिघाडाशीदेखील वि.प.4 चा काहीही संबंध नाही. तक्रारकर्तीने स्वतः मान्य केले आहे की, वि.प.4 कडे वाहनाच्या दुरूस्तीखर्चाचे देयक सादर करण्यांत आले असता वाजवी रक्कम वि.प.4 ने त्वरीत अदा केली आहे.अशा परिस्थितीत वि.प.4 विरूध्द सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
9. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच वि.प.क्र.1 चे लेखी म्हणणे तसेच लेखी उ्त्तरालाच रिजॉईंडर व लेखी युक्तिवाद समजण्यात यावे अशी अ.क्र. नि.क्र.25 व 28 वर पुरसीस दाखल, वि.प.क्र.3 चे लेखी म्हणणे, दस्तावेज, शपथपत्र तसेच लेखी उ्त्तर व शपथपत्रालाच रिजॉईंडर व लेखी युक्तिवाद समजण्यात यावे असे दिनांक 5/10/2017 रोजी नि.क्र.27 वर पुरसीस दाखल, वि.प.क्र.4 चे लेखी म्हणणे, तसेच लेखी उ्त्तरालाच शपथपत्र व लेखी युक्तिवाद समजण्यात यावे असे दिनांक नि.क्र.23 वर पुरसीस दाखल, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्र.1 ते 4 चा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्या प्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : नाही
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
10. तक्रारकर्तीने दिनांक 29/5/2014 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 व 2 ने निर्मीत अॅसेंट 1.12 एसएक्स सीआरडीआय डिझेल कार, विरूध्द पक्ष क्र.1 व 2 चे अधिकृत विक्रेते असलेल्या विरूध्द पक्ष क्र.3 यांचेकडून रू,7,11,509/- किमतीत खरेदी केली. सदर वाहन 9/6/2015 ते 8/6/2016 या कालावधीकरीता विरूध्द पक्ष क्र.4 यांचेकडून विमाकृत करण्यांत आले होते. याबाबत वाहन खरेदीची पावती तसेच विमा पॉलिसी हे दस्तावेज प्रकरणात दाखल आहेत. तसेच सदर बाब विरूध्द पक्ष क्र.1, 3 व 4 यांनादेखील मान्य असल्याने तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष क्रं.1 ते 4 यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
11. तक्रारकर्तीने सदर वाहनाचे इंजीनमध्ये निर्मीती दोष असल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. या म्हणण्याचे पुष्टयर्थ तक्रारकर्तीने शिवकृपा इंजीनियरींग कंपनी चे प्रोप्रायटर श्री.प्रवीण जुमडे, बी.ई.मेकॅनीकल यांचा तपासणी अहवाल दाखल केलेला आहे. परंतु सदर अहवालाचे अवलोकन केले असता, निदर्शनांस येते की, श्री.जुमडे यांना सदर वाहनात काही दोष आढळून आले असले तरीदेखील ते निर्मीतीतील दोष असल्याबाबत कोणताही निश्चित असा निष्कर्ष नोंदविलेला नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी अहवालात नमूद केले आहे की,
“My suggestive opinion is that the detailed inspection of the CAR is necessary in a well equipped workshop by well experienced technically qualified personnel for technical diagnosis, rectification, repairing for removing defects of the CAR emphasizing on the criteria of warranty and extended warranty. Under such type of circumstances dealer must make alternate arrangement of vehicle for customer if delaying the repairing works or not able to assess the fault and if vehicle is defective, it must be replaced with new one with warranty”
सदर तज्ञाच्या वरील शे-यांवरून वाहनातील दोषांबाबत त्यांनी कोणताही अंतीम निष्कर्ष काढल्याचे दिसून येत नाही व सदर तज्ञाने अन्य विशेषज्ञाकडून वाहन तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. असे असूनही तक्रारकर्तीने अशा विशेषज्ञाकडून वाहन तपासून तसा अहवाल सादर करण्याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे श्री.जुमडे यांच्या तज्ञअहवालावरून वाहनात निर्मीती दोष आहे ही बाब सिध्द होत नाही असे मंचाचे मत आहे.
12. सदर वाहनामध्ये ए.बी.एस.सुविधा उपलब्ध असल्याचे वि.प.3 चे कर्मचा-यांनी तक्रारकर्तीला सांगितले होते असे तक्रारकर्तीने नमूद केले आहे. तसेच वाहनाला लावलेल्या चार अॅलॉय व्हील प्रमाणेच स्टेपनी ही अॅलॉय व्हीलची पुरविली नाही असा आक्षेप तक्रारकर्तीने घेतलेला आहे. परंतु सदर वाहनामध्ये ए.बी.एस.सुविधा उपलब्ध असल्याचे तसेच वाहनाची स्टेपनीदेखील अॅलॉय व्हील ची राहील असे तक्रारकर्तीला सांगण्यांत आले नव्हते इतकेच नव्हे तर सदर बाब तक्रारकर्तीला देण्यांत आलेल्या माहिती पुस्तिकेत आणी वि.प.1 च्या वेबसाईटवरदेखील नमूद नाही असे वि.प.1 व 3 यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. असे असतांना तक्रारकर्तीने आपले कथन पुरेशा पुराव्यानिशी सिध्द करणे आवश्यक होते, परंतु तसा कोणताही पुरावा तक्रारकर्तीने दाखल केलेला नाही. इतकेच नव्हे तर वॉरंटी कालावधीत तक्रारकर्तीने दिनांक 7/7/2014 ते दिनांक 29/12/2014 या कालावधीत वेळोवेळी सदर वाहन सर्व्हीसींगसाठी वि.प.3 कडे नेले तेंव्हाही अॅलॉय व्हीलबाबत कोणतीही तक्रार नोंदविल्याचा कोणताही पुरावा प्रकरणात उपलब्ध नाही व तसा कोणताही उल्लेख वि.प.क्र.3 ने प्रकरणात दाखल केलेल्या संबधीत सर्व्हीसींगचे जॉबकार्डवर दिसून येत नाही. वास्तवीकतः कार खरेदीच्या दिनांकापासून दोन वर्षाचे कालावधीत तक्रारकर्तीने अॅलॉय व्हीलबाबत तक्रार नोंदविणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारकर्तीने सदर कथन दस्तावेज, पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही असे मंचाचे मत आहे.
13. तक्रारकर्तीने तिच्या तक्रारअर्जात कबूल केले आहे की, तिचा भाऊ व आई हे दिनांक 6/11/2015 रोजी चंद्रपूर येथे सदर वाहनाने परत येत असतांना बामनी बल्लारपूर हायवेवर दिलासा ग्रामसमोर गतीरोधकावरून जात असतांना कार गतीरोधकावर आदळून कारचे ऑईल पॅन क्षतीग्रस्त झाले व त्यामधून इंजीन ऑईल सांडत असल्याचे त्याला दिसले. त्यामुळे त्याने लगेच याबाबत वि.प.3 ला फोनद्वारे सुचीत केले. रात्री 9 वाजता वि.प.3 ने दोन माणसे पाठविली व त्यांनी वाहनाची पाहणी करून, ऑईल पॅन फुटल्याचे सांगितले व रात्र होवून गेल्यामुळे कार शोरूमला नेता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्तीच्या भावाने सदर वाहन लोकांच्या मदतीने ढकलत नेवून 100 मिटरवरील परिचित असलेल्या जगदंबा डिझल्स येथे नेऊन सुरक्षीत ठेवले. यावरून ऑईल पॅनला झालेली क्षती ही अपघातामुळे झाली असून प्रकरणात तकारकर्तीने स्वतःच दाखल केलेल्या कारच्या वॉरंटी कार्डमधील नमूद अटींनुसार अपघातामुळे झालेल्या वाहनाच्या क्षतीची दुरूस्ती वॉरंटी अंतर्गत बसत नाही. तक्रारकर्तीने तक्रारीत मान्य केले आहे की, वि.प.3 चे कर्मचा-यांनी सदर वाहनाची तपासणी करून वाहन हलविता येणार नाही असे सांगितले. परंतु वि.प.3 चे कर्मचा-यांनी वाहन हलवू नये अशी सुचना केली असूनही तक्रारकर्तीच्या भावाने सदर वाहन हलविले, व इंजीन ऑईलशिवाय वाहन चालल्यामुळे इंजीन क्षतीग्रस्त झाले असे वि.प.3 ने नमूद केले आहे. त्यामुळे सदर वाहन इंजीन ऑईलशिवाय चालल्यामुळे वाहनाचे इंजीन क्षतीग्रस्त झाले हे वि.प.3 चे म्हणणे संयुक्तीक आहे. वि.प.क्र.4 विमा कंपनीनेदेखील केवळ ऑईल पॅन शी संबंधीत क्षतींबाबत क्षतीपुर्ती मंजूर केली असून वाहनाच्या इंजीनचे दुरूस्तीबाबत खर्चाचा दावा मंजूर केलेला नाही व तक्रारकर्तीने याबाबत विमा कंपनीकडे मागणीदेखील केलेली नाही. त्यामुळे वाहनाच्या इंजीनला पोहोचलेली क्षती ही तक्रारकर्तीच्या भावाने अपघातग्रस्त वाहन इंजीन ऑईलशिवाय चालविल्यामुळे पोहचलेली असून सदर दुरूस्ती देखील वॉरंटी अंतर्गत बसत नाही. मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने अशीच तथ्ये असलेल्या अशोक कुमार विरूध्द फ्रंटीयर ऑटोवर्ल्डड प्रा.लि. आणि इतर 3, या प्रकरणात दिनांक 11 सप्टेंबर, 2017 रोजी दिलेल्या निवाडयात तक्रारकर्त्याचा दावा खारीज केला असून निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे ते गतीरोधकावर आदळून वाहनाचे ऑईल पॅन क्षतीग्रस्त होवून त्यातील इंजीन ऑईल वाहून गेले असूनही वाहन ढकलत नेल्यामुळे इंजीनदेखील क्षतीग्रस्त झाले.अशा परिस्थितीत सदर क्षतीची दुरूस्ती ही वॉरंटीत बसत नाही असा निवाडा दिलेला आहे.सदर न्यायनिवाड्यातील न्यायतत्त्व प्रस्तुत प्रकरणास लागू पडते सदर प्रकरणातील तथ्ये प्रस्तूत प्रकरणाशी मिळती जूळती असून प्रस्तूत प्रकरणीदेखील सदर दुरूस्ती ही वॉरंटीअंतर्गत बसत नाही असे मंचाचे मत आहे.
14. क्षतीग्रस्त वाहन दिनांक 7/11/2015 रोजी वि.प.3 कडे दुरूस्तीसाठी नेण्यांत आले होते. त्यावेळी सदर वाहन दुरूस्तीसाठी 20,000/- ते 25,000/- रूपये खर्च येईल असा अंदाज व्यक्त करून तसे वि.प.4 विमा कंपनीला परस्पर कळविण्यांत आले आहे असे वि.प.3 ने तक्रारकर्तीला सांगितले. मात्र वि.प.3 ने सदर वाहन दिनांक 7/11/2015 ते दिनांक 16/12/2015 असे 37 दिवस दुरूस्तीकरीता स्वतःचे ताब्यात ठेवले वाहनाची मागणी केली असता विमा कंपनीकडून दुरूस्ती च्या देयकाची रक्कमप्राप्त न झाल्यामुळे वाहन देता येणार नाही असे सांगितले. असा तक्रारकर्तीचा आक्षेप असून या विलंबाबात वि.प.3 जबाबदार असल्याचे तिचे म्हणणे आहे. यावर, तक्रारकर्तीचे वाहन वि.प.3 कडे आणण्यात आले असता ते तपासून वि.प.3 ने सदर वाहनाची दुरूस्ती करावी लागणार असल्याचे वि.प.4 विमा कंपनीला कळविले. परंतु वि.प.क्र.4 व तक्रारकर्ती यांच्यात नो क्लेम बोनस बाबत समस्या असल्यामुळे वाहन दुरूस्तीकरीता घेता आले नाही. तक्रारकर्तीने दिनांक 10/11/2015 रोजी रू.3892/- प्रिमियम शुल्क चा भरणा केल्यानंतर वाहन दुरूस्तीला घेण्यांत आले. तक्रारकर्तीला दिनांक 27/11/2015 चे एकूण रू.49,662/- रकमेचे दुरूस्ती बिल दिले. त्यापैकी दिनांक 10/12/2015 रोजी वि.प.4 कडून रू.24,300/- क्षतीग्रस्त वाहनाचे विमादाव्यापोटी वि.प.3 ला मिळाल्यानंतर आणी तक्रारकर्तीने उर्वरीत दुरूस्तीखर्चापोटी रू.25,000/- रक्कम वि.प.3 कडे जमा केल्यानंतर वाहनाची डिलीव्हरी देण्यांत आली. त्यामुळे सदर विलंबाला विप. क्रमांक. ३ जबाबदार नसून स्वत्ः तक्रारकर्ती जबाबदार असल्याचे मंचाचे मत आहे. दाखल दस्तावेजांवरून विरूध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
15. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.51/2017 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च स्वतः सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
स्थळ :- चंद्रपूर
दिनांक :- 30/11/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) ) ( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.