तक्रारदार : भागीदार वकीलासोबत हजर. सामनेवाले : -- *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- तक्रार दाखल करुन घेण्यासंबधीचा आदेश 1. सा.वाली ही बँक आहे. तर तक्रारदार हे सा.वाले यांचे खातेदार आहेत. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांचे सा.वाले यांचेकडे चालु खाते 1999 मध्ये उघडलेले आहे. व त्या खात्यामध्ये तक्रारदार हे त्यांच्या व्यवसायातील उत्पन्नाची रक्कम तसेच परदेशातून मिळणा-या उत्पन्नाची रक्कम जमा करीत होते. तक्रारदारांची वेगवेगळी चार खाती सा.वाले यांचेकडे आहेत. व त्या खात्यामध्ये सा.वाले बँकेने त्या खात्याच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविल्या नाहीत अशी तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द तसे जाहीर करुन मिळावे त्याच प्रमाणे नुकसान भरपाई इत्यादीची मागणी केली आहे. 2. तक्रारदारांच्या वकीलांचा दाखल सुनावणीकामी युक्तीवाद ऐकण्यात आला. प्रस्तुत मंचाने तक्रार व त्या सोबतची कागदपत्रे यांचे वाचन केले. 3. तक्रारदारांच्या वकीलांचा दाखल सुनावणीकामी युक्तीवाद ऐकत असतांना प्रस्तुत मंचास प्रस्तुतचा व्यवहार हा वाणीज्य व्यवसायाकामी सा.वाले बँकेची सेवा सुविधा स्विकारलेली असल्याने ग्राहक मंचास प्रस्तुतची तक्रार दाखल करुन घेण्याचा अधिकार आहे काय ? अशी शंका तक्रारदारांचे वकीलांना विचारण्यात आली व त्याबद्दल त्यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. 4. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.1 मध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदार हे औद्योगिक वस्तुचे उत्पादन 1977 पासून करतात व तक्रारदारांनी आपली कंपनी 1989 मध्ये स्थापन केलेली आहे. तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ट क्र.2 मध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी सा.वाले बँकेकडे उघडलेल्या चालु खात्यामध्ये तक्रारदारांचे सर्व आयात निर्यातीचे उत्पन्न विदेशी चलनामध्ये जमा होते. तक्रारीच्या परिच्छेद क्र.2 मध्ये सा.वाले यांचेकडून सेवा सुविधा पुरविण्यात आलेल्या कसुरामुळे तक्रारदारांचे कसे नुकसान झाले याचे विवरण देण्यात आले आहे. तक्रारीच्या परिच्छेद क्र.4 मध्ये तक्रारदारांची सा.वाले यांचेकडे जी वेग वेगळी खाती आहेत त्याचे विवरण दिलेले असून परिच्छेद क्र.5 मध्ये तक्रारदार असे म्हणतात की, वरील सर्व खाती ही व्यवसायाकामी उघडलेली खाती असून खाते क्र.1 हे चालु खाते असून त्यामध्ये भारतीय चलनामध्ये रक्कम जमा होते तर इतर तिन खात्यामध्ये परदेशी चलनामध्ये उत्पादनाच्या रक्कमा जमा होतात. ती सर्व खाती चालु खात्याचे स्वरुपात आहेत व तशी वापरली जातात. तक्रारदारांनी सा.वाले यांना त्या खात्याच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली, त्याचे विवरणपत्र तक्रारीच्या अन्य भागात दिलेले आहे. 5. वर वर्णन केल्याप्रमाणे तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडून स्विकारलेली सेवा सुविधा ही व्यवसायाकामी स्विकारलेली सेवा सुविधा होती असे दिसून येते. तक्रारदारांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, सा.वाले यांचेकडून ज्या सेवा सुविधा स्विकारण्यात आल्या ती बँकेच्या खात्याच्या स्वरुपात होती. जी विक्री करुन तक्रारदारांनी नफा कमविलेला नाही. तक्रारदारांच्या वकीलांनी या संदर्भात मा.राष्ट्रीय आयोगाचा हर्सोलिया मोटर्स विरुध्द नॅशनल इंनश्युरन्स कंपनी लिमिटेड I (2005) CPJ 27 (NC) या प्रकरणाचा आधार घेतला. परंतु त्या प्रकरणात विमा कंपनीकडून घेतलेली सेवा सुविधा ही वाणीज्य व्यवसायाकामी स्विकारलेली सेवा सुविधा होती हाय हा मुख्य प्रश्न होता. परंतु प्रस्तुत प्रकरणात तो मुद्दा उपस्थित होत नाही. कारण सा.वाले ही बँक असून खात्याच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्याचा वाणीज्य व्यवसाय करणारी संस्था आहे. 6. या उलट प्रस्तुत मंचाने सर्वोच्च न्यायालयाच्या बिर्ला टेक्नॉलॉजी लिमिटेड विरुध्द न्युटरल ग्लास अन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड 2011 CTJ पृष्ट क्र.121 या प्रकरणाचा आधार घेतला. या प्रकरणातील न्याय निर्णय तक्रारदारांचे वकीलांचे निदर्शनास आणला त्यावर तक्रारदारांच्या वकीलांचे भाष्य ऐकण्यात आले. बिर्ला टेक्नॉलॉजी लिमिटेड या प्रकरणात अपीलकर्ते यांनी सा.वाले यांचेकरीता संगणक प्रणाली विकसीत केली होती परंतु त्यामध्ये दोष आढळून आला. सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदविला की, सेवा स्विकारणारी संस्था ही वाणीज्य व्यवसाय करीत असलीतरी त्याकामी स्विकारलेली सेवा सुविधासुध्दा वाणीज्य व्यवसायाकामी स्विकारलेली सेवा सुविधा आहे असे समजले जाते, असा अभिप्राय नोंदविला. 7. प्रस्तुतचे प्रकरणात तक्रारदार ही एकल व्यवसाय करणारी कंपनी आहे व तक्रारदार हे त्या कंपनीचे मालक आहेत. मा.राज्य आयोगाने प्रथम अपील क्रमांक 1261/2008 न्याय निर्णय दिनांक 17.2.2011 यामध्ये एकल व्यवसाय करणारी कंपनी ही ग्राहक या संज्ञेत मोडते असा अभिप्राय नोंदविला. तथापी त्या प्रकरणामध्ये तक्रारदारांचे असे कथन आहे की, तो व्यवसाय तक्रारदार आपल्या उदरनिर्वाहाकरीता व स्वयंमरोजगार म्हणून करीत आहेत. या प्रकरणात व्यवसाय करणारी व्यक्ती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) चे अपवादात्मक भागात मोडते व पर्यायाने ग्राहक ठरते. परंतु प्रस्तुतचे प्रकरणात तक्रारदारांचे असे कोठेही कथन नाही की, त्यांनी आपल्या व्यवसायाकामी सा.वाले यांचेकडे उघडलेले खाते हे एकल व्यवसाय, स्वयंमरोजगारा व उदरनिर्वाहासाठी म्हणून होते. तसे असणे शक्य नाही. कारण तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे जे तक्रारदारांचे नुकसान झाले ते काही लाखामध्ये झाले आहे असे नमुद केलेले आहे. त्याचे विवरण तक्रारीच्या परिच्छेद क्र.15 मध्ये दिलेले आहे. तक्रारदारांनी मागीतलेली नुकसान भरपाई ही रु.19,40,000/- होती. या प्रमाणे व्यवसाय करणारी व्यक्ती निच्छितच वाणीज्य व्यवसायाकामी व नफा कमविण्याचे उद्देशाने बँकेकडून सेवा सुविधा स्विकारते असे समजावे लागेल. त्यातही तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन नाही की, तक्रारदार हे स्वयमरोजगार व उपजिवीकेचे साधन म्हणून व्यवसाय करीत होते. तसे असणेही शक्य नाही. 8. वरील सर्व परिस्थितीत तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून स्विकारलेली सेवा सुविधा ही वाणीज्य व्यवसायाकामी स्विकारलेली सेवा सुविधा असल्याने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(डी) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत बसत नाही असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. 9. वरील चर्चा व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार दाखल करुन घेण्यात येत नाही व ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(3) प्रमाणे रद्द करण्यात येते. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती तक्रारदारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |