निकाल
पारीत दिनांकः- 30/06/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी दि. 23/6/2011 रोजी जाबदेणार यांच्या दुकानामधून एक हार्मनी 4 डोअर वार्डरोब, एक कॉफी टेबल आणि एक शू कॅबिनेट रक्कम रु. 69,000/- देऊन खरेदी केले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, वरील फर्निचर तक्रारदारांच्या घरी आणले असता कॉफी टेबल आणि शू कॅबिनेट बसविले, परंतु हार्मनी 4 डोअर वार्डरोब आणतानाच तुटलेल्या अवस्थेमध्ये होता, त्याच्या एका बाजूला फळी लावलेली होती व इतर लाकडाच्या रंगापेक्षा तिचा रंग वेगळा होता. सदरचा हार्मनी 4 डोअर वार्डरोब कधीही बसविला (Assemble) नाही. जाबदेणारांचा सुतार दोन वेळा तक्रारदारांच्या घरी आले व तुटलेल्या अवस्थेतील वार्डरोब बसवून देतो असे सांगितले, परंतु तक्रारदारांनी त्यास नकार दिला. तक्रारदारांनी जाबदेणारांना अनेकवेळा फोन केला व प्रत्यक्षात जाबदेणारांच्या दुकानामध्ये जाऊन आले, परंतु त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदारांना वार्डरोबशिवाय रहावे लागले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वार्डरोबची सर्व रक्कम देऊनही त्यांना त्यांचे स्वत:चे घर सोडून वार्डरोब नसल्यामुळे वडीलांच्या घरी रहावे लागत आहे. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून वार्डरोबची किंमत रक्कम रु. 24,180/- द.सा.द.शे. 24% व्याजदराने, फोन कॉल्स आणि जाबदेणारांच्या इतर शाखांना भेटी देण्यासाठी आलेला खर्च रक्कम रु. 500/-, असेम्बल न केलेले वॉर्डरोब त्यांच्या घरामध्ये ठेवल्याबद्दलचे भाडे प्रतिमहिना रु. 200/-, तक्रारीचा खर्च व असेम्बल न केलेले वॉर्डरोब परत घेऊन जावा अशी मागणी करतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी सत्य दडवून ठेवले आहे. तक्रारदारांनी त्यांच्याकडून एक हार्मनी 4 डोअर वार्डरोब, एक कॉफी टेबल आणि एक शू कॅबिनेट या गोष्टी खरेदी केल्या होत्या, हे जाबदेणारांना मान्य आहे, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार या वस्तुंना कुठलेही डॅमेज झालेले नव्हते. जाबदेणारांचे प्रतिनिधी म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस टीम तक्रारदारांच्या घरी त्यांनी खरेदी केलेले फर्निचर असेम्बल करण्याकरीता गेले असता इतर दोन वस्तु त्यांनी असेम्बल केल्या मात्र, वार्डरोब असेम्बल करीत असताना तो तुटलेला आहे याची कल्पना तक्रारदारांना देण्यात आली, सदरचा दोष हा वॉरंटी कालावधीमध्ये दुरुस्त करता येत नसल्याचे, तरीही हा दोष तक्रारदारांना विनामुल्य दुरुस्त करुन देण्यात येईल असेही जाबदेणारांच्या आफ्टर सेल सर्व्हिस टीमने तक्रारदारास सांगितले. अद्यापही वार्डरोब असेम्बल केला नाही, हे जाबदेणारांना मान्य नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार,त्यांच्या प्रॉडक्ट डिलिव्हरी पॉलिसीनुसार सुतार दोन वेळा पूर्वसूचना देऊन तक्रारदारांच्या घरी गेला होता, परंतु तक्रारदारांनी वार्डरोब असेम्बल करण्यास नकार दिला. जाबदेणार हे ग्राहकाशी संवाद साधणारे आहेत, म्हणून त्यांनी तक्रारदारास त्याच किंमतीचे दुसरे फर्निचर खरेदी करण्याची ऑफर दिली. तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणारांडून पैसे उकळण्यासाठी दाखल केलेली आहे, म्हणून ती खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दि. 23/6/2011 रोजी जाबदेणार यांच्या दुकानामधून एक हार्मनी 4 डोअर वार्डरोब, एक कॉफी टेबल आणि एक शू कॅबिनेट रक्कम रु. 69,000/- देऊन खरेदी केले. त्यापैकी दोन वस्तु म्हणजे कॉफी टेबल आणि एक शू कॅबिनेट व्यवस्थित असेम्बल केले गेले, परंतु हार्मनी 4 डोअर वार्डरोब आणला तेव्हाच त्याच्या एका बाजूची पट्टी निघाली होती व ते खूप जुने आणि वेगळ्या रंगाचे होते, हे दिसून आले. त्यानंतर जाबदेणार यांचे सुतार त्यांच्या घरी आले, परंतु तेच जुने तुटलेले वार्डरोब असेम्बल करु लागले, त्यास तक्रारदारांनी नकार दिला. त्यासाठी तक्रारदारांनी अनेकवेळा ई-मेल केले, प्रत्यक्षात ते व त्यांची पत्नी जाबदेणारांच्या दुकानामध्ये जाऊन आले, तरीही जाबदेणारांनी जुने तुटलेले वार्डरोब बदलून दिले नाही.
जाबदेणार हे मान्य करतात की, ते रिफंड किंवा रिप्लेस करण्यास तयार होते व आहेत. त्यासाठी ते अनेकवेळा तक्रारदारांकडे गेले होते, परंतु तक्रारदार घरी नव्हते, हे जाबदेणारांचे म्हणणे मंचास पटत नाही. बदलून द्यायच्या दिवशी त्यांनी तक्रारदारास फोन करुन, त्यांची घरी राहण्याची वेळ विचारुन घरी जावयास पाहिजे होते. नवीन वार्डरोबची संपूर्ण रक्कम घेऊनही ते तक्रार दाखल करेपर्यंत बदलून न देणे, ही जाबदेणारांची सेवेतील त्रुटी आढळून येते. तसेच, नवीन फर्निचर म्हणून रंग वेगळे असलेले, तुटलेल्या स्थितीतील वार्डरोब जाबदेणारांनी तक्रारदारास विक्री केले, यावरुन त्यांनी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. म्हणून मंच जाबदेणारांना असा आदेश देते की, त्यांनी वार्डरोबची किंमत रक्कम रु. 24,180/- तक्रारदारास द.सा.द.शे. 9% व्याजदराने द्यावेत व त्यानंतर तक्रारदारांनी लेगेचच सदोष वार्डरोब परत घेऊन जावा.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारांना हार्मनी 4 डोअर वार्डरोबची
किंमत रक्कम रु. 24,180/- (रु. चोवीस हजार एकशे
ऐंशी फक्त) द.सा.द.शे. 9% व्याजदराने दि. 23/6/2011
पासून ते रक्कम अदा करेपर्यंत व रक्कम रु. 1,000/-
(एक हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी या आदेशाची
प्रत मिळाल्या पासून चार आठवड्यांच्या आंत द्यावी
व त्यानंतर तक्रारदारांनी लगेचच सदोष वार्डरोब
जाबदेणारांना परत करावा.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.