::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- ३१/०७/२०१७)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याने दिनांक 24/10/2014 रोजी गैरअर्जदार क्रं 3 यांचे सब डिलर गैरअर्जदार क्रं 2 यांच्या कडुन नगदी रूपये 21,000/- जमा करून व उर्वरीत रकमे करिता गैरअर्जदार क्रं 1 कडुन कर्ज घेउन असे ऐकुण रूपये 53,427/- ला टु व्हीलर स्प्लेन्डर प्रो क्रंमांक एमएच-34 एटी-3071 या क्रमांकाची गाडी विकत घेतली. विरूध्द पक्ष 1 यांचेकडे सदर गाडी विकत घेण्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेचा भरणा एकूण 24 किस्ती मधे दरमहा रूपये 2010/- या प्रमाणे परत फेड करायचे ठरले होते. विरूध्द पक्ष क्रं 1 यांनी आरसी बुक साठी वेगळे रूपये 200/- प्रती हप्ता तसेच अॅक्सेसरीजसाठी पुन्हा रूपये 6000/- आणि दंड व सरचार्ज धरून आपल्या मर्जी प्रमाणे तक्रारकर्त्याकडुन ऐकुण रूपये 52,270/- वसुल केले. विरूध्द पक्ष क्रं 1 यांनी दिनांक 24/06/2016 रोजी तक्रारकर्त्याची सदर गाडी जप्त केली. तक्रारकर्त्याने सदर गाडी परत करण्याची विनंती केली असता विरूध्द पक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्यास पुन्हा 26,580/- रूपये भरण्यास सांगून सदर गाडी परत करण्यास नकार दिला. विरूध्द पक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्याकडुन दरमहा रूपये 2010/- प्रमाणे 24 महिण्यात म्हणजेच 24/10/2016 चे पुर्वीच कर्जाची रक्कम वसुल केली असतांना गाडी जप्त करण्याचे कारण नव्हते. विरूध्द पक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्याची गाडी बेकायदेशीर जप्त केल्याने तक्रारकर्त्याच्या मुलीचे शिक्षण बंद झाले आहे. विरूध्द पक्ष क्रं 1 तक्रारकर्त्याची गाडी जप्त करून त्याची विल्हेवाट वा दुस-यास विकण्याचे प्रयत्नात आहे. सबब तक्रारकर्त्याने दिनांक 11/08/2016 रोजी विरूध्द पक्षांना अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठवली परंतु विरूध्द पक्षानी त्याची पुर्तता केली नाही व सदर नोटीसला उत्तर ही दिले नाही. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला सेवेत त्रुटी दिल्याने तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाच्या विरूध्द मंचा समक्ष तक्रार दाखल करून त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, विरूध्द पक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्याची जप्त केलेली स्प्लेन्डर गाडी क्रं एमएच-34 एटी 3071 तक्रारकर्त्यास परत करावी. सदर गाडी परत करणे शक्य नसल्यास विरूध्द पक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्या कडुन वसुल केलेली रक्कम रूपये 46,270/- तसेच अॅक्सेसरीज चे रूपये 6,000/- व गैरअर्जदार क्रं 2 ने दिनांक 24/10/2014 रोजी तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम रूपये 21,000/- व्याजासह परत करावी तसेच तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रूपये 15,000/- व तक्रारखर्च रूपये 7,000/- विरूध्द पक्षाकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्रं 1 हजर होऊनही त्यांनी प्रकरणात लेखी उत्तर दाखल न केल्यामुळे दिनांक 12/06/2017 रोजी सदर प्रकरण गैरअर्जदार क्रं 1 यांचे लेखी उत्तराशिवाय पुढे चालविण्यात येते असा आदेश पारीत तसेच विरूध्द पक्ष क्रं 2 व 3 यांना नोटीस तामील होऊन सुध्दा ते प्रकरणात उपस्थित न झाल्यामुळे त्यांच्या विरूध्द प्रकरण एकतर्फा चालवण्याचा आदेश नि.क्रं 1 वर पारीत.
4.तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच तोंडी युक्तीवादावरून खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारण मिमांसा व निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१) तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष 1 ते 3 यांचा ग्राहक आहे काय ? होय
२) विरूध्द पक्ष यांनी तक्रार कर्त्यास न्युनता पुर्ण सेवा दिली आहे काय ? होय
३) आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
5. तक्रारकर्ता यांनी दिनांक 24/10/2014 रोजी गैरअर्जदार क्रं 3 यांचे सब डिलर गैरअर्जदार क्रं 2 यांच्या कडे नगदी रूपये 21,000/- जमा करून व उर्वरीत रकमे करिता गैरअर्जदार क्रं 1 कडुन कर्ज घेतले असे ऐकुण रूपये 53,427/- ला टु व्हीलर स्प्लेन्डर प्रो. एमएच-34 एटी-3071 या क्रमांकाची गाडी विकत घेतली. या संदर्भात तक्रार कर्त्याने नि.क्रं 5 वर पावती दाखल केली यावरून तक्रार कर्ता हा विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे हे सिध्द होते सबब मुद्दा क्रं 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
6. तक्रारकर्त्याची तक्रार व त्याने दाखल केलेले दस्तावेज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की तक्रारकर्त्याने दिनांक 24/10/2014 रोजी स्वतः नगदी रूपये 21,000/- जमा करून व उर्वरीत रक्कम रू.32,483/- करिता विरूध्द पक्ष क्रं 1 कडुन कर्ज घेवून, गैरअर्जदार क्रं 3 यांचे सब डिलर गैरअर्जदार क्रं 2 यांच्याकडुन एकुण रूपये 53,427/- ला टु व्हीलर स्पलेन्डर प्रो एमएच-34 एटी-3071 या क्रमांकाची गाडी विकत घेतली. सदर कर्जाची परतफेड दरमहा किस्त रू.2010/- याप्रमाणे 24 किस्तींमध्ये करावयाची होती. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने दिनांक 8/3/2016 पर्यंत एकूण रू.46,270/- ची परतफेड विरूध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे केली. याचाच अर्थ तक्रारकर्त्याने कर्जपरतफेडीपोटी विरूध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे पर्याप्त रकमेचा भरणा केलेला आहे. दिनांक 24/6/2016 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचे सदर वाहन जप्त केले व तक्रारकर्त्याने सदर वाहन परत मागितले असता त्याला रू.26,580/- चा भरणा करण्यांस सांगितले. परंतु सदर वाहन ताब्यात घेण्यापूर्वी विरूध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यांस कोणतीही पूर्वसुचना न देता जप्त केलेले आहे. तक्रारकर्त्याने नोटीस पाठवून विरूध्द पक्ष क्र.1 यांना वाहन परत मागितलेले आहे, परंतु नोटीस प्राप्त होवूनही विरूध्द पक्ष क्र.1 यांनी पुर्तता केलेली नाही तसेच नोटीसचे उत्तरदेखील दिलेले नाही. विरूध्द पक्ष क्र.1 यांनी मंचाचा प्रकरणातील नोटीस प्राप्तीनंतर उपस्थीत होवूनही आपले बचावापुष्टयर्थ तक्रारीतील कथन खोडून काढलेले नाही, त्यामुळे विरूध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यांस पूर्वसुचना न देता त्याचे वाहन जप्त केले असून तक्रारकर्त्याने मागणी करूनही त्याला ते परत न करून सेवेत न्युनता केलेली आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
7. विरूध्द पक्ष क्र.2 व 3 यांचा सदर कर्जप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द प्रस्तूत तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार क्रं 16/91 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) विरूध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचे टु व्हीलर वाहन स्प्लेन्डर प्रो. एमएच-34 एटी-3071 तक्रारकर्त्यांस परत करावे व सदर वाहन परत करणे शक्य नसल्यांस वि.प.क्र.1 यांनी सदर वाहनाची किंमत रू. 53,427/- तक्रारकर्त्यांस परत करावी. या आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाच्या आत करावी.
3) विरूध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रूपये 10,000/-व तक्रार खर्च रूपये 3000/- या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाच्या आत तक्रार कर्त्यास दयावे.
4) विरूध्द पक्ष क्र.2 व 3 यांच्याविरूध्द तक्रार खारीज करण्यांत येते.
5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 31/07/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.