श्री. शेखर मुळे, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये वि.प.ने तक्रारकर्त्याला त्याने घेतलेल्या कारचे स्पेअर व्हील हे अलॉय व्हील न देऊन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आणि सेवेत कमतरता ठेवली या कारणास्तव दाखल केलेली आहे.
2. वि.प.क्र. 1 ह्युंडाई मोटर कंपनीची अंगभूत कंपनी असून ती ह्युंडाई कारची निर्मिती करते. वि.प.क्र. 2 ही ह्युंडाई कारची अधिकृत विक्रेता आहे. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 2 कडून दि.16.04.2015 ला रु.10,000/- अग्रीम रक्कम भरुन i 20 Active ही पेट्रोलवर चालणारी कार आरक्षीत केली होती. त्यावेळी त्याला सांगण्यात आले होते की, त्या कारचे पाचही चाक हे 16 इंच अॅलॉय व्हीलचे (16” alloy wheels) राहतील. म्हणजेच त्या कारचे स्पेअर व्हील सुध्दा अॅलॉय व्हील असेल. कंपनीतर्फे देण्यात आलेल्या या तपशिलामध्ये त्यानंतर काही बदल होण्याची शक्यता नाही असे वि.प.क्र. 2 ने सांगितले होते. परंतू 23.04.2015 ला तक्रारकर्त्याला दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले की, कंपनीने त्या कारचे स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यामुळे त्याला कारचे चार चाक अॅलॉय व्हील मिळतील. तेव्हा तक्रारकर्त्याने वि.प.ला त्यासंबंधी आक्षेप नोंदवित पत्रव्यवहार केला होता, परंतू त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर दि.18.07.2015 ला त्याने पुन्हा ई-मेलद्वारे वि.प.ला पाचही चाक अॅलॉय व्हील द्यावे म्हणून सांगण्यात आले. परंतू वि.प.ने त्यावर काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वि.प.ने तक्रारकर्त्याला त्याने आरक्षित केलेली कार दि.22.07.2015 ला घेऊन जाण्याविषयी सुचित केले. तक्रारकर्त्याने त्याच्याकडून जुनी कार अगोदरच विकली होती आणि त्याला दुसरा पर्याय नसल्याने त्याने वि.प.क्र. 2 कडून आरक्षित केलेली कार “Under protest” स्विकारली. ती कार त्याला चार अॅलॉय व्हीलसह देण्यात आली होती. परंतू स्पेअर व्हील अॅलॉय व्हील नव्हते. वि.प.क्र. 2 ने यासंबंधीची जबाबदारी वि.प.क्र. 1 वर टाकली. परंतू वि.प.क्र. 1 कडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्त्याने त्यानंतर दोन्ही वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठविली आणि स्पेअर व्हील अॅलॉय व्हील देण्याचे सुचित केले. परंतू त्याची मागणी नाकारण्यात आली. सबब या तक्रारीद्वारा त्याने विनंती केली की, वि.प.ला आदेशीत करण्यात यावे की, त्याने त्याला झालेल्या मनस्ताप आणि त्रासाबद्दल रु.25,000/- नुकसान भरपाई आणि रु.15,000/- तक्रारीचा खर्च द्यावा.
3. तक्रारीची नोटीस प्राप्त झाल्यावर वि.प.क्र. 1 ने आपले लेखी उत्तर दाखल करुन असे नमूद केले की, त्याच्याविरुध्द तक्रार दाखल करण्यास कुठलेही कारण घडलेले नाही आणि या तक्रारीमध्ये तो आवश्यक पक्षकारसुध्दा नाही. त्याचप्रमाणे या मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही, कारण वि.प.क्र. 1 चे कार्यालय या मंचाचे अधिकार क्षेत्राबाहेर आहे. त्याशिवाय, पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्त्याला कारची डिलीवरी देण्याचे दोन महिन्यापूर्वी कळविण्यात आले होते की, कंपनीने स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यामुळे कारचे स्पेअर व्हील अॅलॉय व्हील न येता स्टील व्हील देण्यात येईल आणि तक्रारकर्त्याने ते मान्यसुध्दा केले होते. कुठल्याही वाहनाचे स्पेसिफिकेशन किंवा त्याच्या मॉडेलमध्ये पूर्वसुचना न देता बदल करण्याचे हक्क हे कंपनीचे आहे आणि तसे ऑर्डर बुकींग फॉर्ममध्ये सुध्दा नमूद आहे. त्यामुळे जर तक्रारकर्ता केलेल्या बदलामुळे समाधानी नव्हता तर त्याला कारचे बुकींग रद्द करता आले असते. वारंटीनुसार कंपनीची जबाबदारी ही वाहनाच्या कार्यक्षमतेपूरती मर्यादित असते. वि.प.क्र. 2 हे प्रींसीपल टू प्रींसीपल या तत्वावर काम करते, त्यामुळे वि.प.क्र. 2 च्या कुठल्याही कार्यासाठी वि.प.क्र. 1 जबाबदार राहू शकत नाही. या सर्व कारणास्तव तक्रार खारिज करण्याची विनंती करण्यात आली.
4. वि.प.क्र. 2 ने आपले लेखी उत्तर नि.क्र. 9 वर दाखल केले. वि.प.क्र.1 निर्मित वाहनाचा तो अधिकृत विक्रेता आहे हे मान्य करुन पुढे असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने त्याच्याकडून i 20 Active ही कार आरक्षित केली होती. तसेच कारचा ताबा देण्याचे फार पूर्वी तक्रारकर्त्याला कळविण्यात आले होते की, कंपनीतर्फे त्या कारच्या स्पेसिफिकेशनमध्ये बदल करण्यात आल्यामुळे आता त्या कारला फक्त चार चाक अॅलॉय व्हील राहतील. कुठल्याही वाहनाच्या स्पेसिफिकेशन पूर्व सुचना न देता बदल करण्याचे पूर्णतः अधिकार वि.प.क्र. 1 ला आहे. कारचा ताबा देतांना सुध्दा तक्रारकर्त्याला या सर्व गोष्टीची जाणिव करुन दिली होती आणि त्यानुसार त्याने कारचा ताबा कुठल्याही आक्षेपाशिवाय घेतला होता. वि.प.क्र. 2 ला वाहनामध्ये कुठलाही बदल करता येत नाही. अशाप्रकारे त्याने सेवेत कुठलीही कमतरता ठेवली नाही किंवा अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला नाही, म्हणून तक्रार खारिज करण्याची विनंती करण्यात आली.
5. तक्रारकर्ता व वि.प.क्र. 2 यांचा युक्तीवाद त्यांचे वकिलांमार्फत ऐकण्यात आला. वि.प.क्र. 1 व त्यांचे वकील यांचा युक्तीवाद प्रकरण नंतर बोर्डवर घेऊन ऐकण्यात आला. मंचाने दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
6. या तक्रारीतील वाद हा फार छोट्या स्वरुपाचा आहे. वि.प.ने हे नाकबूल केलेले नाही की, पूर्वी तक्रारकर्त्याने घेतलेल्या कारच्या स्पेसिफिकेशननुसार त्या कारचे पाचही चाक अॅलॉय व्हील राहणार होते. त्यामुळे ज्यावेळी तक्रारकर्त्याने कार आरक्षित केली त्यावेळी त्याला सांगण्यात आले होते की, कारचे पाचही चाक अॅलॉय व्हील राहतील. कारचे आरक्षण दि.16.04.2015 ला केले होते आणि कारचा प्रत्यक्ष ताबा दि.22.07.2015 ला मिळाला. ताबा देण्यापूर्वी दि.23.04.2015 त्याला कळविण्यात आले होते की, स्पेसिफिकेशन मध्ये बदल झाल्यामुळे त्या कारचे केवळ चार चाक अॅलॉय व्हील राहतील. कार आरक्षित केल्यानंतर केवळ एक आठवडयाच्या आतच तक्रारकर्त्याला झालेल्या बदलाची सुचना देण्यात आली होती. कारचा ताबा मिळण्यास बराच अवधी होता. त्यामुळे तक्रारकर्ता अगोदरच बुकींग रद्द करु शकला असता किंवा त्याच कंपनीचे दुसरे एखादे वाहन विकत घेऊ शकला असता. त्या वाहनाच्या ब्रोशर आणि ऑर्डर बुकींग फॉर्म वाचल्यावर हे स्पष्ट होते की, त्यामध्ये ह्युंडाई मोटर कंपनीच्या कुठल्याही वाहनाचे स्पेसिफिकेशन, वैशिष्टये, मॉडेल मध्ये पूर्वसुचना न देता बदल करण्याचे अधिकार स्वतःजवळ ठेवले आहे. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे ठरेल की, वि.प.क्र. 1 ला ते वाहन आरक्षित केल्यानंतर त्या वाहनाच्या स्पेसिफिकेशनमध्ये कुठलेही बदल करता येत नाही. तक्रारकर्त्याला बदलासंबंधी सुचना फार पूर्वी देण्यात आली होती. त्यामुळे स्पेअर व्हील अॅलॉय व्हील न देऊन सेवेत कमतरता ठेवली किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असे म्हणता येणार नाही.
7. कारचे स्पेअर व्हील अॅलॉय व्हील न देऊन तक्रारकर्त्याच्या प्रतिष्ठेमध्ये कशी बाधा निर्माण झाली किंवा त्याला कुठली अडचण आली हे समजून येत नाही. कारण त्याने या कारणास्तव रु.25,000/- ची नुकसान भरपाई मागितली आहे. मंचाचे मते त्याची ही मागणी अवास्तव आणि विनाआधार असल्याची दिसून येते. त्याला त्या कारचे आरक्षण रद्द करता आले असते किंवा कारच्या आरक्षण करण्यापूर्वी किंवा ताबा घेण्यापूर्वी ती कार घ्यावी की नाही याचा विचार करता आला असता. कारण कारच्या स्पेसिफिकेशनमध्ये बदल करण्याचे अधिकार वि.प.क्र. 1 कंपनीचे आहे ही बाब स्पष्टपणे बुकींग फॉर्ममध्ये नमूद आहे.
8. सबब, सदर तक्रार ही तथ्यहीन असल्याने खारिज होण्यायोग्य आहे. करिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श –
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चाबाबत कुठलीही आदेश नाहीत.
- आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.