(घोषित दि. 19.09.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) गैरअर्जदारांकडून रुपये 19,65,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तक्रारदाराने केलेली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्यास गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी सन 2004 पासून थंड पेय विक्रीसाठी वितरक म्हणून नेमलेले आहे. त्या संदर्भात गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी त्याच्या सोबत करार केलेला आहे. त्या कराराचे वेळोवेळी नुतनीकरण करण्यात आले. त्यानंतर सन 2010 मध्ये कराराचे नुतनीकरण करण्यात आले आणि तो करार सन 2013 पर्यंत करण्यात आला. दिनांक 16.08.2011 पर्यंत गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी त्याच्यासोबत व्यवस्थित व्यवहार केले. परंतू त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी अचानक त्यास थंड पेयाचा पुरवठा करण्याचे बंद केले. त्याने सदर व्यवसायामध्ये रुपये 14,50,000/- गुंतविलेले आहेत. असे असूनही गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी त्यास थंड पेयांचा पुरवठा करण्याचे थांबविले आणि त्यांनी त्यास कोणतीही सूचना न देता गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्या बरोबर व्यवहार करण्यास सुरुवात केली. दिनांक 06.09.2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 हे त्याच्या दुकानात आले आणि त्यांनी थंड पेयाची 500 कॅरेट्स जबरदस्तीने चोरुन नेले. अशा प्रकारे गैरअर्जदारांनी करारानुसार त्यास थंड पेय वितरीत केले नाही आणि त्याच्याकडील 500 कॅरेट्स थंड पेय चोरुन नेले व त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांच्याकडून रुपये 19,65,000/- नुकसान भरपाई द्यावी आणि गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी गैरअर्जदार क्रमांक 4 याच्यासोबत वितरक या नात्याने व्यवहार करण्यास प्रतिबंध करावा. तक्रारदाराच्या तक्रारीचे स्वरुप पाहता तक्रारदार ग्राहकाच्या व्याख्येत बसतो काय आणि ही तक्रार या मंचात चालू शकते काय ? असा प्राथमिक मुद्दा उपस्थित झालेला आहे. तक्रारदाराच्या वतीने अड. एस.डी.देशपांडे यांनी युक्तीवाद केला. सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी हे स्पष्ट करु इच्छितो की, तक्रारदाराचे गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांच्यासोबत ग्राहक म्हणून कोणतेही नाते नाही. तक्रारदार हा गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी उत्पादीत केलेल्या मालाचा वितरक आहे. म्हणजेच तक्रारदार हा गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांचा एजंट असून तक्रारदाराचा गैरअर्जदारा सोबत एजंट व मालक असा संबंध आहे. त्यामुळे तक्रारदाराला या मंचाकडे तक्रार करण्याचा कोणताही अधिकार नाही. थोडयावेळासाठी असे जरी गृहीत धरले की, तक्रार गैरअर्जदारांकडून वितरण करण्यासाठी माल खरेदी करतो म्हणून तो गैरअर्जदारांचा ग्राहक आहे, तरी ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) मध्ये दिलेल्या ग्राहकाच्या व्याख्येत तक्रारदार बसत नाही. कारण तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून व्यापारी कारणासाठी माल खरेदी केलेला आहे. तक्रारदाराच्या व्यवसायाचे स्वरुप पाहता तो स्वयंरोजगाराद्वारे व्यवसाय करीत नसून त्याचा व्यवसाय मोठा असून त्याच्याकडे अनेक माणसे काम करतात ही बाब तक्रारदाराच्या वतीने युक्तीवादा दरम्यान मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार या मंचात चालू शकत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्यात येते.
- तक्रारदारास आदेशाची प्रत देण्यात यावी.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | |