(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, ते देवणी जि.लातुर येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांनी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसासाठी भेट देण्याकरीता गैरअर्जदार (2) त.क्र.35/10 क्र.2 यांच्याकडून दि.23.11.2008 रोजी पाच वस्तुंचा बेडरुम सेट रक्कम रु.40,499/- देऊन खरेदी केला. खरेदी केलेला बेडरुम सेट त्यातील सर्व वस्तुंसह दि.25.11.2008 पूर्वी पोहोचतील असे आश्वासन गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदारास दिले. त्यानुसार तक्रारदाराने वस्तु मिळण्याची वाट पाहिली, परंतू वस्तु मिळाल्या नाहीत म्हणून गैरअर्जदार क्र.2 यांचेशी फोनवर संपर्क साधला असता, त्यांनी वस्तु उपलब्ध नसल्यामुळे देता आल्या नाही व दोन चार दिवसात देऊ असे सांगितले. दि.28.12.2008 रोजी तक्रारदार स्वतः गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे रक्कम परत मागण्यासाठी गेले परंतू त्यांनी वस्तुंची ऑर्डर रदद करता येणार नाही, दोन दिवसात वस्तु देऊ असे सांगितले. त्यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांनी वस्तुंची डिलेव्हरी हैद्राबाद येथून घ्यावी असे सांगितल्यावरुन तक्रारदार वाहन घेऊन वस्तु आणण्यासाठी हैद्राबाद येथे गेले परंतू तेथेही वस्तु उपलब्ध नव्हत्या. तक्रारदाराने बरीच वाट पाहिल्यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदाराने खरेदी केलेल्या बेडरुम सेटमधील चार वस्तु दि.13.12.2008 रोजी पाठविल्या व उरलेली एक वस्तु दि.29.12.2008 रोजी पाठविली. तक्रारदाराने त्यांचे पत्नीच्या वाढदिवसानिमित्त दि.23.11.2008 रोजी पाच वस्तुंचा बेडरुम सेट खरेदी केला होता, परंतू गैरअर्जदार क्र.2 यांनी वेळेवर वस्तु दिलेल्या नसल्यामुळे तक्रारदारास हैद्राबाद येथे वस्तुंच्या डिलेव्हरीसाठी वाहन घेऊन जावे लागले व त्या ठिकाणी वस्तु उपलब्ध न झाल्यामुळे त्याचे व्यावसायिक नुकसान झाले. अशा प्रकारे गैरअर्जदारांनी त्यास त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदारांकडून नुकसान भरपाई रु.50,000/-, ट्रकचे भाडे रु.5,000/-, व्यावसायिक नुकसान रु.5,000/-, प्रवास खर्च रु.2,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकत्रित लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने काही गोष्टी लपविलेल्या असून, तक्रारदार स्वच्छ हाताने मंचासमोर आले नाहीत. तक्रारदाराने इंपानिया बेडरुम सेट त्यामधील पाच वस्तुंसह रक्कम रु.49,145/- मधे बुक केला होता. सदर रकमेपैकी तक्रारदाराने रु.46,500/- जमा केले. आणि उर्वरीत रक्कम जमा केल्याशिवाय वस्तुंची डिलेव्हरी मिळणार नाही असे तक्रारदारास सांगितले. तक्रारदाराने दि.28.11.2008 रोजी गैरअर्जदारांचे दुकानात येऊन इंपानिया बेडरुम सेट रदद करुन एरिसा बेडरुम सेट खरेदी करावयाचे सांगितले. एरिसा सेटची किंमत रक्कम रु.40,449/- होती. परंतू तक्रारदाराने दि.23.11.2008 रोजी रु.46,500/- जमा केलेले असल्यामुळे त्यास रु.6,000/- परत करण्यात आले. तक्रारदाराचे गाव देवणी हे उदगीरजवळ असून, औरंगाबादपासून 380 कि.मी. वर आहे. (3) त.क्र.35/10 आणि कंपनीचे पॉलीसीनुसार गैरअर्जदारांच्या मोफत डिलेव्हरी देण्याच्या कार्यक्षेत्राबाहेर असल्यामुळे तक्रारदाराने स्वतः वस्तु दोन तीन दिवसात घेऊन जातो असे सांगितले. गैरअर्जदारांनी तक्रारदाराकडून वस्तुंच्या वाहतुकीचे चार्जेस घेतलेले नाहीत. तक्रारदाराने त्याच्या आधी बुक केलेल्या वस्तुमधे बदल करुन दुस-या वस्तु बुक केल्या. तक्रारदाराने औरंगाबाद ते देवणी हे अंतर जास्त असून, हैद्राबाद ते देवणी हे अंतर जवळ असल्यामुळे वस्तु तेथून घेतो असे सांगितले. तक्रारदाराने खरी वस्तुस्थिती मंचासमोर न आणता खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. युक्तिवादाचे वेळेस तक्रारदार गैरहजर. गैरअर्जदारांच्या वतीने अड.अनिरुध्द पाठक यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने दि.28.11.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचे दुकानामधे एरिसा बेडरुम सेट त्यातील पाच वस्तुंसह रक्कम रु.40,499/- देऊन खरेदी केल्याचे पावतीवरुन दिसून येते. परंतू सदर पावतीचे निरीक्षण केले असता, तक्रारदाराने दि.23.11.2008 रोजी 46,500/- रु. रोख जमा केलेले असून, सदर एरिसा बेडरुमची किंमत रु.40,499/- असल्यामुळे त्यास दि.28.11.2008 रोजीच रक्कम रु.6,000/- परत केल्याचे स्पष्ट दिसून येते. तसेच दि.28.11.2008 रोजीचे गैरअर्जदारांनी दाखल केलेले पेमेंट हाऊचर पाहिले असता, तक्रारदाराने दि.23.11.2008 रोजी बुक केलेला इंपानिया बेडरुम सेट रदद करुन एरिसा बेडरुम सेट बुक केलेला असल्यामुळे तक्रारदारास रक्कम रु.6,000/- परत करण्यात आलेले आहेत आणि सदर हाऊचरवर “ऑफर चेंज फॉर न्यु आर्टिकल्स” असे लिहिलेले स्पष्ट दिसून येते. यावरुन तक्रारदाराने दि.23.11.2008 रोजी बुक केलेला बेडरुम सेट बदलून दुसरा बेडरुम सेट दि.28.11.2008 रोजी बुक केल्याचे स्पष्ट होते. दि.28.11.2008 रोजीच्या पावतीच्या पाठीमागेच काही अटी व शर्ती नमूद केलेल्या आहेत आणि सदर अटी व शर्ती हया तक्रारदार व गैरअर्जदार यांना बंधनकारक असतात. त्यातील अट क्र.10 मधे असे स्पष्ट नमूद केलेले आहे की, “Freight charges for delivery of products sold beyond free delivery zones as per the company policy shall be payable by the customer.” तक्रारदार हे देवणी जि.लातूर येथे राहात असून गैरअर्जदार क्र.2 चे औरंगाबाद येथील दुकानापासून सदर अंतर खूपच लांब आहे आणि गैरअर्जदाराने मोफत डिलेव्हरी देण्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारदारास खरेदी (4) त.क्र.35/10 केलेला बेडरुम सेट त्याचे घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि महत्वाची बाब म्हणजे गैरअर्जदार क्र.2 यांनी वाहतुकीचा कोणताही खर्च तक्रारदाराकडून घेतलेला नसल्याचे दि.28.11.2008चे पावतीवरुन स्पष्ट दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारदारास त्याच्या घरापर्यंत वस्तु न पोहोचवून कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने बेडरुम सेट हैद्राबादहून आणावा लागला हया म्हणण्यापुष्टयर्थ श्री.गणेश ट्रान्सपोर्ट एजन्सीची एक पावती दाखल केली आहे. सदर पावतीवर कुठेही वाहतुकीसाठी किती खर्च लागला याची रक्कम नमूद केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने हैद्राबाद ते देवणी वस्तु आणण्यासाठी रु.5,000/- ची मागणी केली आहे, ती मान्य करणे योग्य ठरणार नाही. तसेच तक्रारदाराने व्यावसायिक नुकसान व प्रवास खर्च मागितला आहे, परंतू तक्रारदाराने याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्याच्या हया मागण्या मान्य करणे उचित ठरणार नाही. यावरुन तक्रारदार त्याची तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरलेला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.. 3) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |