नि.19
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - सौ वर्षा नं. शिंदे
मा.सदस्या - सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र.46/2013
तक्रार नोंद तारीख : 26/04/2013
तक्रार दाखल तारीख : 04/05/2013
निकाल तारीख : 29/03/2014
---------------------------------------------------
1. श्री.बबन (भाऊसो) आत्माराम गडदे
व.व.54, व्यवसाय – शेती,
2. सौ.सुवर्णा बबन (भाऊसो) गडदे
व.व.47, व्यवसाय – घरकाम
दोघे रा.मु.पो.अग्रण धुळगांव,
ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली. ....... तक्रारदार
विरुध्द
1. व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी लि.मुंबई
श्री.अजय मेहता
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी
2. महाराष्ट्र राज्या विदयुत वितरण कंपनी मर्या. मुंबई
शाखा – सं.व सु. विभाग कवठेमहांकाळ,
अंबिका चित्र मंदीराजवळ, ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली.
तर्फे कार्यकारी अभियंता,
श्री.विश्वास रामु कांबळे
व.व.सज्ञान, धंदा- नोकरी ....... जाबदार
तक्रारदार तर्फे - अॅड श्री.एम.एन.शेटे जाबदार तर्फे – अॅड श्री यू.जे.चिप्रे
- नि का ल प त्र –
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार मयत अनिल बबन उर्फ भाऊसाहेब गडदे याच्या आई-वडिलांनी जाबदारांच्या निष्काळजीपणाने अनिल बबन (उर्फ भाऊसाहेब) गडदे याच्या दि.10/06/2000 रोजी दुपारी 11.30 मिनीटांनी तो शेतामध्ये कुळपणी करत असताना शेतातील लघुदाब वाहिनीची न्यूट्रल वायर तूटून लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे झालेल्या मृत्युमुळे, तसेच, त्याच्या बैलाच्या झालेल्या मृत्युमुळे एकूण नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.18,80,000/- ची नुकसानभरपाई व मानसिक त्रासाबद्दल रु.8,500/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- ची मागणी करुन, ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 11 व 12 खाली दाखल केलेली आहे. तक्रारदारांचे थोडक्यात कथन असे की दि.10/06/2011 रोजी दुपारी 11.30 चे सुमारास मयत अनिल बबन गडदे हा त्याच्या बैलांच्या सहाययाने त्याचे शेतामध्ये कुळपणी करत होता. कुळपणी करत असताना त्या शेतात असलेल्या लघुदाब वाहिनीखाली तो आला असता सदर लघुदाब वाहिनीमधील न्युट्रल वायर त्याच्या बैलांवर तुटून पडली. तुटलेल्या वायरचा स्पर्श झाल्यामुळे बैल खाली पडला. त्यावेळेला मयत अनिल ती वायर काढण्यास गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसून अनिल व त्याचा बैल दोघेही जागीच मयत झालेले आहेत.
2. मयत अनिल हा तक्रारदारांचा एकुलता एक मुलगा होता. तक्रारदार क्र.1 बबन ऊर्फ भाऊसाहेब आत्माराम गडदे याचे नावे विद्युत जोड आहे त्यामुळे तक्रारदार व मयत हे जाबदारांचे ग्राहक आहेत. जाबदार क्र.1 व 2 यांनी प्रस्तुत प्रकरणात कर्तव्यच्युती केलेली आहे व गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिलेली आहे. सबब तक्रारदारांनी नुकसानभरपाईकरीता जून 2011 मध्ये जाबदारांकडे अर्ज दाखल केलेला होता. अपघात झालेनंतर तक्रारदारांना रक्कम रु.20,000/- इतकीच अंत्यविधीचा खर्च म्हणून जाबदारांनी दिलेली आहे. तथापी अद्यापही कसलीही नुकसानभरपाई तक्रारदार यांना दिलेली नाही. जाबदार क्र.1 व 2 हयांनी आपल्या सामुग्रीचे व्यवस्थित व्यवस्थान केलेले नसल्यामुळे व दुर्लक्ष केलेले असल्याने तक्रारदारांच्या एकुलल्या एक मुलाचा नाहक बळी गेलेला आहे व जाबदारांनी तक्रारदारास सदोष सेवा दिलेली आहे. सबब अपघात तारखेपासून नुकसानभरपाईच्या रकमेवर द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
3. तक्रारदारांचे पुढे असे म्हणणे आहे की तक्रारदार यांना चार एकर शेती असून त्यातील दिड एकर बागायत शेती आहे तर अडीच एकर शेती जिरायत शेती आहे. तक्रारदार व मयत अनिल मिळून सदर शेती करीत होते व त्यात गहू, खपली, शाळू व बाजरी यांची पिके घेत होते. त्याकरीता त्यांनी शेतीला उपयोगी पडणारी सर्व प्रकारची औजारे, बैलजोडी व बैलगाडी खरेदी केलेली होती. स्वतःचे शेतीची मशागत करुन राहिलेला वेळ मयत अनिल दुस-यांच्या शेतीची रोजंदारीवर आपली बैल व औजारे घेवून मशागत करुन देत होता व त्याला दिवसाला बैलाची म्हणून रक्कम रु.250/- व स्वतःची मजूरी म्हणून रक्कम रु.150/- अशी एकूण रक्कम रु.400/- मिळत होती. वर्षाकाठी 6 महिने त्याला बैलभाडयाचे काम मिळत होते. मयत झालेला बैल तक्रारदार यांनी कोंगनुळी, ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली येथील रहाणार संभाजी तुकाराम खोत हयाकडून रु.65,000/- ऑक्टोबर 2009 साली विकत घेतलेला होता. तो बैल अत्यंत जातीवंत, खिलार, देशी व तीन वर्षांचे खोंड होते. जून 2011 मध्ये सदर बैलाला धावण्याच्या शर्यतीकरीता म्हणून रु.1,00,000/- किंमतीला एका गि-हाईकाने मागणी केली होती. परंतु त्यावेळेस सदर बैल विकण्यात आला नव्हता. अपघातात सदरचा बैल मेल्यामुळे दुसरा बैल तक्रारदारास कमी किंमतीत विकावा लागला. त्यांची शेतीची औजारे गंजून कुजून गेली. अशाप्रकारे तक्रारदारांचे बैलाचे व औजारांचे रक्कम रु.1,25,000/- चे नुकसान झालेले आहे. एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्युमुळे तक्रारदारांना जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे. त्यांची शेती पडीक अवस्थेत पडलेली आहे. बैलांपासून होणारे भाडयाचे उत्पन्नदेखील बंद झालेले आहे. मयत अपघाताचेदिवशी 24 वर्षे वयाचा होता. त्याचे दरमहाचे निव्वळ उत्पन्न रु.6,000/- होते त्याने किमान पुढील 36 वर्षे सदरचे उत्पन्न किंवा त्यापेक्षा अधिक उपत्न्न मिळविले असते. सबब त्याच्या मृत्यमुळे होणा-या भविष्यातील नुकसानीखातर रक्कम रु.17,00,000/- तक्रारदारास देणेचा हुकूम करण्यात यावा. बैलाचे अपघाती निधन झालेमुळे त्याची किंमत रु.1,00,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळावी, तक्रारदारांचा म्हातारपणाचा आधार तुटल्याने व ते पुत्रसुखापासून वंचित राहिल्यामुळे त्यांना रक्कम रु.80,000/- देणेचा आदेश जाबदारांना व्हावा, त्यांची विनाकारण छळवणूक व मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांना प्रत्येकी रु.8,500/-, तसेच, या अर्जाचा खर्च म्हणून प्रत्येकी रु.3,000/- देणेचे आदेश जाबदारांस व्हावेत अशी मागणी तक्रारदार यांनी केलेली आहे.
4. आपल्या तक्रारअर्जामधील कथनांच्या पृष्ठयर्थ तक्रारदारांनी तक्रारदार क्र.1 बबन उर्फ भाऊसाहेब आत्माराम गडदे यांचे नि.2 ला शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच नि.4 या फेरीस्तसोबत एकूण 13 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. जाबदार क्र.1 व 2 हयांनी हजर होवून आपली लेखी कैफियत नि.12 ला दाखल करुन तक्रारदाराची संपूर्ण मागणी अमान्य केलेली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मयत अनिल बबन गडदे किंवा तक्रारदार हे जाबदार कंपनीचे ग्राहक नाहीत. त्यांना जाबदार कंपनीने कधीही व केव्हाही कोणत्याही प्रकारची सेवा जाबदारांनी पुरविलेली नाही. त्यांचेकडून कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारलेले नाही किंवा कोणत्याही प्रकारे विजपुरवठा केलेला नाही. जाबदारांनी कोणतीही कर्तव्यच्युती केलेली नाही किंवा कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. जाबदारांचे म्हणण्याप्रमाणे घटनेच्यादिवशी अचानकपणे झालेल्या वादळामुळे गडदे यांच्या विहीरीवरील पोलवरील गार्डलूपमधून न्यूट्रल वायर तुटून खाली पडली व त्याच्या पूर्वेकडील पोल नं.3 वरील गार्डलूपवरुन एक नंबर फेजला चिटकल्यामुळे न्युट्रल वायरमध्ये विदयुतप्रवाह आला व ती विदयुतभारीत न्युट्रल वायर बैलाच्या अंगावर पडली व त्यामुळे घटना घडली. या सर्व बाबी अचानक आलेल्या वादळामुळे व पावसामुळे घडलेल्या आहेत (Act Of God). त्यामुळे त्यामध्ये जाबदारांचा कोणताही दोष नाही. बैलाला न्युट्रल वायरमधून विदयुत धक्का बसल्याचे दिसल्यानंतर मयत अनिल हयाने ती वायर काढण्याचा प्रयत्न करणे हेच चुकीचे व निष्काळजीपणाचे आहे त्यामुळे मयत अनिल यास झालेला अपघात व त्याचा अपघाती मृत्यु हा त्याचे स्वतःचे निष्काळजीपणामुळे व बेफिकरीपणामुळे झालेला आहे. जाबदारांच्या नियमाप्रमाणे जाबदार कंपनीचा दोष असल्यास किंवा नसतानादेखील विजेचा शॉक लागून मृत्यु झाल्यास मयत व्यक्तिच्या वारसांना रक्कम रु.2,00,000/- देण्याबद्दल परिपत्रके काढण्यात आलेली आहेत. मयताचे वय व उत्पन्न इ.कोणत्याही बाबी विचारात न घेता सदरची रक्कम रु.2,00,000/- देण्याच्या तरतूदी आहेत. त्याकरीता जाबदार विदयुत कंपनीकडे रितसर अर्ज करावा लागतो. जाबदार कंपनी अपघातानंतर तातडीची मदत म्हणून रक्कम रु.20,000/- देत असते व तशी रक्कम जाबदार कंपनीने तक्रारदारांना दिलेली आहे. ही रक्कम अदा केल्यामुळे जाबदारांच्या सेवेमध्ये त्रुटी होत्या असे म्हणता येत नाही. जाबदारांनी असे स्पष्टपणे नमूद केले आहे की कंपनीच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्याकरीता तक्रारदारानी अर्ज केल्याचेही दिसत नाही. जाबदारांच्या चुकीमुळे तक्रारदारांचा मुलगा व बैल मरण पावला हे तक्रारदारांचे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जात विषद केलेले मयताचे संपूर्ण उत्पन्न व त्याबद्दलीची सर्व कथने मयत बैलाची किंमत व त्याबाबत आलेली मागणी याबाबतची कथने जाबदारांनी स्पष्टपणे नाकारलेली आहेत. तक्रारदारांनी मागणी केलेप्रमाणे नुकसानभरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत हे कथनदेखील जाबदारांनी स्पष्टपणे नाकबूल केले आहे व तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे.
6. जाबदारांनी आपल्या लेखी कैफियतीच्या पृष्ठयर्थ श्री.सुदाम पुरभाजी राखे यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
7. तक्रारदारांनी पुराव्यादाखल नि.14 सोबत काही कागदपत्रे दाखल केलेली असून नि.15 ला पुरशीस दाखल करुन आपणास हयापेक्षा जास्त लेखी अथवा तोंडी पुरावा देणेचा नाही म्हणून पुरशीस सादर केली आहे. तर जाबदारांनी नि.16 ला पुरशीस दाखल करुन आपणास लेखी अथवा तोंडी पुरावा दयावयाचा नाही असे निवेदन दिलेले आहे.
8. प्रस्तुत प्रकरणात आम्ही तक्रारदारांतर्फे त्यांचे विद्वान वकिल श्रीमती संध्या कुलकर्णी व ऍड.एन.एम.शेटे तर जाबदारांतर्फे त्यांचे विद्वान वकिल श्री.यु.जे.चिप्रे यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. जाबदारांचे विद्वान वकिल श्री.यु.जे.चिप्रे यांनी मा.राज्य आयोगाच्या महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी लि. व इतर विरुध्द बाबालाल गांधी (First Appeal No.A/07/227) आणि बाबालाल के. गांधी विरुध्द महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी (First Appeal No.A/07/228) या दोन अपीलातील दि.10/03/10 च्या एकत्रित निकालावर भर दिला.
9. प्रस्तुत प्रकरणात आमच्या निष्कर्षास खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार प्रस्तुत तक्रारीच्या कामी जाबदारांचे ग्राहक होतात काय ? नाही.
2. तक्रारदारांनी तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे जाबदारांनी त्यास
दुषीत सेवा दिली आहे हे शाबित केले आहे काय ? उद्भवत नाही.
3. तक्रारदारांना मागितल्याप्रमाणे नुकसानभ्रपाई मिळणेस ते पात्र
आहेत काय ? नाही.
4. अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे.
10. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
कारणे
11. मुद्दा क्र.1
जाबदारांनी तक्रारदार जाबदार क्र.1 विदयुत वितरण कंपनीचे ग्राहक होत नाहीत असा बचाव घेतलेला
आहे. तर तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार क्र.1 हयाचे नावे विदयुत जोडणी घेतलेली असून त्या अन्वये
तक्रारदार व मयत अनिल हे जाबदारांचे ग्राहक होतात. तक्रारदार ग्राहक होतात हे दर्शवण्याकरीता तक्रारदारानी
नि.14 या फेरिस्तसोबत आपल्या रामपूरवाडी ता.कवठेमहांकाळ या गावी असणा-या शेतांचा आठ अ चा उतारा व
गट नं.63 या शेतजमीनीचा सातबाराचा उतारा दाखल केलेला आहे. त्याचबरोबर अग्रणधुळगांव, हया गावी
त्यांना दिलेल्या एजी 398 हया शेतजमिनीत दिलेल्या विदयुत जोडणीच्या व मिटर क्र.5309447103 हया
मिटरच्या तीन एच.पी.चा संलग्न भार असलेल्या जोडणीकरीता दि.30/07/13 चे विदयुत देयक दि.08/08/13 चे
विदयुत देयक इ. हजर केलेले आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सदर घटना ही त्यांच्या शेतात असलेल्या
लघूदाब विदयुत वाहिनीची एक तार तुटून व ती मयत चालवित असलेल्या बैलाच्या अंगावर पडून झाली व त्यात
बैलास वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मयताने त्या तारेस स्पर्श केल्यामुळे त्यासदेखील विजेचा धक्का बसून
त्याचा मृत्यु झाला व सदरची विदयुत वाहिनी ही जाबदारांनी त्याची योग्य ती देखभाल न केल्याने तुटली आणि
ही जाबदारांची सेवेतील त्रुटी असून त्यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे प्रस्तुतची घटना घडली. सदरची घटना
घडल्याबद्दल जाबदारांनी आपल्या लेखी कैफियतीमध्ये कबूल केलेले आहे. तथापी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे
सदरची तार ही अचानक आलेल्या वादळामुळे व पावसामुळे तुटली व ती घटना ऍक्ट ऑफ गॉड होती. इथे हे
नमूद करणे आवश्यक आहे की सदरची विदयुत वाहिनी ही नेमकी कशामुळे तुटली हयाबद्दल उभय पक्षांपैकी
कोणीही पुरावा दिलेला नाही. पण ही बाब वादातीत आहे की तक्रारदारांच्या शेतात असलेल्या लघुदाब विदयुत
वाहिनीची एक तार तुटून खाली पडली व ती विदयुत भारीत तार असल्याने विजेचा धक्का बसून तक्रारदारांचा
मुलगा व बैल मरण पावले. तक्रारदारांनी घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर भेट देवून तयार केलेल्या
घटनास्थळाच्या पंचनाम्याची प्रत नि.4/8 ला दाखल केलेली आहे. तसेच जाबदारांच्या अधिका-यांनी
घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचा पंचनामा करुन जो नकाशा तयार केला त्या नकाशाची एक प्रत नि.4/2 ला
दाखल केली व नि.4/3 ला घटनेच्या अहवालाची प्रत सादर केली. त्या प्रतीवरुन हे दिसते की रामपूरवाडी व
अग्रणधूळगांव ही दोन्हीही गावे एकच आहेत. असो. घटनास्थळाच्या पंचनाम्यावरुन असे दिसते की अपघाताचे
ठिकाण हे तक्रारदाराच्या शेतात असणा-या विहिरीवरील विदयुत पंपाकरीता देण्यात आलेल्या विदयुत वाहिनीच्या
खांबापासून 175 फूट अंतरावर पूर्वेकडे आहे. ज्या ठिकाणी विहीरीपाशी असणा-या पोलवर विदयुत पेटी
बसवलेली आहे. त्या ठिकाणी सदरचा अपघात घडलेला नाही. मा.राज्य आयोगाने वर नमूद केलेल्या एकत्रित
निकालांमधील निष्कर्षांवरुन ही बाब अत्यंत महत्वाची आहे.
12. महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी व इतर विरुध्द बाबूलाल कु. गांधी आणि श्री.बाबुलाल के.गांधी
विरुध्द महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी हया अपीलांचे निकालामध्ये मा.राज्य आयोगाने ग्राहक संरक्षण
कायदयाच्या कलम 2 क मध्ये देण्यात आलेल्या ग्राहक हया संज्ञेची व्याख्या त्याच शब्दाची इंडियन इलेक्ट्रीसिटी
ऍक्ट व त्यातील नियम, तसेच डिस्ट्रीब्युटिंग मेन व इलेक्ट्रीक सप्लाय लाईन, विदयुत जोडणी म्हणजे काय,
सर्व्हिस लाईन म्हणजे काय यांचा तौलनिक अभ्यास करुन व त्यांच्या व्याख्या विषद करुन विदयुत कंपनीच्या
संदर्भात ग्राहक कोण हयाबद्दल निर्देश दिलेले आहेत. मा.राज्य आयोगाने त्यांच्यासमोर करण्यात आलेले
युक्तिवाद की ज्यावेळेला एखादी व्यक्ति किंवा एकपेक्षा जास्त व्यक्तिंना विदयुत संचाची जोडणी करुन विदयुत
वितरण कंपनीच्या लाईनला जोडल्यानंतर अशी किंवा अशा व्यक्ति कुठेही एखादी घटना घडू देत किंवा कुठल्याही
ट्रान्समीशन लाईनसंबंधी घटना घडू देत अशा घटनेच्याद्ष्टीने अशा व्यक्ति या विदयुत वितरण कंपनीच्या ग्राहक
होतात हा युक्तिवाद नाकारलेला आहे. मा.राज्य आयोगाने हे त्या निकालात स्पष्ट केले आहे की Main हया
शब्दाचा अर्थ म्हणजे अशी विदयुत वाहिनी की ज्या वाहिनीतून सर्व जनतेला विदयुत उपलब्ध करुन देण्यात
येते. Distribution Main म्हणजे Main या विदयुत वाहिनीचा तो भाग की ज्याला सर्व्हिस लाईन जोडली जाते.
सर्व्हिस लाईन म्हणजे अशी विदयुत वाहिनी की ज्यातून एखादया / एकटया ग्राहकाला डिस्ट्रीब्युशन मेनमधून
वीजपुरवठा केला जातो. ग्राहक तक्रारीच्या संदर्भात मा.राज्य आयोगाने सदर निकालामध्ये असे स्पष्टपणे
नमूद केलेले आहे की वीजवितरण कंपनी ही ग्राहकास त्याच्या जागेत बसवलेल्या इलेक्ट्रीक मिटरपासून देत
असते. विदयुत मिटरपर्यंत आलेली विदयुत वाहिनीची जोडणी ही विदयुत वितरण कंपनीच्या मालकीची असते.
सदरची जोडणी ही वीजेचा प्रवाह ग्राहकाच्या जागेपर्यंत आणण्यासाठी केलेली असते. ग्राहकाच्या जागेपर्यंत
विदयुत प्रवाह डिस्ट्रीब्युशन मेन पासूनसप्लाय लाईनव्दारे आणला जातो आणि सप्लाय लाईन ही ट्रान्समीशन
किंवा मेन लाईन म्हणली जावू शकत नाही. कोणत्याही एका व्यक्तिगत विदयुत ग्राहकाचे वीजवितरण कंपनीचे
ग्राहक हे नाते त्याचे जागेत बसवलेल्या इलेक्ट्रिक मिटरपासून सुरु होते आणि त्या ठिकाणपासून विदयुत सेवा
ग्राहकास मिळणेस सुरुवात होते. ट्रान्समीशन लाईनमध्ये जो बिघाड निर्माण होतो त्याला सेवेतील त्रुटी म्हणता
येत नाही. मा.राज्य आयोगाने आपल्या हया निष्कर्षाकरीता मा.राष्ट्रीय आयोगाच्या शंकर सिताराम जाधव
विरुध्द महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ हया (1994 एसटीपीएल (सीएल) 582 एनसी) हया निकालाचा आधार
घेतला आहे. सदर प्रकरणामध्ये सोसाटयाच्या वा-यासह झालेल्या भारी पावसामुळे रस्त्यालगत असलेल्या एका
झाडाची फांदी ट्रान्समीशन वायरवर पडून ट्रान्समीशन लाईन तुटली व ती रस्त्यावर पडली. या प्रकरणातील
मयत हा अपघाताने सदर तुटून पडलेल्या वायरला स्पर्श केलेल्या एका व्यक्तिस सहायय करीत असताना सदर
विदयुत भारीत वायरला त्याचा स्पर्श होवून त्याला विदयुत शॉक लागून मरण पावला होता. हया घटनेमध्ये
वीज वितरण कंपनीने मयतास कोणतीही दूषीत सेवा दिलेली नाही असा निष्कर्ष मा.राष्ट्रीय आयोगाने काढलेला
होता. ज्या ट्रान्समीशन लाईनमधून वायर तुटून खाली पडली होती ती ट्रान्समीशन लाईन मयताचे घरची
सप्लाय लाईन नव्हती. त्याच निकालात आपले मा.राज्य आयोगाने, मा.राष्ट्रीय आयोगाच्या हरियाणा राज्य
विदयुत मंडळ विरुध्द गंगादेवी (1997 सीसीजे 1541 ) तसेच हरियाणा राज्य विदयुत मंडळ विरुध्द शेरसिंग
हया प्रकरणातील निकालांचा तसेच उत्तर प्रदेश ग्राहक तक्रार निवारण आयोग लखनौच्या उत्तर प्रदेश राज्य
विदयुत मंडळ व इतर विरुध्द मुन्नू (2004 सीसीजे 390 ) या निकालांचा उल्लेख केलेला आहे. मा.राज्य
आयोगाने आपले निकालपत्रात असे नमूद केलेले आहे की सदर प्रकरणातील अपघात अशा ठिकाणी घडलेला नाही
की जेथून विदयुत प्रवाह तक्रारदाराच्या जागेत येत नाही किंवा ज्या ठिकाणाहून तक्रारदाराच्या जागेमध्ये विदयुत
प्रवाह देण्यात आलेला आहे. मेन लाईन किंवा डिस्ट्रीब्युटींग लाईनमध्ये असणा-या विदयुत वाहिनींच्या
जोडणीमध्ये असणा-या दोषामुळे व त्यावेळेला झालेल्या सोसाटयाच्या वा-यामुळे झालेले शॉर्टसर्किट आणि
उडालेल्या ठिण्गयांमुळे अपघात झालेला आहे. केवळ त्या विदयुत वाहिन्या तक्रारदाराच्या शेतातून जात आहेत
आणि केवळ तक्रारदाराने विदयुत कनेक्शन घेतलेले आहे एवढयावरुन हया प्रकरणातील तक्रारदार व विदयुत
वितरण कंपनी यामध्ये ग्राहक आणि सेवा देणार हे नाते उत्पन्न होत नाही. मा.राज्य आयोगाने हे स्पष्ट केलेले
आहे की ज्या ठिकाणी ग्राहकाच्या जागेमध्ये विदयुत प्रवाह येतो त्या ठिकाणापासून पुढे ग्राहक आणि विदयुत
वितरण कंपनीमध्ये ग्राहक आणि सेवा देणार हे नाते तयार होते. मा.राज्य आयोगाच्या हया निकालामुळे आम्ही
वर नमूद केलेले अपघाताचे ठिकाण जे घटनास्थळाच्या पंचनाम्यावरुन दिसून येते ते महत्वाचे आहे.
पंचनाम्यावरुन हे स्पष्ट होते की घटनास्थळ तक्रारदाराचे विहीरीजवळ बसवलेल्या मिटरपासून 175 फूट अंतरावर
आहे. जाबदारांच्या अधिका-यांनी जो घटनास्थळाचा नकाशा काढलेला आहे आणि ज्याची प्रत तक्रारदारांनी
याकामी दाखल केलेली आहे त्यावरुन असे दिसते की तक्रारदाराच्या विहीरीवर बसवलेल्या विदयुत मोटरीकरीता
ज्या खांबावरुन विदयुत प्रवाह तक्रारदारास देण्यात आलेला आहे त्या खांबापासून इतरत्र जाणा-या विदयुत
वाहिनीच्या दुस-या खांबाजवळ सदरची वायर तुटून खाली पडलेली असून तिथे ही घटना घडलेली आहे याचा
अर्थ असा की ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी तक्रारदाराच्या Premises मध्ये विदयुत प्रवाह जात
नव्हता तो तीथून पुढे जात होता. जरी ते ठिकाण तक्रारदाराच्या मालकीच्या शेतामध्ये होते आणि जरी ती
विदयुत वाहिनी तक्रारदाराच्या मालकीच्या शेतातून जात होती तरी अपघाताच्या नेमक्या ठिकाणी मा.राज्य
आयोगाच्या वर नमूद न्यायनिर्णयांप्रमाणे तक्रारदार व जाबदार विदयुत वितरण कंपनी हयांच्यामध्ये ग्राहक
आणि सेवा देणार हे नाते नव्हते. मा.राज्य आयोगाचा वरील न्याय निर्णय हया मंचावर बंधनकारक आहे.
13. तक्रारदारांच्या विद्वान वकिल ऍड.श्रीमती संध्या कुलकर्णी हयांनी असा हिरीरीने युक्तिवाद केला की
मा.राज्य आयोगाचा वरील निकाल हा ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 24 अन्वये झालेला अंतिम निर्णय
नव्हे. त्या निर्णयाविरुध्द त्यांनी स्वतः मा.राष्ट्रीय आयोगासमोर अपील दाखल केलेले असून ते अपील
अदयापही प्रलंबित आहे. तसेही पहाता मा.राष्ट्रीय आयोगाने तसेच मा.सर्वोच्च न्यायालयानेदेखील इतर ब-याच
प्रकरणांमध्ये मोकळया जागेत विदयुत वाहिनी तुटून झालेल्या अपघाताकरीता ग्राहक संरक्षण कायदयाखाली
संबंधीत विदयुत वितरण कंपन्यांना नुकसानभरपाई देण्यास जबाबदार धरलेले आहे व त्या प्रकरणांतील तक्रारदार
व विदयुत वितरण कंपन्यांमध्ये ग्राहक आणि सेवा देणार हे नाते असल्याचे ठरविलेले असल्याने हया सर्व
निकालांमुळे आपले मा.राज्य आयोगाचा वरील निकाल/न्यायनिर्णय हा निष्प्रभ ठरतो. सबब तो हया मंचावर
बंधनकारक नाही असा युक्तिवाद केला. आपल्या युक्तिवादाचे पृष्ठयर्थ विद्वान वकिलांनी दक्षीणी हरियाणा
बिजली वितरण निगम विरुध्द प्रमिलादेवी व इतर (2013(2)सीपीआर 181(एनसी)) तसेच अजमेर विदयुत
वितरण निगम विरुध्द पार्थू व इतर (1(2013)सीपीजे 169(एनसी)) हया मा.राष्ट्रीय आयोगाच्या तसेच बलराम
प्रसाद विरुध्द डॉ.कुनाल शहा व इतर (IV(2013)सीपीजे 1) मा.सर्वोच्च न्यायालयाच्या यु.पी.पॉवर कार्पोरेशन
विरुध्द अनिस अहमद (एआयआर 2013 सुप्रीम कोर्ट 2766 ) व इतर न्यायनिर्णयांचा संदर्भ दिला.
14. हे जरुर आहे की तक्रारदाराचे विद्वान वकिल नमूद करतात त्याप्रमाणे भरपूर प्रकरणांत मोकळया
जागेत विदयुत वाहिनीच्या तारा तुटून झालेल्या अपघातामध्ये विदयुत वितरण कंपनी आणि संबंधीत यांचेमध्ये
ग्राहक आणि सेवा देणार हे नाते गृहीत धरुन नुकसानभरपाई देण्यात आलेली आहे. तथापी आपल्या मा.राज्य
आयोगाचे निकाल हे राज्यातील जिल्हा ग्राहक मंचांवर बंधनकारक असतात आणि आहेत. जरी तक्रारदाराच्या
विदवान वकिलांनी असे नमूद केले आहे की त्यांनी राज्य आयोगाच्या सदर न्यायनि र्णयाविरुध्द अपील दाखल
केलेले असून ते प्रलंबित असल्यामुळे तो निकाल अंतिम निकाल मानता येत नाही तरीही ग्राहक संरक्षण
कायदयाच्या कलम 24 खाली अंतिम निकाल ही संकल्पना आदेशांच्या अंमलबजावणी (Execution )संदर्भातील आहे. हयाचा अर्थ असा नव्हे की केवळ राज्य आयोगाच्या निर्णयाविरुध्द मा.राष्ट्रीय आयोग किंवा मा.सर्वोच्च न्यायालय यांचेपुढे अपील प्रलंबित असल्याने मा.राज्य आयोगाचा निकाल हा जिल्हा मंचांवर बंधनकारक राहू शकत नाही. जोपर्यंत मा.राज्य आयोगाच्या निकालांविरुध्द सक्षम न्यायालयाने काही मत प्रदर्शीत केलेले नाही किंवा तो निकाल किंवा त्यातील निष्कर्ष हे रद्दबातल ठरवलेले नाहीत तोपर्यंत ते मा.राज्य आयोगांचे निकाल जिल्हा मंचावर बंधनकारक असतात. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणातील अपघाताचे ठिकाण पहाता त्याठिकाणी तक्रारदार व जाबदार विदयुत वितरण कंपनीमध्ये ग्राहक आणि सेवा देणार हे नातेसंबंध नव्हते. म्हणून त्या घटनेकरीता तक्रारदारांना या ग्राहक मंचाकडे धाव घेवून जाबदारांनी त्यांना सेवेत त्रुटी दिली व त्या त्रुटीमुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले असे म्हणून नुकसानभरपाई मागता येत नाही. हे जरुर आहे की तक्रारदारांना दिवाणी न्यायालयामध्ये सदर घटनेबाबत टॉर्टखाली किंवा फेटल ऍक्सीडेंट ऍक्टस च्या कलमाखाली खटला दाखल करुन नुकसानभरपाई मागता येईल व ती नुकसानभरपाई ग्राहक आणि सेवा देणार या संज्ञेखाली त्यांना या मंचाकडून मागता येणार नाही. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे ग्राहक आणि सेवा देणार असे नातेसंबंध नसल्याने प्रस्तुतची तक्रार या मंचापुढे चालणेस पात्र नाही. सबब आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी दिलेले आहे.
15. मुद्दा क्र.2 ते 4 एकत्रित
ज्याअर्थी तक्रारदार व जाबदार यामध्ये ग्राहक आणि सेवा देणार हे नाते नाही व ज्याअर्थी तक्रारदारांची
प्रस्तुत तक्रार या मंचासमोर चालू शकत नाहीत त्याअर्थी प्रस्तुत प्रकरणातील इतर मुद्दे हे उद्भवत नाहीत आणि त्या मुद्दयाचा विचार करणेचे प्रयोजन नाही. तक्रारदाराची तक्रार चालू शकत नाही. तक्रारदार हया प्रकरणात घडलेल्या घटनेबद्दल नुकसानभरपाई मागू शकत नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार खारीज करणेस पात्र आहे असा या मंचाचा निकर्ष्ष आहे. तथापी तक्रारदारांचा दिवाणी न्यायालयासमोर खटला दाखल करुन नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार हा अबाधीत आहे. सबब मुद्दा क्र.2 ते 4 यांचे नकारार्थी उत्तर देवून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2. प्रस्तुत प्रकरणातील विविक्षीत परिस्थितीमुळे उभय पक्षकारांनी आपापला खर्च आपण सोसायचा आहे.
सांगली
दि. 29/03/2014
( सौ मनिषा कुलकर्णी ) ( सौ वर्षा नं. शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्या अध्यक्ष