सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.32/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि. 25/03/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि. 31/08/2010
श्री दत्ताराम भदू कुडाळकर
वय 27 वर्षे, धंदा – व्यवसाय,
रा.झाराप (कुंभारवाडी),
ता.कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) हिरो होंडा मोटर लि.
34, कम्युनिटी सेंटर, बसंत लोक,
वसंत विहार, न्यु दिल्ली – 110057
2) मुलराज त्रिंबकदास,
हिरो होंडा डिलर
प्रोप्रा प्रदिप मुलराज भाटीया
वय 45 वर्षे, धंदा- व्यापार,
रा.X 53, एम.आय.डी.सी.
पिंगुळी, औदयोगिक क्षेत्र, कुडाळ
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या
तक्रारदारतर्फे - विधिज्ञ श्री एस.जी. माळगावकर.
विरुद्ध पक्षातर्फे - विधिज्ञ श्री के.डी. वारंग
(मंचाच्या निर्णयाद्वारे महेंद्र म. गोस्वामी,अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.31/08/2010)
1) विरुध्द पक्ष क्र.2 च्या सर्व्हीस सेंटरमध्ये तक्रारदाराने त्याचे हिरो होंडा वाहन दुरुस्तीसाठी दिल्यावर 1 महिना वाहन आपलेकडे पाडून ठेवल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने हिरो होंडा कंपनीची Hunk ही दुचाकी गाडी क्र.MH07-M-3858 दि.24/04/2008 रोजी खरेदी केली असून सदर वाहनामध्ये गिअर व इंजिनमध्ये आवाज येत असल्यामुळे दुरुस्त करणेसाठी विरुध्द पक्ष क्र.2 यांचे शोरुम व सर्व्हीस सेंटरमध्ये दि.17/12/2009 रोजी देण्यात आले होते; परंतु 2 दिवसांत गाडी दुरुस्त करुन देऊ असे वचन देऊन देखील तब्बल 1 महिन्याने दि.16/01/2010 रोजी गाडी दुरुस्त करुन दिली त्यामुळे विरुध्द पक्षाने योग्य प्रकारे व योग्य मुदतीत सेवा न दिल्याने तक्रारदाराला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास झाला त्याबद्दलची नुकसान भरपाई रु.25,000/- व तक्रार खर्चाचे रु.5000/- अशी एकुण भरपाई रु.30000/-, 12 टक्के व्याजासह आपणास मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने त्याच्या तक्रारीत केली आहे.
2) तक्रारदाराने त्याचे तक्रारीसोबत नि.3 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार विरुध्द पक्षास पाठविलेली नोटीस, त्या नोटीशीचे विरुध्द पक्ष क्र.2 ने दिलेले उत्तर, नोटीशीची पोचपावती, सर्व्हीस मॅन्युअलची प्रत, सर्व्हीस रेकॉर्ड शीटची प्रत, वाहन खरेदीचे बील, वाहन दुरुस्तीच्या खर्चाची बिले, व वॉरंटी कार्डची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली. सकृतदर्शनी तक्रारदाराची तक्रार दाखल होण्यास पात्र असल्याचे दिसून आल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना तक्रारीची नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 व 2 तर्फे विरुध्द पक्ष क्र.2 हे ऑथॉरिटी पत्रासह मंचासमोर हजर झाले व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.10 वर दाखल केले.
3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यात तक्रारदाराचे तक्रारीवर आक्षेप घेऊन आपण तक्रारदाराचे वाहन दुरुस्तीला आल्यावर एक दोन दिवसांतच दुरुस्त करुन दिल्याचे स्पष्ट केले. तसेच तक्रारदाराचे वाहन 1 महिना त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी पडून नव्हते असे स्पष्ट करुन तक्रारदाराचे वाहन वॉरंटी कालावधीत दुरुस्तीला आल्यावर विनामुल्य वाहनाचे स्पेअर पार्टस बदलून दिल्याचे म्हणणे मांडले. तसेच तक्रारदाराच्या वाहनात कोणताही दोष नसल्यामुळे तक्रारदार रु.25,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही त्यामुळे खर्चासह तक्रार नामंजूर करावी अशी विंनती केली. त्यावर तक्रारदाराने त्याचे पुराव्याचे शपथपत्र नि.12 वर दाखल केले. त्यावर विरुध्द पक्षाने उलटतपासाची प्रश्नावली नि.14 वर दाखल केली. त्यानुसार तक्रारदाराने उलटतपासाची उत्तरावली शपथेवर नि.15 वर दाखल केली. तसेच तक्रारदाराने त्याचे साक्षीदार श्री संतोष रामदास पाटकर यांचे शपथपत्र नि.17 वर दाखल केले. या साक्षीदाराचा तोंडी उलटतपास घेण्याची परवानगी मिळण्यासाठी विरुध्द पक्षाने नि.18 वर अर्ज दाखल केला परंतु सदरचा साक्षीदार हा तज्ज्ञ व्यक्ती नसल्यामुळे तोंडी उलटतपासाची परवानगी मंचाने नाकारली व लेखी प्रश्नावली देण्याची सूचना केली. त्यामुळे विरुध्द पक्षाने नि.19 वर प्रश्नावली दाखल केली. त्याची उत्तरावली सदर साक्षीदाराने नि.21 वर दाखल केली. तसेच नि.22 वरील यादीनुसार सदर साक्षीदाराचे ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत दाखल केली व आपला पुरावा संपल्याची पुरसीस नि.23 वर दाखल केली.
4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे वतीने विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.25 वर दाखल केले. त्यावर तक्रारदाराने उलटतपासाची प्रश्नावली नि.26 वर दाखल केली. तर त्याची उत्तरावली विरुध्द पक्षाने नि.27 वर दाखल केली. दरम्यान विरुध्द पक्षाचे ताब्यातील सर्व्हीस कार्ड व वाहन दुरुस्तीची बिले विरुध्द पक्षाने मंचासमोर सादर करावीत यासाठी तक्रारदाराने नि.28 वर अर्ज दाखल केला त्या अर्जावर विरुध्द पक्षाने आक्षेप घेतला; परंतु मंचाने सदरचा अर्ज मंजूर करुन विरुध्द पक्षाने वाहनाच्या संबंधातील सर्व्हीस कार्डची प्रत मंचासमोर सादर करण्याचे आदेश पारीत केले. विरुध्द पक्षाने त्यांचा पुरावा संपल्याची पुरसीस नि.29 वर दाखल केले. त्यामुळे प्रकरण अंतीम युक्तीवादासाठी ठेवण्यात आले. मंचाने आदेश केल्यानुसार विरुध्द पक्षाने जॉबकार्डची प्रत व वाहनाचे हिस्ट्री पेपर्स प्रकरणात दाखल केले. तर तक्रारदाराने नि.34 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार सर्व्हीस बुकाची मुळ प्रत प्रकरणात दाखल केली तसेच उभय पक्षकारांचे वकीलांनी विस्तृत स्वरुपात तोंडी युक्तीवाद केला. त्यानुसार खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्ष क्र.2 ने त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदाराची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? | होय./ अंशतः |
-कारणमिमांसा-
5)मुद्दा क्रमांक 1–तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 यांनी उत्पादित केलेले वाहन त्यांचे अधिकृत विक्रेता विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडून खरेदी केले असल्यामुळे विक्रीपश्चात सेवा देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांची आहे. विरुध्द पक्ष क्र.2 चे शोरुम व अधिकृत सर्व्हीस सेंटर असून तक्रारदाराने त्याचे वाहन दि.17/12/2009 रोजी दुरुस्तीसाठी विरुध्द पक्ष क्र.2 च्या सर्व्हीस सेंटरमध्ये आणल्याचे नि.34/1 वरील सर्व्हीस बुकातील नोंदीवरुन दिसून येते. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 यांनी मंचासमोर नि.32/1 वर दाखल केलेल्या जॉबकार्डवरुन देखील दि.17/12/2009 ला त्यांचेकडे वाहन दुरुस्तीसाठी आले होते हे स्पष्ट होते; परंतु सदरचे वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी 30 दिवसांचा अवधी विरुध्द पक्षाने घेतल्याचे त्यांनी दाखल केलेल्या जॉबकार्डवरुन दिसून येते; परंतु विरुध्द पक्ष क्र.2 ने त्यांच्या नि.27 वरील उलटतपासाच्या उत्तरावलीमध्ये प्रश्न क्र.3 ला उत्तर देतांना दि.17/12/2009 रोजी त्यांचेकडे वाहन दुरुस्तीसाठी आले नव्हते असे म्हटले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 ने ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली आहे हे स्पष्ट होते. मात्र विरुध्द पक्ष क्र.1 ने या प्रकरणात कोणतीही त्रुटी केली नाही हे देखील दिसून येते. त्यामुळे त्यांचेविरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
6) मुद्दा क्रमांक 2 - i) तक्रारदाराने त्याचे वाहन विरुध्द पक्ष क्र.2 चे सर्व्हीस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दि.17/12/2009 रोजी दिले होते हे नि.32/1 वरील जॉब कार्डवरुन व नि.34/1 वरील सर्व्हीस बुकमधील नोंदीवरुन स्पष्ट होते. तसेच विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या नि.32/2 वरील हिस्ट्री पेपरमधील पान क्र.4 मधील नोंदीवरुन देखील 17/12/2009 रोजी वाहन दुरुस्तीला आले होते हे स्पष्ट होते. नि. 32/1 वरील जॉब कार्डचे अवलोकन केल्यास त्यामध्ये नोंदलेले किलोमिटर 26400 नमूद केले असून दि.16/01/2010 च्या दुस-या जॉबकार्डचे अवलोकन केल्यास त्यामध्ये देखील किलोमिटरची संख्या तेवढीच अर्थात 26400 नमूद केल्याचे दिसून येते. त्यामुळे वादग्रस्त वाहन विरुध्द पक्ष क्र.2 च्या सर्व्हीस स्टेशनमधून बाहेर गेलेच नाही हे स्पष्ट होते. या जॉबकार्डवर तक्रारदाराची सही घेतलेली नाही. तसेच डिलिव्हरीच्या कॉलममध्ये कुठेही डिलिव्हरीची तारीख, वेळ किंवा तक्रारदाराची सही नमूद केलेली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 ने वाहन वेळेत दुरुस्त न करता आपल्याकडे पाडून ठेवले व ग्राहकाला देण्यात येणा-यासेवेत त्रुटी केली हे स्पष्ट होते.
ii) तक्रारदाराने सदर तक्रारीमध्ये आपणांस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल व प्रकरण खर्चाबद्दल एकूण रु.30,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी तक्रारदाराने आपणांस मौजे झाराप पासून मौजे सांगेली येथे जाण्यासाठी दरदिवशी रु.600/- याप्रमाणे 20 दिवसांसाठी 12000/- रुपये खर्च आला हे दाखविण्यासाठी नि.17 वर साक्षीदाराचे शपथपत्र दाखल केले आहे; परंतु सदर साक्षीदाराचे नि.22 वरील ड्रायव्हिंग लायसन्स बघता त्याच्या लायसन्सची मुदत 22/9/2006 ते 21/09/2009 पर्यंत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांने तक्रारदारास दि.18/12/2009 पासून दि.12/01/2010 पर्यंत रिक्षा भाडयाने दिली हे कायदेशीर परवान्याअभावी स्वीकारता येत नाही. तसेच तक्रारदाराने मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रु25,000/- चे नुकसान कसे झाले हे देखील स्पष्ट केले नाही. त्यामुळे तक्रारदार रु.30,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. मात्र विरुध्द पक्ष क्र.2 ने ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्यामुळे आम्ही तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करीत असून त्या दृष्टीकोनातून खालील अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
अंतिम आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्ष क्र.2 ने त्रुटी केल्याबद्दल व तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास दिल्याबद्दल नुकसान भरपाई रु.2000/-(रुपये दोन हजार मात्र) व प्रकरण खर्चाबद्दल रु.1,000/-(रुपये एक हजार मात्र) देण्याचे आदेश पारीत करणेत येतात.
3) वरील आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीचे 30 दिवसांच्या आत विरुध्द पक्ष क्र.2 यांनी करावी.
4) विरुध्द पक्ष क्र.1 यांचेविरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 31/08/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-