निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः-
सामनेवाले यांनी तक्रारदारच्या कारची दुरुस्ती सांगितलेल्या वेळेत केली नाही व ट्रायलच्या वेळी गाडीला जास्तीचे नुकसान पोहचविले, म्हणून त्यांनी त्या कार ऐवजी नविन कार द्यावी किंवा त्या जुन्या कारची त्यावेळेची किंमत रु.5,50,000/- द्यावी तसेच मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व या तक्रारीचा खर्च रु.25,000/- द्यावा, यासाठी सदरची तक्रार केली आहे.
2 तक्रारदार-कंपनीचा इमारत बांधकामाचा व्यवसाय आहे. सन-2002 मध्ये सिल्व्हासा येथे त्यांचा बांधकामाचा व्यवसाय चालू होता व तेथेच त्यांचे स्थानिक ऑफीस होते. तक्रारदार कंपनीने तिच्या मॅनेजींग डायरेक्टरच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या व वैयक्तिक वापरासाठी सामनेवाले क्र.1 यांनी तयार केलेली होंडा सिटीकार सामनेवाले क्र.3, जे सामनेवाले क्र.1 चे अधिकृत विक्रेते आहेत, त्यांचेकडून दि.30.01.2002 रोजी रु.6,80,518/- ला विकत घेतली होती. सदरची कार कंपनीच्या सिल्व्हासा येथील पत्त्यावर विकत घेतली होती. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 चे अधिकृत गॅरेज आहे. तक्रारदाराने सदर कारचा विमा काढून घेतलेला होता. दि.26.07.2005 रोजी मुंबईत झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे तक्रारदाराची कार पाण्यात बुडाली व तिचे खूप नुकसान झाले.
3 दि.31.07.2005 रोजी तक्रारदार-कंपनीचे प्रतिनिधी सामनेवाले क्र.2 कडे गेले व गाडीची दुरुस्ती करण्याबद्दल विनंती केली. त्यांनी सांगितले की, पावसाच्या पुरामुळे ब-याच गाडयांचे नुकसान झालेले असल्यामुळे त्यांचेकडे दुरुस्तीला खूप गाडयां आलेल्या आहेत. त्यांनी दि.11.08.2005 रोजी गाडी दुरुस्तीला आणण्यास सांगितले, म्हणून दि.11.08.2005 रोजी सदरची कार सामनेवाले क्र.2 कडे दुरुस्तीला नेली. ती बांधून ओढत न्यावी लागली. त्यावेळी सामनेवाले क्र.2 यांचे प्रतिनिधी यांनी आश्वासन दिले की, आवश्यक दुरुस्त्यां लवकरात लवकर करुन दि.07.09.2005 रोजी किंवा त्या अगोदर गाडीचा ताबा दिला जाईल. त्यावेळी सामनेवाले क्र.2 यांनी दुरुस्तीच्या खर्चाचे कोटेशन दिले व ते गाडीच्या विमा कंपनीने मंजूर केले होते. याप्रमाणे दुरुस्तीच्या बिलाच्या पेमेंटबद्दल खात्री असूनही सामनेवाले क्र.2 यांनी कारची दुरुस्ती करण्यास खूप उशिर केला. दि.07.09.2005 पर्यंत काहीही प्रगती नव्हती. म्हणून दि.07.09.2005 ते दि.21.09.2005 पर्यंत कंपनीच्या प्रतिनिधीने पाठपुरावा केला. परंतु काही उपयोग झाला नाही.
4 दि.21.11.2005 रोजी सामनेवाले क्र.2 चे इंजिनियअर यांनी तक्रारदार-कंपनीच्या ऑफीसमध्ये फोनवरुन कळविले की, गाडीत आवश्यक दुरुस्त्यां झालेल्या आहेत व गाडी ट्रायलसाठी तयार आहे. म्हणून कंपनीच्या मॅनेजींग डायरेक्टरने त्यांचे ड्रायव्हर–श्री.अजय शर्मा व काका–श्री.दास यांना कारची ट्रायल देण्यासाठी पाठविले. पण ते जाण्यापूर्वीच सामनेवाले क्र.2 चे इंजिनिअरने कारची ट्रायल घेतली होती व त्यांनी सांगितले की, ट्रायल घेतांना कारचे इंजिन पूर्ण खराब (Damage) झाले व ते दुरुस्ती होण्यापलीकडचे आहे. म्हणून गाडीचे पूर्ण नुकसान (total loss) झाले आहे असे समजण्यात यावे. त्याने असेही सांगितले की, गाडीतील कॉम्प्युटराईज चीप खराब झाल्यामुळे गाडीचे दुरुस्ती पलीकडचे नुकसान झाले आहे व ते ट्रायलच्या वेळी झालेले असल्यामुळे सामनेवाले क्र.1 व 2 एखाद्या जुन्या कारचे इंजीन त्या कारला बसवून तिचा ताबा देतील. म्हणून तक्रारदार कंपनीने सामनेवाले क्र.1 व 2 यांना दि.25.11.2005 ची नोटीस पाठविली व त्याबद्दल कळविले. व त्यांना सांगितले की, अशा परिस्थितीत इंजीन जरी बदलून दिले तरी ते गाडीचा ताबा घेण्यास तयार नाहीत.
5 सामनेवाले क्र.1 यांनी त्या नोटीसीला उत्तर देवून कळविले की, दि.10.10.2000 पासून गाडीची पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत ते दररोज रु.500/- प्रमाणे परंतु, दुरुस्तीच्या खर्चापेक्षा जास्त नाही, एवढी सुट द्यायला तयार आहेत. त्यांनी असे कळविले की, तक्रारदार-कंपनी त्यांची ती जुनी कार देऊन नविन होंडा कार घेत असेल तर ते रु.25,000/- ने नविन गाडीची किंमत कमी करतील. तक्रारदार-कंपनीने तो प्रस्ताव नाकारला. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारीला उत्तर देऊन गाडीचा ताबा लवकर न देण्याबाबत असमाधानकारक व खात्री न पटविणारी अशी कारण दिली.
6 तक्रारदार–कंपनीचा आरोप की, याप्रमाणे सामनेवाले क्र.2 यांच्या सेवेत न्यूनता आहे. तसेच सामनेवाले क्र.1 यांचे ते ज्या गाडयांचे उत्पादन करतात त्या गाडयांचे सुटे भाग अशा अभूतपुर्व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सहजपणे उपलब्ध करुन देणे हे कर्तव्य होते. परंतु या कारचे सुटे भाग उपलब्ध झाले म्हणून ती गाडी निरुपयोगी झाली. सामनेवाले क्र.2 यांच्या प्रतनिधीने गाडीचे सुटे भाग उपलब्ध आहेत किंवा नाहीत याचा विचार करता, दि.05.09.2005 रोजी किंवा त्यापूर्वी गाडी दुरुस्ती होऊन तिचा ताबा दिला जाईल असे खोटे आश्वासन दिले. याप्रमाणे सामनेवाले क्र.2 यांचेही सेवेत न्यूनता आहे. त्यामुळे तक्रारदार ती कार वापरु शकत नाहीत. तक्रारदाराने किंवा इतर ग्राहकाने सामनेवाले क्र.1 यांना त्यांची अशी जुनी गाडी कमी किंमतीला देऊन तिची किंमत व नवीन गाडीची किंमत यातील फरकाची रक्कम देऊन त्यांच्याकडून नविन गाडी घ्यावी. यासाठी सामनेवाले क्र.1 यांनी गाडीचे सुट्टे भाग सहजपणे उपलब्ध नाहीत असे खोटे कारण पुढे केले.
7 तक्रारदार-कंपनीचे म्हणणे की, फेब्रुवारी, 2002 च्या मॉडेलची या कारची त्यावेळी बाजारभावाने किंमत रु.5,50,000/- होती व त्या नविन मॉडेलची किंमत रु.5,25,000/- होती. तक्रारदार त्या किंमतीला त्याची कार देऊन किंमतीतील फरकाची रक्कम अदा करुन नविन गाडी घेण्यास तयार होते. परंतु तो प्रस्ताव सामनेवाले यांनी नाकारला. तक्रारदाराची मागणी की, सामनेवाले क्र.1 यांनी त्याला नविन होंडा सीटी कार किंवा सामनेवाले यांनी त्याच्या गाडीची किंमत रु.5,50,000/- द्यावी. तसेच त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास झाल्याबद्दल रु.1,00,000/- नुकसानभरपाई तसेच या तक्रारीचा खर्च रु.25,000/- द्यावा.
8 सामनेवाले क्र.1 यांनी कैफियत देऊन तक्रारदार –कंपनीचे सर्व आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, तक्रारदार-कंपनीचा सिल्व्हासा येथे इमारती बांधकामाचा व्यवसाय आहे व तेथेच त्यांचे स्थानिक ऑफीस होते. सिल्व्हासा येथे त्या व्यवसायासाठी वापरण्यासाठी सदरची कार त्यांनी घेतलेली होती. त्यामुळे तक्रारदार-कंपनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 खाली “ग्राहक” या संज्ञेत येत नाही. कंपनीच्या मॅनेजींग डायरेक्टरच्या वैयक्तिक वापरासाठी ही कार घेतली होती हे खोटे आहे. तक्रारदार-कंपनी ग्राहक नसल्यामुळे सदरची तक्रार या मंचात चालू शकत नाही.
9 या सामनेवाले यांचे म्हणणे की, सामनेवाले या मंचाच्या कार्यक्षेत्रात राहत नाहीत किंवा व्यवसाय करीत नाहीत. तक्रारदार-कंपनीने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम-11(2)(बी) नुसार सदरची तक्रार दाखल करण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे सदरची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
10 सामनेवाले यांनी हे नाकारले आहे की, सामनेवाले क्र.2 हे त्यांचे अधिकृत गॅरेज आहे. त्यांचे म्हणणे की, त्याचे व सामनेवाले क्र.2 यांच्यातील संबंध Principal to Principal Basis वर आहे. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदाराची कार व्यवस्थित दुरुस्त करुन दि.17.01.2006 रोजी ताबा देण्याजोगी होती. मुंबईतील जुलै, 2005 च्या अभूतपूर्व अतिवृष्टीच्या घटनेमुळे हजारों कार पाण्यात बुडाल्या होत्या. त्यामुळे सामनेवाले क्र.2 व इतर सर्व्हिस सेंटरकडे ब-याच कार दुरुस्तीसाठी आलेल्या होत्या. सर्व सर्व्हिस सेंटर्स त्यांचेने होईल तेवढे जास्तीत जास्त काम करीत होते. परंतु सर्वच गाडयां एकदम दुरुस्त करणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे सामनेवाले यांची सेवेत न्युनता म्हणता येणार नाही.
11 सामनेवाले यांचे म्हणणे की, तक्रारदार-कंपनीने सामनेवाले क्र.2 यांचेकडे गाडी दुरुस्तीला दिली. त्यावेळेसच तिचे इंजीन बिघडलेले होते. गाडीतील कॉम्प्युटर चीप बिघडल्यामुळे इंजीन खराब झाले हा आरोप त्यांनी नाकारला. तक्रारदाराला गाडी बदलून देण्याचा क्लेम त्यांनी नाकारला आहे. त्यांचे म्हणणे की, दि.17.01.2006 रोजी गाडी दुरुस्त करुन ताबा घेण्याजोगी होती असताना तक्रारदार कंपनीने जाणूनबुजून गाडी ताब्यात घेण्याचे टाळले. कारण सामनेवाले यांचेवर दबाव आणून त्यांना नविन गाडी घ्यावयाची होती. त्यांनी त्यांचा चांगुलपणा म्हणून त्यांच्या सर्व होंडा सीटी कारला सुट देऊ केली होती. त्यावरुन त्यांनी त्यांची चुक कबुल केली असे म्हणता येत नाही. त्यांनी गाडयांच्या सुटया भागांचा पुरेसा पुरवठा प्रत्येक वेळी सर्व्हिस सेंटरला केला होता. परंतु अतिवृष्टीच्या या अभूतपूर्व घटनेने खूप गाडया खराब झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या सुटया भागांचा एकदम पुरवठा करणे शक्य नव्हते. ते परदेशात ऑर्डर देऊन मागावावे लागले. त्याच्या परिणामासाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही.
12 सामनेवाले यांचे म्हणणे की, घसा-यामुळे प्रत्येक वर्षी गाडीची किंमत कमी होते. जानेवारी, 2002 मध्ये तक्रारदार यांच्या गाडीची किंमत रु.6,49,638/- होती. तक्रारदाराने घटनेच्या वेळचे त्याच्या गाडीचे मुल्य निर्धारण रु.5,50,000/- केले हे खरे नाही. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी व त्यांच्याकडून नवी कार घेण्यासाठी तक्रारदाराने सदरची तक्रार केली आहे. तक्रारदाराने स्वतःच हेतुपुरस्सर दुरुस्त केलेली गाडी ताब्यात घेण्यास नाकारले आहे. त्यांची सेवेत न्यूनता नाही, म्हणून सदरची तक्रार रद्द करण्यात यावी.
13 सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारीला उत्तर देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले. तक्रारदार-कंपनीने सदरची कार त्यांच्या व्यवसायासाठी घेतली आहे, हा मुद्दा या सामनेवाले यांनीही उपस्थित केला आहे. तसेच त्यांचे म्हणणे की, त्यांच्या विरुध्द तक्रार/दावा दाखल करण्यासाठी कंपनीचा ठराव नाही. या कारणास्तव तक्रार रद्द करण्यात यावी.
14 या सामनेवाले यांचे म्हणणे की, दि.17.01.2006 रोजी सदरची कार दुरुस्त होऊन तयार होती व त्यांनी तक्रारदार-कंपनीला ती घेऊन जाण्यास तोंडी कळविले होते. तसेच दि.21.01.2006 रोजी पत्र पाठवुन कार घेऊन जाण्यास सांगितले. परंतु वारंवार विनंती करुनही तक्रारदार-कंपनीने गाडी नेली नाही व दि.27.01.2006 च्या पत्राने कळविले की, त्यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
15 या सामनेवाले यांचे म्हणणे की, सामनेवाले क्र.1 व 2 हे दोन्हीं भिन्न आहेत. ते सामनेवाले क्र.1 चे एजंट नाहीत. सामनेवाले क्र.1 यांच्या कार व त्यांच्या accessories विकण्यासाठी त्यांना डिलर नेमलेले आहे. तसेच त्यांच्या गाडयांना ते सेवाही देतात. डिलरशिपचा जो करार आहे तो Principal to Principal Basis वर आहे.
16 तक्रारदार यांच्या गाडीची दुरुस्ती करुन देण्यासाठी काहीही ठराविक मुदत त्यांना दिलेली नव्हती. त्यामुळे वेळेत गाडी दुरूस्त केली नाही असे म्हणता येत नाही. त्यांनी तक्रारदार-कंपनीच्या गाडीला काही नुकसान पोहविले नाही.
17 या सामनेवाले यांचे असेही म्हणणे की, दि.26.06.2005 च्या अतिवृष्टीमुळे त्यांचेकडे ब-याच गाडया दुरुस्तीला आल्या होत्या. त्यांच्या गॅरेजचे आवारही पावसाच्या पाण्याने खराब झाले होते. त्यांनी त्यांच्या ग्राहकांना व तक्रारदार-कंपनीलाही त्याबद्दल कल्पना दिली होती व सांगितले होते की, लवकरात लवकर गाडी दुरुस्त करुन ताब्यात दिली जाईल. त्यांना हेही सांगितले की, प्रत्येक गाडीचे कोणते व किती प्रमाणात नुकसान झाले आहे. हे पाहणे गरजेचे आहे. ब-याच कारचे इलेक्ट्रिक भाग खराब झालेले होते व त्यांना बदलविणे गरजेचे होते. परंतु ब-याच गाडया दुरुस्तीला आलेल्या असल्यामुळे ते भाग सहजपणे उपलब्ध नव्हते. ते परदेशातून मागावावे लागले. ते भाग बसविल्यानंतरच गाडयांचे इंजीन सुरु झाले व त्यावर त्यांनी गाडीत काय बिघाड आहे हे पाहून गाडयांचे दुरुस्तीचे काम सुरु केले. त्यांनी जास्तीत जास्त वेळ काम केले, जास्तीची माणसं कामाला लावली. त्यातील काही माणसं त्यांच्या इतर सर्व्हिस सेंटरला पाठविली. याप्रमाणे, पावसामुळे नुकसान झालेल्या गाडयांची दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी सर्वपरीने प्रयत्न केले. तक्रारदाराची गाडी दि.11.08.2005 रोजी दुरुस्तीला आणली होती. ऑगस्ट, 2005 पासून त्यांना कारचे पार्ट उपलब्ध होऊ लागले. तोपर्यंत त्यांनी कारच्या दुरुस्तीची इतर कामं केली. पार्ट आल्यानंतर तो बसवून कार चालू झाली व त्यावेळी गाडीमध्ये काय दोष आहे हे त्यांना कळाले व त्यानंतर कार दुरुस्त करण्यात आली. दि.21.11.2005 रोजी गाडी ट्रायलसाठी तयार होती. त्यांनी तिची ट्रायल घेतली. ट्रायलच्या वेळी इंजीन खराब झाले हे खरे नाही व तसे तक्रारदाराच्या प्रतिनिधींना सांगितले नाही. कॉम्प्युटराईज्ड चिप खराब झाल्यामुळे गाडी दुरुस्त करण्याच्या पलिकडे खराब झाली हे खरे नाही. त्यांच्या प्रतिनिधींने गाडीचे इंजीन बदलून दिले जाईल असे तक्रारदाराच्या प्रतिनिधीला सांगितले नव्हते.
18 त्यांनी कारचे इंजीन उतरविण्यासाठी व त्याचे भाग वेगळे करण्यासाठी विमा कंपनीकडून दि.24.11.2005 रोजी अनुमती घेतली होती. त्यानंतर गिअर बॉक्स काढल्यावर फ्लायव्हिल टिथ खराब झाल्याचे व त्यात स्टार्टर बेंडेक्स अडकल्याचे लक्षात आले. त्यांच्या कामगारानी तो दोष दूर केला व इंजीन व्यवस्थित सुरु झाले. इंजीन बदलविण्याची गरज पडली नाही. दुरुस्ती बद्दलचे बिल तयार केलेले आहे. त्यावरुन इंजीनमध्ये खूप मोठया प्रमाणात दुरुस्ती करावी लागली नाही असे दिसून येते.
19 याप्रमाणे सामनेवाले यांचे म्हणणे की, त्यांची सेवेत न्यूनता नाही. दि.17.01.2006 रोजी गाडी पूर्णपणे दुरुस्त होऊन ताबा देण्याजोगी असूनही तक्रारदार-कंपनी ती घेऊन गेली नाही. तक्रारदाराने त्याच्या जुन्या गाडीच्या त्यावेळच्या किंमतीबद्दल जे कथन केले आहे ते खोटे आहे. तक्रारदार कंपनीच्या मॅनेजींग डायरेक्टरला व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास झाला हे खोटे आहे. तक्रारदार-कंपनीची कोणतीही मागणी मान्य करण्यासाठी नाही सदरची तक्रार रद्द करण्यात यावी.
20 सामनेवाले क्र.3 यांनी कैफियत दिली आहे. त्यांचे म्हणणे की, तक्रारदार-कंपनीने त्यांचेकडून कार विकत घेतली आहे. त्यांचेकडून कोणतीही सेवा घेतलेली नाही. कारच्या संबंधीत सेवा सामनेवाले क्र.2 यांचेकडून घेतली आहे. त्यामुळे त्यांचेविरुध्द तक्रारीला काहीही कारण घडलेले नाही. तक्रारदार–कंपनीने त्यांचेविरुध्द काहीही आरोप केलेले नाहीत, म्हणून त्यांचे विरुध्दची सदरची तक्रार रद्द करण्यात यावी.
21 आम्हीं तक्रारदारातर्फे वकील-श्री.प्रभावळकर यांचेसाठी वकील –श्री.पार्टे, सामनेवाले क्र.1 साठी वकील- श्री. विशाल लोहीरे, सामनेवाले क्र.2 साठी वकील- श्री.पुष्कर पाटणकर आणि सामनेवाले क्र.3 साठी वकील –श्री.अमीत अय्यर यांचा युक्तीवाद ऐकला व या तक्रारीतील कागदपत्रं वाचली.
(21-अ) सामनेवाले क्र.1 यांनी असा आक्षेप घेतला आहे की, त्यांचे कार्यालय या मंचाच्या अधिकारक्षेत्रात नाही किंवा या मंचाच्या अधिकारक्षेत्रात ते व्यवसाय करीत नाहीत. म्हणून तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम-11(2)(बी) तरतुदीनुसार सदरची तक्रार दाखल करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक होते परंतु त्यांनी तशी परवानगी घेतलेली नाही. म्हणून सदरची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. सामनेवाले क्र.1 यांचा हा आरोप मान्य करता येत नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.10 मध्ये तशी परवानगी देण्याबाबत विनंती केलेली आहे. मंचाने ही तक्रार दाखल करुन घेतलेली आहे. यावरुन असा निष्कर्ष निघतो की, मंचाने ही तक्रार दाखल करण्यास अनुमती दिलेली आहे.
22 सामनेवाले क्र.1 व 2 यांनी असा मुद्दा उपस्थित केला आहे की, तक्रारदार-कंपनीने सदरची कार त्यांच्या व्यवसायासाठी घेतली होती, त्यामुळे तक्रारदार-कंपनी ग्राहक होत नाही. सामनेवाले यांच्या या कथनात तथ्य दिसून येते. तक्रारीमध्ये तक्रारदार-कंपनीने म्हटले आहे की, त्यांचा इमारती बांधकामाचा व्यवसाय आहे. जानेवारी-2002 मध्ये त्यांचा सिल्व्हासा येथे बांधकामाचा व्यवसायचालू होता व तेथेच त्यांचे स्थानिक ऑफीस होते, म्हणून त्यांनी सदरची कार सिल्व्हासा येथील त्यांच्या पत्त्यावर घेतली होती. सदरची कार कंपनीच्या नावांवर घेतलेली दिसून येते. तक्रारदार-कंपनीने सदरची कार त्यांच्या मॅनेजींग डायरेक्टरच्या सुखसुविधेसाठी घेतली होती. तक्रारदार-कंपनीचे म्हणणे आहे की, सदरची कार त्यांच्या मॅनेजींग डायरेक्टरच्या व त्यांच्या कुटुंबाच्या वैयक्तिक वापरासाठी घेतली परंतु हे म्हणणे खरे वाटत नाही. जर त्यांच्या मॅनेजींग डायरेक्टरच्या वैयक्तिक वापरासाठी घेतली असेल तर ती सिल्व्हासा येथील पत्त्यावर घेऊन दमण येथे नोंदणी करण्याची काही आवश्यकता नव्हती. ती सिल्व्हासाच्या पत्त्यावर घेतली असून तीची दमण येथे नोंदणी झाली, याचा अर्थ स्पष्ट आहे की, ती त्यांच्या मॅनेजींग डायरेक्टरसाठी कार्यालयीन कामासाठी घेतली होती. सदरची कार व्यवसायासाठी व्यापारी तत्वावर घेतलेली असल्यामुळे तक्रारदार-कंपनीने दाखल केलेली सदरची तक्रार ही या मंचात चालण्यासारखी नाही, कारण ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम-2(1)(डी) च्या तरतुदीनुसार तक्रारदार-कंपनी ग्राहक होऊ शकत नाही. ती रद्द होणेस पात्र आहे. असाच दृष्टीकोन मा.राज्य आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी खालील केसमध्ये घेतलेला आहे.
First Appeal No.938 of 2009
In Consumer Complaint No.18/2008
आदेश दि.06.03.2010
साई सर्व्हिस स्टेशन लि.
विरुध्द
मेसर्स.कोरस् (इंडिया) लि. व इतर
सदरच्या न्यायनिवाडयाची प्रत सामनेवाले क्र.2 यांनी मंचात दाखल केली आहे.
23 मा.राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांनी सुध्दा खालील न्यायनिवाडयात हाच दृष्टीकोन घेतलेला आहे.
First Appeal No.490 of 2004
In Consumer Complaint No.83/2000
आदेश दि.10.02.2009
एच.वसंथाकुमार
विरुध्द
मेसर्स.फोर्ड (इंडिया) लि. व इतर
सदरच्या निवाडयाची प्रत सामनेवाले क्र.1 यांनी मंचात दाखल केली आहे.
24 जरी गुणावगुणांवर तक्रारीचा विचार केला तरी मंचाला सदरच्या तक्रारीत तथ्य दिसत नाही. तक्रारीचे वाचन केले असता, असे दिसून येते की, तक्रारदार-कंपनीने सामनेवाले क्र.3 यांचेविरुध्द सेवात्रुटीचा आरोप केलेला दिसत नाही. तक्रारदार –कंपनीने जानेवारी, 2002 मध्ये सामनेवाले कंपनीकडून गाडी विकत घेतली. गाडी विकत घेतल्यानंतर जवळजवळ साडेतीन वर्षाने या अभूतपूर्व अतिवृष्टीची घटना घडली. गाडी विकत घेतली त्यावेळी तिच्यात काही दोष होते व सामनेवाले क्र.3 यांनी सदोष गाडी तक्रारदार-कंपनीला विकली असा तक्रारदार-कंपनीचा आरोप नाही. गाडी घेतल्यानंतर तक्रारदाराने सामनेवाले क्र.3 ची काहीही सेवा घेतली नव्हती. त्यामुळे सामनेवाले क्र.3 ची सेवेत न्युनता आहे असे म्हणता येणार नाही. त्यांचेविरुध्द तक्रारीला काहीही कारण घडले नाही. म्हणून सामनेवाले क्र.3 विरुध्दची सदरची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
25 तक्रारदाराची मुख्य तक्रार आहे की, सामनेवाले क्र.2 यांनी गाडी दुरुस्त करण्यास उशिर केला, गाडीची ट्रायल घेताना गाडीच्या इंजीनला नुकसान पोहचविले. सामनेवाले क्र.2 यांनी गाडीचे सुटे भाग ताबडतोब उपलब्ध करुन दिले नाही, त्यामुळे त्याला गाडीचा वापर करता आला नाही. सामनेवाले क्र.2 यांच्याकडे गाडी दि.11.08.2005 या दिवशी दुरुस्तीला दिली होती. दि.26.07.2005 रोजी मुंबईत अतिवृष्टीची अभूतपूर्व घटना घडली व पावसाच्या पुरात हजारों कारचे खूप नुकसान झाले. प्रत्येक गॅरेजला /सर्व्हिस सेंटरला पुराने नुकसान झालेल्या गाडयां दुरुस्तीला आणल्या होत्या. सामनेवाले क्र.2 यांचेकडे अशा ब-याच गाडयां दुरुस्तीला आल्या होत्या. ज्या गाडया अगोदर दुरुस्तीला आल्या होत्या, त्या गाडयांची त्यांनी अगोदर दुरुस्ती केली. सामनेवाले क्र.2 यांनी बरेच जादा कामगार कामाला लावले. पावासामुळे त्यांच्या सर्व्हिस सेंटरच्या आवाराचेही नुकसान झाले होते. त्यांनी त्यांच्या इतर सर्व्हिस सेंटरमध्येही गाडयां दुरुस्तीचे काम जोरात सुरु केले. तरीही दुरुस्तीला आलेल्या गाडयांची संख्या खूप असल्यामुळे दुरुस्तीला वेळ लागणे हे साहजिकच होते.
26 पावासाच्या पुरामुळे गाडयांचे इलेक्ट्रॉनिक्स पार्टस् खराब झाले होते. ते बदलून नविन बसविल्यानंतर गाडयांचे इंजिन्स् सुरु झाले व त्यावेळी गाडीत नेमका काय दोष आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतरच त्या दुरुस्त्यां करण्यात आल्या. पावसाच्या या अनपेक्षित घटनेमुळे ब-याच गाडयांचे नुकसान झालेले असल्यामुळे इलेक्ट्रिक्स् पार्ट लवकर उपलब्ध झाले नाहीत. सामनेवाले क्र.1 यांना काही पार्ट परदेशात आर्डर देऊन मागवावे लागले. ऑगस्ट, 2005 पासून ते पार्टस् उपलब्ध होऊ लागले. तक्रारदाराच्या कारचा Electronic Control Module (ECM) हा भाग पावसाच्या पाण्याचे खराब झाला होता. तो पार्ट नविन बसविल्यानंतरच इंजीनमध्ये काय दोष आहे हे त्यांच्या लक्षात आले. इंजीन उतरविण्यासाठी (Dismantle करण्यासाठी) सामनेवाले क्र.2 यांनी इन्शुरन्स कंपनीची परवानगी घेतली. या सर्व कार्यप्रणालीला वेळ गेला. त्यानंतरच काही दुरुस्तींचे काम सुरु करावे लागले. सामनेवाले क्र.2 यांनी कारचे इलेक्ट्रिक पार्ट उपलब्ध होण्याच्या अगोदर पावसाच्या पाण्याने नुकसान झालेल्या गाडयांच्या इतर मॅकेनिकल पार्टची व इतर बाहेरच्या भागांची दुरुस्ती केली. या सर्व बाबींचा विचार करता, सामनेवाले क्र.2 यांनी गाडी दुरुस्त करण्यात सेवेत न्युनता केली असे म्हणता येणार नाही.
27 तक्रारदाराचा आरोप आहे की, सामनेवाले क्र.2 यांच्या इंजीनिअरने कारची ट्रायल घेताना इंजीनला खूप नुकसान झाले. परंतु याबद्दल तक्रारदार यांनी तज्ञांचे मत दाखल केले नाही किंवा इतर कोणताही लेखी पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने तक्रारीबरोबर त्यांनी विमा कंपनीला पाठविलेल्या पत्राची प्रत दाखल केली आहे. ती निशाणी-बी ला आहे. त्यात म्हटले आहे, अतिवृष्टीमुळे व पुरामुळे त्यांची कार पूर्णपणे पाण्यांत बुडाली होती. तक्रारदार- कंपनीने सामनेवाले क्र.2 यांना दि.11.08.2005 रोजी गाडी दुरुस्तीला पाठविली, त्याबरोबर एक पत्र पाठविले होते. त्याची प्रत त्यांच्या कैफियतीच्या निशाणी-सी ला आहे. त्यात म्हटले आहे की, त्याच्या कारचे पुरामुळे पूर्ण नुकसान झाले आहे. सदरची कार सामनेवाले क्र.2 कडे दुरूस्तीला पाठविली त्यावेळेस ती बांधून ओढून न्यावी लागली होती. ती सामनेवाले क्र.2 कडे पाठविली होती, त्यावेळी तिचे इंजीन चांगले होते व नंतर इंजीनला ट्रायलच्या वेळी नुकसान झाले, याबद्दल लेखी पुरावा नाही. पुराव्या अभावी तक्रारदाराचा हा आरोप मान्य करता येत नाही.
28 तक्रारदाराचे म्हणणे आहे की, सामनेवाले क्र.2 यांच्या प्रतिनिधीने त्यांना सांगितले होते की, दि.07.09.2005 पर्यंत किंवा त्यापूर्वी त्यांची कार दुरुस्त करुन देऊ. परंतु त्याबद्दल लेखी पुरावा नाही. त्यामुळे हा आरोप मान्य करता येत नाही. तक्रारदार यांची कार दि.17.01.2006 रोजी ताबा देण्याजोगी होती. त्याबद्दल सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार- कंपनीला कळवून ती घेऊन जाण्यास कळविले. परंतु तक्रारदार कंपनीने गाडी नेली नाही.
29 सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार-कंपनीला दि.21.01.2006 रोजी पाठविलेल्या फॅक्सची प्रत दाखल केलेली आहे. त्याला तक्रारदार-कंपनीने दिलेले उत्तरही तक्रारीत दाखल केले आहे. त्यावरुन असे दिसते की, दि.21.01.2006 रोजी व त्या अगोदरही सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार-कंपनीला कळविले होते की, त्यांची कार दुरुस्त होऊन तयार आहे, त्यांनी बिलाची रक्कम रु.1,44,502/-, कार दुरुस्तीला उशिर झाल्याबद्दल देऊ केलेली (सुटची रक्कम वगळता) देऊन कार घेऊन जावी. परंतु तक्रारदार-कंपनीने कार ताब्यात घेतली नाही व बिलाची रक्कम ही भरली नाही व सामनेवाले क्र.2 यांना कळविले की, त्यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली आहे. कार दुरुस्ती होऊन तयार असताना दुरुस्तीच्या बिलाची रक्कम अदा करुन गाडी ताब्यात घेणे हे तक्रारदार-कंपनीचे कर्तव्य होते. केवळ तक्रार दाखल केली आहे, म्हणून कारचा ताबा घेण्यास नकार देणे योग्य वाटत नाही. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार-कंपनीला विलंब कालावधीसाठी दररोज रु.500/- रुपयेप्रमाणे दुरुस्तीच्या विलंब कालावधीसाठी सुट देऊ केली होती हा त्यांचा चांगुलपणा आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी मा.राज्य आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खालील प्रकरणातील आदेशाची प्रत दाखल केलेली आहे.
First Appeal No.A/10/202
In C.C.No.174/2006
संदीप आर.शहा
विरुध्द
मेसर्स. लिंकवे होंडा
दि.04.01.2010
त्यातील वस्तुस्थिती अशी दिसून येते की, जुलै, 2005 च्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे तक्रारदाराच्या कारला दुसरी सेवा (Second Service) द्यायला सामेनवाले यांचेकडून उशिर झाला. त्यात मा.राज्य आयोगाने असे निरीक्षण केले आहे की, मुंबई मधील सदरच्या अतिवृष्टीच्या घटनेमुळे हजारों, लाखों कार यांना नुकसान झाले होते. प्रत्येक सर्व्हिस सेंटरकडे खूप गाडया दुरुस्तीला आल्या होत्या. त्यावेळी जरी सामनेवाले कंपनीने तक्रारदाराच्या कारला दुसरी सेवा (Second Service) उशिरा दिली तरी सामेनवाले यांची सेवेत न्यूनता म्हणता येत नाही.
30 सामनेवाले क्र.2 यांनी मा.राज्य आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा खालील प्रकरणातील दि.07.09.2009 च्या आदेशाची प्रत दाखल केली आहे.
(i) First Appeal No.937/2008
Scoda Auto India Pvt. Ltd. & ors.
Versus
Mr. Anil Mittal
And
(ii) First Appeal No. (ii) 1316/2008
Mr. Anil Mittal
Versus
Scoda Auto India Pvt. Ltd. & ors.
यात मा.राज्य आयोगाने असे निरीक्षण केले आहे की, जर कार दुरुस्त होऊन तयार असूनही व मॅन्युफॅक्चरर/उत्पादनकर्ता आणि डिलर यांनी गाडीचा ताबा घेण्याची विनंती करुनही तक्रारदाराने गाडीचा ताबा घेतला नाही तर उत्पादन कर्ता व डिलर यांच्या सेवेत न्यूनता आहे असे म्हणता येणार नाही.
31 तक्रारदाराचा सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्द असा आरोप आहे की, त्यांनी ज्या गाडया बनविल्या त्यांचे सर्व सुटे भाग लवकरात लवकर उपलब्ध होतील असे त्यांचे उत्पादन करायला पाहिजे होते परंतु सामनेवाले क्र.1 यांनी तसे न केल्यामुळे त्यांच्या कारचा ईसीएम हा लवकर उपलब्ध झाला नाही व त्यांना गाडी वापरता आली नाही. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराला दि.06.12.2005 रोजी पत्र पाठवुन कळविले होते की, मुंबईतील त्या घटनेच्या अतिवृष्टीमुळे ब-याच कारचे नुकसान झाले आहे. ईसीएम हा गाडीचा भाग गाडीच्या हयातीत बदलण्याची गरज पडत नाही. वर्षातून जास्तीत जास्त 10 ते 15 ईसीएमची आवश्यकता भासते परंतु जुलै, 2005 च्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे खूप गाडयांचे नुकसान झाले. जवळ जवळ 2000 ईसीएमची मागणी आली होती. म्हणून ताबडतोब ते पार्ट उपलब्ध करुन देता आले नाही. तरीसुध्दा त्यांना शक्य होईल तेवढया लवकरात लवकर ते पार्ट त्यांनी उपलब्ध करुन दिले. त्यांनी त्यांचा चांगुलपणा म्हणून तक्रारदार-कंपनीला दि.10.10.2005 पासून गाडी/ कार पूर्ण दुरुस्त होईपर्यंत दररोज रक्कम रु.500/- प्रमाणे परंतु दुरुस्तीच्या बिलाच्या रक्कमेपेक्षा जास्त नाही, एवढी सुट तक्रारदाराला देऊ केली. सामनेवाले क्र.1 यांनी दिलेले हे स्पष्टीकरण मान्य करण्यासारखे आहे. कारण जुलै, 2005 मध्ये अभूतपुर्व अतिवृष्टी होईल व त्यामध्ये हजारों /लाखों गाडयांचे नुकसान होईल व ईसीएमची एवढी मागणी होईल असे सामनेवाले क्र.1 यांनी अपेक्षित होते. सामनेवाले क्र.1 यांनी जाणुनबुजून / हेतुपुरस्सर ईसीएमचे उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात केले नाही असे म्हणता येत नाही. त्यांची सेवेत न्यूनता नाही.
वरील सर्व विवेचनांचा विचार करता, मंचाचे असे मत आहे की, तक्रारदाराने सामनेवाले यांच्या सेवेत न्यूनता आहे किंवा त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे हे सिध्द केलेले नाही. या तक्रारीत मंचाला तथ्य वाटन नाही. दुरुस्तीचे बिल द्यावे लागू नये व सामनेवाले यांचेकडून नविन गाडी मिळण्यासाठी दबाव यावा यासाठी त्यांनी सदरची तक्रार केली आहे. सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
(1) तक्रार क्र.580/2005 रद्दबातल करण्यात येते.
(2) उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा.
(3) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.