(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 19 एप्रिल, 2011) यातील तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे. यातील तक्रारदार श्री ठवरे यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार बोअरवेल व पंप लावून देण्याचा व्यवसाय करीतात. त्यांनी रु. 22,350/- मध्ये बोअरवेल लावून देण्याचा तक्रारदारासोबत करार केला आणि दिनांक 5/2/09 ला तक्रारदाराचे घरी बोअरवेल व पंप लावून दिला. तक्रारदाराने रुपये 22,000/- नगदी दिले आणि रुपये 350/- देणे राहिले. गैरअर्जदाराने 120 फुटाची बोअरवेल तयार करुन .75 एचपी/2 चा सबमर्शिबल पंप लावून दिला. सदर बोअरवेल काही दिवस योग्य सुरु राहिला, मात्र जून 2009 मध्ये तो बंद पडला. गैरअर्जदाराकडे दूरध्वनीद्वारे तक्रार केल्यानंतर गैरअर्जदाराचे प्रतिनिधीने दुरुस्ती करुन पंप सुरु करुन दिला. पुन्हा पंप बंद पडला. पुढे तक्रारदाराने गैरअर्जदार यांची भेट घेतली व पंप दुरुस्त करुन देण्याविषयी तक्रार केली. गैरअर्जदाराचे प्रतिनिधी, त्यांना मनाई केली असता, त्यांनी त्यात सिमेंटचे पाणी टाकले तेंव्हा पंप जॅम झाला. त्यानंतर गैरअर्जदाराचे प्रतिनिधीने पंप ओढून पाहिला व चैन पुलीद्वारे पंप काढण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा पंप न निघताच रोप तुटला. पुन्हा पंप काढण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा पंप लावून देतो असे सांगून पाईपही तोडला. नवीन मोटर लावून देतो असे सांगून जुनी मोटार लावून पंप सुरु केला. फक्त दहा मिनीटेच त्यात पाणी आले व जुनी मोटार जळाली. तेंव्हापासून गैरअर्जदाराने बोअरवेल व पंप दुरुस्त करुन दिले नाही त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारदाराने नोटीस दिली, मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. म्हणुन तक्रारदार श्री ठवरे यांनी ही तक्रार मंचासमक्ष दाखल करुन तीद्वारे नवीन बोअरवेल बसवून द्यावा किंवा बोअरवेलचा खर्च रुपये 22,000/- 18% व्याजासह परत करावा, तसेच त्यांना झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रुपये 20,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- मिळावा अशा मागण्या केल्या आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचाद्वारे नोटीस बजाविण्यात आली, मात्र पाठविलेली नोटीस तीस दिवसांचा कालावधी होऊनही मंचात परत आली नाही, वा पोचपावती सुध्दा परत आलेली नाही. म्हणुन गैरअर्जदारास नोटीस प्राप्त झाल्याचे घोषित करुन ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 28 (ए) (3) मधील तरतूदीप्रमाणे गैरअर्जदाराविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक 1/4/2011 रोजी परीत करण्यात आला. यातील तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत गैरअर्जदारास दिलेली नोटीस, पोचपावती, दिलेल्या रकमेची पावती याप्रमाणे दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांनी आपला लेखी जबाब दाखल केला नाही व आपला कोणताही बचाव केला नाही. यातील तक्रारदाराने प्रतिज्ञालेख, पावत्या, नोटीस इत्यादी दाखल करुन त्यांनी गैरअर्जदाराकडून सदरचे काम करुन घेतले ही बाब मंचासमक्ष सिध्द केलेली आहे. तसेच त्यांचा बोअरवेल बंद आहे ही बाब सुध्दा उघड झालेली आहे. यासंबंधात तक्रारदाराने गैरअर्जदार यांचेशी वेळोवेळी संपर्क केला व नोटीस दिली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांनी उत्तरही दिले नाही. थोडक्यात गैरअर्जदाराने आपल्या सेवेत त्रुटी ठेवली व तक्रारदारास योग्य असे काम करुन दिलेले नाही ही बाब मंचासमक्ष सिध्द झालेली आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. -000 अं ती म आ दे श 000- 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराने तक्रारदारास रुपये 22,000/- नोटीसचा दिनांक 23/1/2010 पासून रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह मिळून येणारी रक्कम द्यावी. 3) गैरअर्जदाराने तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 5,000/-आणि तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 1,000/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 6,000/- (रुपये सहा हजार केवळ) एवढी रक्कम द्यावी. गैरअर्जदार यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून एक महिन्याचे आत करावे. नपेक्षा उपरोक्त रकमेवर 9% ऐवजी द.सा.द.शे. 12% दराने दंडनिय व्याज गैरअर्जदार देणे लागतील.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |