(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 06/10/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 01.01.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारां मार्फत गोल्ड क्रेडीट कार्ड घेतले होते त्याचा क्रमांक 4384599912794400 हा होता. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.2 यांचे कार्यकारी प्रतिनिधीने त्याला एचएसबीसी प्लॅटीनम क्रेडीट कार्ड देऊ केले व त्याला तक्रारकर्त्याने संमती दिली. सदर कार्ड तक्रारकर्त्याचे पत्त्यावर पाठविण्याचे गैरअर्जदारांनी मान्य केले, परंतु तक्रारकर्त्यास प्लॅटीनम क्रेडीट कार्ड कधीच पाठविले नाही. तक्रारकर्त्याने जुन-2009 महीन्याचे आसपास गैरअर्जदार क्र.1 चे सेवाप्रदानकर्त्याशी संपर्क साधुन गोल्ड प्लॅटीनम क्रेडीट कार्ड मध्ये किती घेणे बाकी आहे यासंबंधची विचारणा केली असता प्लॅटीनम क्रेडीट कार्डसुध्दा पुरविण्यांत आले असुन त्याचे खात्यामध्ये घेणे असलेली रक्कम रु.1,00,000/- चे वर असल्याचे सांगण्यांत आले. त्यामुळे तक्रारकर्त्यास मोठा धक्का बसल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.01.06.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना पत्र लिहीले. 3. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, कार्ड धारकाची ओळख पटल्या शिवाय किंवा कार्ड धारकाची अनुमती असल्या शिवाय इतर व्यक्तिला गैरअर्जदारांनी कसे काय कार्ड दिले. तक्रारकर्त्याने भविष्यात कोणतीही गुंतागुंत होऊ नये म्हणून पोलिस स्टेशनमध्ये दि.09.09.2009 रोजी तक्रार केली. तक्रारकर्त्याने बँकेचे वसुली व्यवस्थापक श्री. गणेश हे तक्रारकर्त्याला वारंवार फोन करुन तक्रारकर्त्यास खाते निकाली काढण्याबद्दल दबाव आणत असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असुन प्रतिज्ञा केली आहे की, गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे घोषीत करावे तसेच नुकसान भरपाई पोटी रु.75,000/- व तक्रारीच्या खर्चाची रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. 3. प्रस्तुत तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजाविण्यांत आली असता गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारीला खालिल प्रमाणे उत्तर दाखल केले असुन त्यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकत्यांनी दाखल केलेली तक्रार ही खोटी आहे व तक्रारकर्त्यास प्लॅटीनम क्रेडीट कार्ड पुरविण्यांत आले होते. तसेच तक्रारकर्ता प्रथम 106, धरमपेठ टॉवर जवळ, धरमपेठ, नागपूर येथे राहत होता त्यानंतर तो 23, कुंजू कॉलनी जरीपटका संगीता बिल्डींगजवळ, नागपूर येथे राहावयास गेला, त्यानंतर काही बांधकाम सुरु केल्यामुळे तो 106, युसुफ मंझील, 2 रा माळा, नागराज चौक, शांतीनगर, प्रोनेट कंप्युटरजवळ राहावयास गेला. तसेच तक्रारकर्त्याने त्याचा मोबाईल क्रमांक दोनदा बदलला. गैरअर्जदारांनी पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याचे प्लॅटीनम क्रेडीट कार्ड 106, युसुफ मंझील, 2 रा माळा, नागराज चौक, शांतीनगर, नागपूर या पत्त्यावर पाठविले आहे व ते तक्रारकर्त्यास प्राप्त झाले आहे. त्यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने ओळख म्हणून पॅन कार्ड नं. ABSPV-6623-B पुरावा म्हणून दिले होते. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व नाकारलेले असुन सदर तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. 4. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.29.09.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. तक्रारकर्त्याकडे गैरअर्जदारांचे गोल्ड क्रेडीट कार्ड होते ही बाब उभय पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा सेवाधारक ठरतो, त्यामुळे तो गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ आहे असे मंचाचे मत आहे. 6. तक्रारकर्त्याला गैरअर्जदारांचे कार्यकारी प्रतिनिधीव्दारा एचएसबीसी प्लॅटीनम क्रेडीट कार्ड देऊ करण्यांत आले होते व त्याबाबत तक्रारकर्त्याने संमती दिली होती, असे तक्रारकर्त्याने तक्रारीत कथन केले आहे. तसेच गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरामध्ये नमुद केले आहे की, तक्रारकर्त्यास प्लॅटीनम क्रेडीट कार्ड पुरविण्यांत आले होते. तक्रारकर्त्याचा मुख्य आक्षेप असा आहे की, गैरअर्जदारांनी त्याला कधीही प्लॅटीनम क्रेडीट कार्ड दिले नाही. या उलट गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्यास प्लॅटीनम क्रेडीट कार्ड दिलेले आहे. गैअर्जदारांनी दि.29.09.2010 रोजी अर्ज सादर करुन तक्रारकर्त्यास प्लॅटीनम क्रेडीट कार्ड पुरविल्याचे कथनार्थ दस्तावेज दाखल करण्यांची परवानगी मागितली. सदर अर्ज मंचाने मंजूर केला. 7. गैरअर्जदारांनी ‘ब्यू डार्ट’ या कुरीयर कंपनीची पावती दाखल केलेली आहे सदर पावतीसोबत तक्रारकर्त्याचा ओळख पुरावा म्हणून दिलेल्या पॅन कार्डचा क्रमांक ABSPV-6623-B हा लिहीलेला आहे. तक्रारकर्त्याने सदर पॅन कार्ड हे त्याचे नसल्याचे आपल्या उत्तरात नमुद केले असुन आपले मुळ पॅन कार्ड मंचासमक्ष सादर केले आहे व त्याची झेरॉक्स प्रत दि.01.10.2010 रोजी मंचासमक्ष दाखल केलेली आहे. सदर पॅन कार्डचे अवलोकन केले असता त्याचा क्रमांक AJXPR-9454-P हा असुन त्यावर नितीन पी. रामचंदानी या नावाचा उल्लेख आहे. तसेच तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांनी ‘ब्यू डार्ट’ व्दारा दिलेल्या पॅन कार्ड वरील फोटो सुध्दा तक्रारकर्त्याचा नसल्याचे म्हटले आहे. मंचाने तक्रारकर्त्याचे मुळ पॅन कार्डची पाहणी केली व त्यावरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याचा पॅन कार्ड नं. AJXPR-9454-P हा आहे. 8. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरामध्ये तक्रारकर्त्याचे दोन मोबाईल क्रमांक 9923035222 व 9970309698 दिलेले आहेत. सदर क्रमांक आपले कधीच नसल्याचे तक्रारकर्त्याने आपल्या उत्तरात नमुद केले आहे. गैरअर्जदारांची जबाबदारी होती की, सदर क्रमांक हे तक्रारकर्त्याचेच असल्याबाबत पुरावा सादर करणे, परंतु गैरअर्जदारांनी तसे काहीही केले नाही. 9. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरातील परिच्छेद क्र.6 मध्ये तक्रारकर्त्याला प्लॅटीनम क्रेडीट कार्ड 106, युसुफ मंझील, 2 रा माळा, नागराज चौक, शांतीनगर, नागपूर येथील पत्त्यावर पुरविले होते ही बाब स्पष्ट करणारा कोणताही दस्तावेज अथवा पुरावा गैरअर्जदारांनी दाखल केलेला नाही. यामुळे मंचाच्या मते गैरअर्जदारांनी चुकीच्या पत्त्यावर प्लॅटीनम क्रेडीट कार्ड पाठविल्याचे स्पष्ट होते. 10. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दस्तावेज क्र.3 पोलिस स्टेशनला केलेल्या तक्रारीसंबंधीचे दाखल केलेले आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्यास प्लॅटीनम क्रेडीट कार्ड मिळाले नाही व त्यामुळे त्याने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. 11. वरील सर्व निष्कर्षांच्या आधारे हे स्पष्ट होते की, गैरअर्जदारांनी प्लॅटीनम क्रेडीट कार्ड पाठवीत असतांना योग्य ती काळजी घेतली नाही व त्यामुळे तक्रारकर्त्यास प्लॅटीनम क्रेडीट कार्ड मिळाले नाही. म्हणून सदर प्लॅटीनम क्रेडीट कार्ड संदर्भात कोणतेही देणे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याकडून वसुल करु नये, असे मंचाचे मत आहे. 12. तक्रारकर्त्याने तक्रारमध्ये नुकसान भरपाईपोटी रु.75,000/- ची मागणी केलेली आहे, सदर मागणी अवास्तव असुन तक्रारकर्त्यास रु.75,000/- चे नुकसान कसे काय झाले याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा न्यायोचितदृष्टया रु.10,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीच्या खर्चाचे रु.10,000/- ची मागणी केलेली आहे, सदर मागणी सुध्दा अवास्तव असल्यामुळे वास्तविकतेच्या आधारावर न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला प्लॅटीनम क्रेडीट कार्ड संदर्भात रकमेची मागणी करु नये. तसेच सदर प्लॅटीनम क्रेडीट कार्ड बंद करावे. 4. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई पोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे. 5. गैरअर्जदारांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |