तक्रारदारातर्फे अॅड. श्री. घोणे हजर.
जाबदेणार गैरहजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(24/04/2014)
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार यांचेविरुद्ध सेवेतील त्रुटीसंदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. त्यातील कथने खालीलप्रमाणे.
1] तक्रारदार हे खंडोबाची पाल, जिल्हा – सातारा येथील रहीवासी असून जाबदेणार हे कोरेगांव पार्क, पुणे येथे होमिओपॅथी क्लिनिक चालवितात. जाबदेणार यांनी दैनिक ‘पुढारी’ या वृत्तपत्रामध्ये जाहीरात देऊन टक्कल पडलेल्या व चाई पडलेल्या लोकांना शास्त्रीय पद्धतीने केसांचे रोपन करुन गळणारे केस थांबवितात, अशी जाहीरात दिली होती. त्यानुसार तक्रारदार हे जाबदेणार यांचेकडे गेले. तक्रारदार यांनी दि. 11/9/2011 रोजी रक्कम रु. 300/- प्रवेश फी भरली. त्यानंतर नियमाप्रमाणे जाबदेणारांकडे तीन महिन्यांकरीता रक्कम रु. 18,000/- भरले. परंतु जाबदेणार यांनी दिलेल्या उपचारामुळे तक्रारदारांना फरक पडला नाही. अशा प्रकारे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कसुर केली व तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाची सेवा दिली. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याशी वेळोवेळी मोबाईलद्वारे संपर्क साधला, परंतु जाबदेणार यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना दिला नाही. दि. 20/12/2012 रोजी तक्रारदार यांनी जाबदेणार यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली, परंतु त्या नोटीसीलाही जाबदेणार यांनी उत्तर दिले नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून औषधोपचारासाठी रक्कम स्विकारलेली आहे व तक्रारदार व जाबदेणार यांचेमध्ये ‘ग्राहक’ आणि ‘सेवा पुरवठादार’ असे नाते निर्माण झालेले आहे. तक्रारदार यांना सदर सेवा न मिळाल्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास झाला, त्यामुळे त्यांनी प्रस्तुतची तक्रर दाखल केली. तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून त्यांनी स्विकारलेली रक्कम रु. 18,300/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व कोर्ट खर्च म्हणून रक्कम रु. 15,000/- ची मागणी केलेली आहे.
2] जाबदेणार यांना नोटीस बजावूनही ते गैरहजर राहीले त्यामुळे प्रस्तुतचे प्रकरण एकतर्फा चौकशीसाठी ठेवण्यात आले.
3] तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र, जाबदेणार यांनी दिलेल्या पावत्या, रजिस्टर्ड नोटीसीची स्थळप्रत इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4] तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा निरुत्तर करण्यासाठी जाबदेणार यांनी कोणताही पुरावा दाखल केला नाही. तक्रारदार यांनी शपथपत्र दाखल करुन आपल्या तक्रारीतील कथने सिद्ध केलेली आहेत. त्यामुळे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना
न्युनतम सेवा दिल्याचे सिद्ध होते. या तक्रारीतील कथनांचा विचार करता, तक्रारदार हे जाबदेणार यांना दिलेली रक्कम रु. 18,300/- प्राप्त करण्यास पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे. त्याचप्रमाणे मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व या तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु. 3,000/- मिळण्यास पात्र आहेत. सबब, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना, त्यांनी स्विकारलेली
रक्कम रु. 18,300/- (रु. अठरा हजार तीनशे फक्त),
रक्कम रु. 5,000/- (रु. पाच हजार फक्त) मानसिक
व शारीरिक त्रासापोटी आणि रक्कम रु. 3,000/- (रु.
तीन हजार फक्त) तक्रारीचा खर्च म्हणून, असे एकुण
रक्कम रु. 26,300/- (रु. सव्वीस हजार तीनशे फक्त)
या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या
आंत द्यावी.
3. वर नमुद रक्कम रु. 26,300/- जाबदेणार यांनी
तक्रारदार यांना जर सहा आठवड्यांच्या आंत दिली
नाही तर, त्यावर तक्रार दाखल दिनांकापासून पूर्ण
रक्कम वसुल होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याज
आकारण्याचा अधिकार तक्रारदार यांना राहील.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
5. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी
आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या
आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन
जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 24/एप्रिल/2014