::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 07.09.2013)
1. अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. संक्षेपाने तक्रारदाराचे म्हणणे असे कि,
2. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 यांनी निर्माण केलेली स्प्लेंडर गाडी गैरअर्जदार क्रं. 1 यांचेकडून दि. 27/04/2012 रोजी रक्कम रु.48,251/- मध्ये विकत घेतली. अर्जदाराने गाडी घरी आणल्यानंतर चालविली नाही व ती तशीच ठेवून दिली. त्यानंतर अर्जदार दि.07/05/2012 रोजी सकाळी 8.30 वाजता चंद्रपूर वरुन भद्रावतीकडे जाण्यासाठी निघाले असता गाडी साखरवाही फाटयाजवळ पूर्णपणे बंद पडली व चालु झालीच नाही. म्हणून अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं. 2 यांना फोनव्दारे गाडी बंद पडल्याची माहीती दिली तेंव्हा गैरअर्जदार क्रं 2 ने अर्जदाराला गाडी शोरुम मध्ये आणावयास सांगितली. म्हणून अर्जदाराने गाडी दि.07/05/2012 ला दुपारी1.00 वाजता गैरअर्जदार क्रं 2 च्या शोरुम मध्ये आणली. त्यावेळी अर्जदारासोबत श्री.अरविंद मोरे, सचिन पिंपळशेंडे, कमलाकर खोब्रागडे, शंकर बल्की होते. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 कडे गाडी आणून दिल्यावर त्यांनी गाडी शोरुम मध्ये ठेवून घेतली व त्याबाबत अर्जदाराला पावती क्रं. 48313 दिली. ती पावती अर्जदाराने तक्रारीत नि.क्र. 5 च्या सह दस्त क्रं. अ-2 म्हणून जोडलेली आहे. अर्जदाराने सदर पावती मध्ये गाडीच्या दोषाबाबत काहीही लिहीलेले नव्हते. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 यांचेकडे सदर गाडी दिल्यानंतर गाडीच्या निर्मीतीत दोष आहे आणि अर्जदाराला या गाडीच्या बदल्यात नवीन गाडी स्प्लेंडर प्रो देण्यात यावी किंवा गाडी विकत घेतलेली किंमत रु.48,251/- दि. 27/04/2012 पासून 12 टक्के व्याजासह दयावे असे म्हटले, परंतु गैरअर्जदार क्रं 2 हयांनी सदर अर्जदाराची मागणी धुडकावून लावली. म्हणून अर्जदार हयांनी दि.08/05/2012 रोजी दोन्ही गैरअर्जदार यांना पञ पाठविले. पञ नि. क्रं. 5 सह दस्त क्रं अ-6 वर दाखल आहे. परंतू सदर पञाचे गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हयांनी उत्तर दिले नाही. तसेच अर्जदाराचे म्हणणे असे आहे की, गैरअर्जदार क्रं. 2 हयांनी अर्जदाराकडून गाडी चेसीस नं.,एम बी एल एल ए 10 ए आर सी 9000300 इंजीन नंबर एच ए 10, ईलसी 9004603 दि. 07/05/2012 ला जमा केली, परंतु अर्जदाराला नवील गाडी देण्याबद्दल कोणतेही पावले उचलली नाही. म्हणून अर्जदाराला गैरअर्जदार क्रं. 1 व 2 विरुध्द ग्राहक तक्रार मंचात तक्रार दाखल करावी लागली.
3. अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हयांनी त्यांना दिलेली गाडी बदलवून नवील गाडी दयावी तसेच ते शक्य नसल्यास गाडीची किंमत 48,251/- दि.27/04/2012 पासून 12 टक्के व्याजासह दयावे, तसेच अर्जदारास गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हयांचे कडून झालेला मानसिक व शारिरीक ञासापोटी रक्कम रु.1,00,000/- दयावे अशी मागणी केली आहे. अर्जदार हयांनी नि. क्रं. 5 या दस्ताऐवजाच्या यादी सोबत दस्त क्रं. अ-1 पासून ते दस्त क्रं. अ- 9 पर्यंत जोडलेले आहे.
4. गैरअर्जदार क्रं. 2 हयांनी नि. 11 प्रमाणे लेखीबयाण दाखल करुन अर्जदाराची मागणी नाकारली आहे. त्यांचे असे म्हणणे कि, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही विनाकारण आहे. अर्जदाराने दि.27/04/2012 ला गाडी विकत घेतली तेंव्हा त्या दिनांकापासून गाडी अगदी सुव्यवस्थित व चालु स्थितीत होती. तसेच गैरअर्जदार क्रं. 2 कडे गैरअर्जदार क्रं. 1 कडून येणा-या गाडया हया चांगल्या व सुव्यवस्थित असतात व तांञिक बाजू तपासूनच विक्री करण्यात येतात. तरीही यदाकदाचीत एखाद्या गाडीत तांञीक बिघाड आल्यास विशेष प्रशिक्षित तंञज्ञ तो बिघाड दुर करुन ग्राहकांना होणारी गैरसोय दुर करतात. एखाद्या ग्राहकाच्या गाडीत कोणता बिघाड आहे व त्यावर कोणती उपाय योजना करावी हे ठरविण्यासाठी गैरअर्जदार क्रं. 1 कडून गैरअर्जदार क्रं. 2 चे माध्यमातून विशेष तपासणी व्यवस्था केलेली आहे. व त्यासाठी गाडी खरेदी केल्यावर गाडीची विशेष तपासणीची सोय, गाडीने पूर्ण केलेला कालावधी व अंतर तपासून पुरवीत असतात.
5. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हयांच्या कथनाप्रमाणे अर्जदार हयांनी उपरोक्त सुविधेचा लाभ करुन घेण्याऐवजी निष्कारण वाद दाखल केलेला आहे. अर्जदार हयांची गाडी चांगल्या स्थितीत व चालु अवस्थेत अजूनही ती गैरअर्जदार क्रं. 2 हयांचे शोरुम मध्ये आहे. अर्जदार हयांनी वाईट हेतूने व गैरअर्जदार क्रं. 1 व 2 प्रतिमा मलीन करण्याकरीता ही तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदारांनी समोर नमुद केले कि, अर्जदाराने गाडी 27/04/2012 ला खरेदी केली, दि.07/05/2012 ला अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यात बिघाड आला, दि. 16/05/2012 ला नोटीस पाठविला व दि.21/05/2012 ला ग्राहक मंचात तक्रार अर्ज दाखल केला यावरुन त्यांचा वाईट हेतू दिसून येतो. गैरअर्जदार क्रं. 2 हे अर्जदाराची सुस्थितीत असणारी गाडी त्यांस देण्यास पूर्वीपासून तयार होते व आजही तयार आहेत. म्हणून अर्जदाराचा अर्ज खारीज करावा अशी मागणी केली आहे.
6. सदर प्रकरणात अर्जदार हयांनी नि.कं.15 वर शपथपञ दाखल केले, तसेच गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हयांनी नि. 14 प्रमाणे पुरसीस दाखल करुन त्यांचे लेखीबयाण हेच शपथपञ समजण्यात यावे असे नमुद केले. या प्रकरणाच्या निर्णयासाठी दोन्ही पक्षांनी दाखल केलेले शपथपञ व लेखीबयाण तसेच अर्जदारांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजांचा विचार करण्यात आला.
7. गैरअर्जदार क्रं. 1 ने नि. 12 प्रमाणे पुरसीस देवून गैरअर्जदार क्रं. 2 हयांनी दाखल केलेले लेखीबयाण हेच गैरअर्जदार क्रं. 1 चे लेखीबयाण समजावे असे कळविले.
8. अर्जदार व गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हयांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेल्या
स्प्लेंडर मोटार सायकल मध्ये दुरुस्त न होणारा
निर्मिती दोष (Manufacturing Defect) आहे काय ? नाही.
2) गैरअर्जदाराने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार अगर
अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? नाही.
3) मागणी प्रमाणे अर्जदार खरेदी केलेल्या गाडीच्या
बदल्यात नविन गाडी किंवा गाडीचे खरेदी मुल्य
मिळण्यास पाञ आहे काय ? नाही.
4) अंतीम आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे तक्रार खारीज.
मुद्दा क्रं. 1, 2 व 3 बाबत ः-
9. या प्रकरणात अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 हयांचे कडून गैरअर्जदार क्रं. 1 ने निर्मित नविन स्प्लेंडर गाडी दि. 27/04/2012 रोजी रु.48,251/- मध्ये विकत घेतल्याबाबत नि. क्रं. 5 या दस्तऐवजाच्या यादी सोबत दस्त क्रं. अ-1 व अ-2 जोडलेले आहे. ही बाब गैरअर्जदारांनी देखील नाकबूल केली नाही. म्हणून ही गोष्ट र्निविवाद आहे कि, सदर नविन गाडी गैरअर्जदार क्रं. 2 यांचेकडून अर्जदाराने दि.27/04/2012 ला विकत घेतली.
10. दि.07/05/2012 रोजी सकाळी 8.30 वाजता चंद्रपूर वरुन भद्रावतीकडे जात असतांना साखरवाही फाटयाजवळ ही गाडी एकदम बंद पडल्यानंतर ती चंद्रपूरला गैरअर्जदार क्रं. 2 च्या शोरुम पर्यंत कशी आणली याबद्दल खुलासा अर्जदार हयांनी त्याच्या कथनात किंवा शपथपञात केलेला नाही. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार क्रं. 2 यांचेकडे आणल्यावर त्यांनी गाडी ठेवून घेतली व त्याबद्दल पावती अर्जदाराला दिली परंतु गाडीच्या दोषाबद्दल काहीही नमुद केले नाही. सदर गाडी गैरअर्जदार क्रं. 2 कडे दिल्यावर सदर गाडीत काय दोष आहे हे जाणून घेण्यासाठी व ती परत घेण्यासाठी अर्जदाराने पुन्हा गैरअर्जदार क्रं. 2 च्या शोरुम मध्ये भेट दिल्याचे अर्जदाराचे म्हणणे नाही किंवा त्याबाबत पुरावा सादर केलेला नाही.
11. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 च्या कथनाप्रमाणे कोणत्याही ग्राहकाने गाडी विकत घेते वेळी गाडी ही सुस्थितीत व चालु स्थितीतच असते पण यदाकदाचित त्यात नंतर काही बिघाड आल्यास ग्राहकांना जरुर ती सेवा देऊन त्याच्या गाडीतील दोष उपलब्ध असणा-या तंञज्ञाकडून वारंटी पिरेड मध्ये विनामुल्य दुर केले जातात.
12. अर्जदार हयांनी गाडी दि.27/04/2012 ला विकत घेतली आणि दि. 07/05/2012 ला त्यात बिघाड आल्यामुळे लगेच ती गैरअर्जदार क्रं. 2 हयांचे शोरुम मध्ये आणून ठेवली. गाडी वारंटी पिरेड मध्ये असल्याने त्यातील दोष दुर करुन मिळण्याचा अधिकार अर्जदारास आहे व जर काही दोष असतील तर ते दूर करण्याची जबाबदारी गैरअर्जदारांची आहे.
13. गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराची गाडी विकत दिली तेव्हा ही सुरळीत होती व आताही गैरअर्जदाराच्या शोरुम मध्ये चालू अवस्थेत आहे. परंतु सदर गाडी नेण्यासाठी अर्जदार आला नाही म्हणून ठेवलेली आहे.
14. गैरअर्जदाराकडून घेतलेल्या गाडीत वारंटी पिरेडमध्ये साधारण स्वरुपाचा दोष निर्माण झाला असेल तर तो विक्रेत्याच्या खर्चाने दुरुस्त करुन घेण्याचा अधिकार अर्जदाराचा हक्क असला तरी असा सर्वसाधारण दोष उपलब्ध सुविधेनुसार दुरुस्त करुन घेवून गाडी परत न नेता विकत घेतलेली गाडी गैरअर्जदार क्रं. 2 च्या शोरुम मध्ये सोडून देवून त्या गाडीच्या बदल्यात नवीन गाडी किंवा गाडीची किंमत परत करण्याचा अर्जदाराचा हटट हा ग्राहक म्हणून त्याचा अधिकार ठरत नाही.
15. अर्जदाराने दि.08/05/2012 ला पञ पाठवून त्यात गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हयांनी त्वरीत गाडी बदलवून दयावी नाही तर गाडीची किंमत रु.48,251/- परत करावी तसेच मानसीक व शारिरीक ञासाबाबत नुकसान भरपाईची मागणी केली, आणि त्याची अवाजवी मागणी गैरअर्जदारांनी पूर्ण केली नाही म्हणून सदरची फिर्याद दाखल केली आहे.
16. वास्तविक पाहता जेंव्हा गैरअर्जदार क्रं. 2 हयांनी गाडी वारंटी प्रमाणे दुरुस्त केल्यानंतर अर्जदाराने ती घेवून जायला पाहिजे होती. जर सदर गाडीत दुरुस्त होवू न शकणारा निर्मिती दोष असल्याने सदर गाडी योग्य प्रकारे उपभोगात आणता येत नाही असे अर्जदाराचे म्हणणे असेल तर गैरअर्जदाराकडून सदर गाडी ताब्यात घेवून तीची तज्ञ व्यक्तीकडून तपासणी करुन असाध्य निर्मिती दोष सिध्द केला तरच अर्जदारास दोष असलेल्या गाडीच्या बदल्यात नवीन गाडी किंवा दिलेली गाडीची किंमत परत मिळण्याचा हक्क आहे अन्यथा नाही.
17. सदर प्रकरणात गैरअर्जदारांनी शोरुम मध्ये दुरुस्त करुन ठेवलेली गाडी नेण्यासाठी अर्जदार कधीही गेलेला नाही व सदर गाडीची तंज्ञामार्फत तपासणी करुन त्यात असलेल्या निर्मिती दोषामुळे तीचा वापर करता येत नाही हे अर्जदाराने सिध्द केलेले नाही.
18. अर्जदाराने नवीन गाडी व पर्यायाने गाडीच्या किंमतीची केलेली मागणी सर्वथा अनुचित आहे म्हणून गैरअर्जदारांनी सदर मागणी नाकारुन अर्जदाराची दुरुस्त अवस्थेत असलेली गाडी घेवून जाण्यास कळविले ही ग्राहक असलेल्या अर्जदाराच्या प्रती सेवेतील न्युनता अगर अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब ठरत नाही. म्हणून अर्जदार तक्रार अर्जातील कोणत्याही मागणीस पाञ नाही. वरील कारणांमुळे मुद्दा क्रं. 1 ते 3 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात येते.
2) अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 कडे चालू व सुस्थितीत
असलेली त्याची गाडी त्वरीत ताब्यात घ्यावी.
3) गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांना सदर तक्रारीचा खर्च
रु. 1,000/- द्यावा.
4) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पाठवावी.
चंद्रपूर.
दिनांक – 07/09/2013