अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
मा.अध्यक्ष - श्री.मिलींद सा. सोनवणे.
मा.सदस्य – श्री.सी.एम.येशीराव.
------------------------------- तक्रार अर्ज क्रः– 1014/2009
तक्रार दाखल तारीखः– 06/07/2009
तक्रार निकाली तारीखः-27/05/2013
निशाणीः 18
श्री. सुकदेव दशरथ शिरसाळे,
वय- 45 वर्ष, धंदा – व्यवसाय,
द्वारा – दत्त लॉड्री, 294 बळीराम पेठ,
शिवाजी रोड, जळगांव – 425 001,
ता.जि.जळगांव. ...... तक्रारदार.
विरुध्द
1. श्री. श्रीकांत शिंदे.
उ.स. सज्ञान, धंदा – व्यवसाय,
संचालक एच.पी.. मार्केटींग सर्व्हीसेस,
शॉप नं. 250, ‘ए’ विंग वाशी प्लाझा,
सेक्टर नं. 17, नवी मुंबई, महाराष्ट्र
2. श्री. राजु पाटील,
उ.स. सज्ञान, धंदा – व्यवसाय
3. श्री. दिपक पाटील,
उ.स. सज्ञान, धंदा – व्यवसाय
सामनेवाला क्र. 2 व 3 यांचे कार्यालय,
ब्रॅच ऑफिस – द्वारा – श्री. प्रशांत पाटील,
प्रशांत झेरॉक्स सेल्स अॅण्ड सर्व्हीसेस,
पिपल बॅकेच्या शेजारी, रिंगरोड, जळगांव – 425 001.
ता.जि. जळगांव. ..... सामनेवाला.
कोरम –
श्री. मिलींद सा. सोनवणे - अध्यक्ष
श्री. सी.एम. येशीराव - सदस्य .
तक्रारदार तर्फे - अॅड. हेमंत शिरसाळे, अॅड. हेमंत जाधव,
सामनेवाला तर्फे एकतर्फा
नि का ल प त्र
श्री. मिलींद सा. सोनवणे, अध्यक्ष - प्रस्तुत तक्रार सेवेतील कमतरतेच्या कारणास्तव ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल करण्यात आलेली आहे.
2. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, तक्रारदार हे बळीराम पेठ, जळगांव येथे दत्त लॉड्री नावाचा व्यवसाय आहे. सामनेवाला क्र. 1 यांचे नवी मुंबई, वाशी येथे एच.पी. कंपनीचा मशिन विक्रीचा व्यवसाय आहे. सामनेवाला क्र. 2 व 3 हे सामनेवाला क्र. 1 यांच्या एच.पी. कंपनीच्या ब्रॅच ऑफिस येथील कर्मचारी आहेत.
3. तक्रारदारास दुकानात झेरॉक्स कम फॅक्स, कलर प्रिंटींग मशिन, हवी होती. त्याकरीता तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांच्या कडे विचारणा केली असता सामनेवाला क्र. 1 यांनी त्यांना सांगितले की, आम्ही प्रोडक्ट बुकींग फॉर्म भरुन मशिनची डिलेव्हरी देतो असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 2 व 3 यांचेकडून प्रोडक्ट बुकींग फॉर्म भरुन दि. 11/08/2008 रोजी एच.पी.कंपनीचे झेरॉक्स कम फॅक्स व स्कॅन मशिनची अॅडव्हान्स रक्कम रु. 5000/- भरुन मशिनीची डिलेव्हरी दिली. त्यानंतर सामनेवाला क्र. 1 यांचे सांगणेवरुन दि. 18/08/2009 रोजी रक्कम रु. 35,040/- भरुन ताब्यात घेतले. सदर मशिन विकत घेतेवेळी 6 महिन्यांची गॅरंटी होती. सदर मशिनीचा Item No. हा H.P. Photo Smart All INONE C7288 SERIAL NO. MY859H30MG असा आहे.
4. तक्रारदाराचे पुढे असे ही म्हणणे आहे की, सदरचे मशिन सुरवातीचे काही दिवस व्यवस्थित चालले त्यानंतर ते दि. 13/10/2008 रोजी पहिल्यांदा बंद पडल्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांच्याशी संपर्क केला असता सामनेवाला क्र. 1 यांच्या सांगण्यावरुन सामनेवाला क्र. 2 व 3 यांच्याकडे मशिन दुरुस्ती करता दिले. त्याबदल्यात सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी एक जुनी मशिन काम चालविण्यासाठी दिले. सुमारे 25 ते 26 दिवसांनी मशिन दुरुस्त होवून आल्यानंतर मशिन पुन्हा दुस-याच दिवशी नादुरुस्त झाले त्यानंतर तक्रारदारांनी दि. 08/11/2008 रोजी दुरुस्ती करण्याकरीता सामनेवाला क्र. 2 व 3 यांच्याकडे दिले.
सदर मशिन मध्ये वारंवार बिघाड व्हायचा, वेळोवेळी तक्रारदारांना सामनेवाला यांच्याकडे मशिन दुरुस्त करणेकरीता जावे लागत. दि. 30/01/2009 रोजी मशिन व त्यासोबतचे यु.पी.एस. पुन्हा बंद पडल्यांनतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे दुरुस्ती करता दिले पंरतु त्यानंतर सामनेवाला यांना मशीनचे यु.पी.एस. तक्रारदास आजपावेतो दुरुस्त करुन दिलेले नाही.
5. तक्रारदार पुढे असे ही म्हणतात की, सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदाराचे मशीन त्यांचेसमोर दुरुस्त करण्यासाठी खोलले असता तक्रारदाराच्या असे लक्षात आले की, दुरुस्त करण्यात येणारे मशिन त्यांच्या मालकीचे नाही. मशिन खरेदी करते वेळी मशिन चा मुळ क्रमांक हा वेगळा होता व खोलण्यात आलेल्या मशिनचा क्रमांक हा वेगळा आहे असे तक्रारदारास आढळून आले. सामनेवाला यांनी तक्रारदारांस त्यांचे मुळ मशिन न देता कोणा दुस-याचे मशिन देऊन तक्रारदाराची फसवणुक केली आहे.
6. तक्रारदार पुढे असे म्हणतात की, सामनेवाला यांनी सेवेमध्ये त्रुटी व दोष निर्माण केलेला आहे. त्यामुळे त्यांना त्यांची मुळची मशिन त्याच क्रमांक सह सामनेवाला क्र. 1 ते 3 यांच्या कडून परत करण्याचा हुकूम व्हावा. पर्यायी सामनेवाला क्र 1 ते 3 यांचेकडून अर्जदाराची फसवणुक केल्या प्रकरणी नविन त्याच कंपनीचे सिलबंद मशिन देण्याचा आदेश व्हावा तसेच मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 50,000/- नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च रु. 5000/- व दि. 01/06/2009 पासुन या तक्रारीचा निकाल लागण्याच्या तारखेपर्यत प्रत्येक दिवशी रक्कम रु. 400/- मात्र देण्याचा हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
7. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ, तक्रारदाराचे शपथपत्र, तसेच कागदपत्रांच्या यादीनुसार 09 छांयाकित कागदपत्रे दाखल केली आहेत.
8. सामनेवाला यांना या मंचाने नोटीस काढली. नोटीस मिळुनही सामनेवाला या मंचात हजर झाले नाही. तक्रारीतील कथनास त्यांनी आव्हान दिलेले नाही. परिणामी तक्रार अर्जातील दाखल कागदपत्र नाकारलेले नाहीत. म्हणुन आमच्या पुर्वाधीका-यांनी सामनेवाल्यांविरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला.
9. निष्कर्षासाठीचे मुद्ये व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणमिमांसेसह खालीलप्रमाणे आहेत.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2) सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देतांना कमतरता
केली काय ? होय.
3) आदेशाबाबत काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र.1 साठीः
10. तक्रारदाराने तक्रारीत व पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रात नमुद केलेले आहे की, दि.11/08/2008 रोजी रु.5,000/- व दि.18/08/2009 रोजी रु.35,000/- इतकी रक्कम भरुन त्याने सामनेवाला यांचेकडुन झेरॉक्स कमफॅक्टस स्कॅन मशिन विकत घेतले. दस्तऐवज यादी ला अनुक्रमांक 1,2 व 3 ला दाखल कागदपत्रे वरील बाबीस पुष्टी देतात, परिणामी तक्रारदार व सामनेवाले यांचेत विक्रेता व ग्राहक हे संबंध शाबीत होतात. सामनेवाला यांनी सदर पुरावा संधी असुनही नाकारलेला नाही. यास्तव मुद्या क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्या क्र.2 साठीः
11. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देतांना कमतरता केली याबाबत तक्रारदाराने पुराव्यात नमुद केले की, त्याचे बळीरामपेठ,जळगांव येथे दत्त लॉण्ड्री नावाचे दुकान आहे., त्या दुकानात व्यवसायास पुरक असे झेरॉक्स व स्कॅनिंग चे मशिन असावे म्हणुन त्याने सामनेवाला यांचेकडुन H.P. Photo Smart All INONE C7288 SERIAL NO. MY859H30MG हे मशिन एकुण रु.40,040/- इतक्या रक्कमेस विकत घेतले. त्याने सामनेवाला यांना वरील रक्कम अदा केलेबाबतच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत.
12. सामनेवाला यांनी पुढे असेही नमुद केलेले आहे की, दि.13/10/2008 रोजी सदर मशिन बंद पडले. सामनेवाला क्र. 1 यांचे सांगण्यावरुन ते मशिन सामनेवाला क्र. 2 व 3 यांचेकडे दुरुस्तीसाठी देण्यात आले. 25 ते 26 दिवसांनी मशिन दुरुस्त झाल्यानंतर दि.8/11/2008 रोजी ते मशिन पुन्हा ना-दुरुस्त झाल्याने सामनेवाला क्र. 2 व 3 यांचेकडे देण्यात आले. त्यानंतर मशिन दुरुस्त होऊन आले परंतु दि.30/01/2009 रोजी मशिन व यु.पी.एस. खराब झाल्याने पुन्हा सामनेवाला क्र. 1 व 2 यांना देण्यात आले. त्यानंतर मशिन दुरुस्त होऊन आल्यानंतर देखील ते वारंवार खराब होता. मशिन उघडले असता तक्रारदारास लक्षात आले की, त्या मशिनचा क्रमांक हा वेगळा होता. मशिन नवीन घेतले त्यावेळी त्याचा क्रमांक वर नमुद प्रमाणे होता मात्र अनेक वेळा दुरुस्तीला मशिन पाठविल्यानंतर अंतीमतः त्याच्याकडे भलतेच मशिन सामनेवाला यांनी दिलेले आहे, हे त्याच्या लक्षात आले.
13. तक्रारदाराचा वरील सर्व पुरावा हा सामनेवाला यांनी मंचात हजर होऊन नाकारलेला नाही. आपल्या विरुध्द तक्रारदाराने केलेली विधाने माहित झाल्यानंतर देखील सामनेवाला यांनी त्यांचा इन्कार केलेला नाही. सबब तक्रारदाराचा वरील पुरावा नाकारण्यात आलेला नाही. तक्रारदाराने दिलेला पुरावा खरा व योग्य आहे म्हणुनच तो आव्हानीत करण्यात आलेला नाही, असा प्रतिकुल निष्कर्ष सामनेवाला यांचेविरुध्द काढण्यात येतो. यास्तव मुद्या क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्या क्र. 3 साठीः
14. मुद्या क्र. 1 व 2 चे निष्कर्ष होकारार्थी दिलेले आहेत ही बाब विचारात घेता हे स्पष्ट होते की, तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा पुरविण्यात कमतरता केलेली आहे. परिणामी ग्राहक संरक्षण कायदा कलम 14 प्रमाणे रिलीफ मिळण्यास तक्रारदार पात्र ठरतात. तक्रारदाराने त्याला त्याचे मुळ मशिन सामनेवाला यांनी परत करावे व त्याचा वॉरंटी कालावधी मशिन दिल्याचे तारखेपासुन मोजावा किंवा सामनेवाला यांनी त्यास त्याच कंपनीचे नविन सिलबंद मशिन द्यावे, असे आदेश मंचाने सामनेवाला यांना द्यावेत अशी विनंती केलेली आहे. आमच्या मते तक्रारदाराने सादर केलेल्या पुराव्याच्या अनुसार व आधारे त्यास देण्यात आलेले मशिन वारंवार दुरुस्तीसाठी नेऊनही निट दुरुस्त झालेले नाही,ही बाब स्पष्ट होते. अशा परिस्थितीत तेच मशिन पुन्हा दुरुस्त करुन देण्याचा आदेश न्यायोचित होणार नाही, असे आमचे मत आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा कलम 14 (1) (ब) अन्वये सामनेवाला यांनी तक्रारदारास त्याच मेकचे व तपशिलाचे नविन मशिन द्यावे, हा आदेश देणे न्यायसंगत ठरेल.
15. तक्रारदाराने दि.1/6/2009 पासुन तक्रारीचा निकाल लागेपावेतो दर दिवशी रु.400/- या दराने त्यास नुकसान भरपाई मंजुर करावी, अशी विनंती मंचास केलेली आहे. मात्र त्यास दर दिवशी रु.400/- इतके नुकसान कसे झाले याचा तपशिल त्याने सादर केलेला नाही. शिवाय मशिन दुरुस्तीसाठी देण्यात आल्यानंतर पर्यायी मशिन सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले आहे, हे त्याच्याच पुराव्यातुन समोर आलेले आहे. अशा परिस्थितीत दर दिवशी रु.400/- प्रमाणे नुकसान भरपाई मंजुर करणे अन्यायकारक होईल. त्यामुळे शारिरिक व मानसिक त्रासापोटी व नुकसानीपोटी एकंदरपणे रु.30,000/- देण्याचे आदेश उभय पक्षांना न्याय दिल्यासारखे ठरावेत. तक्रारदाराने तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- याची देखील मागणी केलेली आहे. मात्र प्रस्तुत तक्रार सामनेवाला यांनी आव्हानीत केलेली नाही ही बाब विचारात घेता, तक्रारदारास अर्ज खर्च म्हणुन रु.3,000/- मंजुर करणे न्यायास धरुन होईल. यास्तव मुद्या क्र. 3 च्या निष्कर्षासाठी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
(1) सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास पुर्वी पुरविण्यात आलेल्या मशिनच्या मेकचे नविन मशिन रिप्लेस करुन द्यावे.
(2) सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास शारिरिक व मानसिक त्रासापोटी व नुकसानीपोटी एकंदरपणे रु.30,000/- (अक्षरी रु.तीस हजार मात्र ) अदा करावेत., सदरची रक्कम न दिल्यास त्या रक्कमेवर आदेश दिनांकापासुन वसुल होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
(3) सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास अर्ज खर्चापोटी रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र) अदा करावेत.
(4) निकाल पत्राच्या प्रती उभय पक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
दि. 27/05/2013
जळगांव.
(श्री.सी.एम.येशीराव) (श्री.मिलींद.सा.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.