-ः अंतिम आदेश ः- द्वारा- मा.सदस्या, सौ. ज्योती अभय मांधळे. 1. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणे- तक्रारदार हे नवी मुंबईचे रहिवासी असून सामनेवाले 1 हे नवी दिल्लीचे रहिवासी आहेत. सामनेवाले 2 हे गोरेगाव-पश्चिमचे रहिवासी आहेत. तक्रारदाराने सामनेवालेकडून शुभ धनलक्ष्मी यंत्र व रुद्राक्ष माला दि.21-12-2010 रोजी विकत घेतले होते. सामनेवाले 1 यानी टी.व्ही.चॅनेलवर हिमालय रुद्राक्ष संस्थानबद्दल जाहिरात दिली. सदर जाहिरातीतून त्यानी असे यंत्र वापरल्याने आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते असे सांगितले. जर 15 दिवसाचे आत सुधारणा झाली नाही तर सदर वस्तू परत घेतल्या जातात व पैसे परत दिले जातात. त्याबाबत सामनेवाले 1 यानी तसे प्रमाणपत्रही दिले होते. सदर जाहिरात पाहिल्यावर सामनेवालेकडून तक्रारदाराने सदर यंत्र विकत घेतले. सदर वस्तूपासून तक्रारदाराला यश न आल्याने त्यानी प्रथम सामनेवाले 2 यांचेशी संपर्क साधणेचा प्रयत्न केला. सामनेवाले 2 यानी प्रतिसाद न दिल्यामुळे सामनेवाले 1 यांचेशी संपर्क साधून सदर वस्तूचा त्याना काही फायदा न झाल्याचे सांगितले. सामनेवाले 1 यानी तक्रारदाराला प्रत्यक्षरित्या गोरेगावला जाऊन चौकशी करण्यास सांगितले. त्यानी वस्तु बदलून दिली व नवीन वस्तुमुळे 21 दिवसाचे आत त्याना काही परिवर्तन जाणवेल हे ही सांगितले परंतु तक्रारदारास काही बदल जाणवला नाही. 2. तक्रारदाराला सदरची वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च आला, तसेच सामनेवाले 2 यानी काही पूजाविधी सांगितल्याने त्याचाही खर्च आला परंतु त्याना काही यश न आल्याने त्यानी सदर वस्तूची किंमत, पूजाविधीची किंमत, मानसिक त्रासासाठी नुकसानभरपाई तसेच न्यायिक खर्चाविषयी मंचात तक्रार दाखल केली. सदरची तक्रार मंचासमक्ष अँडमिशनसाठी आली असता तक्रारदाराने स्वतः मंचासमोर युक्तीवाद केला. तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकून मंचाने खालील मुद्दा निश्चित केला. मुद्दा क्र.1- तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार या मंचाच्या अधिकारक्षेत्रात येते काय? उत्तर - नाही. विवेचन मुद्दा क्र.1- तक्रारदाराने दाखल केलेला तक्रारअर्ज, प्रतिज्ञापत्र तसेच कागदपत्रे या सर्वाचा विचार करुन मंचाचे असे निदर्शनास आले की, तक्रारदार स्वतः नवी मुंबई, सी.बी.डी.बेलापूरचा रहिवासी आहे. परंतु सामनेवाले 1व 2 चे कार्यालय या मंचाचे कार्यकक्षेत नाही. सामनेवाले 1 यांचे कार्यालय नवी दिल्ली येथे असून सामनेवाले 2 यांचे कार्यालय गोरेगाव पश्चिम येथे आहे. सबब सदर तक्रार मंचाच्या भौगोलिक कार्यकक्षेत नसल्याने ती दाखल करुन घेता येत नाही. 3. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो- -ः आदेश ः- 1. तक्रार क्र.96/11 मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याने ती निकाली काढण्यात येते. 2. खर्चाचे वहन उभय पक्षानी स्वतः करावे. 3. सदर आदेशाची सत्यप्रत तक्रारदाराना पाठवण्यात यावी. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि. 15-6-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |