(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या)
(पारीत दिनांक : 24 सप्टेंबर 2015)
अर्जदाराने सदर तक्रार, कार्बन कंपनीचा मोबाईल मॉडेल नं.A 90 घेतले व त्याची फसवणूक झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याकरीता किंवा दाखल केली असून तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून दि.12.10.2013 ला कार्बन कंपनीचा मोबाईल मॉडेल नं. A 90 रुपये 4850/- बिल क्र.812 अन्वये खरेदी केला. सदर मोबाईल मध्ये दि.16.4.2014 ला बिघाड आलेला असल्यामुळे सदर मोबाईल दुरुस्तीकरीता दि.17.4.2014 ला गैरअर्जदाराकडे जमा केला व मोबाईल जमा केल्याबाबत पोचपावती अर्जदाराला दिली. त्यानंतर, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे बरेचदा भेट दिली असता सदर मोबाईल दुरुस्ती करुन दिला नाही किंवा बदलवून सुध्दा देण्यात आलेला नाही. याबाबत, गैरअर्जदाराकडे विचारणा केली असता, गैरअर्जदाराने उडवा-उडवीचे उत्तरे देण्यात आली व मोबाईल दुरुस्त होताच कळविण्यात येईल असे तोंडी सांगण्यात आले. जवळ-जवळ आठ-नऊ महिन्याचा कालावधी लोटून सुध्दा अजुन पर्यंत गैरअर्जदाराने मोबाईल दुरुस्ती करुन दिला नाही. गैरअर्जदाराने मोबाईल बदलवून देण्याबाबत कोणतेही प्रयत्न केले नाही. त्यामुळे, सदरहू मोबाईल ऐवजी दुसरा मोबाईल देण्यात यावा किंवा मोबाईलची अदा केलेली रक्कम रुपये 4850/- व्याजासह परत करण्यात यावी. अर्जदारास शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रुपये 10,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्यात यावे. प्रकरण दाखल करण्याचा खर्च रुपये 2000/- मिळण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 4 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार यांनी नि.क्र.5 नुसार लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार यांनी नि.क्र.5 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे की, अर्जदाराने दि.17.4.2015 ची स्लीप दिली त्यानुसार मोबाईल खरेदी केल्याचा कालावधी जवळपास एक वर्ष तीन महिनेच्या वर झालेला आहे. हे म्हणणे खरे आहे की, अर्जदाराने मोबाईल रिपेअरींग करीता दिला होता व सदर मोबाईल कंपनीने दुरुस्त करुन दिला व दि.3.5.2014 अर्जदारास परत केला. यानंतर दोन महिन्यानंतर पुन्हा मोबाईल दुरुस्तीकरीता घेऊन आले त्यावेळी मोबाईलचे कनेक्टर तुटले होते, परंतु मोबाईल दुरुस्तीकरीता दिले नाही. यांनतर, अर्जदार पुन्हा मोबाईलमध्ये बिघाड आल्यामुळे दुरुस्तीकरीता ऑक्टोंबर 2014 मध्ये आणले त्यावेळी तीन-चार अलग-अलग मेकॅनिक्स ला मोबाईल दाखविले असता कनेक्टर तुटले असल्यामुळे मोबाईल दुरुस्त होणार नसल्याचे सांगीतले. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास मोबाईल घेऊन जाण्यास सांगीतले.
4. अर्जदाराने नि.क्र.9 सोबत शपथपञ व नि.क्र.10 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार यांनी नि.क्र.8 शपथपञ व नि.क्र.11 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, शपथपञ, दस्ताऐवज, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीची : होय.
अवलंबना केली आहे काय ?
3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
4) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून दि.12.10.2013 ला कार्बन कंपनीचा मोबाईल मॉडेल नं. A 90 रुपये 4850/- बिल क्र.812 अन्वये खरेदी केला. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
6. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून दि.12.10.2013 ला कार्बन कंपनीचा मोबाईल मॉडेल नं. A 90 रुपये 4850/- बिल क्र.812 अन्वये खरेदी केला. सदर मोबाईल मध्ये दि.16.4.2014 ला बिघाड आलेला असल्यामुळे सदर मोबाईल दुरुस्तीकरीता दि.17.4.2014 ला गैरअर्जदाराकडे जमा केला व मोबाईल जमा केल्याबाबत पोचपावती अर्जदाराला दिली. यावरुन, सदर मोबाईलमध्ये वॉरंटी कालावधीत बिघाड आला व त्याकालावधीत अर्जदाराने मोबाईल गैरअर्जदाराकडे दि.17.4.2014 ला दुरुस्ती करीता दिला, तेंव्हापासून सदर मोबाईल गैरअर्जदाराकडे दुरुस्तीकरुन दिले नाही किंवा बदलून नवीन मोबाईल दिले नाही. तसेच, गैरअर्जदाराचे हे म्हणणे की, सदर तक्रारीतील मोबाईल दुरुस्ती करुन अर्जदारास परत दिले होते व आणखी बिघाड झाल्यामुळे आणखी सदर मोबाईल गैरअर्जदाराकडे दुरुस्तीकरीता आणला होता व गैरअर्जदाराकडे जमा आहे, याबाबत कोणतेही पुरावे गैरअर्जदाराने तक्रारीत दाखल केले नसल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा सदर मोबाईल एक वेळा वॉरंटी मध्ये दुरुस्ती करुन दिला होता हे म्हणणे पुराव्याअभावी ग्राह्य धरण्यास पाञ नाही. एकंदरीत, गैरअर्जदाराने अर्जदाराचे सदर मोबाईल दुरुस्ती करुन दिला नाही व सदर मोबाईल गैरअर्जदाराकडेच वॉरंटी मध्येच नादुरुस्त जमा आहे. वरील विवेचनावरुन गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीची अवलंबना केली व सेवेत ञुटी केली असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास तक्रारीतील मोबाईलची किंमत रुपये 4850/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(3) अर्जदार व गैरअर्जदाराने आप-आपला तक्रारीचा खर्च सहन करावा.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 24/9/2015