(पारीत सौ.वृषाली गौ.जागीरदार, मा.सदस्या यांचे व्दारा)
(पारीत दिनांक–20 जुलै, 2019)
01. तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 खाजगी बँके विरुध्द मुदत ठेवीची देय रक्कम न दिल्या बाबत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष एच.डी.एफ.सी.बँक ही एक खाजगी बँक असून गरजू लोकांना व्याजाने कर्ज पुरवठा करते, असे कर्ज देताना विरुध्दपक्ष बँक संबधित ग्राहकांची काही रक्कम मुदतीठेवी मध्ये गुंतविते आणि व्यावर व्याज देते. तक्रारदार कं 1 ते 3 यांची संयुक्त शेती असून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह त्यावर करतात. माहे जून-2017 मध्ये तक्रारदारांना शेतीच्या कामासाठी रकमेची गरज असल्याने त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1) एच.डी.एफ.सी.बँक, शाखा करडी, जिल्हा भंडारा यांचेकडे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला व संबधित कागदपत्र जमा केले. विरुध्दपक्ष क्रं 1) बँकेनी अर्जदारांना कर्ज दिले. सदर कर्ज खाते हे त.क. क्रं 1 श्री नंदकिशोर यांचे नावे असून त्याचा खाते क्रं-50200025023882 असा आहे. सदर कर्ज खात्यामध्ये श्री रामदास आणि श्री खेमराज हे सहखातेदार (Joint Holders) आहेत. विरुध्दपक्ष क्रं 1 बँकेनी दिनांक-03.06.2017 रोजी अर्जदारांना रुपये-3,50,000/- आणि रुपये-4,00,000/- अशा रकमांचे कर्ज त्यांचे खात्यात जमा केले. सदर कर्ज घेते वेळी तत्कालीन शाखा व्यवस्थापक श्री अभिजीत समर्थ यांनी अर्जदारांना वरील कर्जाच्या रकमेतून रुपये-2,00,000/- ची मुदतठेव एक वर्षा करीता काढण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे रुपये-2,00,000/- अर्जदारांचे नावाने एक वर्षासाठी मुदतीठेवी मध्ये गुंतवणूक करण्यात आली व तेवढया रकमेची खात्यामधून कपात केली, या सर्व व्यवहाराच्या नोंदी कर्ज खात्यामध्ये दर्शविलेल्या आहेत. सदर मुदत ठेवी संबधात ठेव पावतीची मागणी केली असता विरुध्दपक्ष क्रं 1 बँकेनी रेकॉर्ड आमचे कडे असल्याने त्याची गरज नाही असे सांगितले. तसेच मुदत ठेव परिपक्व झाल्या नंतर व्याजासह रक्कम मिळेल असेही विरुध्दपक्ष क्रं 1 तर्फे सांगण्यात आले.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, एक वर्षा नंतर जून-2018 मध्ये सदर मदतठेव परिपक्व झाल्यामुळे तक्रारदारांनी त्याची मागणी विरुध्दपक्ष क्रं -1 बँकेत केली तसेच मुदतठेव पावतीची सुध्दा मागणी केली परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अर्जदारांनी त्यांचे वकील श्री डी.आर.निर्वाण यांचे मार्फतीने विरुध्दपक्षांना कायदेशीर नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविली परंतु रजि. नोटीस मिळून सुध्दा विरुध्दपक्षांनी दखल घेतली नाही तसेच मुदतठेवीची परिपक्व रक्कम परत केली नाही. तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष बँकेकडून सेवा घेतलेली असल्याने ते विरुध्दपक्षांचे ग्राहक ठरतात.अशाप्रकारे विरुध्दपक्ष बँकेनी मुदतठेवीची परिपक्वता तिथी नंतरची देय रक्कम वारंवार मागणी करुनही न दिल्याने तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. म्हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्षांना आदेशित करण्यात यावे की, त्यांनी तक्रारदारांना रुपये-2,00,000/- मुदतठेवीची रककम परिपक्वता तिथी नंतर मिळणा-या देयलाभांसह माहे जून-2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-10 टकके दराने व्याजासह तक्रारदारांना द्दावेत.
