आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा श्रीमती आर. डी. कुंडले 1. या प्रकरणात मागील अनेक तारखांवर दोन्ही पक्ष गैरहजर आहेत. विरूध्द पक्ष यांना तीन वेळा पाठविलेली नोटीस ‘व्यवस्थापक हजर नसल्यामुळे’ व “Unclaimed” म्हणून परत आली. तक्रारकर्ते व त्यांचे वकीलही सतत (1 जुलै, 2011 सोडून) गैरहजर आहेत. म्हणून रेकॉर्डवर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हे प्रकरण मेरिटवर निकाली काढण्यात येत आहे.
2. तक्रारकर्ती व तिची अज्ञान मुले (वय 15, 14 व 12) यांनी विरूध्द पक्ष पत संस्थेमध्ये गुंतविलेली रक्कम मुदतीपूर्वीच परत मिळण्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. 3. गुंतविलेल्या रकमेचा तपशील खालीलप्रमाणेः-
अ.क्र. |
दिनांक |
रक्कम |
ठेवीदाराचे नांव |
देय रक्कम |
देय दिनांक |
1. |
04/12/2004 |
रू. 10,000/- |
कु. अश्विनी सुधाकर बांगडकर |
रू. 40,000/- |
04/12/2014 |
2. |
04/12/2004 |
रू. 15,000/- |
कु. मेघा सुधाकर बांगडकर |
रू. |
04/12/2012 |
3. |
04/12/2004 |
रू. 10,000/- |
कु. नेहा सुधाकर बांगडकर |
रू. 40,000/- |
04/12/2014 |
4. |
04/12/2004 |
रू. 15,000/- |
सौ. निर्मला सुधाकर बांगडकर |
|
04/12/2012 |
5. |
04/02/2005 |
रू. 17,100/- |
सौ. निर्मला सुधाकर बांगडकर |
रू. 1,36,800/- |
04/02/2010 |
6. |
18/04/2006 |
रू. 8,000/- |
सौ. निर्मला सुधाकर बांगडकर |
रू. 16,000/- |
18/04/2012 |
7. |
19/04/2007 |
रू. 15,000/- |
सौ. निर्मला सुधाकर बांगडकर |
रू. 30,000/- |
19/10/2013 |
8. |
27/11/2007 |
रू. 10,000/- |
सौ. निर्मला सुधाकर बांगडकर |
रू. 20,000/- |
27/05/2014 |
उपरोक्त गुंतविलेल्या रकमांची मुदत पूर्ण झाली नाही. तरीही तक्रारकर्तीला पैशाची अत्यंत गरज असल्याने तिने मुदतीपूर्वीच ठेवी तोडण्याचे ठरविले. तक्रारकर्तीचे पती घर सोडून निघून गेले आहेत. तीन अज्ञान मुलांचे पालन पोषण, शिक्षण व घरखर्च या सर्वांची जबाबदारी तक्रारकर्तीवरच येऊन पडली. तक्रारकर्ती मोलमजुरी करते. अशा परिस्थितीत तिला पैशाची गरज असल्याने तिने अनेकवेळा तोंडी विनंती केल्यानंतर दिनांक 29/01/2011 रोजी विरूध्द पक्ष यांना लेखी पत्र देऊन गुंतविलेल्या रकमेची मागणी केली. परंतु सध्या संस्थेची आर्थिक स्थिती चांगली नाही म्हणून संस्थेने रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली. 4. तक्रारकर्त्यांची मागणी –गुंतविलेल्या रकमा व्याजासहित मिळाव्या, शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- मिळावे तसेच तक्रारीचा खर्च रू. 5,000/- मिळावा. 5. तक्रारीसोबत एकूण 7 मुदत ठेवीच्या झेरॉक्स प्रती व दिनांक 29/01/2011 चे विरूध्द पक्ष यांना पाठविलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे. 6. विरूध्द पक्ष एकतर्फी आहेत. विरूध्द पक्ष यांना तीन वेळा नोटीस पाठवूनही त्यांनी घेण्यास नकार दिला. मंचात हजर झाले नाहीत तसेच तक्रारीवर उत्तर देखील दाखल केले नाही. ही बाब गंभीर आहे. 7. मंचाला तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार ग्राह्य वाटते म्हणून आदेश. आदेश तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरूध्द पक्ष संस्थेने तक्रारकर्तीला तिच्या अज्ञान मुलांच्या नावे गुंतविलेल्या मुदत ठेवीच्या अनुक्रमे रू. 10,000/-, रू. 15,000/- व रू. 10,000/- या रकमा Indemnity Bond लिहून घेऊन प्रदान कराव्या. 2. विरूध्द पक्ष संस्थेने तक्रारकर्तीला तिच्या स्वतःच्या नावे गुंतविलेल्या मुदत ठेवीच्या अनुक्रमे रू. 15,000/-, रू. 17,100/-, रू. 8,000/-, रू. 15,000/- व रू. 10,000/- या रकमा परत कराव्या. 3. तक्रारकर्ती मुदत पूर्ण होण्यापूर्वी 7 पावत्या तोडत असल्याने संस्थेच्या नियमानुसार वजावट व व्याज द्यावे. 4. विरूध्द पक्ष संस्थेने शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 1,000/- तक्रारकर्तीला द्यावे. 5. प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून विरूध्द पक्ष संस्थेने तक्रारकर्तीला रू. 500/- द्यावे. 6. विरूध्द पक्ष संस्थेने आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी. 7. ऑफीसने विरूध्द पक्ष संस्थेला या आदेशाची प्रत रजिस्टर्ड पोस्टाने पाठवावी. असहमतीदर्शक आदेश (Dissenting Order (पारित व्दारा श्रीमती गीता रा. बडवाईक, सदस्या) (पारित दिनांक 21 जुलै, 2011) वरील आदेशाशी असहमत असल्यामुळे वेगळा आदेश खालीलप्रमाणेः- 1. तक्रारकर्ती क्रमांक 1 ही तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 4 यांची आई आहे. तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 4 यांचे वय अनुक्रमे 15, 14 व 12 वर्षे आहेत. म्हणजेच तीनही तक्रारकर्ते अज्ञान आहेत. तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केले आहे की, तिचे पती काही दिवसांपूर्वी तक्रारकर्त्यांना सोडून बाहेर निघून गेले आहेत. तिच्यावरच परिवाराचे पालनपोषण करण्याची जबाबदारी आहे. ती मोलमजुरी करते मात्र त्यातून परिवाराचे पालनपोषण करणे तिला फार कठीण जात असल्यामुळे तिला रकमेची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु यासंदर्भात तक्रारकर्ती क्रमांक 1 ने कोणताही दस्त दाखल केला नाही. 2. तक्रारीच्या परिच्छेद क्रमांक 2 मध्ये तक्रारकर्तीने मुदत ठेवीचे विवरण दिलेले असून त्यामधील अनुक्रमांक 1 ते 3 मध्ये अज्ञान तक्रारकर्ते यांच्या नांवाने अनुक्रमे रू. 10,000/-, रू. 15,000/- व् रू. 10,000/- या रकमा दिनांक 04/12/2004 ला विरूध्द पक्षाकडे मुदती ठेवीमध्ये गुंतविल्या असून विरूध्द पक्ष संस्थेच्या व्यवस्थापकाने त्यासंदर्भात प्रमाणपत्र दिले आहेत. सदर तीनही प्रमाणपत्र दस्तऐवज अनुक्रमे 8, 9 व 10 वर आहेत. 3. कायद्याचे हे तत्व आहे की, अज्ञानाच्या हक्कावर कोणत्याही प्रकारे कोणीही गदा आणू नये. याबाबत दक्षता घेतली पाहिजे. अज्ञानाच्या कायदेशीर अधिकारावर तो अज्ञान आहे याचा गैर फायदा घेऊन कोणीही स्वतःचा फायदा सुध्दा करू शकत नाही. अज्ञानाच्या हिताचे संरक्षण करणे हे न्यायालयाचे प्रथम कर्तव्य आहे. ग्राहक मंच हे अर्धन्यायिक न्यायालय असल्यामुळे अज्ञानाच्या हिताचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. तक्रारकर्ती क्रमांक 1 ने तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 4 यांच्या मुदतपूर्व ठेव मागणीच्या मुळे तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 4 यांचा फायदा न होता त्यांचे नुकसानच होईल. कारण मुदत संपल्यानंतर देय रक्कम मुदतीपूर्वी दिल्या जाणा-या रकमेपेक्षा निश्चितच जास्त असणार आहे. अज्ञान तक्रारकर्ते 2 ते 4 यांच्या मुदतीपूर्वी रकमा मागण्याचा तक्रारकर्ती क्रमांक 1 ला अधिकार नाही. कारण ते तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 4 यांच्या हिताचे ठरणार नाही असे आमचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 4 यांची तक्रार अपरिपक्व आहे असे आमचे मत आहे. 4. तक्रारकर्ती क्रमांक 1 ला तिने स्वतः मुदत ठेवीमध्ये गुंतविलेल्या रकमा मुदतीपूर्व परत मागण्याचा तिला अधिकार आहे. त्यामुळे विरूध्द पक्षाने तक्रारकर्ती क्रमांक 1 च्या मुदत पूर्व ठेवी तिला संस्थेच्या/बँकेच्या नियमानुसार व्याज दराने परत कराव्यात. तक्रारकर्ती क्रमांक 1 हिने विरूध्द पक्षाकडे तिच्या ठेवी मुदतीपूर्वी परत मागितल्या असता विरूध्द पक्षाने तिला त्या परत केल्या नाहीत ही विरूध्द पक्षाची कृती त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. मंचामध्ये तक्रार दाखल करावी लागली. करिता तक्रारकर्ती क्रमांक 1 ठेवीच्या रकमेसोबतच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई, तक्रारीचा खर्च व संस्थेच्या/बँकिंगच्या नियमाप्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहे असे आमचे मत असल्यामुळे फक्त तक्रारकर्ती क्रमांक 1 हिचीच तक्रार मंजूर करण्यात येत आहे. करिता खालील आदेश. -ः आ दे श ः- 1. तक्रारकर्ती क्रमांक 1 ची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. विरूध्द पक्षाने तक्रारकर्ती क्रमांक 1 हिला रू. 15,000/-, रू. 17,100/-, रू. 8,000/-, रू. 15,000/- व रू. 10,000/- या मुदत ठेवीच्या रकमा संस्थेच्या/बँकिंगच्या मुदतपूर्व ठेवीच्या नियमानुसार व्याजासहित परत कराव्यात. 3. विरूध्द पक्षाने तक्रारकर्ती क्रमांक 1 हिला शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 1,000/- द्वावेत. 4. विरूध्द पक्षाने तक्रारकर्ती क्रमांक 1 हिला तक्रारीचा खर्च म्हणून रू. 500/- द्यावेत. 5. तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 4 हे अज्ञान असल्यामुळे त्यांची तक्रार अपरिपक्व आहे. त्यामुळे ती खारीज करण्यात येत आहे. 6. विरूध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी. नरेश वि. बनसोड श्रीमती गीता रा. बडवाईक सदस्य सदस्या
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |