तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले क्र.1 : मेनन आणि असोशियेटस करीता वकील
श्रीमती किर्ती शेट्टी हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही लॅपटॉप बनविणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे लॅपटॉपचे विक्रेते आहेत. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 कंपनीने उत्पादित केलेला लॅपटॉप सा.वाले क्र.2 यांचेकडून दिनांक 5.6.2007 रोजी रु.56,500/- किंमतीस खरेदी केला. लॅपटॉपची वॉरंटी एक वर्षाचे कालावधीकरीता होती.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, वॉरंटीचे कालावधीमध्ये लॅपटॉप सारखा बिघडत होता. सा.वाले यांच्या सेवा केंद्राकडून तक्रारदारांचा लॅपटॉप स्विकारण्यात येत होता परंतु तो वेळेवर दुरुस्त करुन देण्यात येत नव्हता. सेवा केंद्रातील कर्मचारी तक्रारदारांना केवळ बसवून ठेवत होते व त्यांचे कामाकडे दुर्लक्ष करीत होते. वॉरंटी कालावधी संपल्यानंतर तक्रारदारांना रु.1400/- खर्च करुन लॅपटॉप दुरुस्त करुन घ्यावा लागला. तक्रारदारांच्या लॅपटॉप मधील तो दोष सा.वाले क्र.1 यांच्या कर्मचा-यांच्या चुकीने निर्माण झाला होता. दरम्यान तक्रारदारांना अमेरीकेमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता होती. परंतु लॅपटॉप व्यवस्थित चालत नसल्याने तक्रारदार अमेरीकास्थित कंपनीशी संपर्क प्रस्तापित करु शकले नाही. तक्रारदारांनी लॅपटॉप बदलून द्यावा अशी सा.वाले यांना विनंती केली, परंतु तक्रारदारांचे विनंतीकडे सा.वाले यांचे कर्मचा-यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना सदोष लॅपटॉप विकल्याबद्दल लॅपटॉपची किंमत रु.56,500/- परत करावी व नुकसान भरपाई असे एकत्रित रुपये 9,73,436/- अदा करावेत अशी दाद मागीतली.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये लॅपटॉप सदोष होता या आरोपास नकार दिला. सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदारांचे विनंती प्रमाणे लॅपटॉप मधील दोष संपूर्ण दुरुस्त करुन देण्यात आले. लॅपटॉप मधील दोष मुख्यतः डी.व्ही.डी.रायटर या बद्दलचे होते व एकदा डी.व्ही.डी.रायटर बदलून देण्यात आला. त्यानंतर लॅपटॉप व्यवस्थित आहे असे सा.वाले यांनी कथन केले. या प्रमाणे तक्रारदारांना लॅपटॉपचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली या आरोपास नकार दिला.
4. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले यांनी त्यांचे अधिकृत प्रतिनिधी श्री.श्रीराम मोहन यांचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती हजर केल्या. तसेच लेखी युक्तीवादही दाखल केला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तक्रारदार यांचा स्वतःचा तसेच सा.वाले यांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांचा तक्रारदारांना सदोष लॅपटॉप विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. परंतू लॅपटॉप दुरुस्तीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होते. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय- रु.30,000/- |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत दिनांक 5.6.2007 रोजीचे बिलाची प्रत जोडलेली आहे. त्यावरुन असे दिसते की, सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेला लॅपटॉप तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून रु.56,500/- किंमतीस विकत घेतला. लॅपटॉपची वॉरंटी एका वर्षाची होती. हया सर्व बाबी सा.वाले यांनी मान्य केल्याने त्या बद्दल वेगळी चर्चा करण्याची आवश्यकता नाही.
7. तक्रारदारांचे असे कथन आहे की, लॅपटॉप सदोष असून या प्रकारचा लॅपटॉप सा.वाले क्र.2 यांचे मार्फत विक्री करुन सा.वाले क्र.1 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, तक्रारदारांनी लॅपटॉप सदोष असल्याबद्दल अथवा त्यामध्ये मुलभुत दोष असल्या बद्दल कोणत्याही संगणक तज्ञाचे अथवा अभियंत्याचे शपथपत्र दाखल केलेले नाही. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या परिच्छेद 7 मध्ये दुरुस्तीचे संदर्भात जो घटणाक्रम नमुद केलेला आहे, त्यातील नोंदी असे दर्शवितात की, शेवटची घटणा दिनांक 26.9.2008 रोजी घडलेली होती. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन नाही की, लॅपटॉप बंद पडलेला असून तो वापरात नाही. तक्रारदारांनी आपला मुळचा युक्तीवाद दाखल केला व त्यानंतर पुरवणी दोन युक्तीवाद दाखल केले. त्यामध्ये देखील लॅपटॉप बंद आहे व तो चालत नाही असे कथन नाही. या वरुन मुलभूत दोष असलेला सदोष लॅपटॉप सा.वाले यांनी तक्रारदारांना विक्री केला व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असा निष्कर्ष काढणे शक्य नाही.
8. तक्रारदाराचे तक्रारीत असे कथन आहे की, लॅपटॉपमध्ये वारंवार बिघाड होत होता व तो सा.वाले यांच्याकडे दुरुस्तीकामी न्यावा लागत असे व त्यामध्ये तक्रारदारांचा बराच वेळ व शक्ती खर्च करावी लागली व तक्रारदारांची गैरसोय व कुचंबणा झाली. या संदर्भात तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे की, दिनांक 7.6.2007 रोजी डी.व्ही.डी. व सी.डी.रायटर योग्य रितीने काम करीत नव्हते. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये या कथनास केवळ नकार दिलेला आहे. तथापी तक्रारदारांनी तक्रारीसोबत त्याबद्दल काही कागदपत्रे दाखल केलेली नाही. त्यानंतर तक्रारदार असे म्हणतात की, दिनांक 5.9.2007 रोजी लॅपटॉपमये बुटींग ही क्रिया होत नव्हती व तक्रारदारांना बाहेरुन फॉरमेटींग व सेटींग करुन घ्यावे लागले. त्याबद्दल तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ट क्रमांक 12 वर पावती जोडलेली आहे. त्यामध्ये वरील बाब नमुद केलेली आहे. त्यानंतर दिनांक 9.10.2007 रोजी लॅपटॉपमध्ये चित्र व्यवस्थित दिसत नव्हते तसेच लॅपटॉप अन्य प्रणाली स्विकारत नव्हता. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये ही बाब मान्य केलेली आहे व असे कथन केलेले आहे की, सा.वाले यांच्या सेवा केंद्राने योग्य ती दुरुस्ती करुन व लॅपटॉपमध्ये अध्ययावत यंत्रसामुग्री टाकून तो दुरुस्त करुन दिला. त्या नंतरही दिनांक 9.1.2008 रोजी डी.व्ही.डी. व सी.डी.रायटर व्यवस्थित चालत नव्हता अशी तक्रारदारांची तक्रार होती व सा.वाले यांनी डी.व्ही.डी. व सी.डी.रायटर बदलून दिला व त्यानंतर लॅपटॉप व्यवस्थित चालत होता.
9. तक्रारदारांनी आपल्या प्रति उत्तराचे शपथपत्र दिनांक 19.3.2011 यामध्ये असे कथन केलेले आहे की, ऑक्टोबर,2007 ते जानेवारी,2008 या कालावधीमध्ये सी.डी.ड्राव्हू सदोष असल्याने तक्रारदारांचे कमीत कमी दोन डझन डी.व्ही.डी. खराब झाल्या. तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असे कथन आहे की, दिनांक 29.1.2008 रोजी डी.व्ही.डी. व सी.डी.रायटर पुन्हा बिघडला व तो पुन्हा बदलून देण्यात आला. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन केलेले आहे की, तो दुरुस्त करुन देण्यात आला व सा.वाले यांचे अभियंते डी.व्ही.डी. व सी.डी. बदलून देण्यास तंयार होते परंतु तक्रारदारांनी तो स्विकारला नाही. तक्रारदार पुन्हा असे कथन करतात की, दिनांक 11.2.2008 रोजी पुन्हा डी.व्ही.डी. व सी.डी.रायटर बिघडला या बद्दल तक्रारदारांचे कथन तक्रारीच्या पृष्ट क्र.14 वर दाखल केलेल्या अहवालावरुन स्पष्ट होते. तो अहवाल सा.वाले यांनी तंयार केलेला आहे व त्यामध्ये डी.व्ही.डी. व सी.डी.रायटर व्यवस्थीत काम करत नाहीत असे कथन केलेले आहे.
10. त्यानंतर तक्रारदारांच्या तक्रारीतील अनुक्रमांक 7 ते 11 या तक्रारी डी.व्ही.डी. व सी.डी.रायटर तसेच वेब कॅमेरा या बद्दलच्या आहेत. त्या दुरुस्त करणेकामी तक्रारदारांवा वारंवार सा.वाले यांचेकडे लॅपटॉप घेऊन जावे लागत होते हे तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत जो अहवाल दाखल केलेला आहे त्यातील नोंदीवरुन दिवून येते. या प्रकारे सा.वाले यांचेकडून विकत घेतलेला लॅपटॅाप दुरुस्त करणेकामी तक्रारदारांना तो सा.वाले यांचे सेवा केंद्रामध्ये वारंवार न्यावा लागला, त्याकामी वेळ व शक्ती खर्च करावी लागली हे सिध्द होते.
