Maharashtra

DCF, South Mumbai

CC/266/2012

HARSHA AMBALAL JAIN - Complainant(s)

Versus

HIRALAL JAIN, PROPRIETOR OF SHILPA CREATIONS - Opp.Party(s)

VAISHALI MANE & BHARAT MANE

06 Jan 2015

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Complaint Case No. CC/266/2012
 
1. HARSHA AMBALAL JAIN
112, PURUSHOTTAM BUILDING, 4TH FLOOR, KESHAVJI NAYAK MARG, MASJID, MUMBAI 400 009
...........Complainant(s)
Versus
1. HIRALAL JAIN, PROPRIETOR OF SHILPA CREATIONS
1-A, JAIHIND ESTATE, SHOP NO.14, DR.A.M. MARG, BHULESHWAR, MUMBAI 400 002.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. S.M. RATNAKAR PRESIDENT
 HON'BLE MR. S.G. CHABUKSWAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

द्वारा - श्री.शा.गं.चाबुकस्‍वार : मा.सदस्‍य  

 1)    प्रस्‍तुतची तक्रार ही सामनेवाला यांच्‍याकडून साडीची किंमत रु.2,150/- व त्‍या रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह आणि मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई, तक्रारीचा खर्च रु.50,000/- मिळवण्‍यासाठी ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12(1) नुसार दाखल केलेली आहे.

2)    थोडक्‍यात तक्रारदाराची हकीकत खालीलप्रमाणे -

      तक्रारदार या केशवजी नायक मार्ग, मस्जित, मुंबई येथे राहतात. सामनेवाला यांचे शिल्‍पा क्रिएशन्‍स नावाचे साडयांचे दुकान भुलेश्‍वर, मुंबई येथे आहे. दिनांक 29/12/2010 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍या दुकानातून एक भेसळमुक्‍त नक्षीकाम असलेली साडी किंमत रु.2,150/- मध्‍ये खरेदी केली होती. तक्रारदार यांनी सामनेवाला याच्‍याकडून सदर साडी खरेदीची पावती क्र.7528 घेतलेली आहे. त्‍याच दिवशी तक्रारदार यांनी सदरची साडी सामनेवाला यांच्‍या दुकानात नक्षीकाम करण्‍यासाठी दिली होती. सामनेवाला यांनी सदर साडीवर नक्षीकाम केल्‍यानंतर दि.03/01/2011 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍या दुकानातून ती साडी घेतली व घरी नेली.

3)    यापुढे तक्रारदार यांचे असे कथन आहे की, वादग्रस्‍त साडी खरेदी केली तेव्‍हा पावती लिहणा-याने पावतीवर तक्रारदार यांचे नांव हर्षाजी ऐवजी आशाजी असे लिहिले. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सदरची चूक दुरुस्‍त करण्‍यासाठी विनंती केली परंतु सामनेवाला यांनी नांव महत्‍वाच नाही असे सांगून तक्रारदार यांची समजूत घातली. दि.03/01/2011 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍या दुकानातून नक्षीकाम केलेली वादग्रस्‍त साडी घेतली त्‍या दिवशी त्‍या घाईत असल्‍यामुळे त्‍यांनी साडी उघडून पाहिली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍या बोलण्‍यावर विश्‍वास ठेवून ती साडी घरी नेली.

4)    यापुढे तक्रारदार यांचे असे कथन आहे की, त्‍यांनी त्‍यांच्‍या पुतणीच्‍या साखरपुडयाच्‍या कार्यक्रमात परिधान करण्‍यासाठी वादग्रस्‍त महागडी साडी खरेदी केली होती. तक्रारदार यांनी साखरपुडयाच्‍या कार्यक्रमाच्‍या दिवशी वादग्रस्‍त साडी परिधान करण्‍यासाठी काढली असता, ती साडी ठिकठिकाणी फाटलेली दिसली तसेच त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे नक्षीकाम केलेले नसल्‍याचे दिसून आले. तक्रारदार यांना पुतणीच्‍या साखरपुडयाच्‍या कार्यक्रमात हौसेने घेतलेली नवीन साडी परिधान करता आली नाही त्‍यामुळे त्‍यांना अतिव दु:ख झाले. तसेच तक्रारदार या नातेवाईकाध्‍ये खूप अपमानित झाल्‍या होत्‍या. साखरपुडयाच्‍या कार्यक्रमातून परत आल्‍यानंतर तक्रारदार सामनेवाला यांच्‍या दुकानात गेल्‍या व घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे वादग्रस्‍त साडी बदलून देण्‍याची किंवा साडीची किंमत परत करण्‍याची मागणी केली परंतु सामनेवाला यांनी त्‍यास स्‍पष्‍ट नकार दिला आणि तक्रारदार यांना उध्‍दट भाषा वापरली. तक्रारदार अनेकवेळा सामनेवाला यांच्‍या दुकानात गेल्‍या आणि त्‍यांना त्‍यांची चूक समजावून देण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु सामनेवाला ते मान्‍य करण्‍यास तयार झाले नाही. तक्रारदार यांनी शेवटी दि.31/01/2011 रोजी सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून 15 दिवसात साडी बदलून देणेची किंवा साडीची किंमत परत करण्‍याची मागणी केली. दि.19/02/2011 रोजी सामनेवाला यांनी सदर नोटीसीला उत्‍तर देवून साडी बदलून देण्‍याची तयारी दर्शवीली. तक्रारदार यांनी ज्‍या उद्देशासाठी वादग्रस्‍त साडी खरेदी केली होती तो उद्देश संपूष्‍टात आलेला आहे, म्‍हणून आता तक्रारदाराची साडी बदलून घेण्‍याची इच्‍छा नाही. करीता ही तक्रार परिच्‍छेद क्र.1 मध्‍ये नमूद केलेल्‍या मागण्‍यासाठी दाखल केली आहे.

5)    सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारीतील कथनास व मागणीस आव्‍हान दिलेले आहे. सामनेवाला यांचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी वादग्रस्‍त साडी कराची नक्षीकाम केलेली तक्रारदार यांना विकली नसून ती साडी त्‍यांनी आशाजी नावाच्‍या स्‍त्रीला विकली आहे. तक्रारदार या वादग्रस्‍त साडी खरेदी करण्‍यासाठी व घेवून जाण्‍यासाठी सामनेवाला यांच्‍या दुकानात कधीही आल्‍या नाहीत. सामनेवाला हे तक्रारदार यांना ओळखत नाही. सामनेवाला गेल्‍या 9 वर्षापासून साडी विक्रीचा व्‍यवसाय करीत आहे. सदर व्‍यवसायात त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍य व कर्मचारी काम करतात. सामनेवाला हा परिधानासाठी तयार असलेल्‍या साडयांची विक्री करतात. मे.शिल्‍पा क्रिएशन्‍स हे ग्राहकाच्‍या पसंदी प्रमाणे साडी तयार करुन देण्‍याची मागणी स्विकारत नाही, परंतु ग्राहकाच्‍या अपरिहार्य परिस्थितीत आणि जर ग्राहक नक्षीकामाशिवाय साडी विकत घेण्‍यास तयार असले तर शिल्‍पा क्रिएशन्‍स हे ग्राहकास साडीची पावती देवून पावतीत साडीवर करण्‍यात येणा-या नक्षीकामाची व रंगाची नोंद करतात आणि ती साडी ग्राहकास कोणत्‍या तारखेस नक्षीकाम करुन देणेची आहे ती तारीख नमूद करतात. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या पावतीमध्‍ये स्‍पष्‍टपणे अशी अट नमूद केलेली आहे की, कपडयाची व रंगाची हमी दिली जाणार नाही, तसेच इस्‍त्री करुन घडी केलेली किंवा फॉल लावलेली साडी परत घेतली जाणार नाही किंवा बदलून मिळणार नाही. मुंबई येथील कापड बाजारात दुकानदार ग्राहकास त्‍यांच्‍या पसंतीनुसार खरेदी केलेले कापड बदलून देतील, परंतु कापडाची किंमत ग्राहकास परत करीत नाहीत.

6)    यापुढे सामनेवाला याचे असे कथन आहे की, कराची नक्षीकामाच्‍या साडयाचे उत्‍पादन हे फक्‍त पाकि‍स्‍तानात होते. बाहेर देशातून आयात केलेली कराची नक्षीकाम असलेल्‍या साडीसारखी तशीच दुसरी साडी भारतातील कोणताही साडी विक्रेता तयार करु शकत नाही. साडीवर नक्षी काम करण्‍यासाठी ती साडी पलंगावर पसरवून तिचे टोके व कडेच्‍या बाजू खिळयांना ताणून बांधली जातात व त्‍यानंतर त्‍या साडीवर बारीक खिळयाच्‍या साहयाने ग्राहकाच्‍या मागणीप्रमाणे नक्षीकाम केले जाते. सदरच्‍या साडीवर ठराविक चित्राचे नक्षीकाम करण्‍यासाठी जे बारीख खिळे वापरतात त्‍या खिळयाचा टोकदार भाग साडीवर टोचल्‍यामुळे त्‍या साडीच्‍या टोकाला व कडेच्‍या बाजूस आणि नक्षीकामाच्‍या ठीकाणी नजरेस दिसतील असे छिद्रे पडतात, तसेच साडी काही ठिकाणी, फाटलेला भाग शिवून दुरुस्‍त केला आहे अशी दिसते. कारागीर साडीवर संपूर्ण कराची नक्षीकाम हाताने करतात ते नक्षीकाम मशिनद्वारे होत नाही. कुशल कारागीराचे काम व कला कराची नक्षीकामावरुन दिसून येते. कराची नक्षीकामासाठी जो माल वापरला जातो तो अतिशय नाजूक असतो, त्‍यामुळे इतर दुसरा माल वापरुन नक्षीकाम केलेल्‍या साडीवरील छिद्राच्‍या तुलनेत कराची नक्षीकामाच्‍या साडीवरील छिद्रे मोठया प्रमाणात दिसून येणारी असतात.

7)    यापुढे सामनेवाला यांचे असे कथन आहे की, वादग्रस्‍त साडी विक्रीच्‍या आठ दिवसानंतर ज्‍या आशाजीने ती साडी घेतली होती त्‍या आशाजी सामनेवाला यांच्‍या दुकानात आल्‍या व दुकानातील पेहापसिंग या कर्मचा-याकडे ती साडी दुरुस्‍तीसाठी दिली. सदर आशाजीने ज्‍यावेळी वादग्रस्‍त साडी पेहापसिंगकडे दिली त्‍यावेळी ती साडी पूर्णपणे चोळामोळा झालेली व चुरगळलेली होती. त्‍यावरुन असे दिसत होते की आशाजीने किंवा इतर स्‍त्रीने साखरपुडयाच्‍या कार्यक्रमात वादग्रस्‍त साडी परिधान केली व साडी व्‍यवस्‍थीत न हाताळल्‍यामुळे त्‍या साडीला नुकसान पोहचले. तसेच ज्‍या दिवशी सामनेवाला यांनी आशाजीला वादग्रस्‍त साडी नक्षीकाम करुन दिली त्‍या दिवशी साडीसोबत एक ब्‍लाऊज मोफत दिले होते. सदर ब्‍लाऊज दोषमुक्‍त होते. आशाजीने ज्‍या वेळी ब्‍लाऊज व वादग्रस्‍त साडी दुरुस्‍तीसाठी दिली त्‍यावेळी ब्‍लाऊजवर कशाचेतरी थेंब पडल्‍यामुळे खराब झालेले होते. आशाजी यांनी पेहपसिंग यांना वादग्रस्‍त साडी दुरुस्त होईल काय अशी विचारणा केली असता पेहापसिंग यांनी त्‍याची हमी दिली नाही परंतु प्रयत्‍न करतो असे आशाजीना सांगितले होते. तसेच हंगामाचा काळ असल्‍यामुळे साडी दुरुस्‍तीसाठी कमीत कमी 30 दिवस लागतील असे आशाजीना सांगितले होते. त्‍यानंतर आशाजीने पेहपसिंग यांच्‍याकडे ब्‍लाऊज व वादग्रस्‍त साडी दुरुस्‍तीसाठी दिली. त्‍याबाबत पेहपसिंगने आशाजीना पावतीवर पोहच लिहून दिली. जरी आशाजीकडून वादग्रस्‍त साडी व ब्‍लाऊजला नुकसान पोहचले होते, तरी पेहपसिंगने ती साडी व ब्‍लाऊज दुरुस्‍तीसाठी घेतले होते. कराची नक्षीकामाच्‍या नाजूक साडीवरील द्रव पदार्थाचे डाग काढण्‍याचे काम खूप बिकटीचे असते, परंतु पेहपसिंग हा कुशल कारागीर असल्‍यामुळे त्‍याने ब्‍लाऊज व साडी दुरुस्‍तीचे काम स्विकारले होते. सामनेवाला यांच्‍या कारागीराने वादग्रस्‍त साडी ही पाकिस्‍तानातून आयात केलेल्‍या नवीन साडीसारखी दिसेल अशा प्रकारे दुरुस्‍त केले आहे. परंतु सामनेवाला यांना तक्रारदार यांची दि.31/01/2011 रोजीची नोटीस मिळाली आहे. दि.19/02/2011 रोजी सामनेवाला यांनी सदर नोटीसीला उत्‍तर दिलेले आहे.

8)    यापुढे सामनेवाला यांचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी वादग्रस्‍त साडी दुरुस्‍त केल्‍यानंतर आशाजी त्‍यांच्‍या दुकानातून साडी घेवून जाण्‍यासाठी आल्‍या नाहीत. त्‍यावेळेपासून सामनेवाला यांनी वादग्रस्‍त साडी जशाच तशी सुरक्षित ठेवलेली आहे. सामनेवाला हे आशाजीने त्‍यांच्‍याकडे वादग्रस्‍त साडी दुरुस्‍तीसाठी दिली आहे त्‍या आशाजीला वादग्रस्‍त साडी परत देण्‍यास तयार आहेत. सामनेवाला हे तक्रारदार यांना वादग्रस्‍त साडी परत देण्‍यास तयार नाही. सामनेवाला यांच्‍या दुकानातून तक्रारदार यांनी वादग्रस्‍त साडी खरेदी केल्‍याचे सामनेवाला यांनी नाकारलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारीतील सर्व विरोधी विधाने नाकबुल करुन तक्रार खर्चासह नामंजूर करण्‍याची मागणी केली आहे.

9)    दोन्‍ही पक्षकारांच्‍या परस्‍परविरोधी कथानातून तक्रारीच्‍या निर्णयाकरीता खालील मुद्दे उपस्थित झालेले आहेत व त्‍यावर आमचे निष्‍कर्ष ज्‍या त्‍या मुद्दयांसमोर कारणमिमांसेवरुन नमूद केले आहेत

                        मुद्दे                             निष्‍कर्ष

1)  तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍या दुकानातून वादग्रस्‍त             होकारार्थी.

    साडी खरेदी केलेली आहे काय ?

2)         सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा पूरविण्‍यात          होकारार्थी.

     कमतरता केलेली आहे काय ?

3)  तक्रारदार तक्रारीत मागणी केलेल्‍या दादी मिळवण्‍याची      साडीची किंमत

    हक्‍कदार आहे काय ?                               रु.2,150/-, मानसिक

                                                    त्रासाची नुकसानभरपाई

                                                    रु.3,000/-, तक्रारीचा

                                                     खर्च रु.2,000/-.

 4)  काय आदेश ?                                    अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारणमिमांसा

 10)   तक्रारदार यांनी त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्र सादर केले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी आपापला लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करण्‍यात आले आहे. तसेच श्रीमती. वैशाली माने तक्रारदार यांचे वकील आणि श्री. रितेश जैन सामनेवाला यांचे वकील यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला आहे.

11) मुद्दा क्र.1 तक्रारदार यांनी तक्रारीत आपले नांव हर्षाजी अंबालाल जैन असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी वादग्रस्‍त साडी खरेदीची पावती दि.29/12/2010 रोजीची अभिलेखावर दाखल केली आहे. सदर पावतीवर खरेदीदाराचे नांव, आशाजी असे दर्शविलेले आहे. वरील पस्थितीतीवरुन सामनेवाला कैफीयतीमध्‍ये असे कथन घेवून आला आहे की, दि.29/12/2010 रोजी प्रस्‍तुत तक्रारदार हर्षाजी सामनेवाला यांच्‍या दुकानात वादग्रस्‍त साडी खरेदी करण्‍यासाठी कधीही आल्‍या नाहीत. सामनेवाला यांनी आशाजी नावाच्‍या स्त्रिला वादग्रस्‍त साडी विकलेली आहे. सामनेवाला प्रस्‍तुत तक्रारदार यांना ओळखत नाही. 

12)   दि.31/01/2011 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना प्रशांत सि.मोहिते वकीलामार्फत वादग्रस्‍त साडीची किंमत मागणीची नोटीस पाठविलेली आहे. सामनेवाला सदरची नोटीस मिळाल्‍याची कबुल करतात. दि.19/02/2011 रोजी सामनेवाला यांनी सादर नोटीसीला उत्‍तर दिलेले आहे. सामनेवाला व तक्रारदार यांनी सादर उत्‍तराची प्रत दाखल केलेली आहे. श्री.प्रशांत मोहिते वकीलांनी दि.31/01/2011 रोजीच्‍या नोटीसीमध्‍ये त्‍यांच्‍या पक्षकाराचे नांव श्रीमती.हर्षाजी अंबालाल जैन, रा.112, पुरुषोत्‍तम बिल्‍डींग, के.एन. रोड, चिंचबुंदर, मुंबई 400 009 असे नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत स्‍वतःचे नांव व पत्‍ता वरील प्रमाणेच नमूद केलेला आहे.  सामनेवाला यांनी दि.19/02/2011 रोजीच्‍या नोटीस उत्‍तर श्री.प्रशांत मोहिते वकीलांना त्‍यांच्‍या पत्‍त्‍यावर पावविलेले आहेत. सामनेवाला यांनी सदर नोटीस उत्‍तराच्‍या परिच्‍छेद क्र.2 मध्‍ये असे स्‍पष्‍टपणे कथन केले आहे की, तुमचे पक्षकार श्रीमती. हर्षा अंबालाल जैन (दि.29/12/2010 रोजीच्‍या पावती क्र.7528 प्रमाणे आशाजी) यांनी सामनेवाला यांच्‍या दुकानातून कराची नक्षीकामाची साडी खरेदी केली आणि दि.03/01/2011 रोजी ती साडी नक्षीकाम करुन तुमच्‍या पक्षकाराला दिली. पुढे परिच्‍छेद क्र.4 मध्‍ये असे कथन केलेले आहे की, सदर साडीत दोष आहे असे तुमच्‍या पक्षकाराचे म्‍हणणे आहे. आम्‍ही तुमच्‍या पक्षकारांस साडीच्‍या मालाबाबत व नक्षीकामाबाबत माहिती दिली होती. तुमचे पक्षकार त्‍यावर समाधानी झाले होते. आम्‍ही तुमच्‍या पक्षकाराचा आदर करतो, चांगली सेवा देतो. साडीचे नक्षीकाम पूर्ण झाल्‍यानंतर दि.03/01/2011 रोजी तुमचे पक्षकार साडी दुकानातून घेवून गेलेल्‍या आहेत. पुढे परिच्‍छेद क्र.5 मध्‍ये असे नमूद आहे की, तुमच्‍या पक्षकारानी पावतीतील नावाबाबतची चुक दि.29/12/2010, 03/01/2011 आणि ज्‍या दिवशी साडीचा दोष दाखवण्‍यास आल्‍या त्‍या दिवशी आमच्‍या नजरेस आणून दिलेली नाही. पुढे परिच्‍छेद क्र.6 मध्‍ये असे नमूद आहे की, दि.03/01/2011 रोजी तुमच्‍या पक्षकारांनी साडी तपासून घेतली होती. परिच्‍छेद 7,10 व 11 मध्‍ये असे नमूद केले आहे की, आम्‍ही तुमच्‍या पक्षकाराना साडी ठेवून जा दुरुस्‍त करुन दितो अशी विनंती केली होती. सदरची साडी दुरुस्‍त करण्‍यासाठी कमीत कमी 30 दिवस लागतील असे तुमच्‍या पक्षकाराना सांगितले होते. आम्‍ही एकदा विकलेल्‍या मालाचे पैसे ग्राहकांना परत देत नसतो हे तुमच्‍या पक्षकाराना माहित आहे. आम्‍ही साडी दुरुस्‍त केलेली आहे तुम्‍ही तुमच्‍या पक्षकाराना आमच्‍या दुकानात ती साडी घेवून जाण्‍यासाठी पाठवा असे कळविले आहे. दि.31/01/2011 रोजी सामनेवाला यांना तक्रारदार यांनी प्रशांत माहीते वकीलामार्फत नोटीस पाठवलेली आहे म्‍हणून सदर नोटीसीच्‍या हद्दीपर्यंत प्रस्‍तुत तक्रारदार या प्रशांत मोहीते वकीलाच्‍या पक्षकार आहेत. सामनेवाला यांनी नोटीस उत्‍तरातील वरील मजकुरात तुमचे पक्षकार हा जो शब्‍दप्रयोग केलेला आहे तो प्रशांत मोहिते वकीलांचे पक्षकार हर्षाजी अंबालाल जैन प्रस्‍तुत तक्रारदार यांना उद्देशुन केलेला असून कैफीयतीत नमूद केलेल्‍या आशाजी यांच्‍या सबंधित नाही. सामनेवाला यांचे दि.19/02/2011 रोजीच्‍या नोटीस उत्‍तरावरुन हे सिध्‍द झाले आहे की, दि.29/12/2010 रोजी प्रस्‍तुत तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे दुकानातुन वादग्रस्‍त साडी खरेदी केली आहे व साडीचे नक्षीकाम पूर्ण झाल्‍यानंतर दि.03/01/2011 रोजी तक्रारदार यांनी ती साडी सामनेवाला यांच्‍या दुकानातून आपल्‍या घरी नेली आहे व साडीतील दोष आढळल्‍यानंतर सामनेवाला यांच्‍याकडे दुरुस्‍तीसाठी दिलेली आहे. सामनेवाला यांनी वादग्रस्‍त साडी प्रस्‍तुत तक्रारदार यांना विक्री केलेली नसून ती साडी आशाजी नांवाच्‍या स्‍त्रीला विकलेली आहे असे जे विधान सामनेवाला यांनी कैफीयतीमध्‍ये केलेले आहे ते विधान पोकळ असून त्‍यास कोणत्‍याही पुराव्‍याचा आधार नाही. करीता मुद्दा क्र.1 चा निष्‍कर्ष होकारार्थी दिला आहे.

13) मुद्दा क्र.2 मुद्दा क्र.1 च्‍या निष्कर्षानुसार दि.29/12/2010 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍या दुकानातून वादग्रस्‍त साडी विकत घेवून सामनेवाला यांच्‍याकडेच नक्षीकामासाठी दिली. तसेच दि.03/01/2011 रोजी सादर साडीचे नक्षीकाम झाल्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून ती साडी घेतली व घरी नेली. त्‍यानंतर आठ दिवसांनी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे वादग्रस्‍त साडी दुरुस्‍तीसाठी दिली या बाबी सिध्‍द झालेल्‍या आहेत. आता फक्‍त एक प्रश्‍न निर्माण होतो तो म्‍हणजे वादग्रस्‍त साडीत दोष आहे किंवा नाही आणि जर दोष आहे तर तो कोणता ?   

14)   सामनेवाला यांनी कैफीयतीच्‍या परिच्‍छेद क्र.2(जे) मध्‍ये असे कथन केले आहे की, सामनेवाला यांच्‍या कारागीरांनी वादग्रस्‍त साडी अशी दुरुस्‍त केली आहे की ती पाकिस्‍तानातून आयात केलेल्‍या कराची नक्षीकामाच्‍या नवीन साडीसारखी दिसत आहे. सामनेवाला यांनी वादग्रस्‍त साडी जशाच तशी सुरक्षित ठवलेली आहे. दि.26/11/2014 रोजी तोंडी युक्‍तीवादाच्‍या वेळी श्री.रितेश जैन सामनेवाला यांच्‍या वकीलांनी वादग्रस्‍त साडी मंचासमोर दाखवली आणि युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यानी तक्रारीत कथन केल्‍याप्रमाणे वादग्रस्‍त साडी कोठेही फाटलेली नाही. श्रीमती.वैशाली माने तक्रारदाराचे वकीलांनी सामनेवाला यांच्‍या वकीलांसमक्ष वादग्रस्‍त साडीवर पानाफुलाचे जे चित्राचे नक्षीकाम केलेले आहे त्‍या नक्षीकामाच्‍या बाजूस छीद्रे असल्‍याचे दाखविले. त्‍यानंतर श्री.रितेश जैन सामनेवाला यांच्‍या वकीलांनी युक्‍तीवाद केला की, वादग्रस्‍त साडीला नक्षीकामाच्‍या बाजूस जी छिद्रे दिसतात ती साडीचे नक्षीकाम करताना पडलेली आहेत. सामनेवाला यांच्‍या दुकानात अशाप्रकारचे नक्षीकाम केलेल्‍या इतर साडयांना सुध्‍दा अशाप्रकारची छिद्रे आहेत. त्‍यावर श्री.रितेश जैन सामनेवाला यांचे वकीलांना नमुन्‍यासाठी साडी दाखविणार काय अशी विचारणा झाली असता त्‍यानी नमुण्‍यासाठी तशाच प्रकारची साडी दाखविण्‍याची तयारी दर्शविली.

15)   दि.06/12/2014 रोजी श्री.रितेश जैन सामनेवाला यांच्‍या वकीलांनी वादग्रस्‍त साडी व नमुण्‍यासाठी इतर दोन साडया पाहणी करण्‍यासाठी आणल्‍या होत्‍या. उभय पक्षकाराच्‍या वकीलांनी व मंचाने सदर साडयांची पाहणी केली. त्‍यावेळी असे दिसून आले की, वादग्रस्‍त साडीवर नक्षीकामाच्‍या बाजूला असलेल्‍या छिद्राप्रमाणे छिद्रे नमुण्‍याच्‍या साडीवर नक्षीकामाच्‍या बाजूला नव्‍हती. नमून्‍यासाठी दाखविण्‍यास आणलेल्‍या दोन्‍ही सांडयांच्‍या नक्षीकामाजवळ कोणत्‍याही प्रकारची छिद्रे दिसून आली नाहीत. वादग्रस्‍त साडीवर नक्षीकामाच्‍या बाजूला जी छिद्रे आहेत ती छिद्रे अती बारीक स्‍वरुपाची आहेत असे म्‍हणता येत नाही. सदरची छिद्रे थोडया अंतरावरुन दिसतील एवढया मोठया आकाराची आढळून आली. वरील परिस्थितीत वादग्रस्‍त साडी दोषमुक्‍त आहे असे म्‍हणता येत नाही. वादग्रस्‍त साडीवर नक्षीकामाच्‍या बाजूस थोडे मोठया स्‍वरुपाचे अनेक छिद्र असल्‍याचा दोष आढळून आला आहे. सामनेवाला यांनी कैफीयतमध्‍ये असे कथन केलेले आहे की, आशाजीना वादग्रस्‍त साडी सोबत एक ब्‍लाऊज मोफत दिले होते. आशाजी कडून सदर ब्‍लाऊजवर द्रव पदार्थाचे डाग पडून खराब झाले होते व सदरचे ब्‍लाऊज साडीसोबत दुरुस्‍तीसाठी दिले होते. परंतु सामनेवाला यांनी वादग्रस्‍त साडीसोबत कथीत ब्‍लाऊज मंचासमोर आणलेले नाही. सामनेवाला यांचे ब्‍लाऊज संबंधीचे कैफीयतीमधील कथनास कोणत्‍याही पुराव्‍याचा आधार नाही. 

