(मंचाचा निर्णय: श्री. रामलाल सोमाणी- अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 14/09/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 15.01.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने दि.22.08.2009 रोजी हॉरीजन ट्रेडिेंग कंपनीमधुन डेल कंपनीचा लॅपटॉप रु.37,550/- ला विकत घेतला असता दुस-या दिवशी सदर लॅपटॉपमध्ये डॉट असल्याचे निदर्शनास आले. तक्रारकर्ता लॅपटॉप घेऊन हॉरीजन ट्रडिंगचे मालक श्री.संजय चव्हाण यांना भेटून सल.सी.डी. बदलवुन देण्याची विनंती केली तसेच दि.06.10.2009 ला डेल टेक्नीकल सपोर्टिंगला मेल व्दारे लॅपटॉपच्या एल.सी.डी.मध्ये डॉट आहे व तो वाढत असल्याबद्दल कळविले परंतु कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही व लॅपटॉपची तपासनी केली नाही. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, तो दि.17.11.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 ला लिखीत तक्रार दाखल केली परंतु गैरअर्जदारांकडून कुठलीही कारवाई न केल्यामुळे व सेवेत त्रुटी दिल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केलेली आहे. प्रस्तुत तक्रारीव्दारा तक्रारकर्त्याने सदर लॅपटॉप / एल.सी.डी. बदलवुन द्यावा किंवा रु.30,000/- परत करण्याची मागणी केलेली आहे. तसेच गैरअर्जदारांव्दारे फसवणुक व सेवेतील त्रुटी मुळे त्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.40,000/- ची व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.20,000/- ची मंचासमक्षमागणी केलेली आहे. 3. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावंर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. 4. गैरअर्जदार क्र.1 ने आपल्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याने लॅपटॉप खरेदी केल्याची बाब मान्य केली आहे. तसेच तक्रारकर्त्याने त्यांचेकडे लेखी तक्रार केली असता त्याला गैरअर्जदार क्र.2 कडे संपर्क करावयास सांगितल्याचे नमुद केले आहे. गैरअर्जदार क्र.1 ने नमुद केले आहे की, ते फक्त विक्रेते असुन तक्रारकर्त्या सोबत त्यांचा कुठलाही करार झालेला नसुन तक्रारकर्त्याची त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 5. गैरअर्जदार क्र.2 ने आपल्या लेखी जबाबातीत प्रार्थमिक आक्षेपात प्रस्तुत तक्रार त्रास देण्याचे उद्देशानी व चुकीचे वर्णन करुन दाखल केलेली आहे, त्यामुळे ती खारिज करण्यांत यावी, असे नमुद केले आहे. गैरअर्जदार क्र.2 ने आपल्या परिच्छेद निहाय जबाबात तक्रारकर्त्याला अनेकदा दुरध्वनी व ई-मेलव्दारा एल.सी.डी.चे फोटो पाठविण्या बाबत कळविले होते. परंतु तक्रारकर्त्यानी एल.सी.डी. चे फोटो उशिरा दि.12.11.2009 ला मिळाल्यामुळे त्याचे तक्रारीला प्रतिसाद देण्यास वेळ झाल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने पाठविलेल्या फोटोचे निरीक्षण करता त्यामध्ये कुठलेही पिक्सेल दिसत नव्हते व औद्योगिक प्रमाणा प्रमाणे एल.सी.डी. वर 5-6 पिक्सेल (डॉट) बदलवुन देण्याकरीता सापेक्ष नाही. तसेच प्रस्तुत तक्रार त्रास देण्याचे उद्देशाने व ज्या औद्योगित प्रमाणांखाली उपकरण निर्माण करते त्याच्या अपूर्ण माहितीवर आधारीत असुन ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 26 अंतर्गत ती खारिज करण्यांत यावी, अशी गैरअर्जदार क्र.2 ने मंचास विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र.2 ने पुढे नमुद केले आहे की, तो प्रस्तुत परिस्थीतीखाली अपवाद म्हणून व ग्राहकाला पुरेपूर सेवा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून एल.सी.डी. बदलवुन देण्यास तयार असल्याचे नमुद केले आहे. 6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि. रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर.उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. प्रकरणात तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला सदर लॅपटॉपमध्ये दोष असल्याबद्दल कळविले आहे व त्यासंबंधीत दस्तावेज प्रकरणात दाखल आहेत. उभय पक्षांमध्ये लॅपटॉप खरेदी केल्याबद्दल व आलेल्या दोषांबद्दल कोणताही वाद नाही. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे वेळोवेळी केलेल्या लॅपटॉपच्या तक्रारीबद्दल गैरअर्जदारांनी वाद प्रस्तुत केला नाही. गैरअर्जदार क्र.1 ने युक्तिवाद केला की, त्यांचेकडील लॅपटॉपमध्ये विक्री करतांना कोणताही दोष नव्हता. नोटीस मिळाल्यावर गैरअर्जदार क्र.1 ने सदर बाब गैरअर्जदार क्र.2 ला कळविलेली आहे. 8. गैरअर्जदार क्र.2 ने नमुद केले आहे की, त्याने तक्रारकर्त्याचा त्रास कमी करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. सदर लॅपटॉपमध्ये दोष हा निर्मीती दोष होता हे तक्रारकर्त्याने सिध्द केलेले नाही. आणि तक्रारकर्त्याच्या चुकीमुळे लॅपटॉपमध्ये दोष निर्माण झाला आहे, त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 ने तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही आणि भिस्त असलेला निवाडा I 1994 CPJ-200 (NC) DCM Data Products –v/s- Hanumanprasad Poddar Cancer Hospital, Gorakhpur, III (1995) CPJ 82 (NC) National Insurance Co. –v/s- Thiruvalluvar Silk cotton Industries. वर भिस्त ठेवत युक्तिवाद केला की, तक्रारकर्ता दोषी आहे. परंतु उपरोक्त निवाडे प्रकरणाला लागू होत नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. कारण सदर निवाडयांतील मुद्दे प्रस्तुत वादाशी भिन्न आहेत. 9. तक्रारकर्त्यातर्फे प्रतिनिधी त्याचे वडील व गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील व प्रतिनिधी हजर. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचा लॅपटॉप दुरुस्त करुन देण्याचे तसेच बदलवुन देण्याचे मान्य केले. वरुन तक्रारकर्त्याने प्रयत्न केले असता गैरअर्जदारांनी अशी कोणतीही कारवाई केलेली नाही. 10. गैरअर्जदारांनी दोषरहीत लॅपटॉप देण्याचे मान्य केले आहे, परंतु प्रस्तुत वाद हा मंचात आल्यानंतरच निकाली होत आहे. म्हणून मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला बिघाड असलेले लॅपटॉप देऊन व सुचना मिळाल्यावरुनही त्यातील दोष दुरुस्ती करुन न देऊन दोषपूर्ण सेवा दिली आहे. आणि यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला व त्याला लॅपटॉप वापरता आला नाही, व तक्रारीपोटी खर्च करावा लागला. म्हणून गैरअर्जदारां विरुध्द तक्रार मंजूर करणे कायदेशिर व न्यायोचित राहील असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण लॅपटॉप पुरवुन सेवेत त्रुटी केलेली आहे. 3. गैरअर्जदार क्र.2 ने तक्रारकर्त्याला वादीत जुन्या लॅपटॉप ऐवजी त्याच वर्णणांचा व तेच वैशिष्टय असलेला नवीन लॅपटॉप बदलवुन द्यावा. 4. अथवा तक्रारकर्त्याला सदर लॅपटॉपची संपूर्ण किंमत रु.37,550/- तक्रार दाखल दिनांकापासुन संपूर्ण रक्कम चुकती होईपर्यंत द.सा.द.शे.9% व्याजासह परत करावी. 5. गैरअर्जदार क्र.2 ने तक्रारकर्त्याला सेवेतील त्रुटीबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- देय करावे. 6. दोन्ही गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला प्रत्येकी रु.500/- देय करावे. 7. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा पुढील कालावधी करीता संपूर्ण रकमेवर व्याज द.सा.द.शे.9% ऐवजी 12% देय राहील. 8. तक्रारकर्त्याने मा. सदस्यांकरीता दाखल केलेल्या (ब,क) प्रति 1 महिन्याच्या आंत घेऊन जाव्यात. अन्यथा 20(5) Consumer Protection Regulation 2005 अन्वये नष्ट करण्यांत येईल.
| [HONABLE MR. MILIND KADAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |