तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : वकील श्रीमती किर्ती शेट्टी मार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही संगणक/लॅपटॉप उत्पादन करणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचे सुविधा केंद्र आहे. तक्रारदारांनी वर्ष फेब्रृवारी 2007 मध्ये सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेला लॅपटॉप अमेरीकेमध्ये खरेदी केला व तक्रारदार त्याचा वापर करीत होते. तक्रारदारांना लॅपटॉप वापरत असतांना अनेक दोष दिसून आले. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 सुविधा केंद्राकडून तो वारंवार दुरुस्त करुन घेतला. दरम्यान तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दिनांक 10.11.2008 रोजी लॅपटॉप हमी कालावधी (Warranty ) वाढवून मिळणेकामी रु.5,500/- धनादेशाव्दारे जमा केले. व त्या वरुन हमी कालावधी दिनांक 10.11.2009 पर्यत वाढविण्यात आला.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, लॅपटॉपमध्ये पुन्हा बिघाड झाल्याने तक्रारदारांनी दिनांक 17.1.2009 रोजी लॅपटॉप सा.वाले क्र.2 यांचेकडे दिला व सा.क्र.2 यांनी लॅपटॉपची तपासणी करुन त्यामधील दुरुस्ती करुन देण्याचे कबुल केले. तथापी सा.वाले क्र.2 यांनी दिनांक 10.4.2009 रोजी लॅपटॉप मधील काही भाग बदलून दिले व लॅपटॉप तक्रारदारांकडे दिला.
3. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, दिनांक 23.6.2009 रोजी लॅपटॉप मध्ये पुन्हा बिघाड झाल्याने तक्रारदारांनी तो लॅपटॉप सा.वाले क्र.2 यांचेकडे नेला. परंतु सा.वाले क्र.2 यांनी लॅपटॉपची दुरुस्ती करणेकामी खर्चाचे अंदाजपत्रक रु.3781/-दिनांक 31.10.2009 रोजी तक्रारदारांना दिले. तक्रारदारांचे असे कथन आहे की, लॅपटॉपमध्ये मुलभूत दोष असल्याने तसेच सा.वाले क्र.2 यांनी हमी कालावधी वाढविण्याबद्दल रु.5,500/- तकारदारांकडून स्विकारले असल्याने सा.वाले यांनी तो लॅपटॉप अंदाजपत्रक न देता दुरुस्त करणे आवश्यक होते. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना लॅपटॉपचे दुरुस्तीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांनी लॅपटॉप चे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करुन मिळावे. तसेच जुना लॅपटॉपचे ऐवजी नविन लॅपटॉप बदलून द्यावा अथवा सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल रु.1 लाख अदा करावेत अशी दाद मागीतली.
4. सा.वाले क्र.1 यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये लॅपटॉप हा सा.वाले यांनी दुरुस्त करुन दिलेला आहे असे कथन केले. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी जेव्हा दिनांक 29.10.2011 रोजी लॅपटॉप मधील बिघाड बद्दल सा.वाले यांना कळविले तेव्हा लॅपटॉपचा हमी कालावधी संपलेला होता व त्यामुळे सा.वाले क्र.2 यांनी (सेवा केंद्र) यांनी तक्रारदारांना लॅपटॉपच्या दुरुस्तीबाबत अंदाजपत्रक दिनांक 31.10.2009 रोजी दिले, परंतु तक्रारदारांनी त्या प्रमाणे रक्कम अदा करण्यास नकार दिला व प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
5. सा.वाले क्र.2 यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली नाही. व त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
6. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे अधिकारी श्री.श्रीराम मोहन यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजुंचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना लॅपटॉपचे दुरुस्तीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | सा.वाले यांनी तक्रारदारांना जुना लॅपटॉप बदलून नविन लॅपटॉप द्यावा असा आदेश देणे योग्य आहे काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सा.वाले क्र.2 यांनी लॅपटॉपमध्ये वेळोवेळी केलेली दुरुस्तीचे संदर्भात जो अहवाल दिला त्याची प्रत दाखल केलेली आहे. सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये सा.वाले क्र.2 हे त्यांचे अधिकृत सेवा केंद्र नाही असे कथन केलेले नाही. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी लॅपटॉप अमेरीकेत खरेदी केला व त्याची खरेदीची पावती दाखल केलेली नाही असे कथन केले. परंतु सा.वाले यांनी दिलेला दुरुस्तीचा अहवाल असे दर्शविते की, सा.वाले यांनी लॅपटॉपची दुरुस्ती केली येवढेच नव्हेतर सा.वाले क्र.2 यांनी लॅपटॉपचा हमी कालावधी वाढवून देणेकामी तक्रारदारांकडून रु.5,500/- दिनांक 10.11.2008 रोजी धनादेशाव्दारे स्विकारले. सबब तक्रारदारांनी लॅपटॉपचे खरेदीची पावती हजर केलेली नाही हा मुद्दा गौण ठरतो.
9. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत वेळोवेळी लॅपटॉप दुरुस्तीचा अहवाल अहवालाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये दिनांक 7.11.2007 रोजी लॅपटॉप दुरुस्त केला या बद्दलची नोंद आहे. त्यानंतर दिनांक 5.4.2008 रोजी लॅपटॉप दुरुस्त केला त्या बद्दलच्या दुरुस्ती अहवालाची प्रत दाखल केलेली आहे. या व्यतिरिक्त दिनांक 17.1.2009 रोजी लॅपटॉप मध्ये काही दोष होते त्या बद्दलच्या दुरुस्तीच्या अहवालाची प्रत दाखल केलेली आहे. हमी कालावधी संपला त्या बद्दलही त्या दुरुस्ती अहवालामध्ये नोंद आहे. त्यानंतरही दुरुस्तीची नोंद दिनांक 14.2.2009 रोजीची आहे. त्यानंतरही दुरुस्तीचा अहवाल दिनांक 23.6.2009 रोजीचा आहे. त्यामध्ये लॅपटॉप वर काही चित्रे दिसत नाही अशी नोंद आहे. तसेच लॅपटॉपचा मदर बोर्ड तिन वेळा बदलल्याची नोंद आहे. दिनांक 26.10.2009 रोजी तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे लॅपटॉप दुरुस्तीकामी नेला होता व त्यामध्ये लॅपटॉप चालु करण्याचे बटण यामध्ये दोष होता तसेच आवाज येण्यामध्येसुध्दा दोष होता व लॅपटॉप चालु होण्यामध्ये देखील उशिर होत होता अशी नोंद आहे. या दुरुस्तीचे संदर्भात सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना दिनांक 31.10.2009 रोजी दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक दिले व रु.3,781/- दुरुस्तीकामी मागणी केली. त्या अंदाजपत्रकाची प्रत तक्रारदारांनी तक्रारी सोबत दाखल केलेली आहे.
10. या संदर्भात महत्वाचा मुद्दा म्हणजे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दिनांक 10.11.2008 रोजी धनादेशाव्दारे रु.5,500/- जमा केले होते. त्या पावतीची प्रत तक्रारदारांनी दाखल केलेली आहे. पावतीमध्ये अशी नोंद आहे की, तक्रारदारांनी सा.वाले यांना रु.5,500/- हमी कालावधी वाढविणेकामी अदा केलेले आहेत. त्या पावतीच्या नोंदीवरुन असे दिसून येते की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडून धनादेशाव्दारे रु.5,500/-स्विकारले व दुरुस्त करण्याचा हमी कालावधी वाढवून दिला. निच्छितच तो हमी कालावधी एका वर्षाकरीता वाढविला असणारच. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये देखील असे नमुद केले आहे की, सा.वाले यांनी दिनांक 10.11.2008 च्या धनादेशाव्दारे रु.5,500/- तक्रारदारांकडून स्विकारल्याने हमी कालावधी त्या दिवसापासून एक वर्ष म्हणजे दिनांक 10.11.2009 पर्यत वाढविण्यात आला होता. हमी कालावधी एका वर्षानंतर वाढविल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 10.11.2009 पर्यत लॅपटॉप विना खर्च दुरुस्त करुन देणे आवश्यक होते. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 31.10.2009 रोजी म्हणजे हमी कालावधीमध्ये दुरुस्तीचे अंदाजपत्रक दिले यावरुन सा.वाले यांनी हमी कालावधी एक वर्ष वाढवून दिला असताना देखील हमी कालावधीमध्ये तक्रारदारांना लॅपटॉप विना खर्च दुरुस्त करण्यास नकार दिला असे दिसून येते. ही बाब सा.वाले यांनी तक्रारदारांना लॅपटॉप दुरुस्तीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे सिध्द करते.
11. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे लॅपटॉप दुरुस्तीचेकामी आपला लॅपटॉप वारंवार दिला असला तरी त्यामध्ये मुलभूत दोष आहेत ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. त्याच प्रमाणे सध्या देखील लॅपटॉप बंद आहे व तो नादुरुस्त आहे ही बाब तक्रारदारांनी सिध्द केलेली नाही. तक्रारदारांनी अन्य संगणक अभियंत्याचे शपथपत्र दाखल करुन लॅपटॉप मध्ये मूलभुत दोष आहेत हे सिध्द केलेले नाही. वरील परिस्थितीत सा.वाले यांनी तक्रारदारांना लॅपटॉप हमी कालावधीत (As per warranty) विनाखर्च दुरुस्त करुन देणे योग्य व न्याय राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
12. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 828/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना लॅपटॉप दुरुस्तीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना हमी कालावधीनुसार कराराप्रमाणे
(As per warranty) तक्रारदारांचा लॅपटॉप विनाखर्च दुरुस्त करुन द्यावा असा आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
5. वरील आदेशाची पुर्तता न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून चार आठवडयाचे आत करावी.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.