नि. 13 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 54/2010 नोंदणी तारीख – 17/2/2010 निकाल तारीख – 3/7/2010 निकाल कालावधी – 136 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री अतुल निळकंठ जोशी रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण जि. सातारा ----- अर्जदार (वकील कु.ज्योत्स्ना देवकर) विरुध्द हुसेन चंदूभाई बागवान रा.मु.पो.दहिवडी, ता. माण जि.सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांचे दुकान व डंक आहे. जाबदार यांचा फॅब्रीकेशनचा व्यवसाय आहे. अर्जदार यांनी त्यांचे स्वतःचे जागेत बांधलेल्या दुकान गाळयासाठी शटर बनविण्याचे काम जाबदार यांना दिले होते. सदरचे काम जाबदार यांनी केलेनंतर अर्जदार यांनी त्यांचे दोन मोकळया खोल्यांना शटर बसविण्याचे काम जाबदार यांना दिले. त्यासाठी त्यांनी जाबदार यांना रु.15,000/- दिले. परंतु जाबदार यांनी अद्यापही शटर्स बसवून दिलेले नाही. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली. परंतु जाबदार यांनी त्यास काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अर्जदार यांचे आर्थिक नुकसान झाले व त्यांना मानसिक त्रास झाला. सबब कराराप्रमाणे जाबदारकडून शटर्स बसवून मिळावे, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचा पोस्टाचा शेरा असलेला लखोटा नि. 7 ला दाखल आहेत. जाबदार हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. नि.11 कडे अर्जदारचे जाबदारला नोटीस बजावणी झालेबाबतचे शपथपत्र पाहिले. सबब, जाबदारविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदारची तक्रार पाहता जाबदारचा फॅब्रीकेशनचा व्यवसाय असलेने अर्जदारचे 2 खोल्यांना शटर्स बसवणेचे काम अर्जदारने जाबदारकडे दिले. यासाठी दि. 22/10/2009 रोजी रक्कम रु.15,000/- जाबदारला दिलेले आहेत. परंतु आजपर्यंत जाबदारने शटर्स बसवले नाहीत. अनेकवेळा जाबदारकडे काम करुन देणेबाबत विनंती केली तसेच नोटीसही पाठविली तरीसुध्दा जाबदारने काम केले नाही. सबब त्वरित शटर्स बसवून द्यावीत व मानसिक त्रासासाठी रक्कम मिळावी अशी अर्जदारची तक्रार दिसते. 4. अर्जदारचे स्वतःचे कथनाचे पृष्ठयर्थ नि.5 सोबत कागद दाखल केले असून त्याचे अवलोकन करता नि.5/1 कडे अर्जदारचे स्वतःचे श्रीराम मसाला पदार्थ दि. 22/10/2009 रोजीचे स्वतःचे व्हाऊचरची झेरॉक्स दाखल केली असून त्यावरती पावती असून पैसे घेणा-याची सही दिसते. सदर व्हाऊचर रक्कम रु.15,000/- चे दिसते. तसेच नि.5/2 कडे दि. 4/1/2010 रोजी वकीलामार्फत जाबदारला नोटीस पाठविली आहे त्याची प्रत दाखल केलेचे दिसून येते. 5. निर्विवादीतपणे वरील दाखल कागदपत्रांवरुन जाबदार हुसेन चंदूभाई बागवान यांना अर्जदारने रक्कम रु.15,000/- दिलेचे दिसतात व सदर बाब जाबदार मंचात हजर राहून नाकारत नाहीत. सबब जाबदारने शटर्ससाठी रक्कम रु.15,000/- घेतले आहेत हे दिसून येते. अर्जदारनेच नि.5/2 कडे दाखल केलेली नोटीसची प्रत पाहता - “तुम्हास रु.15,000/- दिलेले आहेत. शटरसाठी आवश्यक त्या खर्चाचा हिशेब शटर बसवलेनंतर पूर्ण करणेचे ठरलेले होते. आज पर्यंत तुम्ही शटर बसवले नाही ” असा मजकूर आहे म्हणजे रक्कम रु.15,000/- व्यतिरिक्त आणखी खर्चाचा हिशोब अर्जदारने शटर बसवलेनंतर देणेचा आहे हे दिसून येते. तक्रारअर्जातील विनंतीमध्ये अर्जदार दोघांमध्ये झालेल्या कराराप्रमाणे शटर्स बसवणेचा आदेश व्हावा असे कथन करतात. निर्विवादीतपणे कोणताही करार अर्जदारने दाखल केला नाही. सबब शटर बसवणेसाठी किती रक्कम ठरली हे समजून येत नाही. अशा परिस्थितीत जाबदारने अर्जदारास रक्कम रु.15,000/- व्याजासह परत करावेत असा आदेश होणे न्याय होणार आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 6. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार यांनी अर्जदार यास रक्कम रु.15,000/- (रु.पंधरा हजार) द्यावेत व सदर संपूर्ण रक्कम अर्जदारचे पदरी पडेपर्यंत दि. 22/10/2009 पासून सदर रक्कम रु.15,000/- वरती द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे. 3. जाबदारने मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- (रु.पाच हजार) द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.3/7/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| , | HONABLE MR. Mr. V.D.Deshmukh, PRESIDENT | , | |