(02) तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- एवढी रक्कम विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
(03) विरुध्दपक्षांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- देण्याचे आदेशित व्हावे.
(04) या शिवाय योग्य ती दाद तक्रारदारांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 अनुक्रमे एच.डी.एफ.सी.बँक शाखा करडी, जिल्हा भंडारा आणि एच.डी.एफ.सी.बँक मुंबई यांना ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता रजि.नोटीस तामील झाल्या बद्दल रजिस्टर पोस्टाच्या पोच अनुक्रमे पान क्रं-20 व 21 आणि पान क्रं-22 व 23 वर दाखल आहेत परंतु रजिस्टर पोस्टाची नोटीस प्राप्त होऊन विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 हे ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी लेखी निवेदन सुध्दा दाखल केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाव्दारे प्रकरणात दिनांक-26/02/2019 रोजी पारीत करण्यात आला.
04. तक्रारदारांनी पान क्रं 11 वरील यादी नुसार अक्रं 1 ते 07 प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने तक्रारदार क्रं 1 ते 3 यांचे विरुध्दपक्ष बँके मध्ये असलेल्या कर्ज खात्याचा उतारा, परिपक्व मुदत ठेवीची रक्कम परत मिळण्या बाबत तक्रारकर्ता क्रं 1 याने विरुध्दपक्ष क्रं 1 बँकेला दिलेले पत्र, तक्रारकर्ता क्रं 1 याने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 बँकेला रजिस्टर पोस्टाने पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, रजि.पोस्टाच्या पावत्या, विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना रजि.नोटीस मिळाल्या बाबत पोस्टाचा ट्रॅक रिपोर्ट अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्ता क्रं 1 याने पान क्रं 24 ते 27 वर स्वतःचे शपथपत्र दाखल केले तसेच पान क्रं 28 व 29 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
05 तक्रारदारां तर्फे वकील श्री डी.आर.निर्वाण यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचे विरुध्द यापूर्वीच एकतर्फी आदेश पारीत झालेला असून मौखीक युक्तीवादाचे वेळी विरुध्दपक्षां तर्फे कोणीही उपस्थित नव्हते.
06. तक्रारदारांची तक्रार, तक्रारकर्ता क्रं 1 याचे शपथपत्र तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. तिन्ही तक्रारदारांनी एकत्रितरित्या तक्रार विरुध्दपक्ष एच.डी.एफ.सी.बँके विरुध्द मुदतठेवीची रक्कम रुपये-2,00,000/- परिपक्वता तिथी नंतर देयलाभांसह व व्याजासह मिळण्या बाबत दाखल केलेली आहे.
08. तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे त.क.क्रमांक-1) श्री नंदकिशोर रामदास गोबाडे आणि त.क.क्रं 3) श्री खेमराज रामदास गोबाडे हे सख्खे भाऊ असून त.क.क्रं 2) श्री रामदास आत्माराम गोबाडे हे त्यांचे वडील आहेत. तिन्ही तक्रारदारांनी शेतीसाठी विरुध्दपक्ष क्रं 1) एच.डी.एफ.सी.बँक शाखा करडी, जिल्हा भंडारा येथून कर्ज घेतले होते.
09. सदर कर्ज खाते हे त.क. क्रं 1 श्री नंदकिशोर गोबाडे यांचे नावे असून त्याचा खाते क्रं-50200025023862 असा आहे. सदर कर्ज खात्यामध्ये श्री रामदास गोबाडे आणि श्री खेमराज गोबाडे हे सहखातेदार (Joint Holders) आहेत.
10. विरुध्दपक्ष क्रं 1 बँकेनी दिनांक-03.06.2017 रोजी अर्जदार क्रं 1 श्री नंदकिशोर गोबाडे याचे नावाने रुपये-3,50,000/- आणि रुपये-4,00,000/- अशा रकमांचे कर्ज सदर कर्ज खात्यात जमा केले. सदर कर्ज घेते वेळी तत्कालीन शाखा व्यवस्थापक श्री अभिजीत समर्थ यांनी अर्जदारांना वरील कर्जाच्या रकमेतून रुपये-2,00,000/- ची मुदतठेव एक वर्षा करीता काढण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे रुपये-2,00,000/- अर्जदारांचे नावाने एक वर्षासाठी मुदतीठेवी मध्ये गुंतवणूक करण्यात आली व तेवढया रकमेची खात्यामधून कपात केली, या सर्व व्यवहाराच्या नोंदी कर्ज खात्यामध्ये दर्शविलेल्या आहेत. सदर मुदत ठेवी संबधात ठेव पावतीची मागणी केली असता विरुध्दपक्ष क्रं 1 बँकेनी रेकॉर्ड आमचे कडे असल्याने त्याची गरज नाही असे सांगितले. तसेच मुदत ठेव परिपक्व झाल्या नंतर व्याजासह रक्कम मिळेल असेही विरुध्दपक्ष क्रं 1 तर्फे सांगण्यात आले होते परंतु त्यांना परिपक्वता तिथी उलटून गेल्या नंतरही व रजि.पोस्टाने पाठविलेली कायदेशीर नोटीस मिळूनही मुदतठेवीची रक्कम परिपक्वता तिथी नंतर देय व्याजासह प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल करे पर्यंत मिळालेली नाही.
11. विरुध्दपक्ष क्रं 1) व क्रं 2) एच.डी.एफ.सी.बँकेला ग्राहक मंचाचे मार्फतीने पाठविलेल्या रजिस्टर नोटीसेस मिळूनही ते ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत व त्यांनी कोणतेही लेखी निवेदन सुध्दा सादर नसून तक्रारदारांनी त्यांचे विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. अशापरिस्थितीत तक्रारीमध्ये दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन गुणवत्तेच्या आधारे (On Merits) ही तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
12. तिन्ही तक्रारदारांनी दस्तऐवजाच्या प्रती तक्रारी सोबत दाखल केल्यात. पान क्रं 12 वर विरुध्दपक्ष क्रं 1 बँके तर्फे निर्गमित तक्रादारांच्या कर्ज खात्याचे उता-याची प्रत दाखल आहे, त्यामध्ये सदर कर्ज खाते हे त.क. क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे यांचे नावे असून त्याचा खाते क्रं-50200025023862 असा आहे. सदर कर्ज खात्यामध्ये श्री रामदास आत्माराम गोबाडे ( त.क.क्रं 1 चे वडील) आणि श्री खेमराज रामदास गोबाडे (त.क. क्रं 1 चे भाऊ) हे सहखातेदार (Joint Holders) आहेत. सदर कर्ज खात्या मध्ये दिनांक-03.06.2017 रोजी त.क.क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे याचे नावाने कर्जाच्या रकमा अनुक्रमे रुपये-3,50,000/- आणि रुपये-4,00,000/- जमा केल्याचे दिसून येते. तसेच सदर कर्ज खात्यामध्ये दिनांक-06.06.2017 रोजी रुपये-2,00,000/- एवढया रकमेची उचल करुन ती मुदतठेवी मध्ये गुंतवल्याची नोंद दिसून येते.
13. पान क्रं 13 वर त.क.क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे याने विरुध्दपक्ष क्रं 1 एचडीएफसी बँक शाखा करडी येथील शाखा व्यवस्थापकांना रुपये-2,00,000/- मुदतठेवीचे पावतीची मागणी करण्यासाठी दिनांक-23 मे, 2018 रोजी अर्ज केल्याचे व तो अर्ज त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्रं 1 ला मिळाल्या बाबत सही व शिक्का पोच म्हणून अर्जावर नमुद आहे.
14. पान क्रं 14 व 15 वर तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे याने त्याचे वकील श्री डी.आर.निर्वाण यांचे मार्फतीने दोन्ही विरुध्दपक्षांना रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या दिनांक-18.08.2018 रोजीच्या नोटीसची प्रत अभिलेखावर दाखल आहे, सदर नोटीस त्याच दिवशी म्हणजे दिनांक-18.08.2018 रोजी दोन्ही विरुध्दपक्षांना रजि.पोस्टाने पाठविल्या बाबत रजि. पोस्टाच्या पावत्या पान क्रं 15 वर दाखल आहेत तसेच दोन्ही विरुध्दपक्षांना रजि.नोटीस मिळाल्या बाबत पोस्टाचा ट्रॅक रिपोर्ट अनुक्रमे पान क्रं 17 व 16 वर दाखल आहे. तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर गोबाडे याने स्वतःचे शपथपत्र पान क्रं 24 ते 27 वर पुराव्यार्थ दाखल केलेले आहे. तसेच तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद पान क्रं 28 व 29 वर दाखल आहे.
15. तक्रारकर्ता क्रं 1) श्री नंदकिशोर रामदास गोबाडे याचे नावाचे विरुध्दपक्ष बँके तर्फे निर्गमित कर्ज खात्याची प्रत अभिलेखावर दाखल केली. सदर कर्ज खात्याचा क्रं-82633492 असून कर्ज खात्याचा कालावधी हा दिनांक-15.02.2017 ते 01.07.2019 असा नमुद आहे. सदर कर्ज खात्यानुसार एकूण कर्जाची रक्कम रुपये-3,25,000/- दिल्याचे नमुद केलेले आहे आणि त्याचा त्रैमासिक हप्ता (Quarterly EMI’s) रुपये-22,867/- असा दर्शविलेला आहे. सदर कर्जाचे परतफेडीचा कालावधी हा 05 वर्षा करीता दर्शविलेला आहे. सदर कर्ज खात्याचे कालावधी करीता मूळ कर्जाची रक्कम रुपये-1,04,026.49 पैसे भरली असल्याचे नमुद असून व्याजाची रक्कम रुपये-71,705/- भरल्याचे नमुद करुन मूळ कर्ज रक्कम व व्याजाची रक्कम असे मिळून सदर कर्ज कालावधी मध्ये एकूण रुपये-1,75,732.19 पैसे भरल्याचे नमुद आहे आणि मूळ कर्जाची रक्कम आणि व्याज असे मिळून दिनांक-01.07.2019 रोजी रुपये-2,20,973.51 पैसे येणे असल्याचे (Balance Amount) दर्शविलेले असून जुलै-2017 पासून ते एप्रिल-2019 या कालावधी करीता व्याजाचा दर 14 टक्के नमुद केल्याचे सदर कर्ज खात्यावरुन दिसून येते. सदर कर्जाची रक्कम रुपये-3,25,000/- धनादेश क्रं-82633492 अन्वये दिनांक-01/06/2017 रोजी उचलल्याची नोंद कर्ज खात्यात केलेली आहे. सदर कालावधीचे कर्ज खात्यावरुन असेही दिसून येते की, धनादेश दिनांक-04.01.2018, 04.04.2018, 04.07.2018, 04.10.2018, 04.01.2019, 04.04.2019 पोटी दिलेल्या त्रैमासिक हप्त्याच्या रकमांचे धनादेश (प्रती त्रैमासिक हप्ता रुपये-22,867/- प्रमाणे) अपर्याप्त निधीचे कारणावरुन (INSUFFICIENT FUNDS) बाऊन्स झाल्याचे नमुद केलेले आहे, त्यापैकी दिनांक- 04.07.2017 आणि 04.10.2017 रोजीच्या धनादेशाव्दारे दिलेल्या त्रैमासिक हप्त्याच्या रकमा क्लियर झाल्याचे नमुद केलेले आहे. सदर कर्ज खात्यामध्ये ओव्हरडयू अमाऊंट ईएमआय इन्टरेस्ट रुपये-12,993/- नमुद केलेली आहे.
16. तक्रारकर्ता क्रं 1) श्री नंदकिशोर रामदास गोबाडे याचे नावाचे विरुध्दपक्ष बँके तर्फे निर्गमित कर्ज खात्याची प्रत अभिलेखावर दाखल केली. सदर कर्ज खात्याचा क्रं-82453873 असा असून कर्ज खात्याचा कालावधी हा दिनांक-15.02.2017 ते 01.07.2019 असा नमुद आहे. सदर कर्ज खात्यानुसार एकूण कर्जाची रक्कम रुपये-2,90,000/- दिल्याचे नमुद केलेले आहे आणि तयाचा अर्धवार्षिक हप्ता (Half Yearly EMI’s) रुपये-41,289/- असा दर्शविलेला आहे. सदर कर्जाचे परतफेडीचा कालावधी हा 05 वर्षा करीता दर्शविलेला आहे. सदर कर्ज खात्याचे कालावधी करीता मूळ कर्जाची रक्कम रुपये-93,192.84 पैसे भरली असल्याचे नमुद असून व्याजाची रक्कम रुपये-68,918.27 पैसे भरल्याचे नमुद करुन मूळ कर्ज रक्कम व व्याजाची रक्कम असे मिळून सदर कर्ज कालावधी मध्ये एकूण रुपये-1,62,111.11 पैसे भरल्याचे नमुद आहे आणि मूळ कर्जाची रक्कम आणि व्याज असे मिळून दिनांक-01.07.2019 रोजी रुपये-1,96,807.18 पैसे येणे असल्याचे (Balance Amount) दर्शविलेले असून नोव्हेंबर 2017 पासून ते मे-2019 या कालावधी करीता व्याजाचा दर 14 टक्के नमुद केल्याचे सदर कर्ज खात्यावरुन दिसून येते. सदर कर्जाची रक्कम रुपये-3,90,000/- धनादेश क्रं-82453873 अन्वये दिनांक-01/06/2017 रोजी उचलल्याची नोंद कर्ज खात्यात केलेली आहे. सदर कालावधीचे कर्ज खात्यावरुन असेही दिसून येते की, धनादेश दिनांक-04.05.2018, 04.11.2018, 04.05.2019 पोटी दिलेल्या अर्ध वार्षिक हप्त्याच्या रकमांचे धनादेश (प्रती अर्धवार्षिक हप्ता रुपये-41,289/- प्रमाणे) अपर्याप्त निधीचे कारणावरुन (INSUFFICIENT FUNDS) बाऊन्स झाल्याचे नमुद केलेले आहे, त्यापैकी 04.11.2017 रोजीच्या अर्धवार्षिक हप्त्याची रक्कम रुपये-41,289/- क्लियर झाल्याचे नमुद केलेले आहे. सदर कर्ज खात्यामध्ये ओव्हरडयू अमाऊंट ईएमआय इन्टरेस्ट रुपये-14,866/- नमुद केलेली आहे.
17. सदर कर्ज खात्याचे उता-या वरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी नियमितपणे कर्ज हप्त्यांच्या रकमा भरलेल्या नाहीत त्यामुळे व्याजापोटी प्रलंबित रकमा कर्ज खात्यात दर्शविलेल्या आहेत. दुसरी बाब अशी आहे की, तक्रारदारांनी जे कर्ज विरुध्दपक्ष क्रं 1 एचडीएफसी बँकेच्या शाखेतून उचललेले आहे, त्या संबधात उभय पक्षां मध्ये काय कर्ज करार झाला होता हे दस्तऐवज तक्रारदारांनी दाखल केलेले नाहीत.
18. तक्रारदारांच्या म्हणण्या प्रमाणे त्यांना विरुध्दपक्ष बँकेनी दिनांक-03.06.2017 रोजी अनुक्रमे रुपये-3,50,000/- आणि रुपये-4,00,000/- असे मिळून एकूण रुपये-7,50,000/- एवढया रकमेचे कर्ज त्यांचे खात्यात जमा केले परंतु त्यापैकी विरुध्दपक्ष बँकेनी रुपये-2,00,000/- मुदतीठेवी मध्ये गुंतवले असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
19. तक्रारकर्ता क्रं 1 याचे दाखल पान क्रं 12 वरील खाते उता-यावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्ष एचडीएफसी बँकेनी रुपये-2,00,000/- एवढया रकमेची एफ.डी. केल्याची खाते उता-यात नोंद आहे परंतु त्यांनी रुपये-2,00,000/- मुदतीठेवीची पावती तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर गोबाडे याला दिलेली नाही असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
20. या ठिकाणी आणखी एक नमुद करावेसे वाटते की, तक्रारदारांनी तक्रारीतील पान क्रं 32 व 33 वर जे तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे यांचे नावे असलेले खाते उतारे दाखल केलेले आहेत, त्यामध्ये अनुक्रमे रुपये-3,25,000/- आणि रुपये-2,90,000/- अशा रकमा (एकूण रक्कम रुपये-6,15,000/-) मंजूर करुन सदर रकमा तक्रारकर्ता क्रं 1 यांना दिल्याची नोंद आहे. तर तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे तसेच पान क्रं 12 वरील खाते उता-या नुसार तक्रारकर्ता क्रं-1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे यांना अनुक्रमे रुपये-3,50,000/- आणि रुपये-4,00,000/- (एकूण रक्कम रुपये-7,50,000/-) मंजूर केल्याची नोंद आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष बँकेच्या त.क. क्रं 1 श्री नंदकिशोर यांचे पान क्रं 12 वरील खाते उता-या मध्ये तसेच त.क. क्रं 1 श्री नंदकिशोर यांचे पान क्रं 32 व 33 वरील खाते उता-या मध्ये दर्शविलेल्या रकमां मध्ये फरक दिसून येतो. या फरक पडलेल्या बाबीवर विरुध्दपक्ष बँके तर्फे कोणी ग्राहक मंचा समोर उपस्थित होऊन लेखी उत्तर दाखल केले असते तर या मुद्यावर योग्य तो खुलासा झाला असता परंतु असे या प्रकरणात काहीही घडलेले नाही.
21. तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर गोबाडे याने विरुध्दपक्ष क्रं 1 यांना दिनांक-23 मे 2018 रोजीचे पत्रान्वये सदर मुदतीठेव पावतीची मागणी केल्याचे दिसून येते व ते पत्र विरुध्दपक्ष क्रं 1 यांना मिळाल्याचे सही व शिक्क्या वरील पोच वरुन दिसून येते. त्याच बरोबर तक्रारकर्ता क्रं 1 याने दोन्ही विरुध्दपक्षांना दिनांक-18 ऑगस्ट,2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली व ती नोटीस दोन्ही विरुध्दपक्षांना मिळाल्याची बाब पोस्ट ट्रॅक रिपोर्ट वरुन सिध्द होते परंतु विरुध्दपक्षांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही वा मुदतठेवीच्या रकमे बाबत ही तक्रार ग्राहक मंचा मध्ये दाखल करे पर्यंत तक्रारदारांना काहीही कळविले नाही वा कोणताही खुलासा केलेला नाही. विरुध्दपक्ष बँकेनी पान क्रं 12 वरील खाते उता-या प्रमाणे तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर गोबाडे याचे कर्ज खात्यात दिनांक-05.06.2017 रोजी रुपये-2,00,000/- मुदतीठेवी मध्ये गुंतविल्याची नोंद केलेली दिसून येते परंतु प्रत्यक्षात रुपये-2,00,000/- एवढी रक्कम मुदत ठेवी मध्ये गुंतविल्या बाबत मुदत ठेवीची पावती तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर गोबाडे याला दिलेली नाही असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. विरुध्दपक्ष बँकेच्या अनुपस्थितीमुळे आणि योग्य खुलाश्या अभावी सदर मुदतठेवीची रक्कम प्रत्यक्षात तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे याचे नावे गुंतविली किंवा कसे या बद्यल सांशकता निर्माण होते, अन्यथा विरुध्दपक्ष बँकेनी तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे याचे नावे मुदत ठेव पावती न देण्याचे कोणतेही प्रयोजन ग्राहक मंचास दिसून येत नाही.
22. दोन्ही विरुध्दपक्ष बँकेला ग्राहक मंचाची रजि.नोटीस तामील होऊनही ते ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झालेले नाहीत वा त्यांनी आपले कोणतेही लेखी निवेदन सादर केलेले नाही. विरुध्दपक्षांनी ग्राहक मंचा समक्ष उपस्थित होऊन तक्रारदारांनी त्यांचे विरुध्द केलेल्या आरोपांवर कोणताही प्रकाश टाकलेला नाही तसेच तक्रारकर्ता क्रं 1 याचे खाते उता-यात दिनांक-05.06.2017 रोजी एफ.डी.म्हणून दर्शविलेल्या रुपये-2,00,000/- एवढया रकमे बाबत कोणताही खुलासा ग्राहक मंचा समक्ष उपस्थित होऊन केलेला नाही, तसेच विरुध्दपक्ष बँके तर्फे वर नमुद केल्या प्रमाणे तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे यांचे नावे एकूण-03 निर्गमित खाते उता-या मध्ये दर्शविलेल्या कर्जाच्या रकमां मध्ये फरक दिसून येतो, या बाबत सुध्दा विरुध्दपक्ष बँकेच्या ग्राहक मंचा समोरील अनुपस्थितीमुळे योग्य तो खुलासा झालेला नाही त्यामुळे प्रत्यक्ष वस्तुस्थिती मंचा समोर आलेली नाही. विरुध्दपक्ष बँकेचा एकंदरीत व्यवहार पाहता ही त्यांनी तक्रारदारांना दिलेली दोषपूर्ण सेवा आहे. विरुध्दपक्ष बँके तर्फे निर्गमित पान क्रं 12 वर दाखल असलेल्या तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर गोबाडे याचे खाते उता-यातील नोंदी प्रमाणे तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे याचे नावाने मुदत ठेव पावती देणे क्रमप्राप्त होते. परंतु अशी मुदतठेवीची पावती तक्रारकर्ता क्रं 1 याचे नावे दिलेली नाही असे तक्रारदारांचे म्हणणे आहे, त्यामुळे तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे याने विरुध्दपक्ष बँके मध्ये रुपये-2,00,000/- मुदतठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर दिनांक-05.06.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. तसेच विरुध्दपक्ष बँकेच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. त्याच बरोबर येथे असेही नमुद करणे आवश्यक वाटते की, तक्रारदारांनी त्यांच्यात आणि विरुध्दपक्ष बँकेत झालेल्या कर्ज करारा प्रमाणे कर्ज परतफेडीच्या रकमा नियमितपणे परतफेड कराव्यात
23. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: आदेश ::
- तक्रारदार क्रं 1 ते 3 यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 बँकेला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता क्रं 1 श्री नंदकिशोर रामदास गोबाडे यास त्याचे कर्ज खात्यात मुदतठेव (F.D.) म्हणून दर्शविलेली रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) परत करावी आणि सदर रकमेवर मुदतठेव दिनांक-05.06.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याज सदर निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत द्दावे. विहित मुदतीत सदर मुदतठेवीची रक्कम तक्रारकर्ता क्रं 1 याला न दिल्यास सदर मुदतठेवीची रक्कम रुपये-2,00,000/- दिनांक-05.06.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दरा ऐवजी, द.सा.द.शे.12% दराने दंडनीय व्याजासह देण्यास दोन्ही विरुध्दपक्ष जबाबदार राहतील.
- विरुध्दपक्ष बँकेच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बँकेनी तक्रारदारांना द्दावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बँकेनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- तक्रारदारांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी उभय पक्षां मध्ये झालेल्या कर्ज करारा प्रमाणे कर्ज परतफेडीच्या रकमा नियमितपणे विरुध्दपक्ष बँके मध्ये जमा कराव्यात.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारदारांना “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.