(घोषित दि. 22.11.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार अशी आहे की, तक्रारदारांचे पती महेताबखॉं पठाण शेतकरी असुन दिनांक 21.06.2008 रोजी सर्पदंशामूळे मृत्यू पावले. सदर घटनेची माहीती भोकरदन पोलीस स्टेशन यांना मिळाल्यानंतर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा केला. मयताचे प्रेत पोस्टमार्टम साठी भोकरदन ग्रामीण रुग्णालय यांचेकडे पाठवले.
तक्रारदारांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसहीत दिनांक 08.12.2008 रोजी तहसिल कार्यालय भोकरदन यांचे मार्फत गैरअर्जदार 1 व 2 यांचेकडे पाठवला. परंतू अद्यापपर्यंत मंजूर अथवा नामंजूर केला नाही. तक्रादारांनी यापूर्वी तक्रार क्रमांक 128/2009 दाखल केली होती. तक्रारदारांचा प्रस्ताव विमा कंपनीकडे प्राप्त झालेला नसल्याचे कारणास्तव तक्रार नामंजूर झाली. तक्रारदारांनी दिनांक 20.10.2011 रोजी विमा दावा सांक्षाकित करुन विमा कंपनीकडे पाठवला. परंतू अद्याप पर्यंत सदर प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
गैरअर्जदार 1 यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू दिनांक 21.06.2008 रोजी झाला असून सदर अपघाताचा विमा कालावधी दिनांक 15.08.2007 ते 14.08.2008 आहे. पॉलीसीतील अटी व शर्तीनूसार पॉलीसीचा कालावधी संपूष्टात आल्यानंतर 90 दिवसात म्हणजेच दिनांक 14.11.2008 पर्यंत प्रस्ताव दाखल करणे आवश्यक होते. तक्रारदारांचा विमा प्रस्ताव दिनांक 03.06.2009 रोजी विहीत मुदतीनंतर प्राप्त झाल्यामूळे परत जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे पाठवला. गैरअर्जदार 2 विमा कंपनीच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
तक्रारदारांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत दाखल केलेला विमा प्रस्ताव विहीत मुदतीनंतर प्राप्त झाल्याचे कारणावरुन गैरअर्जदार 1 यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे परत पाठवला. तक्रारदारांनी यापूर्वी तक्रार क्रमांक 128/2009 न्याय मंचात दाखल केली होती. परंतू गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याचे कारणास्तव (Premature)नामंजूर करण्यात आली. गैरअर्जदार 2 यांचे म्हणण्यानूसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव अद्याप पर्यंत प्राप्त झालेला नाही.
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत दाखल झालेले दावे विलंबाच्या तांत्रिक कारणास्तव नामंजूर करणे नैसर्गिक न्यायाच्या द्ष्टीने योग्य नाही. सदरची योजना शासनाचे कल्याणकारी योजना असून गैरअर्जदार यांनी विमा दावा संदर्भात सकारात्मक द्ष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. असे न्याय मंचाचे मत आहे.
विमा पॉलीसीतील विमा दावा दाखल करण्याबाबत दिलेली 90 दिवसाची मूदत ही फक्त मार्गदर्शक सूचना (Directory)असल्याचे राज्य आयोगाच्या न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि. विरुध्द नानासाहेब हनुमंतराव जाधव (CPR (2) (2005) page 25) न्याय निवाडयामध्ये नमूद केले आहे. त्यामूळे गैरअर्जदार 2 विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा प्रस्ताव विलंबाचे तांत्रिक कारण वगळून गुणवत्तेवर निकाली करणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, सदर प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसहीत आदेश मिळाल्या पासून 30 दिवसात गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे पाठवावा.
- गैरअर्जदार 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसात गुणवत्तेवर निकाली करावा.