द्वारा- मा. अध्यक्ष, श्रीमती अंजली देशमुख
:- निकालपत्र :-
दिनांक 28/9/2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
[1] तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 यांच्याकडून दिनांक 20/9/2007 रोजी “होंडा युनिकॉर्न” ही मोटार सायकल रक्कम रुपये 61,698/- या किंमतीस खरेदी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार गाडी खरेदी केल्याच्या दिनांकापासून त्यात समस्या निर्माण झाल्या. या समस्या तक्रारदारांनी सर्व्हिस इंजिनिअर यांना सांगितल्या. वेळोवेळी तक्रारदारांच्या गाडीमध्ये खालील प्रकारच्या समस्या उदभवल्या होत्या, त्या सर्व्हिसिंगच्या वेळी तक्रारदारांनी सांगितल्या -
1. गिअर बदलतांना व्यवस्थित चालत नव्हते. आवाज करत होते. सर्व्हिस सेंटरनी गिअर बदलून दिला होता तरीसुध्दा समस्येचे निराकरण झालेले नाही.
2. व्हॉल्व्ह सुटे होऊन आवाज करत होते, हे देखील सर्व्हिस सेंटरनी अनेक वेळा दुरुस्त करुनही तसेच राहिले.
3. बाईक हॅन्डल समप्रमाणात नव्हते. डावी बाजू उजव्या बाजू पेक्षा वर होती. ही समस्या अनेक वेळा सर्व्हिस सेंटर ला कळविली होती.
4. गाडीचा पिक अप कमी होता.
5. अचानक ब्रेक दाबल्यानंतर गाडी योग्य तो स्पीड देत नव्हती.
6. गाडीचे इंजिन योग्य ती पावर देत नव्हते.
[2] तक्रारदारांनी गाडी घेणेसाठी कर्ज घेतले होते. त्याचा हप्ता रुपये 1600/- प्रति महिना असा होता. गाडीतील या समस्यांमुळे तक्रारदारास त्रास सहन करावा लागला म्हणून तक्रारदार जाबदेणारांकडून गाडीची किंमत रुपये 61,698/-, नुकसान भरपाई रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- मागतात. तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
[3] जाबदेणार क्र.1 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार गाडीच्या मॅन्युअल प्रमाणे गुरगांव येथील कोर्टात दाखल करावयास पाहिजे. गाडी घेतल्यापासून त्यात समस्या निर्माण होत होत्या हे तक्रारदारांचे म्हणणे जाबदेणार क्र.1 यांना मान्य नाही. तक्रारदारांना त्यांनी दोष रहित गाडी दिलेली होती. तक्रारदारांनी मांडलेल्या समस्या त्यांच्या गाडी चालविण्याच्या सवयींवरुन उत्पन्न झालेल्या आहेत. उदा. क्लच, ब्रेक गाडी व्यवस्थित चालविली नाही तर किंवा रॅश चालविली तर उदभवू शकतात. त्याचप्रमाणे गाडीत कुठल्या प्रकारचे इंधन घातले यावरुन गाडीत समस्या निर्माण होऊ शकतात. यावरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांच्यावर जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत. 10,000 कि.मी वेळी इंजिन ब्रेक डाऊन झाल्यामुळे बदलून दिले हे तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांची गाडी 10,000 कि.मी चालली आहे. याचाच अर्थ गाडी व्यवस्थितरित्या चालत आहे. तक्रारदार ज्यावेळी सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन आले त्यावेळी परत नेतांना गाडीबद्यल समाधानी आहे अशी सही करुन, गाडी घेऊन जात होते. जाबदेणारांनी तक्रारदारांस दोष रहित गाडीची विक्री केलेली आहे. तक्रारदारांनी गाडी मध्ये उत्पादकीय दोष आहे याबद्यलचा कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार क्र.1 यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
[4] जाबदेणार क्र.2 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या गाडीचे 9830 कि.मी झाल्यानंतर गिअर शाप्ट बदलून देण्यात आले आहे. कारण त्यावेळी तक्रारदारांनी त्यांना गिअर बदलतांना आवाज होतो असे सांगितले होते. म्हणून जाबदेणार यांनी मेन शाप्ट गिअर व काऊंटर शाप्ट गिअर वॉरंटी मध्येच बदलून दिले. त्यावेळी तक्रारदारांनी सॅटिसफॅक्टरी नोट लिहून दिली होती. जाबदेणार यांनी वॉल्व्ह सेटिंग देखील करुन दिले होते. तक्रारदारांनी त्यांच्या गाडीमधील वॉल्व्ह समस्येबद्यल कुठलाही पुरावा दिलेला नाही. बाईक हॅन्डल खाली वर आहे हे तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे आहे. अशा प्रकारची कुठलीही समस्या बाईक हॅन्डल मध्ये नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या गाडीमध्ये उदभवलेल्या समस्यांचे वेळोवेळी निराकरण केलेले आहे, हे जॉब कार्डवरुन दिसून येते. प्रत्येक वेळी तक्रारदारांनी सॅटिसफॅक्टरी नोट दिलेली आहे. 70 कि.मी दर तासाला यापेक्षा अधिक स्पीडने गाडी चालू शकत नाही हे तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे आहे. प्रस्तूतच्या जाबदेणारांनी तक्रारदारांना 90 ते 120 कि.मी दर तासाला या स्पीडने गाडी चालू शकते याचा डेमो दिलेला आहे. तक्रारदारांनी त्यांच्या गाडीमध्ये अजूनही समस्या आहेत याबद्यलचा कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. याउलट जाबदेणारांनी प्रत्येक सर्व्हिसिंगच्या वेळी तक्रारदारांचे समाधान होईपर्यन्त काम करुन दिलेले आहे. एवढेच नाही तर तक्रारदारांनी मंचात तक्रार दाखल करुनसुध्दा त्यांची गाडी प्रस्तूतच्या जाबदेणार क्र.2 यांच्या वर्क शॉप मध्ये सर्व्हिसिंग करिता आणली होती. तक्रारदारांचा विश्वास नसेल तर त्यांनी ती गाडी सर्व्हिस सेंटर मध्ये सर्व्हिसिंगला दिली नसती. वरील सर्व कारणांवरुन तक्रार नामंजुर करण्यात यावी, अशी मागणी जाबदेणार क्र.2 करतात. जाबदेणार क्र.2 यांनी शपथपत्र, कागदपत्रे व जॉब कार्ड दाखल केले.
[5] सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. जाबदेणार क्र.2 यांनी दाखल केलेल्या जॉब कार्ड ची मंचानी पाहणी केली असता तक्रारदारांनी ज्या समस्या सांगितलेल्या आहेत त्यांचे निराकरण जाबदेणार यांनी करुन दिलेले आहे. त्यावर सॅटिसफॅक्टरी नोट सुध्दा तक्रारदारांनी दिलेली आहे. जॉब शिटचे अवलोकन केले असता गाडी 3000 कि.मी, 8000 कि.मी., 9000 कि.मी रनिंग झाल्यानंतरचेच जॉब शिट असल्याचे निदर्शनास येते. त्यापुर्वीचे जॉब शिट्स तक्रारदारांनी दाखल केलेले नाहीत. यावरुन जाबदेणार म्हणतात त्याप्रमाणे 922 कि.मी., 3803 कि.मी., 8057 कि.मी., 9074 कि.मी., गाडीचे रनिंग झाल्यानंतर गाडी सर्व्हिसिंगला आली होती हे दिसून येते. 922 कि.मी. गाडीचे रनिंग झाल्यानंतर तक्रारदार ज्यावेळी सर्व्हिस सेंटरला आले त्यावेळी हॅन्डल बार, फॉर्क, टी चेक, टॉप प्लेट नॉईस ऑफ पोथोल, रिअर टेल स्क्रू, स्मोक फ्रॉम सायलेन्सर या समस्यांचे निराकरण केलेले आहे. त्यानंतर तक्रारदार एकदम 3803 कि.मी. गाडीचे रनिंग झाल्यानंतरच जाबदेणारांकडे गेल्याचे दिसून येते. दरम्यानच्या कालावधीतील जॉब शिट्स तक्रारदारांनी दाखल केलेले नाही. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार मधल्या कालावधीत तक्रारदार त्यांच्याकडे सुध्दा आलेले नाही. तक्रारदारांनी त्यांच्या गाडीत उत्पादकीय दोष आहेत हे दाखविण्यासाठी कुठलाही स्वतंत्र पुरावा दाखल केलेला नाही. केला आहे तो दिलीप ऑटो वर्क्स यांचा. दिलीप ऑटो वर्क्स चे प्रोप्रायटर श्री. दिलीप प्रभाकर चौधरी असून ते मेकॅनिअल इंजिनिअर वा तत्सम डिग्री धारक असल्याबद्यलचा कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे हा पुरावा मंच मान्य करीत नाही. तक्रारदारांनी त्यांची गाडी दोषपुर्ण असल्याबद्यलचा कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. जॉब शिट्स मध्ये दाखविलेले दोष/समस्या गाडीमध्ये कायम राहिलेल्या आहेत आणि म्हणून गाडी बदलून दयावी वा रकमेचा परतावा दयावा हे तक्रारदारांचे पुराव्या अभावी म्हणणे चुकीचे आहे असे मंचाचे मत आहे. जाबदेणार क्र.2 यांनी प्रत्येक वेळी गाडी सर्व्हिसिंग करुन दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेतील त्रुटी दिसून येत नाही. तसेच तक्रारदारांनी गाडीमध्ये उत्पादकीय दोष आहेत याबद्यलचा कुठलाही स्वतंत्र पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी दाखल केलेला मा. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा 2011 [3] Mh. I.J. सी.एन. अनंथराम विरुध्द फियाट इंडिया लि. व इतर, प्रस्तूत प्रकरणी लागू होत नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच तक्रारदारांची तक्रार नामंजूर करतो.
मंचाचा आदेश खालीलप्रमाणे,
:- आदेश :-
1. तक्रार नामंजुर करण्यात येते.
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
3. आदेशची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.