निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
आदेश
1. सा.वाले क्र.1 मोटारीचे उत्पादक आहेत. तर सा.वाले क्र.2 हे विक्रेते आहेत. तर सा.वाले क्र.3 हे मोटार वाहनांची दुरुस्ती गॅरेज कार्यशाळा आहे. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 कंपनीकडून मोटरकार खरेदी केली होती व ती त्यांच्या ताब्यात होती.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे दिनांक 26 जुलै, 2005 रोजी मुंबई येथे झालेल्या प्रचंद अतिवृष्टीमुळे तक्रारदारांची मोटर कार पाण्यात बुडाली व नादुरुस्त झाली. ती मोटरकार दुरुस्त करण्याकामी सा.वाले क्र.3 यांचेकडे सतत संपर्क साधला असता टाळाळाट केली व अंतीमतः 14 नोव्हेंबर 2005 रोजी मोटरकार दुरुस्तीकामी नेली. तक्रारदारांच्या कैफियतीप्रमाणे सा.वाले क्र.2 व 3 यांनी ती मोटर कार योग्य ती दुरुस्ती करुन दिली नाही व मोटरकार मध्ये काही दोष दुरुस्ती नंतरही अस्तित्वात राहीला. सा.वाले यांनी तक्रारदारांना मोटरकार दुरुस्तीचे काम बाबत सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली असा आरोप करुन तक्रारदारानी सा.वाले यांना रु.7,50,000/- तक्रारदारांकडून स्विकारुन नविन कार द्यावी अथवा 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करीत प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
3. सा.वाले क्र.1 मोटर वाहनाचे उत्पादक यांनी आपली कैफियत दाखल केली व आपली जबाबदारी नाकारली.
4. सा.वाले क्र.2 व 3 यांनी आपली एकत्रित कैफियत दाखल केली व त्यामध्ये दुरुस्तीकामी झालेल्या उशिराचे स्पष्टीकरण दिले. तसेच सा.वाले यांनी केलेल्या दुरुस्तीचा तपशिल पुरविला व सा.वाले क्र.2 व 3 यांच्याकडून दिलेली सेवा सुविधा पुरविण्यास कसुर झाली या आरोपांना नकार दिला. सा.वाले यांच्या कथनाप्रमाणे 26 जुलै 2005 च्या पावसानंतर मुंबईतील सर्व व्यवस्था मोडकळीस आली होती. त्यामुळे तक्रारदारांची कार दुरुस्त करण्यास उशिर झाला. तरीदेखील सा.वाले यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करुन तक्रारदारांची मोटारकार दुरुस्त करुन दिली. याप्रमाणे सा.वाले यांनी कुठलाही कसुर केला नाही असे कथन करुन नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. तक्रारदाराने आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. यामध्ये तक्रारदारांनी कथनांचा पुर्नउच्चार केला व सा.वाले यांच्या कैफियतीमधील कथने खोटी व बिनबुडाची आहेत असा आरोप केला.
5. तक्रारदारांचे वतीने त्यांचे मुखत्यार श्री.प्रकाश गुरव यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. सा.वाले क्र.1 यांचे वतीने त्यांचे व्यवस्थापक-विधी श्री.अमीत सिन्हा यांनी पूराव्याचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले क्र.2 व 3 यांचे वतीने सा.वाले क्र.2 व्यवस्थापक श्री.अमीत चौधरी यांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
6. आम्ही सा.वाले वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. तसेच दोन्ही बाजुंचा लेखी युक्तीवाद, पुरावा शपथपत्र, कागदपत्रं, यांचे वाचन केले.त्यावरुन तक्रार निकालीकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांची मोटर कार दुरुस्त करुन देण्याच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांच्याकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
2 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे त्यांची मोटारकार 26 जुलै, 2005 रोजी मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यामध्ये बुडाली व त्यामुळे दुरुस्तीची आवश्यकता होती. तथापी हयामध्ये क्र.2 व 3 यांना वेळोवेळी सूचना देऊनही 14 नोव्हेबर, 2005 रोजी उशीराने सा.वाले यांनी तक्रारदारांची मोटरकार दुरुस्तीकामी उचलली. या संदर्भात सा.वाले यांनी आपल्या कैफियतीचे पृष्ठ क्र.3 वर असे कथन केले आहे की, जुलै, 2005 च्या अतिवृष्टीनंतर मुंबई येथील अनेक मोटर मालकांची वाहने पाण्यामध्ये बुडाली होती. त्या प्रकारची वाहने दुरुस्त करण्याकामी वाहन विक्रेते तसेच गॅरेज यांचेकडे मोटरमालक सारखे तगादा लावत होते. तथापी सर्वाची वाहने एकदम दुरुस्त करुन देणे शक्य नसल्याने त्यांचा क्रम लावण्यात आला होता व त्याप्रमाणे तक्रारदारांची मोटरकार 14 नोव्हेंबर, 2005 रोजी दुरुस्तीचेकामी घेण्यात आली. सा.वाले यांनी आपल्या कैफियतीमध्ये परिच्छेद क्र.1 VII यामध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांची मोटरकार सा.वाले क्र.3 गॅरेजकडे ओडत आणली नव्हती तर तक्रारदाराने ती चालवत आणली होती. यावरुन सा.वाले यांचेकडून मोटारवाहन आणण्यापूर्वी तक्रारदाराने ती मोटरकार अन्य गॅरेजकडून दुरुस्त करुन घेतली होती हे सिध्द होते.
8. सा.वाले यांनी आपल्या कैफियतचे पृष्ठ 4 परिच्छेद 9 मध्ये असे नमुद केले आहे की, होंडा कारमध्ये ब-याच अत्याधुनिक यंत्र सामुग्री वापरलेली असल्याने ती यंत्र सामुग्री दुरुस्त करणेकामी उपलब्ध नव्हती व परदेशातून मागवावी लागली त्यामुळे दुरुस्तीकामी उशिर लागला. तसेच उपकरणांची व वाहनांच्या सुटया भागांची मागणी एकदम वाढल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला व त्या कारणानेदेखील मोटर दुरुस्तीकामी सा.वाले यांना उशिर झाला. तरीदेखील तक्रारदारांची मोटरकार दुरुस्त करुन 17 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांचे ताब्यात दिली.
9. सा.वाले यांची कैफियत व शपथपत्रातीली कथनाप्रमाणे 2 मार्च, 2006 रोजी तक्रारदारांनी त्यांची कार किरकोळ दुरुस्तीकामी सा.वाले क्र.3 यांचेकडे आणली व ती लौकर दुरुस्तकरुन कार तक्रारदार यांचे ताब्यात देण्यात आली.
10. सा.वाले यांचे कथनाप्रमाणे 26 मे, 2006 रोजी तक्रारदारांनी मोटरकार लौकर दुरुस्तीकामी आणली होती व काही सुटे भाग बदलण्यात आले व त्यानंतर तक्रारदारांना प्रत्यक्ष मोटर चालवून 22 जून 2006 रोजी कार ताब्यात देण्यात आली.
11. 26 जुलै, 2005 रोजीच्या अतिवृष्टीमुळे मुंबईमध्ये जी परिस्थिस्ती निर्माण झाली होती ती असाधारण होती व त्यामध्ये सर्वच व्यवस्था कोलमडून पडली होती. या बाबतची न्यायालयीन नोंदसुध्दा घेता येऊ शकते. मोटर दुरुस्तीचे गॅरेजसुध्दा बरेच दिवस बंद होती व सर्व व्यवस्था पुन्हा सुरळीत होण्यास बराच अवधी लागला. विमा कंपन्यांची तपासणी करणारेदेखील उपलब्ध नव्हते व त्यांचीसुध्दा भेट होणे दुरापास्त होते.
12. सा.वाले यांनी आपल्या कैफियतीमध्ये जी कथने केली आहेत त्यावरुन असे दिसते की, 26 जुलै, 2005 रोजी मुंबई येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जी व्यवस्था विस्कळीत झाली त्याकामी मोटर दुरुस्त करण्यास उशिर झाला. तथापी सा.वाले क्र. 2 व 3 यांनी तक्रारदारांची कार दुरुस्त करुन दिली व त्यानंतर ती त्यांचे ताब्यात दिली.
13. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, तक्रारदार यांच्याकडे त्यांची मोटारकार सद्या असून त्या कारचा ते वापर करीत आहेत. तक्रारदारांचे असे कोठेही कथन नाही की, मोटरकार बंद पडली असून ती सा.वाला क्र.2 व 3 यांचे ताब्यात आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांची मोटरकार योग्य रित्या दुरुस्त केली नाही व त्यामध्ये काही मुलभूत दोष कायम राहीले ही बाब सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदारावर होती, त्या दृष्टीने तक्रारदारांनी वाहनाचे तज्ञ किंवा अभियंता यांचे करवी आपल्या मोटर कारची तपासणी करुन प्रस्तुतचे मंचापुढे आपला अहवाल दाखल करणे आवश्यक होते. तशा प्रकारचा अहवाल प्रस्तुत प्रकरणात दाखल नसल्याने तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनास पुष्टी मिळू शकत नाही.
14. वरील सर्व परिस्थितीत सा.वाले क्र.2 व 3 यांनी तक्रारदारांची मोटारकार दुरुस्त करण्याकामी कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करु शकत नाहीत. सहाजिकच तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत.
15. वरील परिस्थितीत तक्रारदार कुठलीही दाद मिळण्यास पात्र नसल्याने तक्रार खारीज करणे योग्य आहे असे प्रस्तुतच्या मंचास वाटते.
16. वरील कारणाकरीता पुढील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 370/2006 रद्दबातल करण्यात येते.
2. खर्चाबद्दल काही आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.