11. तथापी लॅपटॉप मधील दोष हा मुलभूत उत्पादक दोष दोष होता असा निष्कर्ष काढता येत नाही. तक्रारदारांनी त्या बद्दल संगणक अभियंत्याचे अथवा तज्ञाचे शपथपत्र अभिलेखात दाखल केलेले नाही. त्यातही महत्वाची बाब म्हणजे लॅपटॉप दुरुस्तीची कार्यवाही ही डी.व्ही.डी. व सी.डी.रायटर नादुरुस्त झाल्याने तो दुरुस्त करणेकामी करावी लागली. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेली नादुरुस्त घटणेपैकी घटणा क्रमांक 3 व 4 दिनांक 5.9.2007 व 9.10.2007 हया सेटींग तसेच संगणक प्रणाली या संबंधात होत्या. तर इतर तक्रारी हया डी.व्ही.डी. व सी.डी.रायटर या बद्दलच्या होत्या. वर नमुद केलेल्या दोन तक्रारीचे निराकरण सा.वाले यांनी करुन दिलेले आहे. तर तक्रार ही डी.व्ही.डी. व सी.डी.रायटर बद्दल असल्याने तो बदलून देण्यात आलेला आहे. त्यातही तक्रारदारांचे असे कथन नाही की, सद्या लॅपटॉप नादुरुस्त असून तो बंद आहे. या वरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना मुलभूत दोष असलेला ( Manufacturing defect ) लॅपटॉप विक्री केला असा निष्कर्ष काढता येत नाही. तथापी तक्रारदारांना लॅपटॉप दुरुस्तीकामी सा.वाले यांचेकडे घेवून जावा लागला व सा.वाले यांनी विनाविलंब दुरुस्तीची कार्यवाही न करता ब-याच वेळा तो लॅपटॉप ठेवून घेतला व दरम्यानचे काळात तक्रारदारांना लॅपटॉप वापरता आला नाही. हे तक्रारदारांचे म्हणणे योग्य दिसते.
12. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, त्यांना विदेशामध्ये अन्य नोकरीची संधी होती परंतु लॅपटॉप नादुरुस्त असल्याने तक्रारदार संपर्क प्रस्तापित करु शकले नाही. व त्यावरुन तक्रारदारांना ती नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकली नाही. याकामी तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मागीतली. तक्रारदारांचा लॅपटॉप त्या विशिष्ट कालावधीत नादुरुस्त असेल तर तक्रारदार अन्य संगणकाव्दारे संबंधीत कंपनीशी अथवा व्यक्तीशी संपर्क प्रस्तापित करु शकले असते. परंतु तक्रारदारांनी तो मार्ग अवलंबविल्याचे दिसून येत नाही. यावरुन तक्रारदारांचा लॅपटॉप नादुरुस्त असल्याने तक्रारदारांना विदेशात काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकली नाही व त्या बद्दल सा.वाले जबाबदार आहेत असा निष्कर्ष काढता येत नाही.
13. वरील परिस्थितीमध्ये तक्रारदारांना त्यांचा लॅपटॉप दुरुस्तीकामी सा.वाले यांचेकडे वेळोवेळी घेऊन जावे लागले व तो दुरुस्तीकामी बराच वेळेस सा.वाले यांचे सेवा केद्रात ठेवून घेतला व दुरुस्तीचीकामी दिरंगाई झाल्याने तक्रारदारांची कुचंबणा व गैरसोय झाली असा निष्कर्ष काढावा लागतो. तक्रारदारांच्या गैरसोईचे स्वरुप लक्षात घेता सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च या बद्दल एकत्रित रुपये 30,000/- नुकसान भरपाई अदा करणे योग्य राहील असा निष्कर्ष काढावा लागतो. तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार स्वतः चालविली आहे व वकील नेमणेकामी त्यांना खर्च करावा लागला नाही. सबब नुकसान भरपाईची वरील रक्कम ही नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च याकामी पुरेसी ठरेल असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
14. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 618/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना लॅपटॉप दुरुस्तीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामेनेवाले क्र.1 यांनी त्या बद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च या बद्दल एकत्रित रुपये 30,000/- तक्रारदारांना अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
4. सामनेवाले क्र.1 यांनी वरील आदेशाची पुर्तता न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयाचे आत करावी. अन्यथा वरील रक्कमेवर मुदत संपल्या दिनांकापासून 9 टक्के व्याज रक्कम अदा करेपर्यत अदा करावे.
5. तक्रार सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्द रद्द करण्यात येते.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.