 16)   सामनेवाला यांनी कैफीयतीत असे कथन केले आहे की, साडीवर नक्षीकाम करण्‍यासाठी ती साडी पलंगावर पसरवून तिचे टोके आणी कडेच्‍या बाजूचा भाग खिळयांना ताणून बांधली जातात व त्‍यानंतर त्‍यासाडीवर ग्राहकाच्‍या पसंदी/मागणीप्रमाणे ठरविक चित्राचे नक्षीकाम बारीक टोकदार खिळयांनी केले जाते. सदर खिळयांचे टोकदार भाग साडीत टोचल्‍यामुळे साडीच्‍या नक्षीकामाजवळ नजरेस दिसतील असे छिद्र पडतात. वादग्रस्‍त साडीवर कराची नक्षीकाम केल्‍यास वरील प्रकारची छिद्रे साडीवर व नक्षीकामाच्‍या बाजूस पडतील अशी पूर्व कल्‍पना सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिली होती असे सामनेवाला यांनी दि.19/02/2011 रोजीच्‍या नोटीस उत्‍तरात किंवा कैफीयतीमध्‍ये कथन केलेले नाही. तसेच सामनेवाला यांनी पुराव्‍याच्‍या शपथपत्रातही वरील बाब सांगितलेली नाही. सामनेवाला यांनी जर तक्रारदारास वरील बाबींची माहिती दिली असती तर त्‍यांनी खरेदी केलेल्‍या साडीवर कराची नक्षीकाम करावयाचे किंवा नाही याचा योग्‍य तो निर्णय घेतला असता. अभिलेखावरील उपलब्‍ध पुराव्‍यावरुन व नमुन्‍याच्‍या दोन साडयांवरुन असे दिसून येते की, सामनेवाला यांनी वादग्रस्‍त साडीवर कराची नक्षीकाम अकुशल व शिकाऊ कामगाराकडून करुन घेतलेले असावे त्‍यामुळे नक्षीकामाच्‍या बाजूला नजरेस दिसतील एवढे मोठया आकाराची छिद्रे पडलेली आहेत. तसेच वादग्रस्‍त साडीवर नक्षीकाम केल्‍यास साडीला नजरेस दिसतील एवढे मोठया आकाराची छिद्रे पडतील अशी माहिती सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेली नाही. वरील दोन्‍ही बाबी हे दर्शवितात की, सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यास कमतरता केलेली आहे. करीता मुद्दा क्र.2 चा निष्‍कर्ष होकारार्थी दिला आहे.

17) मुद्दा क्र.3 तक्रारदार यांच्‍या पुराव्‍यात असे आले आहे की, त्‍यांनी पुतनीच्‍या साखरपूडयाच्‍या कार्यक्रमात परिधान करण्‍यासाठी वादग्रस्‍त महागडी साडी खरेदी केली होती. परंतु साखरपूडयाच्‍या दिवशी तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या नातेवाईकासमक्ष वादग्रस्‍त साडी परिधान करण्‍यासाठी काढली त्‍यावेळी त्‍यांना साडीवर मोठे छिद्रे दिसून आली. त्‍यामुळे तक्रारदार कार्यक्रमात वादग्रस्‍त साडी परिधान करु शकली नाही. तक्रारदार यांना कार्यक्रमात जी महागडी व नक्षीकामाची साडी परिधान करण्‍याची इच्‍छा होती ती पूर्ण झाली नाही आणि त्‍यामुळे तक्रारदारास अती दुःख झाले. तसेच तक्रारदार हया यांच्‍या नातेवाईक व मित्रमंडळीसमोर अपमानित झाल्‍या. तक्रारदार यांना पूतणीच्‍या साखरपुडयाच्‍या कार्यक्रमात वादग्रस्‍त साडी परिधान करता आली नाही याचा मानसिक त्रास झाला आहे. वरील सर्व कारणावरुन आम्‍ही या निर्णयाप्रत पोहचलो आहोत की, तक्रारदार सामनेवाला यांच्‍याकडून वादग्रस्‍त साडीची किंमत रु.2,150/-, मानसिक त्रास झाल्‍याबद्दल नुकसानभरपाई रु.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्‍याची हक्‍कदार आहे. करीता मुद्दा क्र.3 चा निष्‍कर्ष वरील प्रमाणे दिला आहे.

      वरील सर्व कारणांवरुन तक्रार खर्चासह अंशतः मंजूर होणेस पात्र आहे. करीता खालीलप्रमाणे आदेश पारित करणेत येत आहे

अं ति म  आ दे श

1.            तक्रार क्रमांक 266/2012 खर्चासह अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे. 

 2.            सामनेवाला यांनी तक्रारदार यास वादग्रस्‍त साडीची किंमत रु.2,150/- (रु.दोन हजार एकशे पंन्‍नास मात्र) दयावेत

3.            सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्‍या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई  रु.3,000/- (रु.तीन हजार मात्र) दयावेत.

4.            सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीचा खर्च रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) दयावेत.

5.            सामनेवाला यांनी तक्रारदारास वरील परिच्‍छेद क्र.2, 3 व 4 मध्‍ये नमूद केलेल्‍या रकमा या आदेशापासून 1 महिन्‍याच्‍या आत दयाव्‍यात.

6.            सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.

 
 
[HON'BLE MR. S.M. RATNAKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.G. CHABUKSWAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.