नि. 27
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - सौ वर्षा नं. शिंदे
मा.सदस्या - सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 123/2013
तक्रार नोंद तारीख : 21/08/2013
तक्रार दाखल तारीख : 17/09/2013
निकाल तारीख : 19/03/2016
1. श्रीमती स्वाती प्रकाश बाबर
2. कुमारी साक्षी प्रकाश बाबर
3. कुमार अथर्व प्रकाश बाबर
नं.2 व 3 अज्ञान, अ.पा.क. जनक आई नं.1
श्रीमती स्वाती प्रकाश बाबर
4. श्री भिमराव पांडुरंग बाबर
5. सौ पुष्पा भिमराव बाबर
सर्व रा. कामेरी, ता.वाळवा जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे
सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत
वितरण कंपनी मर्या., उपविभाग इस्लामपूर
ता.वाळवा जि. सांगली ....... जाबदार
तक्रारदार तर्फे - अॅड श्री ए.आर.कुडाळकर
जाबदार तर्फे – अॅड श्री यू.जे.चिप्रे
- नि का ल प त्र -
द्वारा : मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार, तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली जाबदार विद्युत वितरण कंपनीने त्यास दिलेल्या दूषित सेवेबद्दल दाखल केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार क्र.1 ही मयत प्रकाश भिमराव बाबर यांची पत्नी असून तक्रारदार क्र.2 व 3 ही मयताची अज्ञान मुले आहेत व तक्रारदार क्र.4 व 5 हे त्याचे आई-वडील आहेत. मौजे कामेरी, बाबर मळा, येथे तक्रारदार यांची वडीलोपार्जित गट नं.2460, क्षेत्र 24 आर, आकार 3 पैसे रु.20 पैसे, हिस्सा संपूर्ण ही शेतमिळकत आहे. सदरची मिळकत महसूल 7/12 रेकॉर्डसदरी तक्रारदार क्र.4 यांचे नावे नोंद आहे. या शेत मिळकती लगत गट नं.2463, क्षेत्र 16 आर ही मिळकत मयत प्रकाश यांचे चुलतचुलते श्री सुनिल बाबूराव बाबर यांच्या मालकीची आहे. या मिळकतीमध्ये श्री सुनिल बाबर यांच्या मालकीची बोअर असून त्यासाठी जाबदार कंपनीचे वीज कनेक्शन त्यांनी घेतलले आहे. तक्रारदार यांच्या मालकीच्या दुभत्या म्हैशी वर नमूद गट नं.2460 मध्ये असतात. सदर म्हैशी प्रकाश भिमराव बाबर यांनी पूरक व्यवसाय या उद्देशाने पाळलेल्या होत्या. सदर म्हैशींना श्री सुनिल बाबर यांचे मालकीच्या वर नमूद बोअरवरुन पाणी दिले जात असे. तक्रारदार, तसेच मयत प्रकाश भिमराव बाबर हे जाबदार कंपनीचे बेनिफीशियरी ग्राहक होते व आहेत. दि.13/4/11 रोजी मयत प्रकाश भिमराव बाबर हे त्यांचे मालकीचे म्हैशींना सदर बोअरवरुन पाणी पाजणेसाठी सकाळी 9.00 चे सुमारास गेले असता, मोटार सुरु करणेकरिता मीटरपेटीचे दार उघडत असताना त्यांना अचानक वीजेचा शॉक बसून ते खाली कोसळले. हे पाहून सुनिल बाबर हे प्रकाश भिमराव बाबर यांचेकडे लगेच धावून गेले. त्यांनी जखमी प्रकाश यांना लगेच दवाखन्यात नेले. परंतु संबंधीत डॉक्टरांनी प्रकाश हे मयत झालेचे सांगितले. त्यानंतर सदर बाब पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. त्यांनी याबाबत योग्य ते कायदेशीर सोपस्कार पार पाडले. जाबदार कंपनीने देखील सदर घटनेबाबत विद्युत निरिक्षक यांना कळविले. त्यांनी याबाबत स्वतंत्रपणे चौकशी केली. पोलीस स्टेशन व विद्युत निरिक्षक यांनी केलेल्या स्वतंत्र चौकशीमध्ये मयत प्रकाश भिमराव बाबर यांचा मृत्यू जाबदार कंपनीच्या सदोष संच मांडणीमुळे वीजेचा शॉक बसून झालेला आहे हे निष्पन्न झाले आहे. दि.13/4/11 रोजी सदर घटना ज्या मीटर पेटीजवळ घडली, त्या मीटरपेटीच्या उत्तर बाजूस असणा-या जाबदार कंपनीच्या 3 व 4 क्रमांकावरील डांबावर असेलेल्या वाहिनीच्या चार तारांपैकी 4 नंबरचे डांबावरील वीजेच्या दोन तारा तुटून खाली पडलेल्या व 3 व 4 नंबर डांबावरील वीजेच्या तारा एकमेकांत गुंतलेल्या अशा स्वरुपात होत्या. यावरुन जाबदार कंपनीच्या अधिका-यांनी सर्व विद्युत वाहिनीच्या तारा व्यवस्थितपणे योग्य पध्दतीने राखलेल्या नसल्यामुळे तुटलेल्या वीज प्रवाहीत तारा एकमेकांत गुंतलेनेच वर नमूद मीटर पेटीत वीज प्रवाह उतरुन मीटर पेटीचे दार उघडत असताना मयत प्रकाश भिमराव बाबर यांना वीजेचा शॉक बसून ते मयत झालेले हे स्पष्ट झाले होते. तक्रारदार यांचे कथनानुसार मयताचा मृत्यू वीजेचा शॉक बसून झालेला असतानाही जाबदार कंपनीच्या अधिका-यांनी सदरचा अपघात वीजेचा शॉक बसून झालेलाच नाही असा बचाव घेतलेने मयत प्रकाश यांचे पोस्टमार्टम अहवालामध्ये संबंधीत डॉक्टरांनी मृत्यूचे कारणाबाबत शंका असलेने मयताचा व्हिसेरा केमिकल अॅनॅलिसीससाठी पाठविलेला होता. सदर रिपोर्ट आलेनंतर संबंधीत डॉक्टरांनी मयताचा मृत्यू हा वीजेचा शॉक बसूनच झाला आहे असा दाखला दिला. त्यानंतर इस्लामपूर पोलीस स्टेशनमार्फतदेखील दि.20/11/11 रोजी मयताचा मृत्यू वीजेचा शॉक बसून झाला आहे असा दाखला दिलेला आहे. त्यानंतर जाबदार कंपनीने नियमानुसार तक्रारदारांना अंत्यसंस्कारासाठी रक्कम रु.20,000/- व नुकसान भरपाई रु.1,80,000/- अशी एकूण रु.2,00,000/- रक्कम लवकरात लवकर देणार आहोत असे सांगितले. परंतु जाबदार कंपनीने तक्रारदारांना आजअखेर कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही. ही जाबदार कंपनीची सेवेतील अक्षम्य त्रुटी आहे.
3. तक्रारदाराचे पुढे असे कथन आहे की, मयत प्रकाश बाबर याचे मृत्यूसमयी 26 वर्षे वय होते. त्यांची मानसिक व शारिरिक प्रकृती एकदम चांगली व दणकट होती. त्यांना कोणताही आजार नव्हता. ते त्यांचे कुटुंबाची वडिलार्जित दोन एकर शेती बघत होते. त्यांना शेतीपासून व दुभत्या जनावरांपासून प्रत्येकी सुमारे रक्कम रु.1,00,000/- इतके वार्षिक उत्पन्न मिळत होते. तसेच मृत्यूसमयी ते मौजे कामेरी येथीलच श्री संतोष सर्जेराव पाटील यांच्या मालकीच्या मारुती ओमनी व्हॅन गाडीवर ड्रायव्हर म्हणून नोकरीस होते. त्यातून त्यांना दरमहा रु.7,000/- इतका पगार मिळत होता. तसेच त्यांनी अशोक लेलँड कंपनीचा मालवाहतुक ट्रक नं. एमएच-10-एयू-3844 मृत्यूपूर्वी एक महिना अगोदर खरेदी केला होता. या ट्रकपासून त्यांना भविष्यात दरमहा रु.20,000/- इतके उत्पन्न मिळाले असते. तक्रारदार हे पूर्णपणे मयताचे उत्पन्नावर अवलंबून होते. परंतु त्यांच्या अचानक मृत्यूमुळे तक्रारदार यांना जबर मानसिक व आर्थिक धक्का बसलेला आहे व त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या व अशा कथनांवरुन तक्रारदारांनी जाबदार यांचेकडून तक्रारदारांचे भविष्यकाळात झालेल्या नुकसानीपोटी रु.15,00,000/-, मानसिक धक्क्यापोटी रक्कम रु.50,000/-, अंत्यविधी धार्मिक खर्चापोटी रु.10,000/-, सहवासाच्या आनंदास मुकावे लागले त्याबाबत रु.1,00,000/- अशी एकूण रु.16,60,000/- ची मागणी केली आहे.
4. आपल्या तक्रारअर्जातील कथनांचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने आपले शपथपत्र नि.2 ला शपथपत्र दाखल केले असून नि.4 या फेरिस्तसोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये भूमापन क्र.2460 व 2463 चे सातबारा उतारे, वैद्यकीय अधिकारी, इस्लामपूर यांनी दिलला दाखला, पोलीस निरिक्षक इस्लामपूर यांनी दिलेला दाखला, विद्युत निरिक्षक, मिरज यांनी दिलेल पत्र, मयत प्रकाश भिमराव बाबर याचे ड्रायव्हींग लायसेन्स, ट्रकचे आर.सी.टी.सी. बुक यांचा समावेश आहे.
5. तसेच तक्रारदार यांनी नि.6 ला विलंब माफीचा अर्ज दाखल केला असून सदर अर्जावर, तक्रारअर्ज मुदतीत असल्याने विलंब माफीचा अर्ज दफ्तरी दाखल करणेचा आदेश तत्कालीन मंचाने पारीत केला आहे.
6. जाबदार विद्युत कंपनीने आपली लेखी कैफियत नि.12 ला दाखल करुन तक्रार अर्जातील सर्व कथने स्पष्टपणे अमान्य केली आहेत. जाबदारांनी तक्रारदार व मयत यांचेतील नातेसंबंध माहितीअभावी नाकारले आहेत. मयत प्रकाश भिमराव बाबर याचा मृत्यू वीजेचा शॉक बसून झाला हे जाबदारांनी नाकारले आहे. यासंबंधीची काही कागदपत्रे तक्रारदार यांनी दाखल केलेली नाहीत. जाबदार यांचे कथनानुसार, कोणत्याही प्रकारे चौकशी पोलीस खात्याकडून जाबदार कंपनीची झालेली नाही अथवा कंपनीच्या कोणत्याही अधिका-याचे जाब-जबाब नोंदविण्यात आलेले नाहीत. तसेच यासंबंधी कोणत्याही त्रयस्थ यंत्रणेकडून सुध्दा चौकशी झालेली नाही. मयताचे मृत्यूचे जागेचा पंचनामा, तसेच मयताचे पोस्ट मार्टेम झाल्याचे दिसून येत नाही. प्रत्यक्षात सर्व गोष्टी संशयास्पद असल्याचे स्पष्ट आहे. 2011 साली झालेल्या मृत्यूसंबंधीत विद्युत निरिक्षक यांनी तब्बल दोन वर्षांनी अहवाल पाठविल्याचे दिसून येते. विद्युत निरिक्षक व तक्रारदार हे एकमेकांस सामील असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात पोलीस केस नाही. विद्युत निरिक्षक हे प्रत्यक्ष केव्हा जागेवर केले याचाही ठाम पत्ता जाबदार कंपनीस दिलेला नाही. त्यामुळे डॉक्टर व पोलीस निरिक्षक यांनी संगनमताने काही आर्थिक लाभ उठविण्यासाठी खोटे दाखले दिल्याचे स्पष्ट दिसून येते. मृत्यू वीजेच्या शॉकपासून झाला या निर्णयाप्रत येण्यासाठी मयताचे पोस्ट मार्टेम होणे आवश्यक आहे, ते झालेले नाही. जाबदार यांनी विद्युत निरिक्षक यांना अहवाल पाठवून सस्पेक्टेड शॉक असे दि.15/4/11 रोजी कळविले होते. मात्र काही कागदपत्रे सबंधीत पोलीस खात्याकडून व डॉक्टरांकडून उपलब्ध न झाल्याने विद्युत निरिक्षक यांनी अहवाल दिलेला नाही. मात्र त्यानंतर संगनमताने जागेवर बसूनच सदरचे पत्र तक्रारदार यांना दिलेचे दिसून येते. तसेच जाबदार कंपनीने पोलीस निरिक्षक इस्लामपूर व विद्युत निरिक्षक यांनाही पत्र देसून पोलीस पंचनामा वगैरे कागदपत्रे मिळणेसाठी विनंती केली होती, पण त्याची पूर्तता झालेली नाही.
7. जाबदार यांचे पुढे असे कथन आहे की, जाबदार कंपनीच्या नियमाप्रमाणे एखाद्या व्यक्तीस शॉक लागून मृत्यू झालेस त्यामध्ये जाबदार कंपनीचा दोष असो किंवा नसो, मयताच्या वारसांना रक्कम रु.2 लाख देणेसंबंधी तरतूद आहे. मात्र त्यासाठी वीजेचा शॉक बसून मृत्यू झाला ही बाब सिध्द होणे आवश्यक आहे. त्यासाठी पंचनामा, इंक्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम रिपोर्ट इ. कागदपत्रेही सादर करणे आवश्यक आहे. त्यांची छाननी होवून वारसांना नुकसान भरपाई देता येते. परंतु प्रस्तुत प्रकरणात अशी कोणतीही कागदपत्रे तक्रारदार यांनी सादर केलेली नाहीत, त्यामुळे त्यांना रक्कम देण्यात आलेली नाही. प्रस्तुतची तक्रार मुदतीत नाही. तथाकथित अपघात दि.13/4/11 रोजी झाला असून दि.20/8/13 रोजी दोन वर्षानंतर तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांनी जाबदार यांना पाठविलेली दि.1/8/13 ची नोटीसही मुदतबाहय आहे. तक्रारदार अथवा मयत प्रकाश भिमराव बाबर हे जाबदार कंपनीचे ग्राहक नाहीत. त्यांना कोणत्याही प्रकारे वीजपुरवठा जाबदार यांनी केलेला नाही. ज्या गट नंबरमध्ये तथाकथित अपघात झाला तो गट नं.2463 हा मयत किंवा तक्रारदार यांच्या मालकी वहिवाटीचा नव्हता. चुलत चुलत्यांच्या नावाने असलेल्या मोटारीवर तथाकथित अपघात घडला या कारणाने मयत किंवा तक्रारदार हे ग्राहक होवू शकत नाहीत. तसेच ते बेनिफिशियरी ग्राहकही होवू शकत नाहीत. मयताने पूरक व्यवसाय म्हणून म्हैशी पाळल्या होत्या हे म्हणणे जाबदारांनी अमान्य केले आहे. जाबदार यांचे सेवेमध्ये कोणत्याही प्रकारे त्रुटी असल्याची तक्रार सुनिल बाबूराव बाबर यांनी केलेली नाही तसेच तथाकथित अपघातानंतरही त्यांनी अशा प्रकारची तक्रार केलेली नाही. दि.13/4/11 रोजी मयत हा म्हैशींना पाणी पाजण्यासाठी गेला होता हे कथन जाबदारांनी नाकारले आहे. मयताच्या मृत्यूबद्दल जाबदारांनी विद्युत निरिक्षक यांना कळविलेनंतर त्यांना कोणत्याही प्रकारचे दोष आढळले नसल्याने तब्बल दोन वर्षे त्यांनी कोणताही अहवाल जाबदार कंपनीकडे दिला नव्हता. पोलीस खात्यानेही पोस्टमार्टेम, घटनास्थळाचा पंचनामा इ. बाबी केलेल्या नाहीत. मीटर पेटीत वीज प्रवाह उतरुन अपघात घडला हे म्हणणे अयोग्य आहे. तारा तुटल्यास वीज प्रवाह मीटरपेटीपर्यंत जावू शकत नाही. तक्रारदार यांनी आपल्या कथनांबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. मयताचे उत्पनाबाबत तक्रारदारांनी केलेली सर्व कथने जाबदारांनी अमान्य केली आहत. येनकेनप्रकारे मयताचे उत्पन्न वाढीव स्वरुपात असल्याचे दाखविण्यासाठी मयताचे नावे ड्रायव्हींग लायसेन्स आहे असे खोटे कथन तक्रारदाराने केले आहे. या व अशा कथनांवरुन तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदार कंपनीने केली आहे.
8. आपल्या लेखी कैफियतीतील कथनांचे पुष्ठयर्थ जाबदारांनी कैफियतीखालीच शपथपत्र दाखल केले आहे.
9. तक्रारदाराने आपले पुराव्याचे शपथपत्र नि.14 ला दाखल केले असून नि.16 सोबत मयताचा इंक्वेस्ट पंचनामा व पोलीस निरिक्षक इस्लामपूर यांचा दाखला हजर केला आहे. तसेच नि.20 या पुरसीस अन्वये तक्रारदाराने आपला पुरावा थांबविलेला आहे. जाबदारतर्फे नि.21 ला पुरावा संपलेची पुरसीस दाखल केली आहे. तक्रारदाराने नि.26 सोबत अपघातस्थळाचा हातनकाशा, अपघाताबाबतचा अहवाल, घटनास्थळाचा फोटो, पोस्ट मार्टेम रिपोर्ट व जबाब इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
10. आम्ही उभय पक्षांचे विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे.
11. प्रस्तुत प्रकरणात आमच्या निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(ड) खाली
ग्राहक होतात काय ? नाही.
2. तक्रारदाराने नमूद केल्याप्रमाणे मयत प्रकाश बाबर याचा मृत्यू
जाबदारांनी त्यांचे विद्युत संचाची योग्य देखभाल न केल्यामुळे
झाला ही बाब तक्रारदाराने सिध्द केली आहे काय ? नाही.
3. जाबदारांनी तक्रारदारास दूषित सेवा दिली हे तक्रारदाराने शाबीत
केले आहे काय ? नाही.
4. तक्रारदाराने मागितलेली नुकसान भरपाईची रक्कम त्यास
मिळण्यास तक्रारदार पात्र आहे काय ? नाही.
5. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
12. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
:- कारणे -:
मुद्दा क्र.1
13. प्रस्तुत प्रकरणामध्ये वादाचा मुख्य मुद्दा हा आहे की, तक्रारअर्जात नमूद केलेल्या घटनास्थळाच्या संदर्भात तक्रारदार व जाबदार विद्युत वितरण कंपनी यांचेमध्ये ग्राहक व सेवा देणार असे नाते उत्पन्न होते किंवा नाही. घटनास्थळाच्या संदर्भामध्ये हा प्रश्न निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मा.राज्य आयोगाने म.रा.वि.वि. कं. विरुध्द बाबूलाल कुबेरचंद गांधी या प्रथम अपिल क्र. ए/07/227 आणि बाबूलाल कुबेरचंद गांधी विरुध्द म.रा.वि.वि.वि. कंपनी व इतर या अपिल नं.ए/07/228 मधील एकत्रित निकालामध्ये मा.राज्य आयोगाने विद्युत वितरण कंपनी व ग्राहक यांचेमध्ये नेमक्या कुठल्या ठिकाणापासून ग्राहक व सेवा देणार हे नाते सुरु होते, याबद्दल केलेले विस्तृत विवेचन असून, ते अद्यापही अस्तित्वात आहे. सदर निकालपत्रामध्ये मा.राज्य आयोगाने ट्रान्समीशन लाईन, डिस्ट्रीब्युशन लाईन, सर्व्हिस लाईन इ. सर्व बाबींचा विचार करुन असे नमूद केले आहे की, ग्राहक आणि विद्युत वितरण कंपनी यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्याला अभिप्रेत असणारे ग्राहक व सेवा देणार हे नाते ज्या ठिकाणापासून ग्राहकाला देण्यात आलेला विद्युत पुरवठा आणि ग्राहकाने सदर पुरवठयाचा घेतलेला उपभोग, ग्राहकाने घेतलेल्या सेवेबद्दल आकारणी करण्याकरिता मोजला जातो, तेथपासून पुढे ज्याठिकाणी ग्राहक सदरचा विद्युत पुरवठा वापरतो त्या त्या ठिकाणी ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) अन्वये ग्राहक आणि विद्युत वितरण कंपनी यांचेमध्ये ग्राहक आणि सेवा देणार असे नाते उत्पन्न् होते. थोडक्यात वीज वितरण कंपनी आणि विजेचा ग्राहक यांच्यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्यास अभिप्रेत असलेले सेवा देणार व ग्राहक हे नाते विद्युत मीटरपासून ज्या ज्या ठिकाणी ग्राहक वीज वापरतो, त्या त्या ठिकाणापर्यंत अस्तित्वात असते. आपल्या मा.राज्य आयोगाच्या नमूद प्रकरणात हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, एखाद्या ग्राहकाला वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने त्याच्या मिळकतीत जरी विद्युत वितरण कंपनीने Distribution line उभारलेली असेल आणि ग्राहकाच्या मिळकतीमध्ये मीटरपर्यंत विद्युत प्रवाह देण्याकरिता जरी ग्राहकाच्या खर्चाने सर्व्हिस लाईन बसविलेली असेल आणि त्या सर्व्हिस लाईनमधून ग्राहकाच्या मीटरपर्यंत विद्युत पुरवठा येत असेल, तरीही त्या क्षणापर्यंत ग्राहक आणि विद्युत वितरण कंपनी यांचेमध्ये वर नमूद केलेले नाते उद्भवत नाही. याचा अर्थ असा की, ज्या ठिकाणी ग्राहकाने वापरलेल्या वीजेची मोजणी करण्याकरिता विद्युत आकार बसविण्याच्या किंवा आकारणेच्या दृष्टीने मोजली जाते, त्या ठिकाणापासुन पुढे, विद्युत ग्राहक आणि विद्युत वितरण कंपनी यांमध्ये ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) ला अभिप्रेत असलेले ग्राहक आणि सेवा देणार हे नाते उत्पन्न होते. सदर ठिकाणापर्यंत जर विद्युत संचाच्या मांडणीतील दोषांमुळे म्हणजे Transmission line, Distribution line, वीज मीटरपर्यंत येणारी सर्व्हिस लाईन, यांच्यातील दोषांमुळे जर अपघात झाला किंवा काही घटना घडली तर त्याबाबतची दाद मागण्याची तरतूद ही Tort च्या प्रावधनानुसार मागता येवू शकते. परंतु त्या वेळेला सदरची दाद निर्णीत करण्याचा अधिकार हा केवळ दिवाणी न्यायालयाला असतो आणि ग्राहक तक्रार निवारण मंचाला Tort खाली दाद विचारात घेण्याचा अधिकार नसतो. मा.राज्य आयोगाचा वर नमूद केलेला न्यायनि र्णय व दंडक हा या मंचावरती बंधनकारक आहे. सदर निकालास छेद देणारा मा.सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही न्यायनिर्णय/दंडक या मंचाच्या निदर्शनाला अद्याप आणून देण्यात आलेला नाही. वर नमूद मुद्यांच्या संदर्भात या गोष्टीची नोंद घेणे अत्यावश्यक आहे की, तक्रारदाराचे कथनानुसार मयताचे चुलत चुलत्याच्या शेतगट नं.2463 मध्ये असणा-या बोअर व विहीरीवर बसविण्यात आलेल्या पंपाकरिता त्या शेतापर्यंत जाबदार विद्युत वितरण कंपनीने Distribution line आणलेली असून त्या विहीरीजवळ एक खांब उभारलेला असून त्या खांबावर विजेचे मीटर, फ्यूजेस आणि विहीरीवर बसविण्यात आलेल्या पंपाचे स्टार्टर स्वीच एका पत्र्याच्या बॉक्समध्ये बसविण्यात आले आहे. त्या पत्र्याच्या पेटीमध्ये विद्युत पुरवठा कला असून त्या पेटीत बसविलल्या मीटरच्या, पुढे पंपाचा स्टार्टर स्वीच आणि पुढे विद्युत पंपापर्यंत वायरिंग करण्यात आले आहे. तक्रारदाराची अशीही केस आहे की, तक्रारदाराचे शेत गट नं.2460 हे सदर गट नं.2463 ला लागून असून गट नं.2460 मध्ये तक्रारदाराची जनावरे बांधली जातात. त्या जनावरांकरिता पिण्याकरिता जे पाणी उपलब्ध केले जाते ते पाणी गट नं.2463 मधील बोअरवर बसविण्यात आलेल्या पंपाचे मार्फत जनावरांना उपलब्ध करुन दिले जाते आणि त्यामुळे तक्रारदार हे जाबदारचे लाभार्थी ग्राहक (Beneficiary) आहेत, सबब ते ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(ड) अन्वये ग्राहक होतात. तक्रारदाराच्याच या पक्षकथनावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदारा हे विद्युत वितरण कंपनी ग्राहक नाहीत. त्यांच्या नावाने किंवा मयताच्या नावने कुठेही विजेचे कनेक्शन नाही आणि ते जाबदार विद्युत वितरण कंपनीचे कोणतेही बिल भरत नवहते.
14. जाबदारचे विद्वान वकील श्री सुर्यवंशी यांनी आपले युक्तिवादाचे दरम्यान असे प्रतिपादन केले की, तक्रारदारांनी मयत प्रकाश भिमराव बाबर व गट नं.2463 चा मालक सुनिल बाबूराव बाबर यांच्यामध्ये कोणते नातेसंबंध होते ही बाब तक्रारदाराने स्पष्टपणे शाबीत केलेली नाही. सदर ठिकाणाला बाबर मळा असे ओळखले जाते आणि त्रूा ठिकाणी इतरही बाबर आडनावाच्या लोकांच्या जमीनी आहेत आणि केवळ त्यांची आडनावे सारखीच आहेत म्हणून मयत प्रकाश भिमराव बाबर आणि सुनिल बाबूराव बाबर यांचेमध्ये काही नातेसबंध होते असे अनुमान काढता येत नाही. तक्रारदारांनी असा कोणताही स्वतंत्र पुरावा याठिकाणी दाखल केलेला नाही की ज्याद्वारे ही गोष्ट शाबीत होईल की सुनिल बाबूराव बाबर याच्या शेतात बसविलेल्या पंपाद्वारे तक्रारदाराच्या किंवा मयताच्या जनावरांना पाणी पाजले जात होते. तक्रारदारांनी तक्रारदार क्र.5 पुष्पा भिमराव बाबर हिचा पोलीसांनी दि.2/5/12 रोजी नोंद केलेल्या जबाबाची प्रत याकामी फेरिस्त नि.26 ला दाखल केली आहे. त्यासोबतच घटनास्थळचा नकाशा, अपघाताबद्दलचा अहवाल, घटनास्थळाचे फोटो व पोस्ट मार्टेम रिपोर्ट देखील दाखल केले आहेत. ही कागदपत्रे पुरावा संपल्यानंतर जादा पुराव्याच्या स्वरुपात,जाबदारच्या मान्यतेने दाखल केली आहेत. तक्रारदार क्र.5 हिचा पोलीसांनी नोंदविलेला जबाब पाहिला तर त्रूामध्ये तक्रारदार क्र.5 हिने मयत प्रकाश बाबर घटनेच्या वेळेला ऊसाला पाणी देण्यास मोटार चालू करण्याकरिता गेला होता, असे सांगितलेले आहे. याचा अर्थ तक्रारदार क्र.5 हिचे सांगणे व तक्रारदाराचे पक्षकथन हयात तफावत आहे. तक्रारदाराचा गट नं.2460 या शेताचा सातबारा उतारा तक्रारदाराने नि.4/1 ला दाखल केला आहे त्यावरुन असे दिसते की, सन 2012-13 मध्ये तक्रारदाराने सदर शेतामध्ये ऊस लावला होता. सदर सातबारा उता-यामध्ये पाण्याच्या स्त्रोताबद्दल कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे तक्रारदाराचे कथन की ते गट नं.2463 मध्ये असलेल्रूा बोअरचा वापर करीत होते हे कथ्ज्ञन सवाभाविक वाटते. त्यामुळे तक्रारदार हे “Beneficiary” या संज्ञेत येतही असतील परंतु त्यांच्यात आणि वीज वितरण कंपनीत ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) मधील नातेसंबंध हे मा.राज्य आयोगाच्या वर नमूद न्यायनि र्णयानुसारच ठरवावे लागतील.
15. याठिकाणी हे नमूद करणे आवश्यक आहे की, तक्रारदारांनी असा कोणताही तांत्रिक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही की जे हे शाबीत करेल की, सदर शेताती मीटरची पेटी बसवलेल्या खांबावरील पत्र्याच्या पेटीमध्ये बसविलेल्या मीटरपासून स्टार्टर स्वीच किंवा स्टार्टर स्वीचपासून निघालेल्या आणि मोटरपर्यंत गेलेल्या वायरमध्ये काही दोष होता किंवा सदर मोटर आणि मीटरपेटी यामध्ये बसविलेल्या अर्थिंगच्या जी.आय.वायरमध्ये काही दोष निर्माण झाला होता ज्यामुळे सदरची टीनाची मीटर पेटी विद्युत भारीत झालेली होती. हे जरुर आहे की, तक्रारदाराच्या कथनानुसार मयत प्रकाश बाबर हा ज्यावेळेला सदरची मीटरपेटी उघडावयास गेला त्यावेळेला त्यास वीजेचा धक्का बसला आणि तो खाली पडला आणि वीजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू घडला. तक्रारदाराची ही केस जशीच्या तशी मान्य केलस हे स्पष्टपणे दिसून येते की सदर घटनेच्या वेळेी ती टिनाची मीटरपेटी संपूर्ण रित्या विद्युत भरीत झाली होती आणि अशा विद्युत भारीत पेटीला स्पर्श केल्यामुळे मयताला वीजेचा धक्का बसला आणि त्याचा मृत्यू ओढवला.
16. ज्याअर्थी इलेक्ट्रीक मीटर त्या मीटरपेटीमध्ये बसविले आहे, त्या अर्थी distribution line & service line मधून येणारा विद्युत प्रवाह इलेक्ट्रीक मीटरला जोडला गेला होता. हे स्पष्ट आहे की, सदर मीटरपेटीतील अंतर्गत वायरींगने मीटरपासून पंपाच्या स्टार्टर स्वीचपर्यंत आणि स्टार्टर स्वीचपासून पुढे विद्युत मोटारपर्यंत वायरिंग करुन विद्युत पुरवठा सदर पेटीमध्ये उपलब्ध केला होता. अर्जदारानेच सदर मीटरपेटीची काही छायाचित्रे या कामामध्ये नमूद केलेल्या फेरिस्त सोबत दाखल केली आहे. ती छायाचित्रे म्हणजे मूळ छायाचित्रांचे झेरॉक्सप्रती आहेत. त्या छायाचित्रांचे अवलोकन करता सदर मीटरपेटीच्या वायरिंगमध्ये काही दोष जाणवत नाही. सदर मीटरपेटीमध्ये वायर जाण्याकरिता आणि सदर पेटीमधून वायर बाहेर काढण्याकरिता सदर मीटर पेटीला छिद्र पाडले असावे. अशा छिद्रांमधून सर्व्हिस लाईन मीटरपेटीमध्ये गेलेली असावी आणि अशाच दुस-या छिद्रामधून स्टार्टर स्वीचपासून विहीरीवरील पंपाच्या मोटारपर्यंत वायर काढलेली असावी. या दोन्ही ठिकाणी सर्व्हिस् लाईन आणि स्टार्टर स्वीचपासून निघणारी वायर यांच्या वरील संरक्षण कवच हे काही कारणामुळे खराब होवून त्यातील विद्युत भारीत कंडक्टर्सचा स्पर्श टिनाच्या पत्र्याला होवून सदर पेटी विद्युत भारीत होण्याची दाट शक्यता आहे. ज्याअर्थी तक्रारदाराच्या कथनानुसार मोटार सुरु करण्याच्या उद्देशाने मयताने सदरची पेटी उघडण्याचा प्रयत्न केला त्याअर्थी सदर मीटरपेटीच्यामध्ये बसविलेला स्टार्टर स्वीच हा बंद होता आणि त्यापासून पुढे मोटरपर्यत विद्युत पुरवठा होत नव्हता. त्यामुळेच स्टार्टरपासून निघणा-या वायरमधील कंडक्टर्सचा स्पर्श घटना घडणेपूर्वी टिनाच्या पेटीच्या पत्र्याला होण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे त्रूा वायरमुळे सदर विद्युत पेटी ही विद्युतभारीत होण्याची शक्यता नव्हती. सर्व्हिस लाईन मीटर पेटीपर्यंत येणा-या वायरमध्ये 24 तांस अखंडीतपणे विद्युत प्रवाह होत असतो. हे सर्वज्ञात आहे. अर्थात ज्यावेळेला विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत प्रवाह बंद केल्याने किंवा काही तांत्रिक कारणांमुळे विद्युत पुरवठा खंडीत होतो, त्यावेळेला विद्युत पुरवठा मीटर पेटीपर्यंत होत नाही.
17. तक्रारदाराने नि.26 या फेरिस्त सोबत विद्युत निरिक्षक, मिरज यांनी सदर घटनेबद्दल केलेला चौकशी अहवाल आणि तांत्रिक नकाशाची प्रत याकामी दाखल केल्या आहेत. तसेच नि.4 या फेरिस्त सोबत अ.क्र.5 ला, विद्युत निरिक्षक यांचा दि.9/5/2009 चा अहवाल, जो कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. इस्लामपूर विभाग यांना पाठविला आहे, त्याची प्रत याकामी दाखल केली आहे. सदर अहवालामध्ये विद्युत निरिक्षकांनी सदरचा अपघात वीज कंपनीच्या संच मांडणीमुळे घडलेला आहे असा अहवाल दिला आहे. नि.26 या फेरिस्त अन्वये केलेल्या अहवालामध्ये विद्युत निरिक्षकांनी असे नमूद केले आहे की, अपघात स्थळी लो टेन्शन संच मांडणीचे अर्थिंग सक्षम दिसले व अपघातस्थळी पोलवरुन येणा-या अर्थिंग वायर, बॉक्सच्या अर्थींग नटास जोडलेली दिसली. विद्युत निरिक्षकांनी सदर अहवालामध्ये असे नमूद केले आहे की, Low Tension Distribution line पैकी एक फेज वायर आणि एक न्युट्रल वायर तुटल्याचे समजले. तक्रारदारांनी Distribution line वरील सदर वायर तुटल्याचे फोटो नि.26 ला दाखल केले आहे. त्यासोबत सहायक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी इस्लामपूर यांनी घटनास्थळी काढलेला एक हातनकाशा हजर केला आहे. त्या नकाशानुसार Distribution line मधील नं.4 या खांबावरील एक फेज वायर व न्यूट्रल वायर तुटून पडलेल्या दिसतात. तक्रारदाराच्या कथनानुसार क्र.3 व 4 या खांबावरील एकमेंकांत गुंतल्या होत्या. विद्युत निरिक्षकाने असेही आपले मत नोंदविले आहे की, गंजलेले कंडक्टर्स तुटल्यामुळे मांडणी असुरक्षित झाली होती. याचा अर्थ असा की, Distribution line मधील खांब क्र.3 व 4 यामधील असणा-या वायर्स या गंजल्या होत्या व त्यामुळे तुटल्या होत्या आणि खांब नं.4 वर बसविण्यात आलेल्या वायरीचे कंडक्टर्स हे एकमेकांत गुंतले होते. सदर वायरिंग तुटल्यामुळे आणि वायर्स एकमेकांत गुंतल्यामुळे सदरची Distribution line ही service line पर्यंत विद्युती भारीत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या Distribution line च्या शेवटच्या पोलपासून सर्व्हिल लाईनद्वारे सदर मीटरपेटीमध्ये बसविलेल्या मीटरपर्यंत जी.आय. वायरींगचे अर्थिंग वायर जोडणी केलेली असल्याने सदर अर्थिंगची वायर विद्युत भारीत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या पत्र्याचे वीजमीटर पेटीला सदरचे अर्थिंग वायर जोडली असल्याने, सदरची मीटर पेटी देखील विद्युत भारीत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्रारदाराचे विद्वान वकील ए.बी.जवळे यांनी असे हिरीरीने प्रतिपादन केले की, ग्राहक तक्रारीची संपरिक्षा चालवीत असताना ज्याठिकाणी पुराव्यावरुन दोन अर्थ निघू शकतात, त्याठिकाणी कायद्याच्या ठाम सूत्रानुसार, जो अर्थ ग्राहकाच्या हिताचा काढला जावू शकतो, तोच अर्थ काढावा. सदरचे विद्वान वकीलांनी या विधानाच्या पुष्ठयर्थ वरिष्ठ न्यायालयाचे काही न्यायनिर्णय हजर करतो असे प्रतिपादन केले, परंतु ते हजर करु शकले नाहीत. अर्थात त्यांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या H.N. Shankara Shastry Vs. Asstt. Director of Agriculture, Karnataka, (2004) 6 Supreme Court Cases 230 व LIC Housing Finance Ltd. Vs. Dr. Shivakumaraswamy & Smt. Prema Sudha, 2015(3) CPR 712 (NC) या दंडकाचा आधार घेतला. H.N. Shankara Shastry Vs. Asstt. Director of Agriculture, Karnataka यामध्ये नमूद केलेल्या न्यायनिर्णयामध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले आहे की, ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकाच्या हिताचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पारीत केला असल्याने त्या कायद्याचे उद्दिष्ट पूर्तीकरिता सदर कायद्याचे प्रावधानांचा अर्थ तांत्रिक बाबीत न गुंतता ग्राहकाचे हित लक्षात घेवून त्याचा अर्थ काढावा, तर LIC Housing Finance Ltd. च्या मा.राष्ट्रीय आयोगाच्या वर नमूद निर्णयामध्ये असे नमूद केले आहे की, कायद्याच्या तरतुदीचा अर्थ लावताना ज्या अर्थामुळे पक्षकारावर अन्याय होईल किंवा Absurdity निर्माण होईल असे अर्थ न्यायालयाने काढू नयेत. मा.सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय आयोग यांच्या वर नमूद केलेल्या न्यायदंडकाचा अत्यंत आदरपूर्वक मान ठेवून असे म्हणावे वाटते की, तक्रारदाराच्या विद्वान वकीलांनी जे वर नमूद केलेले प्रतिपादन या मंचासमोर केले त्यास वर नमूद न्यायनिर्णयामुळे कोणतीही मदत मिळू शकत नाही. याठिकाणी या मंचाला समोर आलेल्या पुराव्यातून निघणारा योग्य तो अर्थ काढावयाचा आहे तथापि वर नमूद केलेले न्यायनिर्णय हे कायद्यातील तरतुदींचा अर्थ काढण्यासंबंधी आहेत. त्यामुळे सदरचे न्यायनिर्णय हे तक्रारदारांना कसल्याही प्रकारे मदत करु शकत नाहीत, असे या मंचाचे मत आहे.
18. वर नमूद केल्याप्रमाणे, तक्रारदार हे शाबीत करु शकले नाहीत की सदरची मीटरपेटी ही त्यात बसविलेल्या मीटरच्या पुढे काढलेल्या वायरिंगच्या काही दोषांमुळे विद्युत भारीत झालेली होती. याउलट वर नमूद केलेल्या परिस्थितीमुळे मीटर पेटी हे डांबावरील तुटलेल्या तारांमुळे, विद्युत भारीत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्रारदारानेच आपल्या तक्रारअर्जातील कलम 3 मध्ये, तसेच आपल्या नि.2 ला दाखल केलेलया शपथपत्रामध्ये असे नमूद केले आहे की, जाबदार कंपनीच्या अधिका-यांनी सर्व विद्युत वाहिनीच्या तारा व्यवस्थितपणे योग्य पध्दतीने राखलेल्या नसल्याने तुटल्या व तुटलेल्या तारा एकमेकांत गुंतल्या व वर नमूद पेटीमध्ये वीजप्रवाह उतरुन मीटर पेटीचे दार उघडत असताना प्रकाश भीमराव बाबर यांना वीजेचा शॉक बसून ते मयत झाले. तक्रारदाराचे हेच पक्षकथन तक्रारदाराच्या केसविरुध्द जाते व आपल्या मा.राज्य आयोगाच्या वर नमूद केलेल्या न्यायनिर्णयानुसार, प्रस्तुत प्रकरणामध्ये जाबदार विद्युत वितरण कंपनी आणि तक्रारदार यांचेमध्ये ग्राहक आणि सेवा देणार असे नाते उत्पन्न होत नाही. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देणे भाग पडत आहे. म्हणून ते नकारार्थी दिले आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
19. ज्याअर्थी तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(ड) अन्वये ग्राहक होत नाहीत, त्याअर्थी त्यांना या प्रकरणात कोणतीही दाद मिळणेचा हक्क नाही व प्रस्तुतची तक्रार चालण्यास पात्र नाही. त्यामुळे मुद्दा क्र.2 ते 4 या मंचासमोर निर्णयाकरीता उद्भवत नाहीत असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. सबब, आम्ही त्यांचे उत्तर नकारार्थी दिले आहे.
मुद्दा क्र.5
20. ज्याअर्थी प्रस्तुत तक्रार चालण्यास पात्र नाही, त्याअर्थी ती खारीज करावी लागेल असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. सबब, आम्ही खालील आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. प्रस्तुतची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. उभय पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावयाचा आहे.
3. या आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क देण्यात याव्यात व प्रकरण दफ्तर दाखल
करावे.
सांगली
दि. 19/03/2016
सौ मनिषा कुलकर्णी सौ वर्षा नं. शिंदे ए.व्ही.देशपांडे
सदस्या सदस्या अध्यक्ष