(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 22 डिसेंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता यांनी डिसेंबर 2010 चे लोकमत समाचार मध्ये विरुध्दपक्ष यांनी प्रकाशीत केलेल्या सहलीबाबत वाचले होते व त्यानुसार तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.2 लोकमत सखीमंच तर्फे मॅनेजर राजेश जोध यांचेशी संपर्क साधला व त्याचे नियोजनानुसार दिनांक 9.1.2011 ते 19.1.2011 पर्यंत सहलीच्या केरळ येथे जाण्याकरीता 5 सदस्यांची बुकींग केली. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी जाहीर केल्याप्रमाणे सहलीची संपूर्ण माहिती घेवून माहितीपञके सुध्दा विरुध्दपक्षाकडून घेतली व पाच टिकीटांची बुकींग प्रत्येकी रुपये 12,500/- प्रमाणे धनादेश विरुध्दपक्षाकडे दिले. त्याबद्दलची पावती सुध्दा व विरुध्दपक्ष क्र.2 यांना तक्रारकर्त्यांना दिली. तक्रारकर्त्याने व त्याचे कुटूंबाने सहलीला जाण्याकरीता ऑफीसमधून सुट्टी मंजूर केली व सहलीला जाण्याची संपूर्ण तयारी सुध्दा केली होती. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.2 यांचे दूरध्वनी क्रमांकावर संवाद साधून श्री राजेश जोध यांना दिनांक 5.1.2011 रोजी सहलीला जाण्याकरीता राहिलेली उर्वरीत रक्कम देवून टिकीटांची मागणी केली. परंतु, त्यादिवशी टिकीटे तक्रारकर्त्याला प्राप्त झाली नाही. त्यानंतर पुन्हा दिनांक 8.1.2011 रोजी सकाळी विरुध्दपक्ष क्र.2 शी संपर्क साधून टिकीटाबद्दल विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, दिल्लीकडून येणा-या सर्व गाड्या दिल्लीमध्ये पडलेल्या धुक्यामुळे विलंबाने चालत आहे व त्याकरीता आम्हीं विलासपूर कोचींग गाडीचे टिकीट काढून त्यात कनफर्म आसन मिळविण्याचे प्रयत्न करीत आहोत व ती गाडी दिनांक 9.1.2011 ला सकाळी 4-40 वाजता येईल व 5-00 वाजता सुटेल असे भाष्य केले व ही गाडी पकडण्याकरीता आपण तयार राहावे असे सांगितले. त्यानंतर पुन्हा विरुध्दपक्ष क्र.2 शी संपर्क साधला असता त्यांनी दिनांक 8.1.2011 ला राञी 9-56 वाजता असे कळले की, 16 टिकीटांपैकी फक्त 8 टिकीटे कनफर्म झाली आहे व तुमचे नांव त्यात नाही व उरलेल्या 8 टिकीटांचे कनफर्ममेशनसाठी रेल्वे अॅथॉरीटीशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यावर तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्षाला वेळोवेळी असे सांगितले की, आम्हीं वेटींगमध्ये राहून प्रवास करु शकत नाही, कारण प्रवास अतिशय दुरचा असून थंडीचे दिवस आहे व सोबत असलेली मंडळी ही 50 वर्ष वयोगटाचे वर असल्यामुळे प्रवास ञासदायक होईल, त्यावर विरुध्दपक्षाने सांगितले की, केरळमध्ये असलेले मंगेश नावाचे गृहस्त आहे व ते टी.सी. सोबत जुगाड करुन आपल्याला कनफर्म टिकीटे करुन देतील व जर तुम्हांला प्रवास करणे कठीण असेल तर तुम्हीं तुमचा प्रवास रद्द करावे, तुम्हांला तुमचे पैसे नागपूर ऑफीसमधून परत दिल्या जाईल. त्यानंतर, तक्रारकर्ता यांनी दिनांक 9.1.2011 रोजी 12-00 वाजता दिल्ली ते चेन्नई ला जाणा-या गाडीमध्ये जाण्याची तयार दर्शविली व विरुध्दपक्ष क्र.2 श्री राजेश जोध यांना संपर्क केला, परंतु त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्दपक्षाला पैसे देवूनही सहलीचा प्रवास करु शकले नाही व सर्व तयार करुन सुध्दा त्यांचा प्रवास रद्द झाला. त्याचे मुळ कारण की, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी सहलीच्या प्रवासचे रिझर्वेशन केले नाही व पैसे देवूनसुध्दा रेल्वे प्रवासाची टिकीटे कनफर्म केलेली नाही या सर्व कारणामुळे तक्रारकर्ता व त्याचे कुंटूंब प्रवासाला गेले नाही व त्या कारणास्तव अतिशय मानसिक ञास सोसावा लागला.
3. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतात की, त्यानंतर तक्रारकर्ता स्वतः विरुध्दपक्ष क्र.2 यांचे कार्यालयात जावून प्रवासाचे पैसे परत मागितले असता, विरुध्दपक्ष यांनी धमकावले की, ‘’तुम्हाला कसले पैस द्यायचे तुम्ही वारंवार पैस मागणी केली तर तुम्हाला लाथा बुक्या पडतील.’’ तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.1 यांना दिनांक 29.1.2011 ला रजिस्टर्ड पञ पाठवून पैशाची मागणी केली, परंतु त्यांनी पञाचे उत्तर दिले नाही व लक्षही दिले नाही. तसेच, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.2 यांना दिनांक 14.2.2011 रोजी रजिस्टर्ड पञ पाठवून सहलीचे पैसे परत करावे याकरीता पाठविले, परंतु त्यांनी पञाचे उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी अधिवक्ता मार्फत दिनांक 28.2.2011 रोजी कायदेशिर नोटीस बजावली. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी वकीलामार्फत नोटीसचे उत्तर पाठवून दिनांक 6.4.2011 रोजी नोटीसमध्ये लिहून पाठविले की, सहलीकरीता दिलेले पैसे बुडीत मान्य केलेले आहे. त्यामुळे, सरते शेवटी तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) तक्रारकर्त्याना झालेल्या नुकसान भरपाई बद्दल प्रत्येकी रुपये 2,50,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
2) तसेच, विरुध्दपक्षांनी 62,500/- रुपये 18 टक्के व्याजासह तक्रारकर्त्यांना परत करण्याचे आदेशीत व्हावे.
3) मानसिक व शारिरीक ञासाबद्दल रुपये 20,000/- तक्रारकर्त्यांना देण्याचे आदेशीत व्हावे.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारीला अनुसरुन आपले लेखीउत्तर सादर केले व त्यात नमूद केले की, तक्रारकर्ता यांनी केरला, कन्याकुमारी सहलीला नागपूर पासून विरुध्दपक्ष क्र.2 यांनी नियोजीत केलेल्या सहलीमध्ये जाण्यास तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांनी तयारी दर्शवून टिकीटाची रक्कम विरुध्दपक्ष क्र.2 कडे जमा केली. तसेच, दिल्ली ते चेन्नई मार्गे जाणा-या रेल्वे गाड्या ह्या दिल्लीत पडलेल्या अतिशय धुक्यामुळे विलंबाने चालत होत्या व त्यामुळे सहलीच्या प्रवासाचे नियोजन विस्कटले होते, याकरीता विरुध्दपक्ष काहीही करु शकत नव्हते. सदरची कृती ही नैसर्गीक होती तरी सुध्दा विरुध्दपक्ष आपल्यापरीने प्रवासाचे टिकीट कनफर्म करण्याकरीता अतोनात प्रयत्न करीत होते. तक्रारकर्त्याप्रमाणे नियोजीत सहलीला जाण्याकरीता इतर कुंटूंब होते व त्यांना सुधारीत नियोजनाबाबत सांगितले असता त्यांनी सहलीला येण्याची उत्सुकता दर्शविली व ते सहलीला येवून सहल पूर्णपणे आनंदाने पार पाडली. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी कोणतीही तयारी दर्शविली नाही व स्वतः सहल रद्द केली, त्याकरीता ते स्वतः कारणीभूत आहे. तक्रारकर्ता यांनी स्वतःच प्रवास रद्द करण्याचे ठरविले. तसेच, पुढे तक्रारकर्त्याने लावलेले आरोप व प्रत्यारोप विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तरात खोडून काढले व नैसर्गीक कृतीमुळे झालेल्या नियोजीत सहलीचे विस्कटने हे विरुध्दपक्ष यांचे हातात नव्हते. त्यामुळे तक्रारकर्ते हे नुकसान भरपाईस पाञ नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहो.
5. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीला लेखीउत्तर दाखल करुन त्यात नमूद केले की, विरुध्दपक्ष क्र.2 हे विरुध्दपक्ष क्र.1 चे प्रतिनीधी असून विरुध्दपक्ष क्र.1 यांचे प्रवासी कंपनी ट्रॅव्हल्स एजंसी आहे. सहलीचे संपूर्ण नियोजन हे विरुध्दपक्ष क्र.1 चे नुसार चालते व विरुध्दपक्ष क्र.1 यांचे मुख्य स्थळ हे औरंगाबाद येथे आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार योग्य त्या न्यायालयात दाखल करणे अनिवार्य होते. या मंचात सदरची तक्रार चालू शकत नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे, असा प्राथमिक आक्षेप नमूद केला.
6. तसेच, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी विरुध्दपक्ष क्र.1 च्या वतीने 50 टक्के अॅडव्हान्स रक्कम घेतली होती व उर्वरीत रक्कम दिनांक 5.1.2011 रोजी दिली होती. सहलीचे आयोजन करणे, टिकीट बुक करणे, टूर मॅनेज करणे व खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याचे काम विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे होते, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 हे फक्त प्रतिनीधी आहे. तसेच, ते तक्रारकर्त्यांशी वेळोवेळी फोनव्दारे संपर्क साधत होते व तक्रारकर्त्यांना प्रवासाबाबत सुचना देत होते की, दिल्ली मार्गाहून येणा-या संपूर्ण रेल्वे गाड्या ह्या तेथे पडलेल्या धुक्यामुळे विलंबाने चालत आहे व काही गाड्या रद्द केल्या सुध्दा आहे त्यामुळे प्रवासाची वेळ बदलून दुस-या रेल्वे गाडीत सोय केलेली आहे, परंतु एकूण 16 प्रवाशांपैकी 8 प्रवाशांचे टिकीट कनफर्म झाले असून उर्वरीत 8 प्रवाशांचे टिकीट कनफर्म करण्याकरीता रेल्वेबोर्डाकडे प्रयत्नशील आहोत. त्यामुळे या सर्व बाबींची माहिती तक्रारकर्ता यांना माहित होती, परंतु फक्त ञास देण्याकरीता व सहजपणे पैसे उकडण्याकरीता तक्रारकर्त्यांनी सदरची तक्रार मंचात दाखल केली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
7. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारी बरोबर 1 ते 9 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने सहलीची माहितीपञक पैसे दिल्याबाबतची पावती, तसेच विरुध्दपक्ष यांनी पाठविलेले पञ व वकीला मार्फत पाठविलेले कायदेशिर नोटीसची प्रत इत्यादी दस्ताऐवज लावलेले आहेत. तसेच, विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तराबरोबर इतर प्रवाशांचे प्रतिज्ञालेख दाखल केलेले आहे व त्याचबरोबर जिल्हा सञ न्यायालय, वरीष्ठस्तर, औरंगाबाद येथे तक्रारकर्त्याविरुध्द झालेल्या आदेशाची प्रत दाखल केली आहे. तसेच, दिनांक 21.12.2014 च्या वर्तमानपञात ‘धुक्यामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत’ याबाबत प्रकाशीत झालेल्या वृत्तपञाची प्रत जोडलेली आहे व दिनांक 9.1.2011 रोजीच्या नागपूर ते तिरुवनन्तपुरम प्रवासाची रेल्वे टिकीटे जोडलेल्या आहेत.
8. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी सदर प्रकरणात लेखी युक्तीवाद दाखल केले. तसेच दोन्ही पक्षांचा मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचे ग्राहक होतात : होय
काय ?
2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेकडून तक्रारकर्त्यास सेवेत ञुटी : नाही
किंवा अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब झालेला दिसून येतो
काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
9. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी सदरची तक्रार अशी आहे की, विरुध्दपक्ष यांनी दिनांक 9.1.2011 ते 19.1.2011 या दरम्यान केरळ, कन्याकुमारी सहलीकरीता जाण्याची इच्छा दर्शविली व विरुध्दपक्ष क्र. 2 ने नियोजीत केले सहलीला जाण्याकरीता प्रत्येकी रुपये 12,500/- प्रमाणे पाच टिकीटा बुक करुन विरुध्दपक्ष क्र.2 यांचकडे टिकीटाचे व सहलीचे पैसे दिले. परंतु, प्रवासाची तारीख जवळ येत असतांना सुध्दा फोनव्दारे चौकशी करुनही तक्रारकर्त्यांना प्रवासाचे कनफर्म टिकीट किंवा पी.एन.आर. नंबर पुरविले नाही व सरते शेवटी कळविले की, दिल्लीमध्ये पडलेल्या धुक्याने रेल्वे गाड्या विलंबाने चालत आहे व काही गाड्या रद्द झाल्या आहेत. तरी सुध्दा रेल्वेचे टिकीट कनफर्म करण्याकरीता प्रयत्न चालू आहेत व सहलीचे नियोजनात बदल करण्यात आला. परंतु, तक्रारकर्त्यांना याबद्दल योग्य माहिती दिली नाही त्यामुळे तक्रारकर्ते प्रवासाला जाऊ शकले नाही व सहल रद्द झाली, तसेच तक्रारकर्त्याचे पैसे परत दिले नाही. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी आपल्या उत्तरात ही बाब स्पष्ट नमूद केली की, सहलीच्या दरम्यानचे काळात दिल्लीतील पडलेल्या धुक्यात ब-याच गाड्या रद्द झाल्या व विलंबाने चालत होत्या, त्यामुळे ही नैसर्गीक कृती असून ती विरुध्दपक्षाच्या आटोक्यातील पलीकडची होती. परंतु, ही बाब तक्रारकर्त्यांना सांगून सुध्दा त्यांनी समजण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांचे बरोबर असलेले इतर प्रवासी यांनी नियोजनात झालेला बदल स्विकारुन प्रवास केला व सहल पारपाडली.
10. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आपल्या उत्तरात प्राथमिक आक्षेप घेवून नमूद केले की, विरुध्दपक्ष क्र.1 हेरंब ट्रॅव्हल्स यांचे मुख्य कार्यालय हे औरंगाबाद येथे आहे व विरुध्दपक्ष क्र.2 हे त्याचे प्रतिनीधी आहे, त्याच्या मार्फत प्रवासाला व सहलीला लागणारे टिकीटांचे शुल्क आकारले त्यामुळे सदरची तक्रार ही या मंचाचे अधिकारक्षेञात बसत नाही, करीता तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. तसेच, तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोट्या स्वरुपाची आहे. तक्रारकर्त्याला टिकीटाची भरलेली रक्कम परत दिलेली असून विनाकारण तक्रारकर्ता खोटी तक्रार दाखल करुन पैसे उकडण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच, तक्रारकर्त्याला प्रवासापूर्वी व सहलीमध्ये बदलेल्या नियोजनाची वेळोवेळी सुचना दिली होती. दिल्ली येथे पडलेल्या धुक्यामुळे रेल्वे गाड्या विलंबाने चालत होत्या व काही गाड्या रद्द झालेल्या होत्या, तरी सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 च्या मार्फत 16 प्रवाशांपैकी 8 प्रवाशांचे टिकीटे कनफर्म झाली होती व उर्वरीत 8 प्रवाशाचे टिकीट कनफर्म करण्यासाठी विरुध्दपक्ष सदैव प्रयत्नात होते. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आपल्या उत्तराबरोबर इतर प्रवाशांचे प्रतिज्ञापञ अभिलेखावर दाखल केले आहे. त्याचे अवलोकन केले असता, विरुध्दपक्षाने नियोजीत केलेल्या सहलीला गेलेले प्रवासी यांचा प्रवास व सहल आनंदाने पारपडली याबाबत नमूद केले आहे.
11. टूर रजिस्टेशन रद्द करण्याबाबतची माहिती ही परिपञकात नमूद केलेली आहे. त्या परिपञकाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, प्रवास 15 दिवसांपूर्वी रद्द करण्यासाठी कळविल्यास 75 टक्के रक्कम परत करता येते, प्रवास 10 दिवसांपूर्वी रद्द करण्यासाठी कळविल्यास 50 टक्के व 5 दिवसांपूर्वी रद्द करण्यासाठी कळविल्यास टिकीटाची रक्कम परत देता येत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांना सहलीला जाण्यापूर्वी दिलेल्या परिपञकाच्या अटी व शर्ती बघता तक्रारकर्ता सदरची रक्कम परत मागण्यास पाञ नाही.
12. दोन्ही पक्षांनी दाखल केलेले दस्ताऐवज व पुराव्याचे आधारे असे दिसून येते की, जरी विरुध्दपक्ष यांनी सहलीचे नियोजन केले, त्या दरम्यानचे तारखेला दिल्ली येथे पडलेल्या नैसर्गीक धुक्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द झाल्या व काही गाड्या विलंबाने चालत होत्या, ही बाब सिध्द होते. तसेच विरुध्दपक्ष यांनी प्रवास व सहलीच्या नियोजनामध्ये बदल झाल्याबाबत तक्रारकर्त्यांना सांगितले, परंतु तक्रारकर्ते हे एकाच गोष्टीवर अडून आहे. त्याच्या तक्रारीनुसार सहलीला जाण्याकरीता भरलेल्या रकमेमुळे सहलीच्या प्रवासाची टिकीटे दिलेली नाही व पी.एन.आर. क्रमांक सुध्दा कळविला नाही, तसेच नैसर्गीक आपत्तीमुळे घडलेल्या गोष्टीवर कुणाचे नियंञण नसते. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास प्रवासाला येण्याबाबत नकार दिलेला नाही. तक्रारकर्त्याने सदरचा प्रवास स्वतःच रद्द केला असे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही खारीज होण्यास पाञ आहे, असे मंचाला वाटते.
करीता, सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 22/12/2016