तक्रारदारांतर्फे - अॅड.श्रीमती. जयश्री कुलकर्णी
जाबदारांतर्फे - अॅड. श्री. मणियार
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 31/01/2014
(द्वारा- अंजली देशमुख, अध्यक्ष
तक्रारदारांची तक्रार संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, जाबदाराच्या एका प्रतिनिधीने तक्रारदारास दि. 26/3/2008 रोजी फोनवरुन तक्रारदारांनी एक बक्षिस जिंकले आहे व ते घेण्यासाठी जाबदारांनी एक सेमिनार ठेवला आहे, त्यामध्ये हजर राहावे असे सांगितले, त्यामुळे तक्रारदार व त्यांच्या पत्नी सेमिनारमध्ये हजर राहिल्या. त्या सेमिनारमध्ये जाबदारांनी तक्रारदारास एक स्कीम आणि त्याचे फायदे सर्वांना समजावून सांगितले व या स्कीमची मेंबरशीप / सदस्यत्व घेतल्यास त्यांना जाबदारांच्या मालकीच्या रिसॉर्टमध्ये अॅडव्हान्स बुकींग केल्यानंतर त्या हॉलीडे रिसॉर्टमध्ये मोफत राहता येईल / सुट्टी घालवता येईल असे सांगितले. त्यावेळी त्यांनी भारतामधील त्यांच्याशी (affiliated) संलग्न असलेल्या रिसॉर्टची यादी दाखवली. जाबदारांशी संलग्न असणा-या त्यांच्या 35 संलग्न रिसॉर्टची माहिती जाबदारांनी तक्रारदारांना दिली आणि तिथे मेंबरना मोफत राहता येते असे सांगितले. या सर्व रिसॉर्टसमधील त्यांचे दर थ्री स्टार हॉटेल पेक्षा कमी किंमतीचे आहेत. या जाबदारांशी संलग्न असलेल्या रिसॉर्टमध्ये मेंबरना केवळ रु.750/- तेथे राहण्यासाठी भरावे लागतील असे तक्रारदारास सांगण्यात आले. तेथील रिसॉर्टमध्ये राहिल्यानंतर तेथील जेवणाच्या बिलावर व ट्रॅव्हलवर डिस्काऊंट देण्यात येईल असे सांगितले परंतु हॉलीडे रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी 15 दिवस आधी बुकींग करावे लागते असे सांगितले. मेंबरशीपचा कालावधी पाच वर्षांचा असून त्याची फी रु.30,000/- अशी ठरली होती. या कालावधीमध्ये तक्रारदार जाबदारांच्या संलग्न असणा-या रिसॉर्टमध्ये 6 रात्र 7 दिवस राहू शकत होते. मेंबरसहित चार जणांना त्याचा फायदा होणार होता. जाबदारांबरोबर चर्चा झाल्यानंतर जाबदारांच्या प्रतिनिधीने मेंबरशीप घेण्याविषयी सांगितले. जाबदारांचे एक कर्मचारी श्री. नितीन यांनी, तक्रारदारास सर्व माहिती देऊन श्री. सिध्दार्थ यांनी देऊ केलेल्या 7 दिवसांपेक्षा 20 दिवस जास्तीचे ऑफर केले तसेच मेंबरशीप रकमेमध्ये देखील डिस्काऊंट दिले. त्यामुळे तक्रारदारांनी भारावून जाऊन त्यांच्या आय सी आय सी आय बँकेच्या डेबीट कार्डमधून रक्कम रु.25,000/- काढून जाबदारांना दिली. ही मेंबरशीप घेतल्यानंतर तक्रारदारास या सुविधा मिळण्यासाठी अनेक त्रास सहन करावा लागला. मेंबरशीप घेतल्यापासून फक्त एकदाच जाबदारांकडून महाबळेश्वरचे एका दिवसाचे बुकींग त्यांना मिळाले. तेथील रिसॉर्टमध्ये तक्रारदारांना रक्कम रु.2,206/- जबरदस्तीने भरावे लागले. तक्रारदारांनी जाबदारांकडे दि. 19/3/2009 व दि. 20/3/2009 महाबळेश्वर येथे नोंदणी करण्यास सांगितले असता जाबदारांच्या प्रतिनिधीने महाबळेश्वरचे रिसॉर्ट एप्रिल 2009 पर्यंत फुल असल्याचे सांगून त्यांना नोंदणी दिली नाही. तक्रारदारांनी बुकींगसाठी प्रयत्न केला परंतु जाबदारांनी त्यांना निरनिराळी कारणे उदा रिसॉर्टचे बांधकाम चालू आहे, बुकींग फुल आहे अशी कारणे देऊन तक्रारदाराच्या बुकींगला नकार दिला. मेंबरशीप घेण्याच्या वेळेस जाबदारांनी त्यांना रिसॉर्टचे बुकींग 15 दिवस आधी केले तर रिसॉर्ट मिळू शकेल असे सांगितले होते परंतु असे काही झाले नाही. त्यानंतर दि. 24/1/2009 रोजी दि.14/2/2009 रोजी लोणावळा रिसॉर्टसाठी नोंदणीची मागणी केली असता रिसॉर्ट फुल असल्याचे सांगून जाबदारांनी नकार दिला. त्यानंतर डिसेंबर 2009 ते फेब्रुवारी 2010 पर्यंत बुकींगसाठी ब-याचवेळा प्रयत्न केला, त्यानंतर दि. 20/3/2010 रोजी महाबळेश्वर येथील मिस्ट्री वुडस रिसॉर्टमध्ये त्यांना बुकींग मिळाले. त्यावेळेस जाबदारांच्या प्रतिनिधीने त्यांना रु.2,000/- युटीलिटी चार्जेस भरण्यासाठी सांगितले. तेथे त्यांनी दोन रुम्स बुक केले होते. तेथे त्यांनी कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत. जाबदारांच्या प्रतिनिधी मिस मेरी यांनी तक्रारदारांनी रु. 2,206/- भरल्यासच बुकींग केले जाईल असे सांगितले त्यामुळे तक्रारदारास ही रक्कम रु.2,206/- दि. 15/3/2010 रोजी कॅशने भरावी लागली. जाबदारांनी त्यावेळेस तक्रारदारास सांगितले की, मिस्ट्री वुडस हे रिसॉर्ट एम एस आर टी सी बस स्टॉप महाबळेश्वर पासून 6 कि.मी. आत आहे वास्तविक ते 16 कि.मी. आत होते. त्या रिसॉर्टमधील रुम्स अस्वच्छ होत्या एअर कंडिशन चालू स्थितीत नव्हते. रुमचे भाडे दि. 20/3/2010 रोजी रु.800/- प्रति रुम असे होते. तक्रारदारांनी रक्कम रु. 2,206/- दोन रुमसाठी पूर्वीच दिले होते. प्रेझेंटेशनच्या वेळेस जाबदारांनी तक्रारदारास असे सांगितले होते की जर हॉलिडेजचा वापर केला नाही किंवा तक्रारदाराने वर्षामध्ये त्यांच्या सुट्टया कंपनीच्या रिसॉर्टमध्ये घालवल्या नाहीत तर ते रेंटची रक्कम रु.1,000/- प्रतिदिवसाचे देतील. त्याचप्रमाणे या जमा झालेल्या सुट्टयांपैकी 65 टक्के सुट्टया एक वर्ष झाल्यानंतर तक्रारदारास परत करता येतात, असे सांगण्यात आले होते. परंतु अशाप्रकारच्या कुठल्याही सुविधा जाबदार कंपनी देत नाहीत असे तक्रारदारास नंतर कळाले आणि मेंबरशीप डॉक्युमेंटसमध्ये सुध्दा तसे नमुद केले नव्हते. त्यावेळेस जाबदार कंपनीने तक्रारदारास पॅनकार्ड क्लब मेंबरशीप मोफत देण्यात येईल असे सांगितले परंतु अशी मोफत मेंबरशीप त्यांना दिली नाही. इंटरनेट साईटवरुन जाबदार कंपनीने अनेक लोकांना याबददल फसविल्याचे तक्रारदारास कळून आले. त्यानंतनर तक्रारदारांनी दि. 30/6/2011 रोजी जाबदारास पत्र पाठवून रक्कम रु.25,000/- परत मागितले, जाबदारांनी दि. 5/7/2011 रोजी उत्तर पाठवून त्यास नकार दिला त्यामुळे तक्रारदारांनी मानसिक त्रास झाल्याबददल आणि असुविधा झाल्याबददल तक्रार दाखल केली. तक्रारदार जाबदारांकडून रक्कम रु.25,000/- परत मागतात. तसेच रक्कम रु.50,000/- मानसिक व शारीरिक त्रासाबददल, रक्कम रु.10,000/- तक्रारीचा खर्च असे एकूण रक्कम रु.85,000/- 18 टक्के व्याजदराने मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदारांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार आणि त्यांची पत्नी जाबदारांचे ब्रोशर, माहितीपुस्तक, जाहिरात पाहून त्यांच्याकडे मेंबरशीप घेण्यास आले. तक्रारदारांनी माहितीपुस्तिकेवरुन व दि. 26/3/2008 रोजीच्या मेंबरशीप अॅग्रीमेंटमधील क्लॉजनुसार मेंबरशीप घेण्याची तयारी दर्शविली. मेंबरशीप अॅग्रीमेंटमध्ये नसलेल्या सेवेबददल जाबदारांनी तक्रारदारास कुठलेही आश्वासन दिले नव्हते. तक्रारदारांनी जाबदारास रक्कम रु.25,000/- मागण्यासाठी दि. 30/6/2011 रोजी पत्र पाठविले होते ते त्यांना मान्य नाही अशाप्रकारची पत्रे तक्रारदारांनी दाखल केलेली नाहीत. तक्रारदारांनी ही तक्रार त्यांच्याविरुध्द खोडसाळपणे दाखल केली आहे
जाबदारांचे असे म्हणणे आहे की, मे. मंचास ही तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र नाही. इतर सर्व आरोप अमान्य करत तक्रारदाराची तक्रार खर्चासहित नामंजूर करावी अशी मागणी जाबदार करतात.
जाबदारांनी शपथपत्र आणि वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे दाखल केले आहेत.
3. त्यानंतर तक्रारदार व जाबदारांनी मा. वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे दाखल केले आहेत.
4. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, मेंबरशीप डिक्लेरेशनप्रमाणे त्यांनी अनेकठिकाणी अनेकवेळा रिसॉर्टला जाण्यासाठी जाबदारांना दोन महिने आधी बुकींगसाठी विचारणा केली असता, त्यांना अनेकवेळा त्या त्या रिसॉर्टची बुकींग फुल आहेत, अंडर कन्सट्रक्शन आहेत म्हणून रिसॉर्टला जाण्यास जाबदारांकडून नकार देण्यात आला. शेवटी तक्रारदारांनी जाबदारांना डिसेंबर 2009 ते फेब्रुवारी 2010 पर्यंत अनेकवेळा फोन केला असता महाबळेश्वर येथील मिस्ट्री वुडस या रिसॉर्टमध्ये दि. 20/3/2010 रोजीचे बुकींग मिळाले. त्यावेळेस युटीलिटी चार्जेस म्हणून दोन रुमचे रक्कम रु. 2,206/- सर्व्हिस टॅक्स सहित त्यांच्याकडून घेण्यात आले त्याशिवाय त्यांचे बुकींग घेतले जाणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्याची पावतीसुध्दा तक्रारदारांनी दाखल केली आहे. मेंबरशीप डिक्लेरेशनची पाहणी केली असता तेथील क्लॉज नं. 6 मध्ये :-
“The utility charges are Rs. 500/- per day / per room at any of the company owned resorts”.
असे नमुद केले आहे. तक्रारदाराकडून जाबदारांनी रक्कम रु. 2,206/- घेतलेले आहेत, वास्तविक त्यांनी डिक्लेरेशनप्रमाणे रक्कम रु. 500/- पर डे पर रुम घ्यावयास पाहिजे होते. त्या रुमसुध्दा अतिशय अस्वच्छ आणि तेथील एअर कंडिशनर चालूस्थितीत नव्हता. तेथील रुम टेरिफ हे रु.800/- पर रुम असे सांगण्यात आले. तरीसुध्दा जाबदारांनी रक्कम रु.2,206/- तक्रारदाराकडून घेतले इथे जाबदारांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत अनेकवेळा बुकींग केल्यानंतर रिसॉर्टचे बुकींग मिळत नव्हते, मिळाले तेही अस्वच्छ व जास्तीची रक्कम अदा करुन. त्यानंतर त्यांनी इंटरनेटवर माहिती काढली असता जाबदार कंपनीने अशा ब-याच लोकांना फसविले आहे म्हणून जाबदारांबरोबरचे अॅग्रीमेंट कॅन्सल करुन अॅग्रीमेंटची रक्कम परत करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. डिक्लेरेशनमध्ये क्लॉज नं. 13 मध्ये :-
“This Declaration is BINDING, FINAL NON-
RESCINDABLE AND NON-CANCELLABLE ”.
असे नमुद केलेले आहे आणि त्यावर तक्रारदारांनी सही केलेली आहे. त्यामुळे हे डिक्लेरेशन किंवा अॅग्रीमेंट कॅन्सल किंवा टर्मिनेट होऊ शकत नाही हे दिसून येते. जाबदार त्यांच्या लेखी जबाबामध्ये डिक्लेरेशनच्या क्लॉज क्र. G 2 & 3 चा आधार घेतात.
G (2) “ Any member who is desirous of using the resort / club shall give prior intimation in advance of his intention to use the Resort / Club which would be provided subject to availability “.
G (3) A member having confirmed to use the Resort / Club can cancel such confirmation of use of the Resort/Club by giving at least 15 days prior intimation in writing to the Company. Default on the part of the members in giving notice of “nonuse” will result in the member having to make such payment as may be determined by the company for their lapse or the period will be treated as “used”.
यावरुन मेंबरने 15 दिवस आधी रिसॉर्ट बुकींग केले पाहिजे असे दिसून येते. प्रस्तुतच्या तक्रार अर्जामध्ये तक्रारदारांनी दोन महिने आधीपासून प्रयत्न केला होता आणि त्यांना दोन महिन्यानंतर रिसॉर्टचे बुकींग मिळाले. क्लॉज नं. G-2 नुसार हे रिसॉर्ट / क्लब उपलब्धतेवर मिळू शकतात असे आहे आणि जाबदार याच क्लॉजचाच आधार घेत नेहमी रिसॉर्ट फुल आहेत अशी कारणे तक्रारदारास देत होते. तक्रारदारांनी जेव्हा जेव्हा रिसॉर्टचे बुकींग केले तेव्हा तेव्हा हीच कारणे देण्यात आली परंतु त्यासाठी खरोखरच रिसॉर्ट बुक होते याबद्दलचा कुठलाही पुरावा जाबदारांनी दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारदारास साहजिकच मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला असेलच असे मंचाचे मत आहे. या नुकसानभरपाईसाठी म्हणून मंच जाबदारांनी तक्रारदारास नुकसानभरपाई पोटी रक्कम रु.15,000/- दयावेत, तक्रारीचा खर्च रक्कम रु.3,000/- दयावा आणि जास्तीचे घेतलेले युटीलिटी चार्जेस रककम रु. 1,000/- परत दयावेत, असा आदेश देते.
जाबदारांनी ही तक्रार मंचात चालू शकत नाही किंवा कार्यक्षेत्र नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे परंतु त्याबददलचे कुठलेही स्पष्टीकरण किंवा क्लॉजेस दाखल केले नाहीत. तक्रारदारांनी दाखल केलेला निवाडा या प्रक्ररणास लागू होतो.
5. वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदारांनी तक्रारदारास युटीलिटी चार्जेसची रक्कम रु.1,000/- (रक्कम रु. एक हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावी.
3. जाबदारांनी तक्रारदारास नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.15,000/- (रक्कम रु. पंधरा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.3,000/- (रक्कम रु. तीन हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावेत.
4. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.