तक्रार दाखल दिनांकः 21/09/2016
आदेश पारित दिनांकः 13/02/2017
तक्रार क्रमांक. : 111/2016
तक्रारकर्ता : 1. श्री स्वप्नील श्रीकृष्ण हटवार
वय – 31 वर्षे, धंदा – मजुरी रा. सातोना, पो. नेरी
ता.मोहाडी जि. भंडारा.
2. श्री तुलसीदास रुपदास गभणे
वय – 32 वर्षे, धंदा – शिक्षण रा. खरबी, पो. खापा
ता.तुमसर जि. भंडारा.
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : श्री हिवराज रामचंद रोकडे
(पायल फर्निचर मार्ट)
वय – 45 वर्षे, धंदा – फर्निचर सेलोटी रोड, विठ्ठल रुखमाई मंदिराजवळ,
ता.लाखनी जि. भंडारा.
तक्रारकर्ता : स्वतः
वि.प.1व 2 तर्फे : अॅड.एस.एस.चव्हाण, अॅड.तृप्ती भोयर
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. हेमंतकुमार पटेरिया, सदस्य यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक – 13 फेब्रुवारी, 2017)
तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
1. तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
तक्रारकर्ता क्र.1 यांनी मुलीच्या लग्नात भेट देण्यासाठी विरुध्द पक्ष यांचेकडून दिनांक 21/3/2015 ला सोफासेट 3 सीट फोम सागवान साईज 6’ x 2½’ x 2½’ एक नग, 2½’ x 2½’ x 2½’ x 2 नग विकत घेतला. दिनांक 14/2/2015 ला आर्डर देतेवेळी तक्रारकर्ता यांच्या मतानुसार कापड लावला जाईल व लाकुड लावला जाईल असे विरुध्द पक्ष यांच्याशी ठरले होते.
विरुध्द पक्ष यांनी दिनांक 21/3/2015 ला तक्रारकर्ता क्र.1 यांचेकडे सोफा सेट पाठविला. तक्रारकर्ता क्र.1 यांनी सोफा सेटची संपुर्ण रक्कम रुपये 21,000/- विरुध्द पक्ष यांना दिली. सोफा सेट आणला तेव्हा दुस-याच दिवशी त्याचे पाय तुटले व काही दिवसात कापड फाटला व प्लाय तुटला. या संबंधी तक्रारकर्ता क्र.1 यांनी विरुध्द पक्ष यांना सुचना दिली. विरुध्द पक्ष एकदा सोफासेट पाहण्याकरीता तक्रारकर्ता क्र.1 यांचेकडे आले व सोफा परत घेवून पुर्ण पैसे देण्याचे कबुल केले, परंतु त्यानंतर आले नाही. तक्रारकर्ता क्र.1 यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे वारंवार विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाने कोणतीही दाद दिली नाही.
तक्रारकर्ता क्र.1 यांनी त्यांचे वकीलामार्फत कायदेशीर नोटीस दिनांक 19/7/2016 रोजी पाठविली. परंतु आजपर्यंत विरुध्द पक्षाने सोफा सेटची किंमत रुपये 21,000/- न दिल्याने विरुध्द पक्ष यांनी सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला असल्याने सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला सोफा सेटची किंमत रुपये 21,000/-
व गाडीचे भाडे रुपये 1,500/- व त्यावर द.सा.द.शे. 18% व्याजासह
दयावे.
2. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 25,000/-
मिळावी.
3. तक्रारीचा खर्च रुपये 15,000/- मिळावा.
2. तक्रारीच्या पृष्ठर्थ्य तक्रारकर्त्याने सोफासेट विकत घेतल्याचे बील क्र.78, तुटलेले सोफासेटचे फोटो, लग्नपत्रिका, विरुध्द पक्षाला पाठविलेली नोटीस व त्याची पोचपावती इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
3. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन प्रस्तुत न्यायमंचामार्फत विरुध्द पक्ष यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्षातर्फे अधिवक्ता चव्हाण यांनी दिनांक 21/11/2016 रोजी वकीलपत्र दाखल केले. परंतु दिनांक 27/12/2016 रोजी गैरहजर राहिले. दिनांक 21/1/2017 रोजी देखिल विरुध्द पक्ष यांनी जबाब दाखल केला नाही म्हणून मुदतीचे आंत लेखी जबाब दाखल न केल्याने दिनांक 6/2/2017 रोजी लेखी जबाबाशिवाय प्रकरण चालविण्याचा मंचाने आदेश पारित केला.
तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्या कथनावरुन तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) | वि.प.ने सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला आहे काय ? | - | होय. |
2) | तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? | - | अंशतः |
3) | अंतीम आदेश काय ? | - | अंतीम आदेशाप्रमाणे तक्रार अंशतः मंजुर. |
कारणमिमांसा
4. मुद्दा क्र.1 व 2 बाबत ः- तक्रारकर्ता यांनी सोफासेट 3 सीट फोम सागवान साईज 6’ x 2½’ x 2½’ एक नग, 2½’ x 2½’ x 2½’ x 2 नग विरुध्द पक्षाकडून दिनांक 21/3/2015 रोजी मुलीच्या लग्नाकरीता रुपये 21,000/- देऊन विकत घेतल्याचे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दिलेल्या बील क्र.78 दस्त क्र.1 वरुन स्पष्ट होते.
सदर सोफासेटचा पाय दुस-याच दिवशी तुटला व काही दिवसात सोफासेटचे कापड फाटले व प्लाय तुटले अशा अवस्थेचे फोटो तक्रारकर्त्याने दाखल केले आहेत. यावरुन स्पष्ट होते की विरुध्द पक्ष यांनी सदोष सोफासेट तक्रारकर्ता क्र.1 यांना विकला होता. सदर सदोष सोफासेटची दिलेली किंमत परत दयावी म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 19/7/2016 रोजी दस्त क्र.7 प्रमाणे नोटीस पाठविली. पोस्टाची रजिस्ट्रेशन पावती आणि पोस्टाचा अहवाल दस्त क्र.2 वर आहेत. नोटीस प्राप्त होवूनही सदोष सोफासेट बदलून न देणे किंवा त्याची किंमत परत न करणे ही ग्राहकाप्रती सेवेतील न्युनता आहे. म्हणुन मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र.2 व 3 बाबत ः- मुद्दा क्र.1 वरील विवेचनाप्रमाणे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सदोष सोफासेट विकला असल्याने तक्रारकर्ता सोफासेटची किंमत रुपये 21,000/- परत मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रुपये 3,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- मिळण्यास पात्र आहे. म्हणुन मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत. वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// अंतिम आदेश //
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील तक्रार वि.प. विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
1. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सोफासेटची किंमत रुपये 21,000/-(एकवीस हजार) दिनांक 20/3/2017 पर्यंत दयावी व न दिल्यास तक्रारकर्ता सदर रक्कम दिनांक 20/03/2017 पासुन प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.शा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र राहिल.
2. विरुध्द पक्षाने वरील प्रमाणे रक्कम दिल्यावर तक्रारकर्त्याने सदर सोफासेट ज्या
स्थितीत असेल त्या स्थितीत विरुध्द पक्ष यांना परत करावा.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई
रुपये 3,000/-(तीन हजार) दयावे.
4. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(दोन हजार)
दयावे.
5. वि.प.ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत
करावी.
6. गै.अ. ने दिलेल्या मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 25 व 27 अन्वये होणा-या कारवाईस पाञ राहील.
7. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
8. तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.